आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिकतेचा संवेदनशील आलेख...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इमॅन्युअल’ हे इमॅन्युअल आर्सन या फ्रेंच लेखिकेचं पुस्तक, १९६७मध्ये फ्रान्समध्ये प्रसिद्ध झालं. १९७१मध्ये इंग्रजीमध्ये पुस्तकाचा अनुवाद झाला. फ्रान्समध्ये तशी या पुस्तकाने फारशी खळबळ माजवली नाही; पण इंग्रजीमध्ये मात्र या पुस्तकाने खळबळ, वादग्रस्तता अशा पुष्कळ गोष्टी साधल्या. पुस्तकातील नायिकेचं नाव असतं, इमॅन्युअल. ही एका फ्रेंच इंजिनिअरची बायको. १९ वर्षांची. नुकतंच लग्न झाल्यावर, नवर्‍याची बदली बँकॉकला झालेली असते, त्यामुळे ती बँकॉकला विमानाने एकटीच येत असते. या विमानातच ती एका पुरुषासोबत शय्यासोबत करते. हे या कादंबरीतील खळबळजनक लेखन आहे. नंतर १९८४मध्ये निघालेल्या सिनेमातही हे दृश्य गाजलं. इमॅन्युअलच्या आसपास किंवा अगोदर कित्येक इरॉटिका लिहिल्या गेल्या होत्या. गाजण्याची कारणं म्हणजे, यात मोठ्या प्रमाणावर लेखनगुण समाविष्ट होते. शिवाय, स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक व अनैसर्गिक अशा सर्व प्रकारच्या फँटसींना त्यामध्ये शब्दबद्ध केलेलं होतं.

इमॅन्युअल स्त्री-पुरुषांच्या प्रेमात पडत राहते, आणि कुठल्याही प्रकारच्या लैंगिकतेचं तिला वावडं नसतं. दृश्यात्मक बारकाव्यांसह ही वर्णनं इमॅन्युअल आर्सनने केली. इमॅन्युअल आर्सन ही फ्रेंच लेखिका आहे, असं मानलं जात होतं. पण प्रत्यक्षात दुसर्‍या लेखिकेचं ते टोपण नाव होतं. तिने आणि तिच्या नवर्‍याने मिळून ही कादंबरी लिहिली होती. कादंबरीची मागणी वाढल्यानंतर तिचा दुसरा व तिसरा असे भाग आले. सिनेमाचेही दोन-तीन भाग येऊन गेले. सिनेमामुळेच कादंबरी अधिकाधिक खपू लागली. इमॅन्युअल बँकॉकमध्ये येते. तिथे अनेक परदेशी गोर्‍या युरोपीय स्त्रिया एकमेकींशी गॉसिप करत एकेकट्या वेळ घालवत असतात. तिथेच इमॅन्युअलची एरियनशी मैत्री होते. एरियन तिला उद्दिपीत करू पाहते. बी नावाच्या एक सुंदर तरुणीच्या प्रेमात इमॅन्युअल पडते. तिच्याशी शारीरिक सलगी करते. बीला हे आवडत नाही आणि बी तिच्याशी मैत्री नाकारते. यामुळे अस्वस्थ झालेली इमॅन्युअल आपल्या नवर्‍याला सारं काही सांगते. कादंबरी किंवा सिनेमात इमॅन्युअलला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की, “तुझ्या नवर्‍याला हे सारं कसं चालतं?” तेव्हा ती म्हणते की, “त्याने मला लैंगिक स्वातंत्र्य दिलेलं आहे.”

