आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट एका \'वजनदार\' भिंतीची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यापन, लेखन, निवेदन अशा विविध प्रांतात सतीश चाफेकर मुशाफिरी करतात. चाफेकरांनी आजवर नऊ हजारांहून अधिक स्वाक्षऱ्या जमा केल्या आहेतच, परंतु याचबरोबरीने घराची भिंतही मान्यवरांच्या स्वाक्षरीने सजवायला घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नांची नुकतीच "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली आहे. त्या निमित्ताने हे मनोगत...

आपण ज्या घरात राहतो, त्या घराच्या भिंती आपल्याला नेहमीच भावतात. आपण त्यावर नितांत प्रेमही करतो. याच भिंती आपल्याला वेळप्रसंगी ऊबही देतात आणि सुरक्षितताही. खासगीपण जपणे ही तर भिंतीची खासियतच, म्हणून सुखा-समाधानाने आपण पहुडतो.
अशाच भिंती मलाही लाभल्या आहेत. साधाच छोटासा ब्लॉक आहे माझा, पण आज घरातली एक भिंत फार आगळीवेगळी ठरली आहे.

१९६९ पासून स्वाक्षऱ्या जमा करण्याचा माझा छंद. आजमितीस ९०००च्यावर स्वाक्षऱ्या माझ्या संग्रही आहेत. आता मोजणेच सोडून दिले आहे. २००२मध्ये मी जेव्हा जागा घेतली, तेव्हा माझा जळगावचा मित्र अमोल सराफ डोंबिवलीला राहात होता. रात्री गप्पा मारता मारता त्याला कल्पना सुचली आणि माझ्या घराची एक भिंत त्याने मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांनी सजवली.
एकदा आमच्या बाजूला डॉ. वसंत गोवारीकर आले होते. त्यांना घरी बोलावले आणि त्या मोकळ्या भिंतीवर स्वाक्षरी करायला सांगितली. त्यांना जरा विचित्र वाटले, पण त्यांनी ती केली. त्यानंतर सिलसिला सुरू झाला. अनेकांना माझ्या स्वाक्षरी संग्रहाबद्दल कल्पना होतीच, कारण वेळोवेळी वृत्तपत्रांमधून, चॅनेलवरून माझ्या मुलाखती होत होत्या. अनेकांना ही कल्पना सुरुवातीला बालिश वाटली. परंतु डॉ. माशेलकर, डॉ. विजय भटकर यांच्यासारख्या मान्यवरांनी स्वत: येऊन घरातल्या भिंतीवर स्वाक्षऱ्या केल्या, तेव्हा माझ्या घराच्या या भिंतीचे ‘वजन’ खऱ्या अर्थाने वाढू लागले. माझा कवी ग्रेस यांच्याबरोबर पत्रव्यवहार झाला होता. त्यांना मुंबईला पवईला हिरानंदानी येथे त्यांच्या नातेवाइकांच्या घरी भेटलो होतो. ते डोंबिवलीत येणार होते. मी त्यांना विनंती केली आणि ती त्यांनी मानलीदेखील. ते माझ्या घरी आले, आणि ही भली मोठी स्वाक्षरी करून गेले. त्याच दिवशी दुपारी निरोप आला, आज सकाळी जे फोटो काढले ते फोटो पाठव. त्या वेळी रोलचा कॅमेरा होता. रोल धड संपलेला नव्हता. तसाच मी डेव्हलप केला, आणि संध्याकाळी त्यांना फोटो दिले. त्यानंतर आम्ही अनेक वेळा कार्यक्रमांमध्ये भेटलो, तेव्हा आवर्जून भिंतीचा उल्लेख होत राहिला.

कोणताही छंद म्हटला, की प्रयोगशीलता हवीच; नाहीतर तोचतोचपणा येतो. स्वाक्षऱ्यांची भिंत बऱ्यापैकी प्रसिद्ध होत होती. एके दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांना विनंती केली, बऱ्यापैकी फिल्डिंग लावून त्यांना घरी आणले, त्यांनी भिंतीवर स्वाक्षरी केली. तेव्हा ते म्हणाले, आज कुणाला कळणार नाही; परंतु इतिहास जपतो आहेस, निर्माण करतो आहेस! खरंच हा वेगळाच इतिहास ठरणार आहे, पुढल्या पिढीसाठी. शायर नदा फाजली यांना विनंती केली, ते कार्यक्रमानंतर सुमारे रात्री बारा-साडेबारा वाजता आले आणि स्वाक्षरी करून गेले.

