आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मांतर सक्तीची हाकाटी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा एक मित्र आहे त्याला एकही मुस्लिम मित्र नाही. तो कधीही मुस्लिम घरामधे गेलेला नाही. ते काय खातात, कसे राहतात, हे त्याने कधीही बघितले नाही. त्याच्या वर्गात पहिलीपासून तो डॉक्टर होईपर्यंत एकही मुस्लिम का नाही याचे त्याला कोडे पडत नाही. आपण काम करत असलेल्या जागी एकही मुस्लिम का नाही, याची त्याला तमा नाही, आपण राहत असलेल्या एरियात मुस्लिमांना राहायला भाड्याने जागा दिली जात नाही, याविषयी तो अनभिज्ञ आहे, तरी तो मुस्लिमांची संख्या वाढत्येय, हे हिरीरीने सांगतो. मुस्लिम लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी साधारण तेरा टक्के आणि आजही एकूण लोकसंख्येच्या तेरा टक्के आहे, हे त्याला माहितीच नसते. तरीही त्याला मुस्लिम समाजाविषयी प्रचंड राग आहे.

मुस्लिम समाजाचा विषय निघताच, तो संतापाने थरथरतो. तो टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्येे मुस्लिम दहशतवादाविषयी बघतो, वाचतो. पाकिस्तानी अतिरेकी आणि भारतीय मुस्लिम हे त्याला एकच वाटतात. किंबहुना, जगातला प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी आहे, याच्यावर त्याचा ठाम विश्वास आहे. यासाठी तो वाट्टेल ती पैज हरायला तयार आहे. अशा वेळी तो महात्मा गांधीचा खून, इंदिरा गांधीचा खून, राजीव गांधींचा खून हा मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेला नाही, हे तो सोयीस्कर विसरतो. वेळप्रसंगी ‘व्हाॅटस् अॅप’वर गांधींचा खून कसा समर्थनीय आहे, याचे मेसेजही दाखवतो. इतिहासाचे दाखले देऊन मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याची भाषा करतो. निरपराध मुस्लिम युवक हकनाक मारला जातो, त्याचेही तो समर्थन करतो, आणि फेसबुकवर आपल्या प्रेरणास्थानाची विटंबना करणाऱ्याला अशीच शिक्षा मिळेल असे खडसावतो (मग भलेही तो निरापराध का असेना) ज्युलिया रॉबर्टसने हिंदू धर्म स्वीकारल्याचे त्याला अप्रूप वाटते. परंतु हेच करिना कपूरने सैफ अलीशी लग्न केले म्हणून मात्र तो अस्वस्थ होतो. या अस्वस्थतेमागे आहे, ती मध्यमवर्गीय विचारसरणीमधून आलेली एक असुरक्षितता. या असुरक्षिततेला लपवण्यासाठी किंवा तिच्यावर अोव्हरकम करण्यासाठी तो काहीही करू शकतो...
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंत समाजसुधारकांमुळे भारतीय स्त्री हे धर्माने तिच्यावर लादलेले बंधन झुगारून स्वत:च्या पायावर उभी राहत्येय. एवढेच नाही, तर आपल्या जोडीदाराच्या निवडीचा अधिकार ती आता जास्त सक्षमतेने बजावण्याच्या स्थितीत आहे, अशा वेळी तिला ‘लव्ह जिहाद’सारख्या फालतू, पोकळ आणि बिनबुडाच्या जाळ्यात अडकविणे म्हणजे धार्मिक अतिरेकाचा कळस आहे. मुस्लिम स्त्रियांना ज्याप्रकारे धर्माच्या नावाखाली बुरख्यात ठेवले जाते, तसेच हिंदू स्त्रियांना धर्माच्या नावाखाली बेडीत अडकवण्याचाच हा खेळ आहे. हिंदू स्त्रियांना काहीही कळत नाही, त्यांना सरसकट गोरेगोमटे दिसणारे मुस्लिम फसवतात. लग्न करून त्यांचे धर्मांतर करतात, ही कल्पना हास्यास्पद आहे, त्याच बरोबर हिंदू स्त्रियांची मानहानी करणारीसुद्धा आहे. मुलींनी स्वत:हून आपला जोडीदार निवडावा, हे ज्या समाजाला मुळातच मान्य नाही, ज्यासाठी त्याचा धर्म पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो, त्यात तिने जर आपल्या मर्जीने एखाद्या मुस्लिम युवकाची निवड केली, तर या समाजाला ते कधीही सहन होणार नाही. कारण त्याची असुरक्षितता त्याला गप्प बसू देणार नाही. याच असुरक्षित मनाचा फायदा, राजकारणी घेत असतात, सामान्य माणूस त्यांच्या या भूलथापांना नेहमीच बळी पडत असतो. भारतामध्ये धर्मांतराचा अर्थ आहे, हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे. याला कारण आहे, या धर्मातील असमानता. ज्याकडे माझा मित्र सहज कानाडोळा करू शकतो, पण जी माणसं ती असमानता सहन करताहेत, ते नाही त्याकडे दुर्लक्ष करू शकत. ज्यांना खरंच प्रामाणिकपणे वाटते की, आपल्या धर्मातून लोक दुसऱ्या धर्मात जाऊ नये, त्यांनी प्रथम ही असमानता नष्ट केली पाहिजे. आजही दलित, भटके जेव्हा दुसऱ्या धर्माचा पर्याय स्वीकारतात, तेव्हा माझ्या मित्राला त्याचे सोयरसुतक नसते, पण तेच, त्याच्या जातीतली एखादी मुलगी मुस्लिम तरुणासोबत लग्न करते म्हटल्यावर तो खवळतो. कारण त्याचा संबंध त्याने स्वत:च्या पुरुषार्थाशी, समाजाच्या अब्रूशी जोडलेला आहे. तिने असे केले आहे म्हंटल्यावर तो जातपंचायत भरवतो आणि त्या मुलीवर सार्वजनिक बलात्कार घडवून आणतो.
