आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आडवळणाचे प्रवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकविलक्षण व्यक्तींच्या जीवनाविषयी असलेल्या आदर, आकर्षणापोटी इतर अनेक व्यक्तींचा त्यांना निकट सहवास लाभणे स्वाभाविक असते. स्त्री-स्त्री व पुरुष-पुरुष संबंध ज्या निकोपपणे बघितले जातात त्याप्रमाणे स्त्री-पुरुष मैत्री समजून घेतली जात नाही.


‘प्रेमातून प्रेमाकडे’ हे अरुणा ढेरे यांचं स्त्री-पुरुष मैत्रीचा, विशेषतः लग्नबाह्य मैत्रीचा धांडोळा घेणारं पुस्तक नुकतंच वाचनात आलं. मैत्री, सौहार्द, जिव्हाळा, प्रेम, दैहिक अथवा अदैहिक अशा अनेकपदरी गुंतागुंतीच्या बारकाव्यांनी समृद्ध असणारे अनोखे स्त्री-पुरुष संबंध वाचताना सहज सुचलेलं शब्दबद्ध करायचा हा प्रयास. 


‘एकाच नदीत दोनदा पाय बुडवता येत नाहीत’ हे मानवी संबंधांबाबतही तंतोतंत लागू पडणारं विधान आहेेे, किंबहुना प्रवाही अशा दोन व्यक्तींमधल्या बंधाचा मागोवा घेणं, ही अशक्य कोटीतील गोष्ट काही अंशी त्या दोन व्यक्तींमधील पत्रव्यवहारामुळे साध्य होते. 


पुस्तकात दखल घेतलेल्या प्रत्येक समीकरणाची पार्श्वभूमी व्याप्ती वेगळी आहे. १८९५मध्ये शिकागोच्या धर्म परिषदेतील यशानंतर विवेकानंद लंडनला गेले, जिथे वयाची तिशी न ओलांडलेल्या मार्गारेट नोबेलने त्यांना पाहिलं. वर्ष -दोन वर्षांच्या काळात स्वामीजींकडून भारताचा इतिहास, धर्म, संस्कृती यांची ओळख करून घेऊन एतद्देशीय समाजासाठी काम करायला १८९८मध्ये मार्गारेट भारतात आली, आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारून ‘भगिनी निवेदिता’ झाली. स्वामीजींचा सहवास त्यांना लाभला तो अवघा चार वर्षांचा, पण विवेकानंदांच्या पश्चातही स्त्रीशिक्षण, स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य झोकून देऊन निवेदितांनी या मैत्रीचा वेलू गगनावरी नेला. ऐहिक आशा-आकांक्षांपलीकडला हा विस्तार मन थक्क करणारा आहे. भगिनी निवेदितांनी आपल्या अकृत्रिम स्नेहाची शिंपण करून गोपाळ कृष्ण गोखले या व्युत्पन्न महासंयमी राजनीतीज्ञ आणि मनोज्ञ व्यक्तीवरही सावली धरली, समवयस्क पण भिन्नस्वभावी मैत्रीचे मार्ग वेगळे तरी उद्दिष्ट समान. दहा वर्षांच्या या स्नेहात व्यक्तिगत ओलावा आणि समाजाभिमुख साथ यांचा हृदयसंगम आढळतो, तर पंचविशीतल्या सरोजिनी नायडू आणि परिपक्व गोखले यांचा स्नेहही मन हेलावणारा आहे. उदात्त कार्याला समर्पित आयुष्यांमध्ये आपुलकी नि स्नेहाचे हे बंध अस्सल माणूसपण देतात. एकमेकांवर हक्क गाजवताना, एकमेकांची काळजी घेताना मायेच्या उबेत एक आगळाच झळाळ दिसतो. 


अग्निशिखा सरला घोषाल आणि गांधीजी यांच्यातले बंध हे गूढ वाटावं असं रसायन आहे. १९१९-२० दरम्यान केवळ मैत्रीण नव्हे, तर ईध्यात्मिक पत्नीपद बहाल करणाऱ्या गांधीजींपासून मतभिन्नतेमुळे दुरावताना सरलादेवी मोडून पडल्या, तर ब्रिटनमधल्या गर्भश्रीमंत घरातील मेडेलीन स्लेड गांधीजींच्या कार्याने प्रभावित होऊन १९२५ मध्ये वयाच्या ३३व्या वर्षी भारतात दाखल हाेते, तेव्हा साठीत असलेल्या गांधीजींची जीवनशैली, विचारसरणी यांना अनुसरून मेडेलीन उर्फ मीराबेन खादीचा प्रचार करते, गोलमेज परिषदेसाठी सहायकाची भूमिका निभावते, तुरुंगवासही सोसते. मात्र, व्यक्तिनिष्ठ मेडेलीनला गांधीजींचा स्नेह अपुरा पडतो. न जाणो हा संघर्षही पुरेसा यातनामय झाला असावा. 