ज्या सुमारास स्त्री मुक्ती आणि इतर चळवळी भरात होत्या, त्याच सुमारास इमॅन्युअलचं लेखन प्रसिद्ध झालं. फ्रान्समध्ये अशा लेखनासाठी भूमी सिमॉन द बोवाने वगैरे तयार केलेली होती. पण इंग्रजीमध्ये तसा सोवळेपणा अजून बराचसा होता, तो या कादंबरीने मिटवून टाकला. कादंबरीच्या दुसर्‍या भागात इमॅन्युअल एका धर्मपीठाला भेट देते. जिथे सारे संन्यासी राहात असतात. तिथे वीज जाते. तेव्हा काळोखात संन्यासाची दीक्षा स्वीकारलेल्या मॉकला आपल्याबरोबर शारीरिक संबंध करायला लावते. असे माणसाच्या आदिम प्रेरणांचा माग काढणारे कितीतरी भाग इमॅन्युअलमध्ये होते. तिच्या नवर्‍याचा भाऊ ख्रिस्तोफर याच्या संबंधातलाही एक प्रसंग तिने रंगवला आहे. सिनेमामध्ये हे दृश्य फारच वेगळ्या प्रकाराने घेतलं आहे. ख्रिस्तोफर तिच्यासोबत जातो. अॅक्युप्रेशरचा ती उपचार घेत असते. शरीरावर, जिभेवर, कपाळावर अनेक ठिकाणी सुया टोचल्या जातात. अचानक इमॅन्युअल स्वप्नावस्थेत जाते आणि ख्रिस्तोफरशी शरीरसंग करू लागते. अत्यंत काव्यात्म पद्धतीने सिनेमात हे दृश्य दिग्दर्शकाने घेतलं आहे. सिल्विया ख्रिस्टल या अभिनेत्रीने इमॅन्युअलची भूमिका साकारली आणि ती गाजली.

इमॅन्युअलच्या ‘वॅना’सारख्या कादंबर्‍या नंतरही आल्या. वॅनासारखी कादंबरी पूर्णत: वेगळ्या प्रदेशात घडते. इमॅन्युअलच्या कादंबरी लेखनाचा जो काळ होता, तो स्त्रियांच्या लैंगिक फँटसीच्या प्रगटीकरणाचा काळ होता. प्रामुख्याने अनायस नीनचा अपवाद वगळता हार्ड कोअर लैंगिकता चितारणारी सर्व पुस्तके पुरुषांनी लिहिलेली आहेत. इमॅन्युअलच्या लेखनात सतत एक सेन्सिटिव्हिटी आढळते आणि लैंगिकतेचे तत्त्वज्ञानही. आता लैंगिकतेचे तत्त्वज्ञान ही काय भानगड आहे? ऊठसुट प्रत्येक स्त्री-पुरुषाशी लैंगिक संबंध जोडू पाहणारी, इमॅन्युअल एक दिवस मारियो नावाच्या सद‌्गृहस्थाला भेटते. हा मारियो लैंगिकतेचं तत्त्वज्ञान सांगतो. त्याचं म्हणणं असतं की, सेक्स आणि प्रेम यांचा संबंध तोडल्याशिवाय माणूस निखळ आनंद मिळवू शकत नाही. त्याच्या शिकवणीमुळे इमॅन्युअल अधिकाधिक मुक्त होते. स्वत: मारियोला लैंगिकतेमध्ये फार रस असतो, असंही नाही. पण त्याची ही सैद्धांतिक वाक्यं कादंबरीत पानोपानी येतात आणि विचार करायला लावतात, एवढं नक्की. पुस्तकाच्या पहिल्या पानाच्या शेवटी मारियो आणि त्याच्याकडे काम करत असणारा मुलगा, इमॅन्युअल यांचा थ्रीसम म्हणजे, तिघांची शय्यासोबत असा प्रसंग येतो. इमॅन्युअल चित्रपटाच्या दुसर्‍या भागाच्या शेवटी असंच दृश्य दिग्दर्शकाने इमॅन्युअल, तिचा नवरा आणि बी यांमध्ये चित्रित केले आहे. चित्रपट आणि पुस्तक या दोन्हींचा खप आणि लोकप्रियता आजच्या मुक्त पोर्नोग्राफीच्या जगातही कायम आहे. हीच इमॅन्युअल आर्सनच्या लेखनाला मिळालेली पावती आहे.
shashibooks@gmail.com