आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saroj Shevde Article About Teaching A Lesson To Person Stalking A Woman

कशी अद्दल घडवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेपरमधील एक बातमी वाचून मन विषण्ण झाले होते. तरुण असमंजस वयात अतिरेकी विचार येतात. त्यानुसार वागलं जातं. त्या बातमीनेच आपण आपल्या मुलीला जे शिकवत आलो ते बरोबर आहे का? चाकोरीबाहेर जाऊन काही करायला, मोठ्या पोस्टवर कर्तबगार महिला म्हणून बघायला मन आतुर असताना, अशी बातमी वाचून मन खरोखरच सैरभैर होऊन गेलं. जणू छान विचारमंथन करून आपण निर्णयापर्यंत पोहोचावं. विचारांनी बहरलेलं कमळ पूर्ण उमलावं आणि अशा एखाद्या घटनेने ते पुन्हा मिटून जावं. ‘नको रे बाबा’, असं काही करायला की जेणेकरून आपल्या मुलीला आत्महत्या करायला लागावी.
मला तर आपण जणू तिला सर्व काही चुकीचेच सांगितले आहे असे वाटू लागले. वयाच्या पंचेचाळिशीत अशी संभ्रमावस्था. समजा कोणी आता मला विचारले तर तुम्ही मुलीला काय सल्ला द्याल? तर या अवस्थेत या बातमीने आपण काही सल्ला देऊ शकू, असे वाटतच नव्हते.
छानपैकी मुलीला एमबीएला अ‍ॅडमिशन मिळाली. उत्तम रीतीने तिने पदवी संपादली. त्यानंतर अगदी सहज तिची कॅम्पसमधूनच निवड मोठ्या कंपनीमध्ये झाली. तिला मी खूप शुभेच्छा, सकौतुक शुभाशीर्वाद दिले आणि ती तिच्या कंपनीमध्ये रुजू झाली. सगळ्यांना खूप कौतुक वाटले. आताच्या काळात इतकी सुंदर नोकरी मिळते का? तुमचं भाग्य थोर म्हणूनच असं झालं. तुमची मुलगी हुशार म्हणूनच हे झालं, असे अनेक अभिप्राय मिळाले. मन नुसतं आनंदानी भरून आलं होतं.
परंतु कुठे तरी त्या बातमीचा परिणाम होताच. मी तिला सारखं बजावत होते, मनाने खंबीर राहा. कोणी काहीही म्हटलं तरी तू तुझं मन काय सांगतं, बरोबर काय आहे याकडेच लक्ष दे.
एका संध्याकाळी मी बाहेरून आले तर ही घरी आली नव्हती. थोडी उशिरानेच आली. मी म्हटलं असेल काही तरी काम, थोडं दुर्लक्ष केलं; पण नंतर ती खूप टेन्सही दिसत होती. माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. झालं काय एवढं हिला? ती काही केल्या उत्तर देईना आणि तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला. तिने तो कट केला. ती मनातल्या मनात खूप घाबरली आहे हे मला जाणवत होते; पण तिने काही सांगितल्याशिवाय आपण काही बोलायचं नाही, असं मी ठरवलं होतं.
आपण केलेला संस्कार कुठपर्यंत मुरला आहे हेच मी बघत होते. किती काळ ती अशी कुढत बसणार आहे? आपण नेहमी मैत्रीपूर्ण संवादच करत आलो. कधी तिचा कुठल्याही बाबतीत जबरदस्ती केली नाही. म्हणूनच तिच्याकडून तिने आपणहून सगळं बोलण्याची अपेक्षा करत होते.
दोन-तीन दिवस असेच गेले व एक दिवस तिने मला आपल्या खोलीत बोलावून घेतले व मला सारे आपणहून सांगितले. एक मुलगा कंपनीत, जो तिच्यासारखाच आताच जॉइन झाला होता. तो तिला सारखा चिडवायचा, सतत तिच्या पाठीच असायचा. त्यावरून कंपनीत वादळ निर्माण झालं होतं.
तिने कधी त्याचा मोबाइल कट करून, कधी रजा घेऊन, तर कधी त्याला चुकवून कधी मित्रांकरवी सांगून अशा अनेक मार्गांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण त्याचे सर्व प्रकार चालूच होते. जसं की मुद्दाम मीटिंगमध्ये मिस्ड कॉल देणे, एसएमएस करणे, लंच ब्रेकमध्ये त्यांच्या स्टाफमधील हिच्या मैत्रिणी व ही जिथे असेल तिथे बसणे, इत्यादी अनेक. म्हणून त्या दिवशी तिने हतबल होऊन ‘मी काय करू’ असे मला विचारले.
मी थोडा विचार केला व तिला म्हटलं, ‘आता त्याचा फोन आला तर तू तो घे व फोन स्पीकरवर ठेव.’ माझं बोलणं पुरे होईपर्यंत त्याचा फोन आलाच. त्यांचं बोलणं आम्ही रेकॉर्ड केलं. त्याने तिला फोनवरून भेटायला एका हॉटेलला बोलावले.
