आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाज हक्काचा आवाज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थळ : बंगळुरू. वेळ : दहा सप्टेंबरची मध्यरात्र. एक ऑनलाइन रेडिओ स्टेशन सुरू झालं.
स्थळ : मुंबई. वेळ : 3 ऑक्टोबर संध्याकाळी सहा. एका समुदायाला राज्याचे मुख्यमंत्री भेटले.
एका महिन्यात घडलेल्या या दोन घटना.
यात खास सांगण्यासारखं ते काय? ऑनलाइन रेडिओ भरमसाट आणि मुख्यमंत्र्यांचं कामच लोकांना भेटणं. तरीही या दोन्ही शहरांत जे घडलं ते अभूतपूर्व! स्वातंत्र्य मिळून 65 वर्षं उलटलेल्या, आर्थिक महासत्तेची स्वप्नं पाहणार्‍या भारतातले हे खर्‍या अर्थाने ऐतिहासिक महत्त्वाचे क्षण!
बंगळुरूमध्ये जे रेडिओ स्टेशन सुरू झालं ते खास समलिंगी, तृतीयपंथी यांच्यासाठी! भारतात प्रथमच ‘क्यू’ हे रेडिओ स्टेशन सुरू झालं. ‘क्यू’ म्हणजे क्विअर, वेगळे लोक. या वेगळ्या लोकांच्या मनोरंजनाच्या गरजा मात्र उपेक्षित. व्यक्त होण्यासाठी, संवाद साधण्यासाठी मुख्य माध्यमात जागाच नाही. एक तर ‘बिचारे’ नाही तर ‘लुटेरे’ अशीच त्यांची ओळख. समलिंगी स्त्रिया (लेस्बियन) तर कुणाच्या खिजगणतीतही नाहीत. चेहर्‍याची ओळख उघड न करताही मनाची कवाडं उघडण्यासाठी या समुदायासाठी रेडिओ हेच सर्वात उपयुक्त माध्यम. ‘बिटविन द शीट्स’ हा खास कार्यक्रम करताना मिळालेला प्रतिसाद पाहून ‘रेडिओवाला’च्या अनिल श्रीवास्तव यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी ही प्रत्यक्षात आणलीसुद्धा.
अगदी रूढिवादी समाजाची पर्वा न करता...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा एका तृतीयपंथीयांच्या मेळाव्यात सामील झाले. ‘‘मी काही फक्त ठरावीक वर्गाचा मुख्यमंत्री नाही. मी सर्वांचा आहे.’’ असं म्हणून त्यांनी तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी बोर्ड, कला अकादमी राज्य सरकार स्थापन करेल, असं आश्वासन दिलं. तृतीयपंथीयांच्या प्रश्नांबद्दल पोलिसांना संवेदनशील केले जाईल, तसेच तृतीयपंथीयांचा वारसाहक्क, दत्तक घेण्याचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकारही मान्य आहेत, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री जे म्हणाले ते प्रत्यक्षात येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तोवर सरकारची मान्यता, सदिच्छा आणि आश्वासनांनीच तृतीयपंथी समाज हरखून गेला आहे...
मध्यंतरी राज्याच्या तिसर्‍या महिला धोरणात प्रथमच सेक्स वर्कर आणि तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आला.
त्यात तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी बोर्ड तसेच कला अकादमी असावी अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. अत्यंत उपेक्षेचं आणि हलाखीचं जीवन जगणार्‍या या समाजाला आज तरी भीक किंवा सेक्स वर्क याशिवाय जगण्याचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत, त्यांची ओळख न लपवता शिक्षण संस्थेत प्रवेश मिळायला हवा. खरी लैंगिक ओळख स्वीकारायची तर अनेकांना घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा वेळी शिक्षणासाठी रात्रशाळा आणि हाताला रोजगार मिळेल तरच सन्मानाने जगता येईल. तृतीयपंथीय समाजाची खरी संख्या कळली तर त्यांच्यासाठी रीतसर काही सरकारी योजना करता येतील, यासाठी इतरांप्रमाणे गणना व्हावी. तरच त्यांना घर, पेन्शन मिळू शकेल, या काही महत्त्वाच्या अपेक्षा आहेत.
खरं तर कायम तिरस्कार किंवा चेष्टेने पाहिले जाणार्‍या या समाजाने अनेक बाबतीत पहिलं पाऊल उचललं आहे. डॉ. सबीना फ्रान्सिस सवेरी हिला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पीएच. डी. मिळाली आहे. सबीना ही डॉक्टरेट मिळवणारी भारतातली पहिली तृतीयपंथी आहे. तर गरीब घरातून आलेल्या, गाण्याचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षणच काय पण गाणी ऐकण्यासाठी साधा रेडिओही घरात नसलेल्या परभणीच्या एका ‘कोती’ने ‘इंडिया टॅलेंट हंट’ गाजवलं. शेकडो वर्षं वेगळ्या पाडलेल्या या समाजाने मुख्य प्रवाहात यावे, स्वावलंबी आणि सन्मानाने जगावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अत्यंत गूढ त्यामुळेच गैरसमज पसरवणारे या समाजातील जाचक रीतीरिवाज कमी होत आहेत. रूढिवादी बंधनं कमी करून गुरू-चेल्यांना सर्वसामान्य समाजात मिसळण्याला, समाजासाठी काम करण्याला प्रोत्साहन देत आहेत. काहींनी स्वत:ची जीवनकहाणी लिहून तृतीयपंथी होण्यामागची प्रेरणा आणि तसं जगणं स्वीकारल्यानंतरचे वास्तव, या जगण्यातले खाचखळगे आणि आनंद, उत्सव लोकांपुढे आणले आहेत. तरीही ही उदाहरणं आहेत बोटावर मोजण्याइतकी.
