आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'वड्याचे तेल वांग्यावर'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या दिवशी मी वांगं भाजत होते. वांगं एकदम छान जळगावी रसरशीत होतं आणि भाजताना येणाऱ्या चटचट अशा आवाजात मला एकदम त्या आजींची आठवण झाली. त्या आजी रोज आपल्या मैत्रिणींबरोबर ‘आजीआजोबा’ उद्यानात येत. मी तिथे चालण्यासाठी जात असे.

सहजच फिरताना त्यांच्या गप्पा कानावर पडत. सगळ्या जणी साधारण ६०, ६५ वयाच्या होत्या. काहींच्या मुलींची लग्न झालेली होती. काहींची ठरत होती. आपल्याकडे दोन बायका एकत्र आल्या की, घरातल्या गोष्टी करतात. त्या कधी आनंदाच्या, कधी दु:खाच्या असतात. बहुतेक वेळा नवीन पिढीकडून दुर्लक्षित किंवा डावलले गेल्यामुळे कुठेतरी आपला मनाचा कोपरा रिकामा करावा, म्हणून मग सर्व काही मनातलं इथे उघड व्हायचं.

अशाच त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्यात सावित्रीबाई होत्या. त्यांच्या सुनेच्या आणि त्यांच्या सततच्या मतभेदामुळे त्यांचे वाद होत आणि त्यातूनच त्यांची सून आणि मुलगा वेगळे झाले होते. त्यामुळे या वयात त्यांच्यावर एकटं राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे आपला अनुभव त्या नेहमी उदाहरणादाखल देत व सगळ्यांना सावध राहायला सांगत. त्यांचे ऐकून ऐकून त्यांचीच मैत्रीण सुनीताताई मात्र खरंच सावध झाल्या होत्या.

सुनीताताईंच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. नवीन सून घरात आली होती. हुशार होती. नव्या नवलाईचे दिवस छान चालले होते. पण या सावित्रीबाईंचं ऐकून त्या आपल्या सुनेशी जरा हातचं राखून वागत होत्या. काही पदार्थ केला सुनेने तर त्याची स्तुती वगैरे न करता ‘बरा झालाय’ एवढंच उत्तर द्यायच्या. तिला नोकरी होती त्यामुळे ती सकाळी सगळं उरकून बाहेर पडत असे. त्यासुद्धा तिला मदत करायच्या, पण हातचं राखून. काही काही कामं तर त्यांनी पूर्णपणे तिच्यासाठीच ठेवलेली असायची. संध्याकाळी घरी आल्यावर या तिला चहा द्यायच्या आणि लगेच आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला या बागेत यायच्या.

त्यामुळे आपसूकच तिला घरातले सगळे आवरून स्वयंपाकाचे बघावे लागे. रविवारी फक्त तिला संध्याकाळी वेळ मिळे. मग तिला साहजिकच नवऱ्याबरोबर फिरायला, सिनेमाला जायला आवडत असे. पण त्या वेळी त्यांच्या ओळखीच्यांना त्या घरी बोलवायच्या. मग ती आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी घरात थांबायची. परंतु त्याचं त्यांना काहीच नसे. ‘आम्हीही हेच केलंय, तुम्हाला आता नोकरी आहे. नवरा चांगला कोडकौतुक करतोय. मला तर घरातच असल्यामुळे इतकं काम असायचं. बरं आमच्या वेळेस आजच्यासारखं सासुबाई आम्हाला मदत नव्हत्या करत.’ हाच त्यांचा धोशा असायचा. सून नवीन होती, त्यामुळे ती हौसेनं रेसीपीज करायची. ती सुसंस्कारी होती, त्यामुळे ती हौसेने, आवडीने, हसतमुखाने सगळं करायची. त्याही मग मनातून खजील व्हायच्या. ती खरंच चांगली आहे. आपण उगाचच तिला त्रास देतो. ही काही सावित्रीच्या सुनेसारखी नाही. पण मन म्हणायचं नको. जर सूट दिली तर ही आपल्याला सावित्रीच्या सुनेसारखंच करेल, म्हणून मग सदसद्विवेक सोडून पुन्हा येरे माझ्या मागल्या.

एकदा त्यांच्याकडे त्यांची मोठी बहीण कामिनी आली. ती शहरात म्हणजे मुंबईत राहणारी. तिच्याही मुलाचे लग्न होऊन बरेच दिवस झालेले असतात. तिची सूनही छान असते. ती प्रोफेसर असल्यामुळे तिला नोकरी करावी लागत असते. पण कामिनी सुनेचे सर्व वेळापत्रक सांभाळत असते. तिच्या सुटीच्या दिवशी तिच्या आवडीचा म्हणा किंवा एखादा छान पदार्थ करत असते. तिच्या सुटीच्या दिवशी तिला थोडी मदत करते. सूनही सासूबाईंच्या आवडीचा पदार्थ करत असते. घरातील छोटी मुले, आजी, आजोबांच्या आवडीनिवडी राखत असते. मुंबईतील अंतरामुळे दिवसभर बाहेर राहिल्यामुळे सुटीचा दिवस, म्हणजे आप्तांशी जवळीक व मौजमजा, अभ्यास असेच समीकरण असते. हे सर्व ती आपल्या बहिणीला समाधानाने तृप्तीने सांगत असते.

तेव्हा सुनीताताईंना पहिल्यांदा जाणीव होते की, खरंच आपलंही असं होऊ शकतं. ती म्हणते, ‘ताई, खरंच आज माझंही असंच चांगलं होऊ शकेल. पण तरीही त्या सावित्रीबाईंकडे पाहिलं की, मनात येतं आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा यानुसार वागलं जातं.’ कामिनी त्यावर आश्चर्य व्यक्त करून म्हणते, ‘अगं, तुला तसा काही अनुभव दिलाय का तिने, ज्यांना असं काही करायचंच असतं त्या लगेच करून मोकळ्या होतात. हे तू वागते आहेस ना, हे पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे नाही वागत आहेस, तर वड्याचे तेल वांग्यावर काढतेयस. त्यांच्या सुनेने त्यांना त्रास दिला, म्हणून तुझ्या सुनेने काहीच न करता तू तिला सावित्रीबाईंसारखं होऊ नये, म्हणून हातचं राखून वागवते आहेस. अजूनही वेळ गेलेली नाही. तू तुझी चूक सुधार. अगं, जसं द्यावं तसं घ्यावं. तू तिला आता समजून घे. सुस्वभावी मुलीचं कौतुक कर. कृतीतून चांगलं वाग, म्हणजे तसं होणारच नाही. आणि कधी असं मनात आलं तरी तुझ्या चांगुलपणामुळे ती तसं करताना त्यापासून आपोआपच परावृत्त होईल. पण अशा वागण्यामुळे तू तिला स्वत:च्या हातानेच दूर ढकलते आहेस.’

‘नवीन पिढी जास्त हुशार आणि समजदार आहे, आणि तितकीच जशास तसे वागणारी. त्यामुळे तू जास्त ताणू नकोस. तिला तुझा सुस्वभाव कळू दे. म्हणजे तीही आता छान आहे तशीच राहील.’

हे सर्व मनोमन पटल्याने सुनीताताईंनी आपल्या बहिणीचे आभार मानले व मनाविरुद्ध हातचं राखून वागायचं नाही, असा निर्धारही त्यांनी केला.

सरोज शेवडे, नाशिक
बातम्या आणखी आहेत...