तिला नेहमीच्या चाकोरीबाहेर जाऊन भेटायला जा, असा सल्ला दिला. त्याला वाटले, ही मुलगी एकटीच येईल; पण आम्हीही तिच्याबरोबर गेलो. तिला त्याच्यासमोर एकटीलाच पाठवले व आम्ही मुद्दामच अशा ठिकाणी थांबलो जेथून ते दोघेही आम्हाला दिसतील व त्यांचे बोलणे ऐकू येईल. ती दिसल्याबरोबर तो तिला म्हणाला, ‘आता कशी आलीस भेटायला, ब-या बोलानं आलीस म्हणून, नाही तर तुला मारणारच होतो.’ ‘का म्हणून, मी तुझं काय बिघडवलं आहे?’ असं ती म्हणाली.
‘तू बिघडवलं नाहीयेस; पण तू मला आवडतेस. ते तुला कळत नव्हतं म्हणून तुला माझ्याकडे लक्ष द्यायला लावण्यासाठी म्हणून मी असं करत होतो.’
हे ऐकून आम्ही दोघंही थक्कच झालो. त्यानंतरही ती म्हणाली, ‘आता तुझे काय म्हणणे आहे?’ ‘काही नाही.’ तो म्हणाला, ‘मग तू मला त्रास का देत होतास?’ ‘सांगितलं ना आता तुला.’
त्याने आणखी काही करण्याच्या आधीच आम्ही दोघं त्याच्यासमोर उभे राहिलो. आम्हाला बघितल्यावर तो दचकला व पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; पण माझ्या नव-याने त्याला पकडलं व ‘आता ताबडतोब तुझ्या आई-वडिलांना बोलावून घे’ असं सांगितलं.
आमचा एकूण अवतार बघून त्या मुलाने गयावया केली; पण आम्ही काहीही ऐकून घेत नाही म्हटल्यावर नाइलाजाने त्याने घरी फोन लावला.
त्यानंतर त्याचे आईवडील येईपर्यंत आम्ही त्याला धरून तेथेच थांबलो; पण जास्त प्रदर्शन नको म्हणून आम्ही त्याची सारी माहिती विचारून घेतली. नुकताच इंजिनिअर होऊन त्यांच्या कॅम्पसमधूनच इथे त्याला नोकरी लागली होती.
तो सारखा म्हणत होता, ‘मला जाऊ द्या. मी तुमच्या मुलीकडे ढुंकूनही बघणार नाही. वडिलांना हे सांगू नका. ते अत्यंत सज्जन व आदर्शवादी आहेत. ते मला घराबाहेर काढतील.’ पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले.
थोड्या वेळाने त्याचे आईवडील आले. आम्ही त्यांना रेकॉर्ड केलेले फोनवरील बोलणे ऐकवले. ते ऐकून वडील त्याला खूप रागावले. आमची माफी मागितली; पण आम्ही त्यावरच त्याची सुटका केली नाही. कारण कदाचित तो उद्या कंपनीत परत तिला त्रास देणार नाही कशावरून, अजून काही तरी भयानक घडेल. म्हणून आम्ही त्याच्या वडिलांना सांगितले की, या सर्व प्रकारामुळे माझ्या मुलीची कंपनीत बदनामी झाली आहे. त्यामुळे उद्या आम्ही कंपनीत येणार आहोत व तुम्हीही या.
त्यांनी मग गयावया करायला सुरुवात केली. आता इथेच मिटवून टाका. आम्ही मात्र धीटपणाने नाही म्हटले व ‘उद्या जर तुम्ही कंपनीत आला नाहीत तर आम्ही पोलिस केस करू.’ असे म्हटल्यावर आम्ही इथपर्यंत येऊ शकतो तर हे नक्की पोलिसांत जातील, या मुद्द्यावर ते यायला तयार झाले.
आम्ही दुस-या दिवशी कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये यांच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखासमोर गेलो. त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी सर्व स्टाफसमोर त्याला माफी मागायला सांगितली व आम्ही त्याला आमच्या मुलीकडून राखी बांधायला लावली आणि पुन्हा असं करणार नाही, असं वदवून घेतलं.
आणि काही दिवसांतच कंपनीतर्फे माझ्या मुलीला परदेशी पाठवण्यात आले. दोन वर्षांसाठी अशा त-हेने संकटातूनच नव्हे, तर खरेखरेच सीमोल्लंघन तिचे झाले. फक्त आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीला विनंती करून तिचा मोबाइल नंबर व ई-मेल आयडी त्याच्यापर्यंत पोहोचू न देण्याची व्यवस्था करायला सांगितली.
जिथे आपण क्षणिक भीतीपोटी निर्णयच घेऊ शकणार नाही, असे वाटत होते तिथे एवढा मोठा विजय संपादन करून जणू दस-याचे सोने लुटून सीमोल्लंघनच केले होते. माझ्या चेह-यावर या विचाराने स्मित झळकले.