आजही बहुतांश समाज आणि कायद्याला काही नाती मान्य नाहीत. ही नाती
वेगळी लैंगिक ओळख असलेल्या व्यक्तींची. समलिंगी, उभयलिंगी आणि तृतीयपंथीयांची ही नाती नवी नाहीत. माणसांची माणसांशीच, पण तरीही खूप वेगळी...
आ पली लैंगिक ओळख याचा संबंध खरं तर फक्त
आपल्या लैंगिक जोडीदाराशी असायला हवा. परंतु शारीरवैशिष्ट्ये आणि लिंगवाचक सामाजिक संकेत याबद्दल काटेकोर असलेल्या साचेबद्ध समाजात, थोडंसं वेगळं असणाऱ्याला वाळीत टाकण्याची पद्धत रूढ आहे.
म्हणून वेगळेपण जोपासायला वावच नसलेल्या, या समाजव्यवस्थेत भिन्न लैंगिक ओळख असलेल्या व्यक्तींचं तारुण्य नव्हे, तर बालपण आणि म्हातारपण वेगळं ठरतं...
अबोध बालपणातच आपण वेगळे आहोत, ही जाणीव होत असली, तरी याबद्दल न बोलण्याचं बाळकडूही आपोआपच मिळालेलं असतं. आपण आहोत तसे मोजक्या लोकांमध्ये अभिव्यक्त व्हायचं, इतर वेळी आपण इतरांसारखेच आहोत, असं भासवायचं; खरं रूप लपवायचं, अशी कसरत काही जणांना आयुष्यभर करावी लागते. तर काही जण हे जोखड भिरकावण्याचं धारिष्ट्य करतात. आपल्याला मुलीसारखं राहायला आवडतंय, याची जाणीव विनायकला वयाच्या चौथ्या वर्षापासून होती. लहानपणी त्याचं मुलीसारखं वागणं लोकांच्या नजरेत भरत असलं, तरी इतरांना खटकत नव्हतं. सुशिक्षित ब्राह्मण घरातला थोरला मुलगा असं वागतो, हे वडिलांना त्रासदायक होतं. त्याचं खापर आईवर फोडलं जातं. त्यामुळे बाह्य जगासाठी ‘विनायक’ आणि एकांतात ‘वीणा’ असं दुहेरी आयुष्य ती तिशीपर्यंत जगली.
मुलांनी विज्ञान शाखा, इंजिनिअरिंग घ्यायचं, हे ठोकताळे नाकारून ती वकील झाली. घराबाहेर पडून सामाजिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर, वीणाने दुहेरी जगण्याला नकार दिला आहे. संपूर्णपणे वीणा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे...
समुपदेशन, हार्मोनल उपचार आणि शस्त्रक्रिया असे टप्पे पार करत, तिची स्त्री ओळख मिळवण्याकडे एक एक पाऊल टाकत आहे. त्यामध्ये तिने आपलं कुटुंब, सहकारी यांनाही सामील करून घेतलं आहे. वैयक्तिक निर्णयाचा कामावर परिणाम होऊ नये, तसंच इतर अनेक मुद्द्यांवर सजग असलेल्या सामाजिक क्षेत्रातही लैंगिक निवडीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची संधी म्हणून, तिने हा चर्चेचा घाट घातला. काही अंशी तो सफलही झाला. वीणासाठी आज घराची दारं सताड उघडी नसली तरी पूर्णपणे बंदही झालेली नाहीत. लिंगबदल करूनही मुख्य प्रवाहातील ओळख आणि व्यवसाय कायम ठेवू शकलेली वीणा आजही आपल्या देशात विरळा व्यक्ती आहे...
अनेकांना मात्र अजूनही हिजडा होण्यावाचून पर्याय नाही. दिशा सर्वसाधारण घरात, पण पौरुष्याचा अनाठायी अभिमान असलेल्या जातीत थोरला मुलगा म्हणून जन्माला आली. तिच्या मुलींसारख्या हालचाली, हावभाव वडिलांना असह्य होत, त्याचा राग ते तिच्या आईवर हात उगारून काढत. कळत्या वयात त्यांच्या या वागण्याला विरोध केल्यावर घरातून बाहेर पडण्याशिवाय दिशाकडे पर्याय नव्हता. गरीब घरातल्या तीन मुलांचा संसार एकटीने चालवणाऱ्या एका आईने दिशाला आसरा दिला. कमावता असल्याने दिशाला आपुलकी मिळाली. जन्म दिलेलं घर कधीच आपलं होऊ शकणार नाही, याची तिला पक्की खात्री आहे. जिने आसरा दिला, तीच आपली आई आणि तिची मुलं हीच आपली भावंडं, हे दिशाच्या मनात इतकं पक्कं आहे की, अनवधानाने ती तिच्या जन्मदात्या घराबद्दल अनेक वर्षांत प्रथमच बोलली.
स्त्री होण्याची असोशी दिशाला हिजडा समाजात, तिसऱ्या परिवारात घेऊन आली. आता तेच तिचं अस्तित्व आणि ओळख आहे. समलिंगी पुरुषांबरोबर काम करणाऱ्या संस्थेत काम करून दिशाने आपण नक्की काय आहोत, हे समुपदेशकाबरोबर बोलून, प्रत्यक्ष हिजड्यांमध्ये राहून समजून घेतलं. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रियेने दिशा आज स्त्री झाली आहे.
