आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sapna Pathak Article About Relation, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाते चौकटी पलिकडेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला आठवतंय, की सातवी-आठवीत असताना मुलीकडे बघणं आवडू लागलं. पण तेव्हा मला माहीत नव्हतं, की त्या कशासाठी आवडतात. मुलांबद्दल मला कधीच आकर्षण वाटलं नाही.

आय डोंट थिंक धिस इज राइट ऑर राँग, आय अ‍ॅम व्हेरी सॅटिसफाइड विथ व्हॉट आय अ‍ॅम डुइंग आणि मला जे ‘फँल’ होतं, ते मी स्वीकारतही गेले आहे.

मी।एका मिडलक्लास जॉइंट फॅमिलीतली. मुंबईकर. घरात मुलींची संख्या जास्त. त्यामुळे सगळ्या मुली एकत्र आल्या, की खूप धिंगाणा असायचा. मी तिसरी मुलगी होते. त्यामुळे आईला भरपूर काम असायचे. माझ्या मोठ्या बहिणीमध्ये आणि माझ्यात नऊ वर्षांचे अंतर आहे. माझ्यात आणि मधल्या बहिणीमध्ये पाच वर्षांचे अंतर आहे. मी मुलगी असले तरी, मला कधी कोणी वाईट वागवलं नाही. वडलांनीही कधी भेदभाव केला नाही. उलट लाडच जास्त झाले. काय पाहिजे ते दिले.

मला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घातले गेले. मी अभ्यासात फार चांगली नव्हते. पास होण्याइतपत मार्क मिळायचे. मला कलाकुसरीची (क्राफ्ट) खूप आवड होती. मी क्रिएटिव्ह होते. माझं सगळं लक्ष आर्टिस्टिक गोष्टींकडे होतं. मला जीन्स, टी शर्ट घालायला आवडायचं. फ्रॉक घालायला आवडायचं नाही. माझ्या इतर बहिणी मात्र फ्रॉक घालायच्या. दिवाळी, वाढदिवस असला की मी घरच्यांच्या मागे लागायचे, की मला जीन्स पाहिजे. माझ्या टी शर्ट-जीन्स घालण्याला घरच्यांकडून कधी विरोध झाला नाही.

मला आठवतंय, की सातवी-आठवीत असताना मुलीकडे बघणं आवडू लागलं. पण तेव्हा मला माहीत नव्हतं, की त्या कशासाठी आवडतात. मुलांबद्दल मला कधीच आकर्षण वाटलं नाही. मला जे वाटलं, त्याच्याबद्दल मला काही चुकीचं वाटलं नाही. आय डोंट थिंक धिस इज राइट ऑर राँग, आय अ‍ॅम व्हेरी सॅटिसफाइड विथ व्हॉट आय अ‍ॅम डुइंग आणि मला जे ‘फील’ होतं ते मी स्वीकारतही गेले आहे.

दहावी झाल्यावर मला आर्टच्या कॉलेजला जायचं होतं. घरच्यांचा माझ्या निर्णयाला पाठिंबा होता. त्या वेळी ‘जेजे’ सर्वांत उत्तम आर्ट कॉलेज मानलं जायचं. म्हणून मी ‘जेजे’ला प्रवेश परीक्षा दिली, पण माझा नंबर नाही लागला.
मग मी दुसर्‍या कॉलेजला नाव घातलं. तिथलं शिक्षण एवढं चांगलं नव्हतं; पण बाबा म्हणाले, ‘एक वर्ष इथं कर, मग परत दुसर्‍या वर्षी इतर कॉलेजात ट्राय करू या.’ पुढच्या वर्षी ‘रहेजा’त प्रवेश मिळाला.

मी पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेले, तेव्हा नलिनी रेल्वे पास कन्सेशन फॉर्मसाठी रांगेत उभी होती. मी नलिनीकडे बघितलं आणि तिथेच तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं. मला तिच्याबद्दल काय ‘फीलिंग्ज’ आहेत, हे तिला सांगायचं होतं, म्हणून एकदा मी तिच्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि तिच्या कंपासपेटीत ठेवली. पण तिच्या मैत्रिणींनी पाहिलं, की हिने काहीतरी कंपासपेटीत ठेवलं आहे, म्हणून मी लगेच ती चिठ्ठी काढून घेतली.

