आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SaptaRang Book On Homosexual And Transgender, Gay, Lesbian

सप्तरंगी लिखाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आता आपलं सुरळीत चालेल असं वाटत असतानाच मुलाने आपण समलिंगी आहोत, ही धक्कादायक बातमी प्रथम बहिणीला व नंतर आम्हा दोघांना सांगितली. आम्ही हादरूनच गेलो. सर्वप्रथम आमच्यासारख्या पापभीरू व देवावर पूर्ण श्रद्धा असलेल्या माणसांवर असा प्रसंग कसा आला, आमचं काही चुकलं का, असा विचार मनात आला.’ आपला मुलगा किंवा मुलगी समलिंगी आहे, असं कोणत्याही आईबापाला पहिल्यांदा कळल्यावर सर्वसाधारणपणे हाच विचार त्यांच्या मनात येत असावा. शेकडो वर्षांपासून आपल्या भारतात समलैंगिकता असल्याचे पुरावे असले (उदा. खजुराहोतील शिल्पे) तरी आज एकविसाव्या शतकातही समलिंगी वा तृतीयपंथी व्यक्ती (LGBT - lesbian, gay, bisexual, transgender) यांच्याविषयी नेमकी शास्त्रीय माहिती फारच कमी जणांना असते. समलिंगी म्हणजे नेमके कोण? ज्या पुरुषाला स्त्रीसारखे कपडे घालायला, तिच्यासारखे राहायला आवडते त्याला काय म्हणायचे? तृतीयपंथी व्यक्ती तशीच जन्माला आलेली असते की तिला तसे बनवले जाते? या सगळ्या व्यक्ती ‘नॉर्मल’ असतात की त्यांच्यात काहीतरी ‘प्रॉब्लेम’ असतो? हे प्रश्न पडतात सगळ्यांनाच, पण त्यांची उत्तरे कुठे शोधायची ते माहीत नसते. अशा परिस्थितीत आपले मूल ते समलिंगी असल्याचे सांगते, तेव्हा धक्का बसणे, खचून जाणे, अविश्वास, वस्तुस्थिती नाकारणे, त्याचे/तिचे लग्न झाल्यावर सगळं नीट होईल असा विश्वास वाटणे, आपल्यातच दोष आहे असे वाटणे, हा प्रकार नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी डॉक्टरकडे न जाता तो ‘दुरुस्त’ करण्यासाठी बाबा/महाराजांचा आश्रय घेणे, इत्यादी प्रतिक्रिया सर्वसामान्यपणे व्यक्त होतात. या प्रतिक्रियांचा त्या मुलावर काय परिणाम होतो, याविषयी नंतर. या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य डॉक्टर किंवा शास्त्रीय परंतु सुलभ भाषेत सहज उपलब्ध असलेली पुस्तके यांच्यामार्फत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, भारतीय भाषांमध्ये अशी पुस्तके फारच कमी प्रमाणात आहेत. मराठी वगळता हिंदी, कन्नड व बांगला या भाषांमध्ये काही पुस्तके आहेत.
मराठीतील बरीचशी पुस्तके बिंदुमाधव खिरे यांनी लिहिलेली वा संकलित केलेली असून त्यांच्याच पुणेस्थित ‘समपथिक ट्रस्ट’तर्फे प्रकाशित केलेली आहेत. ‘माझे पहिले पुस्तक मी पुण्यातल्या एका प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेकडे दिले होते. परंतु अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी त्यात अनेक बदल सुचवले, जे मला स्वीकारार्ह नव्हते. तेव्हा मीच ते पुस्तक काढायचे ठरवले. आणि त्यानंतर कधीच मी इतर प्रकाशकांच्या दारात गेलो नाही,’ असे खिरे यांचे म्हणणे आहे. खिरे यांनी नुकतीच ‘सप्तरंग’, ‘मनाचिये गुंती’ आणि ‘अंतरंग’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांच्या या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय परंतु सर्वसामान्य वाचकाला समजेल, अशा भाषेत ती आहेत. त्यात ‘एलजीबीटी’ कम्युनिटीच्या संदर्भात वापरल्या जाणार्‍या शब्दांचे अर्थ आहेत. त्याविषयी इतर माहिती कुठे मिळू शकते, याचे संदर्भ आहेत. आणि अर्थातच पालकांचे अनुभव इतर पालकांसाठी दिलासादायक आहेत. आपण एकटे नाही, आपल्या मुलाचा वा आपला यात काही दोष नाही, आपले मूल पूर्वी होते तसेच आहे, याची जाणीव करून देण्याचे मोठे काम ही पुस्तके करू शकतात. परंतु त्यासाठी ती सर्वदूर पोहोचणे आवश्यक आहे, हे निश्चित.