दिशाच्या आयुष्यात आजवर तीन जोडीदार आले. एक नातं सहज संपलं, दुसरं नातं त्रासदायक होतं, ते प्रयत्नपूर्वक तोडावं लागलं आणि सध्याच्या नात्यातल्या भावनिक गुंत्यातून सुटण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. कारण मूल होऊ शकत नसल्याने, तिच्या जोडीदाराची इच्छा असली, तरी तिच्याबरोबर ‘लग्न’ होऊ शकत नाही, असं दिशाला वाटतं.
सर्वसामान्य स्त्रीचं नातं प्रेमिका, बायको, सून, आई अशा वेगवेगळ्या रूपामुळे कायम राहतं. आमचं नातं कायम प्रेमिकेचंच, त्यात आम्हाला घरात प्रवेश नाही. त्यामुळे आमची पुढची नाती जोडलीच जाऊ शकत नाहीत. घरचे लोक, सहकारी यांचा दबाव येऊन आज ना उद्या माझ्या जोडीदाराला लग्न करावंच लागणार. आपल्यामुळे दुसऱ्या बाईवर अन्याय होऊ नये, म्हणून कितीही त्रास झाला तरी या नात्यातून बाहेर यायला हवं, असं दिशाला वाटतं.
“हिजडे हे बाईहूनही बाईसारखे वागतात (लाडिक आणि प्रेमळ) आणि मुळात पुरुष असल्याने लैंगिक संबंधाबाबत बायकांपेक्षा जास्त खुले असतात. एकाच नात्यात मिळणारं हे कॉम्बिनेशन पुरुषांना आवडतं. बाईबरोबरच्या संबंधात पुरुषाला हे सुख मिळत नाही”, हे या नात्याचं वेगळेपण आहे.
हिजडा म्हणून दिशाचं वर्तमान अगोदरच्या पिढीहून खूप सुसह्य आहे. तिचे गुरू शिकलेले आणि मोकळीक देणारे आहेत. “एकेकाळी त्यांना गुरुंच्या परवानगीशिवाय बाहेर बोलायलाही मनाई होती. आज मी माझ्या मर्जीने मुलाखत देऊ शकते. पण त्याबरोबरच मला भविष्याची चिंता सतावतेय. आज अनेकांना घरात स्वीकारलं जातंय, आता कायद्यानेही तिसरी ओळख मान्य केली आहे, यापुढे आमच्यासारख्या मुलांना वेगळ्या समाजात येण्याची गरज राहणार नाही. मला चेलेच मिळाले नाहीत तर?” दिशा म्हणते, ते भविष्य आता फार दूर नाही.
समलिंगी स्त्री-पुरुष किंवा उभयलिंगी लोकांची ओळख सदृश्य नसते, पण त्यांच्या जगण्यावर, वैयक्तिक नात्यांवर त्यांच्या वेगळ्या ओळखींवर प्रभाव असतोच. “मुलगी आवडते म्हणजे काय, हे कळायला काही मार्ग नव्हता. तरी छोट्याशा गावामध्ये माझ्या वर्गात माझ्यासारख्या आणखी दोन मुली होत्या. त्यांचं नातं लेस्बियन असलं तरी टिपिकल स्त्री-पुरुषांसारखं होतं. अमिता ही पिंकीच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होती. ती कुठे जाते येते, कुणाशी बोलते, यावर तिची नजर असायची. पुढे दोघींनी घरच्यांच्या दबावाला बळी पडून लग्न केलं. पिंकीचा घटस्फोट झाला, पण अमिताचं लग्न जमलेलं आहे.” मनिषा सांगत होती. “इतर लोकांना जोडीदार मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतात, त्याहीपेक्षा आम्हाला जोडीदार शोधणं कठीण वाटतं. पण स्वत:चा स्वीकार केला की, आपल्यासारखे अनेक आपल्या आजूबाजूलाच आढळतात.”
पुरुष आणि स्त्री दोन्ही आवडणाऱ्या शचीचं पुरुषाशी लग्न झालेल्या मैत्रिणीशी असलेलं हृदय नातं अचानक तुटलं. गेली पाच वर्षं ती त्यातून सावरायचा प्रयत्न करतेय, समुपदेशकांकडे जातेय. पण तिच्या भावना समजू शकतील, असे समुपदेशक तिला मिळत नाहीत. अशा स्थितीत प्रत्यक्ष आणि आभासी जगात अनेक मित्र-मैत्रिणी असल्या तरी सगळ्यांसमोर आपली उभयलिंगी ओळख शची उघड करू शकत नाही. लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यापेक्षा उभयलिंगी म्हणजे काय, हे त्यांना समजूच शकत नाही, ही मोठी कुचंबणा आहे.
रवी गे आहे, आज वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि अॅपमुळे ज्या शहरात जाईल, तिथे समानधर्मी भेटू शकतात, पण त्यातून जोडीदार मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे काम, चेला, पाळीव प्राणी, किवा गरजू वृद्ध यांच्यासोबत पुढचं आयुष्य घालवावं, असं वीणा, दिशा, मनिषा, शची आणि रवी यांनी ठरवलं आहे...
mesanyogita@hotmail.com