Home | Magazine | Madhurima | Saroj Mandavagade Writes About Pt When Nehru had come to school

पं. नेहरू शाळेत आले होते तेव्‍हा

सरोज मांडवगडे | Update - Oct 03, 2017, 12:07 AM IST

‘सत्तरीच्या सदिच्छा’ या संपादकीयाद्वारे केलेल्या आवाहनानुसार आलेला हा लेख, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींना उजाळा देईल

 • Saroj Mandavagade Writes About Pt When Nehru had come to school
  ‘सत्तरीच्या सदिच्छा’ या संपादकीयाद्वारे केलेल्या आवाहनानुसार आलेला हा लेख, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींना उजाळा देईल, यात शंका नाही.

  १९४७ मधला स्वातंत्र्यसोहळा फारसा आठवत नाही, पण त्यानंतरच्या आठवणी जपलेल्या आहेत. माझा जन्म खान्देशातील जळगाव जिल्ह्यातला आहे. तेव्हा खान्देश संपूर्ण काँग्रेसमय होता. इतर पक्षांची नावेही फारशी ठाऊक नव्हती. खादीचे पांढरेशुभ्र कपडे व डोक्यावर खादीची टोपी घालून १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला शाळेची मिरवणूक निघायची. प्रत्येकाच्या घरावर खादीचा तिरंगा झळकत असे. नगरपालिकेवर त्या काळीसुद्धा रोषणाई करीत. अत्यंत शिस्तबद्ध व गंभीर असणारे मुख्याध्यापक त्या दिवशी मात्र खूप उत्साहाने कार्यक्रम पार पाडीत.

  मला आठवतं, मी चौथीत असताना शाळेत पं. नेहरू आले होते. आमच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पताका, तोरणं वगैरे लावून सुंदर गुलाबांनी स्टेज सजवलं होतं. माझ्या काकांकडेच सर्व कार्यक्रमाचं नियोजन होतं. लाउडस्पीकर व इतर साहित्य लावताना त्यांच्यासमोर मी उगीचच पळापळ करत होते, मैत्रिणींसमोर बहुधा शान मारायची इच्छा होती. काही वेळाने पंडितजी आले. अफाट गर्दी जमली होती. मी स्टेजच्या एका कोपऱ्यात काकांजवळ होते. ते काय बोलत होते मला लक्षात नाही, कारण तेव्हा हिंदी विषय अभ्यासक्रमात नव्हता. पण त्यांचं दिसणं, त्यांचा पोशाख, कोटावरचं गुलाबाचं फूल, जयजयकार करणारे लोक, खूप मस्त वाटत होतं. निघताना काकांकडे हट्ट करून मी पंडितजींना एक गुलाबाचं फूल दिलं एवढंच आठवतंय.

  नंतर एकदा इंदिरा गांधी आल्या तेव्हा गावातल्या श्रीमंत सोनाराकडे त्यांची व्यवस्था केली होती. माझे वडील सरकारी वकील होते. त्यामुळे मी, आई व इतर काहीजणी तिथे गेलो. त्यांची घरगुती मीटिंग होती. बरेच लोक इंग्रजी-हिंदीतून बोलत होते. पण आताची मुलं जेवढ्या धीटपण वागतात, तसे स्वातंत्र्य नव्हते. थोडा वेळ त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर साठवून मी स्वयंपाकघरात गेले व जिलबीचे जेवण करून बाबांच्या कारकुनासोबत घरी गेले. त्या काळी आजच्यासारखे सिक्युरिटी गार्ड््स, पोलिस, फौजफाटा, लाउडस्पीकरवर कर्कश जाहिराती किंवा कुठलाच भपका नसायचा. आतासारखी पुढाऱ्यांना हार अर्पण करण्याची स्पर्धा नसायची. उलट हाताने विणलेल्या खादीचा हार फक्त ठरावीक लोक देत होते. एवढ्या महान व्यक्ती आमच्या एरंडोल या छोट्याशा गावी आल्या होत्या, हे सांगितलं तरी मुलांचा नातवांचा विश्वास बसत नाही.