‘तुह्या धर्म कोंचा?’मध्ये आदिवासी समाजाचे चित्रण आहे. आदिवासी समाज हा स्त्रीला अापला जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य देतो, याचबरोबर चित्रपटामधे ती तिचे धार्मिक स्वातंत्र्यही बजावताना दिसते. अापला धर्म आणि जात यापेक्षा महत्वाचं आपलं जगणं आहे, असं चित्रपटातील प्रमुख पात्र भुलाबाई सांगते आणि त्याचबरोबर आदिवासी समाजाचा भाग असलेलं निसर्गाच्या जवळ असलेल्या जीवनशैलीलाही न नाकारता पुढे जाते. धर्म ख्रिश्चन असो, हिंदू धर्मातिरेक असो किंवा नक्षलवादाच्या जाळ्यात ओढला जाण्याची भीती असो, ती निसर्गासोबत जात राहते आणि शेवटी माणसाचं खरं ध्येय हे ईश्वरापर्यंत पोहचणे असेल, तर निसर्ग हाच त्याचा मार्ग आहे, हे अधोरेखित करते.
चित्रपटानिमित्त रिसर्च करत असताना विकासाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली विस्थापित होत असलेला आदिवासी समाज जवळून बघता आला. मघाशी वर्णन केलेला माझा मित्र जो कुठल्याही कारणासाठी आपल्या घराची एक चौरस फूट जागासुद्धा देणार नाही, त्याला विकासाच्या नावाखाली या समाजाचं विस्थापित होणं समर्थनीय वाटतं. माझ्या संपर्कात एक अशी व्यक्ती आली जिने धर्म हा किती वैयक्तिक असू शकतो, याचा दाखलाच दिला. अामच्या शेजारी राहणारी ही व्यक्ती अत्यंत धार्मिक होती. त्यांच्या घरी सतत पूजा-अर्चा, सत्यनारायण, प्रवचन चालत असे. कालांतराने मी दुसऱ्या गावात राहायला गेलो, त्यांच्याशी संपर्क तुटला. साधारण दहाबारा वर्षांनी तेच काका मला रस्त्यात भेटले, मी त्यांना अोळखले नाही कारण त्यांचा बाह्यावतार बदलला होता. ते संपूर्ण मुस्लिम परिवेशात होते. ते म्हटले की, सध्या मला मुस्लिम धर्माचं तत्त्वज्ञान पटतंय. त्यांनी टोपी काढली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. अावर्जून चौकशी केली. मग माझ्या लक्षात अालं की, बाह्य स्वरूप बदलले तरी ते, तेच होते पूर्वीचेच. मागून चालत त्यांची पत्नी आली, त्यांनी मात्र मुस्लिम धर्म स्वीकारला नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका हाती दिली. अाग्रहाने यायला सांगितले. लग्न चर्चमधे असणार होते, कारण त्यांची सून ख्रिश्चन होती. नंतर दोघेही एकत्र हळूहळू चालत बसच्या दिशेने गेले. आजही ते काका जगण्याच्या जास्त जवळ आहेत, असं वाटतं. त्यांच्याकडे बघून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे एवढंच म्हणावंसं वाटतं की, ‘धर्म हा माणसांसाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.’

(राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक-दिग्दर्शक)
satish.manwar@gmail.com