तृतीयपंथी असो की गे, लेस्बियन; ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारले जावे, असं त्यांचं म्हणणं आणि त्यांचं म्हणणं ऐकलं जावं, एवढंच या समाजाचं मागणं आहे. पण त्यांचं म्हणणं मांडायला वाव देणारं, ऐकून घेणारं, हक्काचं कोणी नाही. काही निवडक वर्तमानपत्रांत, रेडिओवर त्यांचे प्रश्न, समस्या, जगणं याबद्दल कधीमधी बोललं जातं, पण तो एखाद्या घटनेच्या, कार्यक्रमाच्या, विशेष दिवस, सप्ताहाच्या निमित्ताने तुकड्या- तुकड्यात. समाजाच्या रोषाच्या भीतीने किंवा माध्यमांच्या पूर्वग्रहामुळे थोडक्यात पचेल एवढंच. कारण अजूनही आपल्याला वाटतं, समलिंगी लोक हे पाश्चात्त्य देशातून आलेलं फॅड आहे. काहीतरी अभद्र आहे. त्यामुळे या समुदायाविषयी कुठेच मोकळेपणी लिहिलं, बोललं जात नाही.
याचा परिणाम म्हणून आंध्रमधल्या एखाद्या साठीच्या म्हातार्‍याला किंवा जळगावमधल्या एखाद्या 18 वर्षांच्या मुलाला समलिंगी भावना असणारे संपूर्ण जगात आपण एकटेच आहोत, असं वाटायला लागतं. चैन्नईच्या ‘सुना’ला लग्न झाल्यानंतरही आपल्याला जे वाटतंय ते म्हणजे आपण लेस्बियन आहोत, हे कळत नाही. काही जणांपर्यंत संस्था पोहोचतात, तर काही हाती लागेल तो दुवा पकडून संस्थांपर्यंत पोहोचतात. परंतु असे अगणित अंधारात कुढत जगत राहतात...
पण समलिंगी आणि तृतीयपंथीयांची चळवळ पुढे नेणारा, वकालत करणारा आणि जीवनशैलीविषयी संवाद साधणारा मंच ‘क्यू’ रेडिओने उपलब्ध करून दिला आहे. गाण्यांबरोबर ‘एचक्यूओ’ या कार्यक्रमात वैशाली या समुदायातील लोकांशी संवाद साधतो. ‘हार्ट टू हार्ट विथ इनरसाइट’ ही समुपदेशन सेवा आणि ‘लेट्स गेट बियाँड टाइज’ हा जॉन आणि सँडीचा शो आहे. सहा महिन्यांना 365 रुपये ही या रेडिओची फी आहे.
‘‘ही फी गरीब, कष्टकरी लोकांना परवडणार नाही. पण इतरांना परवडू शकेल,’’ बंगलोरमध्ये ‘व्हिडिओ व्हॉलिंटियर्स’सोबत काम करणारा क्रिस्ती राज म्हणतो. क्रिस्ती हा मुलीचा मुलगा झालेला ट्रान्ससेक्शुअल आहे. क्रिस्तीची मुलाखत ‘क्यू’ वर ऑन डिमांड शोच्या यादीत आहे. क्रिस्तीने आपली ओळख उघड केली आहे. त्याने यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. ‘देशभरात सुमारे वीस लाख समलिंगी आणि तृतीयपंथी आहेत. मात्र माध्यमांच्या मुख्य प्रवाहात त्यांना स्थान नाही. म्हणूनच आमच्या कार्यक्रमात संगीत कमी आणि गप्पा जास्त होतील,’ असं कार्यक्रम विभागाचे महाव्यवस्थापक सनी आहुजा म्हणाले. म्हणूनच ‘क्यू’वर फॅशन, मनोरंजनाबरोबर समुदायाशी निगडित बातम्या, रोजगार, कायदा आणि इतर गंभीर माहिती देणार्‍या कार्यक्रमांचाही समावेश आहे. सध्या हे कार्यक्रम इंग्रजी आणि हिंदीत आहेत. लवकरच ते प्रादेशिक भाषेतही सादर केले जातील. क्यू रेडिओ या समुदायासाठी आवश्यक आहेच; त्याचबरोबर त्यांना समजून घेण्याची इच्छा असलेल्या समाजाला मार्गदर्शक आहे.
mesanyogita@hotmail.com