माझ्या आयुष्यात योगायोगाला आणि नशिबाला खूप मोठे स्थान आहे. एके दिवशी डोंबिवलीमध्ये संघाचे ज्येष्ठ नेते गोविंदाचार्य आले होते. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो, स्वाक्षरी घेतली होती. रात्री नऊ-साडेनऊ वाजता, एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर बाजूच्या इमारतीमधून त्यांना बाहेर पडताना बघितले. मी त्यांना घरी येण्याची विनंती केली. ते घरी आले, भिंतीवर स्वाक्षरी केली, आणि जाता जाता मी सहज प्रश्न केला, महाराष्ट्रात शिवाजी का निर्माण होत नाही? तसे ते उंबरठ्याशी थबकले, जरा विचार करून म्हणाले, ‘आई’ नाही... शिवाजी महाराजांची आई जशी होती, तशी आई निर्माण झाली पाहिजे, तरच शिवाजी महाराज निर्माण होतील. या उत्तरात खूपच गर्भितार्थ लपलेला आहे, हे त्या क्षणी मला जाणवले.
आईवरून आठवले, एके दिवशी दुपारी सचिन तेंडुलकरचा मित्र, सहकारी रमेश पारधेचा फोन आला. तो सचिनच्या आईला घेऊन डोंबिवलीमधील एका हॉस्पिटलमध्ये आला होता. सचिनच्या आईचा भाऊ अॅडमिट होता. नेहमीप्रमाणे डोंबिवलीतले लाइट गेले होते. मी जवळच तळमजल्यावर राहात होतो. तो म्हणाला, मी सचिनच्या आईला घेऊन येऊ का? सचिनच्या आई घरी आल्या. आम्ही खूप गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना आजूबाजूला कुजबुज सुरू आहे, हे जाणवले... इतक्यात एक शाळकरी मुलगा त्यांची स्वाक्षरी घ्यायला आला. सचिनच्या आईने त्याला विचारले, अरे माझी सही कशाला, मी काय केले आहे... मुलगा तसाच निघून गेला. तेव्हा सचिनची आई म्हणाली, एकदा असाच मुलगा स्वाक्षरी मागायला आला, तेव्हा मी त्याला हाच प्रश्न केला. परंतु तो मुलगा हुशार होता, तो म्हणाला, तुमची स्वाक्षरी घ्यायचे कारण तुम्ही नसता तर आम्हाला सचिन तेंडुलकर दिसला नसता.

मी सहज त्यांना म्हणालो, आता माझ्या या भिंतीवर स्वाक्षरी करा. कारण समोरच तेंडुलकरसरांची (सचिनचे दिवंगत वडील रमेश तेंडुलकर) स्वाक्षरी अमोल सराफने स्केच केलेली होती. मग त्यांनी भिंतीवर स्वाक्षरी केली.

असे अनेक किस्से सांगता येतील माझ्या भिंतीचे. एक सुप्रसिद्ध अभिनेता घरी स्वाक्षरी करायला आला होता. तो खुश झाला. परंतु बाहेर गेल्यावर म्हणाला, आपला चाफेकर स्वर्गात गेला तर त्याला वेगळीच खोली द्यावी लागेल देवाला, कारण तिथेही तो नवीन काही शोधेल.
ज्यांनी अजमल कसाबला पकडले, ते संजीव गोविलकर डोंबिवलीत आले होते. ते आमच्या वरच्या मजल्यावर कुणाकडे आले होते, त्यांना त्यांनी भिंतीबद्दल सांगितले. मी घरात नव्हतो, कामानिमित्त कोपऱ्यावर गेलो होतो. शिकवणीला आलेली मुले घरात अभ्यास करत होती. पटकन ते घरात अाले आणि मी नव्हतो म्हणून तसेच गेले. परंतु रस्त्यात आमची भेट झाली. मी त्यांना ओळखले आणि परत घरी घेऊन आलो, भिंतीवर स्वाक्षरी करण्यासाठी! असे अनेक प्रसंग घडत होते, घडत राहणारच.

आता स्वाक्षरी करणाऱ्यांनी शतक ओलांडले आहे. सुमारे १०५ मान्यवरांनी स्वाक्षरी केलेल्या भिंतीजवळ झोपतानादेखील खूप मजा येते, आनंद होतो. मला आपण वेगळे काहीतरी केले याचा...परवाच मधु मंगेश कर्णिक आले होते. पावसामुळे त्रस्त झाले होते. पण त्या स्वाक्षऱ्यांच्या खोलीत अाल्यावर मात्र त्यांचा त्रास, शीण कुठल्या कुठे निघून गेला.
आज या माझ्या भिंतीमुळे शंभरच्यावर मान्यवरांची पायधूळ माझ्या घराला लागली. अशा घरात शांतपणे पडून राहताना खूप बरं वाटतं. घराचा केर काढायला नाखूशही असतो... कारण ही पायधूळ अशीच जपायची आहे मनाच्या कोपऱ्यात. अजून बरेच जण येतील. पुढे मी असेन नसेन. पण ती भिंत आज ना उद्या एक वेगळाच इतिहास सांगेल. माझ्या या छोट्याशा घराचे नाव आहे, ‘हे माझे घर शब्दांचे’. आणि हो, माझी ‘स्वाक्षरी’ या घरात असणार नाही; असेल ती फक्त माझी सावली!
(satishchaphekar5@gmail.com)