पुढील प्रकरणांमध्ये अन्नपूर्णा तर्खडकर, कादंबरीदेवी, व्हिक्टोरिया ओकॅम्पो असा रवींद्रनाथांच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावरचा तिपेडी वेध घेणं हा तरल काव्यात्म अनुभव आहे. अॅना उर्फ नलिनी यांच्याशी जडलेल्या महिन्या- दीड महिन्याच्या स्नेहाने रवींद्रनाथांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी घडली तो पोत किती आश्वासक असला पाहिज़े या विचाराने आपण चकित होतो. दुसरीकडे बालसवंगडी असलेली वहिनी कादंबरीदेवी हिच्याशी असलेलं मैत्र तर चटका लावणारं आहे. तर ६३ वर्षांच्या रवींद्रनाथांवर ३४ वर्षांच्या व्हिक्टोरियाने कवी म्हणून आणि माणूस म्हणून उधळून दिलं. हे प्रेम सर्वार्थाने स्वीकारायला असमर्थ असलेल्या रवींद्रनाथांनी अतिथी नावाच्या कवितेद्वारे त्या शल्याचं जणू चिरंतन स्मारक उभारलंय. 


अतिथी 
माझे हद्दपारीचे दिवस तू तुझ्या सौंदर्याने कोवळे केलेस। 
किती साध्या करुणेनं मला तुझ्या जवळ घेतलंस तू 
तू एखाद्या अनोळखी ताऱ्यानं हसून माझं स्वागत करावं तसं 
मी उभा राहतो एकटाच सज्जामध्ये आणि दक्षिणेचं आभाळ पाहतो 
तेव्हा अवकाशातून आवाज येतो, तुला ओळखतो आम्ही 
कारण अपाराच्या अंधारातून तू आमचा पाहुणा - उजेडाचा पाहुणा म्हणून आलास 
अगदी त्याच अलौकिक आवाजात तू आर्ततेनं मला म्हणालीस, ‘तुला ओळखते मी’. 
आणि तू तर माझी भाषाही जाणत नाहीस, तू जाणतेस हृदय. 
या पृथ्वीच्या पाठीवर माझ्यातला कवी तुझा सदैव पाहुणा राहील. 
तुझ्या प्रेमाचा पाहुणा!  


पुस्तकात प्रेमाची परिणती लग्नात होऊनही परिस्थितीवश भावबंध उघड न करणारं असं एकमेव नातं आहेे ते सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेंकेल यांचं. तर पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट हे वादळी व्यक्तिमत्त्व स्नेहकवेत घेणारी कोणी एक रशियन अॅना जी एका हाकेसरशी स्वतःचे वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून अत्यंत जोखमीची अशी रशियन भाषेतील बॉम्बविषयक पुस्तिका अनुवादित करायचे काम करते आणि बापटरूपी झंझावात आपल्या आईवडिलांकडे हा जन्म देशसेवेसाठी दिला तरी पुढचा जन्म मनभावन सखीबरोबर व्यतीत करण्याची अनुज्ञा पत्रातून मागतात आणि या स्नेहबंधाला अकल्पित उंचीवर नेतात. वयाच्या अठराव्या वर्षी विवाहबद्ध होऊन पत्नी रुक्मिणीशी आठ वर्षांचा संसार करणारे नि अॅनाशी असलेलं गूज अलवारपणे सांभाळणारे बापट स्तिमित करतात.  


भीम रामजी सकपाळ अर्थात बाबासाहेब आंबेडकर आणि आयरिश मैत्रीण फॅनी उर्फ प्रॅन्सिस्का फिट्झेराल्ड यांचा पीळही कसदार आहे. नात्याकडून असलेली अपेक्षा समजत असून ती स्वीकारता येत नसतानाही कडवटपणा येऊ न देण्याचं कसब फार थोड्यांना साधतं त्यातलं हे एक उदाहरण म्हटलं पाहिजे.  