एलजीबीटी संबंधित साहित्याची विक्री करणारी www.queer-ink.com ही एक वेबसाइट आहे. त्यावर अनेक पुस्तके, नियतकालिके आहेतच; परंतु शंभरहून अधिक शब्द असलेला एलजीबीटी शब्दकोशही आहे. या विषयावरची पुस्तके कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात, अगदी मुंबईतसुद्धा, समोर मांडलेली दिसत नाहीत. या विषयाशी निगडित लाजिरवाण्या, नकोशा, अपराधी भावनांमुळे चारचौघांसमोर ते मागणेही सर्वांनाच जमेल असेही नाही. त्यामुळे वेबसाइटवरून पुस्तके मागवणे त्या मानाने सोपे जाते.
पुस्तके का हवीत, याला एकमेव उत्तर आहे, जर तुमचे मूल या वर्गात मोडणारे असेल तर त्याच्याविषयी जास्तीत जास्त जाणून घेणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चित्रा पालेकर यांचा याविषयीचा अनुभव मार्गदर्शक ठरावा, असाच आहे. ‘साधारण वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीने- शाल्मलीने मला सांगितले, की ती लेस्बियन आहे. मला धक्का नाही बसला, पण मी चक्रावले नक्की. त्या क्षणी मला याविषयी काहीच माहिती नव्हती आणि ती मी करून घ्यायचं ठरवलं. तेव्हापासून माझा जो प्रवास सुरू झालाय तो आजही सुरूच आहे आणि एका लेस्बियन मुलीची आई असणं माझ्यासाठी तरी एक विशेषाधिकार आहे,’ असं चित्राजींना मनापासून वाटतं. त्यांनी त्या वेळी या विषयावरचं खूप काही वाचलं, अजूनही वाचतात. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, भारतात एलजीबीटी व्यक्तींच्या आईवडलांसाठी त्या एक मोठा आधार आहेत. मागच्या आठवड्यातच चेन्नईत एका पालकांच्या परिसंवादात त्या सहभागी झाल्या होत्या. ‘माझी मुलगी लहानपणापासून लाघवी, हुशार, मेहनती आहे. ती लेस्बियन आहे म्हणून हे सगळे तर बदललेले नाही. उलट तिने मला हे सांगितले याचा अर्थ ती धाडसी आहे, विचारी आहे, तिला प्रामाणिकपणे जगायचंय आणि मुख्य म्हणजे माझ्यावर तिचा विश्वास आहे,’ चित्राजी म्हणतात. जसं त्या या विषयावर अधिक वाचत गेल्या, अधिकाधिक एलजीबीटी व्यक्तींना, त्यांच्या पालकांना, त्यांच्यासोबत काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांना भेटत राहिल्या, तशा त्यांच्या जाणिवा रुंदावत गेल्या, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मुख्य म्हणजे भीती दूर पळाली.
‘समपथिक ट्रस्ट’ने प्रकाशित केलेली प्रस्तुत पुस्तके नेमकी हीच भूमिका वठवतात.
- ‘सप्तरंग - तृतीयपंथी व ट्रान्सजेंडर मुलामुलींच्या
आत्मकथा’ किंमत रु. 125
- ‘मनाचिये गुंती - समलिंगी मुलामुलींच्या पालकांचे अनुभव’
किंमत रु. 90
- ‘अंतरंग - समलिंगी मुलामुलींच्या आत्मकथा’
किंमत रु. 150

प्रकाशक - समपथिक ट्रस्ट, पुणे. samapathik@hotmail.com
mrinmayee22@gmail.com