  आम्ही शाळेत जायचो तेव्हा निळी साडी, पांढरा ब्लाउज असा गणवेश होता. वेळेवर गेलो नाही तर चार आणे दंड असायचा. तो चुकूनही आई देणार नाही, हे माहीत होतं म्हणून सगळंच काम व्यवस्थित वेळेवर व्हायचं.
  आताच्या पिढीला पाॅकेटमनी हवा म्हणजे हवाच. हल्लीची दप्तरांची स्टाइल, महागड्या वह्या, फाउंटनपेन, कंपासची व्हरायटी पाहूनच डोळे फिरतात. आम्ही जुनी पुस्तकं घासाघीस करून निम्म्या किमतीत घेणारे. ती एका कापडी पिशवीत असायची. एकदा आणलेली कंपास पुढच्या पिढीपर्यंत. शाईची पेनं वापरायचो. शाळेत कच्च्या लिखाणासाठी मागच्या वर्षीच्या वह्यांच्या कोऱ्या पानांना बाइंडिंग करून वापरायचो. आता माझ्या नातवांना सांगितलं तर हसतात.

  तरुणपणी जळगावच्या मुळजी जेठा काॅलेजला शिक्षण झाले. अकरावी मॅट्रिक होते. संस्कृत विषय आवडता होता. जळगावचे खासदार वाय. एस. महाजन जे आमच्या काॅलेजचे प्राचार्य होते, त्यांचा बंगला हेच आमचं होस्टेल होतं. खालच्या मजल्यावर सायन्सच्या विद्यार्थिनी राहत. मधल्या

  मजल्यावर प्राचार्य व त्यांचं कुटुंब आणि वरच्या मजल्यावर अार्ट््सच्या विद्यार्थिनी. खूप सुंदर स्वप्नाळू दिवस होते ते. आजच्यासारखे भडक आखूड कपडे, प्रसाधनं, सगळ्याच बाबतीत तारुण्य उपभोगणे, आजच्या काॅलेज गर्लचा थिल्लरपणा नव्हता. साधे कपडे. स्वत:चे कपडे स्वत: धुणे. संध्याकाळच्या आत होस्टेलमध्ये परतणे अनिवार्य होते.

  पण काॅलेजात बाॅयफ्रेंड वगैरे प्रकार नसले तरी हिरवळ नावाचे भित्तिपत्रक लावले जायचे. सुंदर स्वरचित कविता लावून छानशा कागदावर चिकटवत. मुलेमुली एकमेकांशी बोलत पण मर्यादा ठेवूनच. आर्ट सर्कलची मी सेक्रेटरी होते. खूप छान कार्यक्रम व्हायचे. नृत्य, संगीत, फिशपाँड, वगैरेतून कला सादर व्हायची. होस्टेलजवळ बगीचा होता. संध्याकाळी फुलून आलेला बगीचा, तरुण मंडळी व १९७० च्या काळातली बहारदार गाणी. आताची तरुण पिढी वाईट नाही, पण भौतिक सुखाच्या आहारी गेली आहे. फार थोडे असे आहेत जे पुढे जाण्यासाठी धडपडतात. पण ही पिढी आमच्यापेक्षा स्मार्ट आहे. परदेशाची स्वप्नं घेऊन जगणारी आहे. सुंदर कपडे, पालकांचा पाठिंबा, तारुण्याचा अवखळपणा, सुखसोयींची विपुलता बघून खरंच हेवा वाटतो. त्यांना नावं ठेवायची नाहीतच, पण फक्त त्यांनी तारुण्याची सळसळ विधायक कामासाठी वापरावी एवढाच आशीर्वाद.

  घाणेरडी व्यसने, शारीरिक लगट, हीरो-हिरोइन्सचा अादर्श नसावा. तेव्हाचे व आताचेही आईवडील मुलांमध्येच सर्वस्व शोधतात. माझा पाचवीतला नातू मला संगणक, व्हाॅट्सअॅप वगैरे समजावतो तेव्हा मी सुखावतेच.

  राजकारणाचा चेहरामोहरा आता बदलला आहे. आमच्या वेळी राजकारण म्हणजे पैसा खाण्याचं कुरण ही कल्पनाही केली नाही. भूदान चळवळ, खादी प्रसारात वाढलेलो आम्ही. पण नवीन योजना, नवे शोध, नव्या कल्पना, तरुण तडफदार नेते जे भारतमातेचे स्वप्न साकार करत आहेत, भारत महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघत आहेत, त्यांनाही शुभेच्छा.
  - सरोज मांडवगडे, यवतमाळ
 • Saroj Mandavagade Writes About Pt When Nehru had come to school

Trending