आमची हळूहळू ओळख वाढली. कॉलेजला जाता-येताना आम्ही बरोबर जाऊ लागलो. मी कधी लवकर आले, तर वांद्रे स्टेशनला थांबायची. त्यांचा ग्रुप ट्रेनने आला, की मी तिच्याबरोबर कॉलेजला चालत जायचे. हळूहळू सगळे आम्हाला ‘नवरा-बायको’ म्हणून चिडवायला लागले. माझ्या बाजूला एक मुलगी बसायची, ती एकदा म्हणाली, ‘तुम दोनों शादी कर लो।’

माझ्या बरोबरच्या एक-दोन मुलांना शंका आली. त्यातल्या एकाने मला विचारले. तो नक्की काय बोलला, हे आठवत नाही. मग मी त्याला दम भरला- ‘तुला काय करायचंय? आणि त्याला काय करायचंय? जस्ट माइंड युवर ओन बिझिनेस.’ खरं तर तेव्हा आम्ही दोघी आमच्या विश्वात होतो. इतर जण काय म्हणतील, याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नव्हतं. पुढे काय होणार? पुढे आम्ही एकत्र राहणार का? हे काही माहीत नव्हतं. कॉलेज झाल्यानंतर जॉब मिळत नव्हता, म्हणून मी आणि तिने ठरवलं, की आपणच पार्टनरशिपमध्ये काहीतरी सुरू करू या. त्यात काही यश मिळालं नाही. दोन वर्षांनी मी म्हणाले, की आपल्या दोघींपैकी एकीने तरी परमनंट जॉब करावा म्हणजे, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ. मी परत जॉब शोधू लागले. एका फर्ममध्ये सहा वर्षे काम केलं.

कुठल्याही नोकर्‍यांमध्ये मी ‘आऊट’ (माझी लेस्बियन ही ओळख जाहीर केली नाही.) झाले नाही. मला लोक विचारायचे, की तू लग्न का नाही केलंस? मी म्हणायचे, ‘मला लग्न नाही करायचं.’ माझ्या आईने मला एकदा विचारलं, ‘काय तुला लग्न करायचं की नाही?’ मी म्हणाले, ‘नाही, मला काही लग्नबिग्न करायचं नाही.’ आई तिच्या स्वत:च्या लग्नाबद्दल समाधानी नव्हती. त्यामुळे ती माझ्या लग्नासाठी बळजबरी करत नव्हती. ‘तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला काय करायचं, ते तुम्ही ठरवा.’

2002मध्ये आई वारली. आता नलिनीच सोबतीला आहे. तिच्यात आणि माझ्यात भांडणं होतात, पण विकोपाची भांडणे विरळ. माझ्या मधल्या बहिणीचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं. तोवर माझ्यावर लग्नाचा दबाव नव्हता. नंतर सगळ्या मावशा विचारायला लागल्या, की ‘तुझ्या लग्नाचं काय?’ मी लग्न करणार नाही, हे ठामपणे सांगितलं. काही दिवसांनी मी माझ्या सर्वात मोठ्या बहिणीला ई-मेलवरून ‘आऊट’ झाले. ई-मेलला उत्तर यायला थोडा वेळ लागला. मग उत्तर आलं, की ‘इट इज ओके विथ मी, इफ यू आर गोइंग टु बी हॅपी.’ तिनं जरी अ‍ॅक्सेप्ट केलं असलं, तरी ती स्वत:हून हा विषय कधी काढत नाही.

कॉम्प्युटर शिकल्यावर जसं नेट वापरायला यायला लागलं, तसं मी विविध वेबसाइट््सवर लेस्बियन मैत्रिणी शोधू लागले. मी माझ्यासारख्यांशी ओळख करून घेऊ लागले. काही काळाने ‘फेसबुक’वरून मला भारतातील एक लेस्बियन मैत्रीण मिळाली. मग तिच्यामार्फत ‘फेसबुक’वर अनेक मैत्रिणी मिळाल्या. वडील आता 74 वर्षांचे आहेत. त्यांना मी माझ्या कम्युनिटीबद्दल सांगते, पण मला माहीत नाही, त्यांना ते कितपत झेपतं. मला वाटतं, की त्यांना थोडी कल्पना असणार, कारण मागे मी त्यांना ‘एक माधवबाग’ (लेखक - चेतन दातार नावाचे) नाटक बघायला पाठवलं. ते घरी आल्यावर मी विचारलं, ‘कसं वाटलं?’ ते ‘चांगलं होतं’, एवढंच बोलले. नलिनी जेव्हा घरी येते, तेव्हा तिचं ते आनंदाने स्वागत करतात. ती खूप दिवस घरी आली नाही, तर ते फोन करून तिला विचारतात, ‘कधी येणार आहेस?’ माझ्या शेवटच्या जॉबपासून मी ‘आऊट’ व्हायला लागले. मला कोणी विचारलं, की लग्न का नाही केलंस, तर मी सांगू लागले, की आपल्या देशात दोन मुलींना लग्न करायला कायद्यानं मान्यता नाही. यावर मला अजून तरी कोणी वाईट प्रतिक्रिया दिलेली नाही...

(samapathik@hotmail.com)