कऱ्हाडचे समाजसेवक देशभक्त बाबूराव गोखले यांचं मित्राची बहीण सुशीला आठवले हिच्याशी असलेलं मैत्र बहरू न शकल्यामुळे तिचा झालेला अकाली अंत, चंपू नावाच्या ज्या मैत्रिणीने मनाने वरले त्याच्यासाठी आजन्म अविवाहित राहून केलेले समर्पण आणि सुलोचनाबाईंशी केलेला संसार या सहृदय विवेचनापाशी स्त्री-पुरुष संबंधांनी जीवनाला बहाल केलेल्या अलौकिक अस्तराचा पुस्तकातील आढावा थांबतो. 


मूळचा कवयित्रीचा पिंड असलेल्या अरुणाताईंनी हा नाजूक विषय नजाकतीने हाताळला आहे. अशा संबंधांचे तळ गाठणं अवघड असून या विषयाकडे स्वाभाविक निकोप दृष्टी ठेवणारं लेखन हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. महाभारतातल्या व्यक्तिरेखांवर ‘कृष्णकिनारा’तून भाष्य काय किंवा गेल्या शे-दीडशे वर्षांतल्या महनीय व्यक्तींच्या न उलगडलेल्या पदराचा माग लेखिका फार सिध्दहस्तपणे घेते. 


लोकविलक्षण व्यक्तींच्या जीवनाविषयी असलेल्या आदर, आकर्षणापोटी इतर अनेक व्यक्तींचा त्यांना निकट सहवास लाभणे स्वाभाविक असते. स्त्री-स्त्री व पुरुष-पुरुष संबंध ज्या निकोपपणे बघितले जातात त्याप्रमाणे स्त्री-पुरुष मैत्री समजून घेतली जात नाही. तो अधिक कुतूहलाचा, उघडपणे न बोलण्याचा व उपहासाचा विषय ठरतो. 


शिक्षण, साहित्य, कला, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी अशा अनेक कारणास्तव स्त्री-पुरुष एकत्र येतात आणि आपण शोधत होतो ती जवळीक मिळाल्याचा विस्मय, आनंद वाटून साहचर्याला सुरुवात होते. संवाद, सहवास व बहुआयामी बंधाचे मूळ धरू लागते. परस्पर सामंजस्य, निखळ आनंद, समर्पण हा या नात्याचा पाया असतो. मात्र खेदाची गोष्ट अशी की पुरुषांच्या विवाहेतर सहभागाविषयी मवाळ धोरण घेणारा समाज स्त्रीविषयी कडवट धोरण अवलंबतो. कुटुंब आणि सामाजिक स्थान टिकविण्याची तथाकथित जबाबदारी आपल्या शिरावर आहेे असे मानणारा सहभागी पुरुष घटकही या संबंधांविषयी वाच्यता टाळतो, सामाजिक जीवनात प्रेयसीला सामावून घ्यायला बिचकतो, संबंधांची हमी म्हणजे कायदेशीर बंधन असाच अर्थ मर्यादित असता तरी पुरुषाचे विवाहेतर सौहार्द पत्नीशी प्रतारणा ठरत नाही. पण पती असूनही पत्नीची अशी गुंतवणूक हा अक्षम्य अपराध ठरतो. बहुतांशी वेळा स्त्रियांची आयुष्ये, मानसिक स्थैर्य, कर्तृत्व याला उतरती कळा लागते. सामाजिक अराजकता थोपवण्यासाठी असलेलं कायदेशीर विवाहबंधन मानसिक गुंतवणूक थोपवू शकत नसताना पुरुषाला झुकतं माप नि स्त्रीला उपेक्षा देते हे खरं तर या व्यथेचं कारण आहे. स्त्रीपुरुष समानाधिकार मानणाऱ्यांनी, जीवनपट देखणा करणाऱ्या अशा मैत्रीचा उघड स्वीकार करणं ही एक प्रकारे मैत्रीची बूज राखणारं नि समाजमन सहृदय करण्याच्या दिशेवरचं दायित्वाचं पाऊल ठरेल.


-सारंगी आंबेकर, मुंबई
saarangee2976@yahoo.co.in 

बातम्या आणखी आहेत...