आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल निरीक्षकाच्या स्तितिदर्शक कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव सखदेवची कविता ही भावनोद्रेकातून उगम पावत नाही, तर भावना रिचवून पचवून नंतरच साकार होत असावी; त्यामुळे तिच्यात ठसठशीत ओळी फारशा नसतात. फार काय, कवितेचे सुशोभीकरण हा प्रकारच प्रणवच्या कवितेत नाही. शब्दांची आतषबाजी तर सोडूनच द्या, पण फापटपसाराच नाही. भावनोद्रेकातून लिहिल्या जाणार्‍या कवितांमध्ये भाषेचा लाव्हा वाहताना दिसतो, तसा प्रकार प्रणवच्या कवितेत घडत नाही. या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती भावना आणि भाषा या दोघींचे स्तोम माजू नये, याची पुरेपूर काळजी घेते. दोघींना जणू ‘पायरी’ ओळखून वागायला लावते. भाषेच्या वावटळीमध्ये कविता भरकटू न देणे, ही किमया साधणे तसे अवघड असते; पण प्रणव त्याच्या कवितेमध्ये हे लीलया साधतो. कारण स्थितीचा वेध घेण्याचा त्याचा रोख सुनिश्चित आहे.
कोणत्या जीवनानुभवात आपल्याला अभिप्रेत असलेली कविता दडलेली आहे, याचे प्रणवला उत्तम भान आहे. घार जशी तिचे सावज अचूक हेरते, आणि झेप घेऊन चोचीत अचूकपणे वेचते, पकडते; तशी त्याची चाणाक्ष दृष्टी जीवनात एखाद्या ाङ्म२२्र’ सारखी दडलेली कविता अलगद उचलते. परिणामी प्रणवची कविता ही जीवनावर केलेल्या कलमासारखी भासत नाही. ‘जीवनात असे काही तरी गोवलेले आहे, जे केवळ कवितेतच व्यक्त होऊ शकणारे आहे’, ते ही कविता नेमकेपणे मांडते. उदा. ‘बाइक सेक्स’ या शीर्षकाखालील दोन कविता. मुळात बाइक ही तारुण्याची मक्तेदारी असते. रस्त्यावर सुसाट निघालेले बाइकस्वार हे रहदारीमध्ये नेहमीच नजरा वेधून घेत असतात, बघणारे त्यांच्यावर शेरेबाजीदेखील करत असतात. त्यात पाठीमागे जर मुलगी बसली असेल, तर मग रोमान्सचा आणखी रंग भरला जातो. आणि मागची तरुणी जर बाइकस्वाराला बिलगून बसली असेल, तर ते जणू ‘मोबाइल मिथुनशिल्प’ बनून जाते. यात प्रणवच्या विलक्षण पारखी नजरेला कविता दिसते.
‘बाइक सेक्स’मधील पहिल्या कवितेत किमान ‘स्व’अनुभव असायची शक्यता तरी जाणवते, परंतु दुसर्‍या कवितेत कवी पुन्हा सरळसरळ निरीक्षक झाला आहे. तरीही या दोन्ही कविता अजिबात नीरस, शुष्क झालेल्या नाहीत; तर चांगल्याच रसरशीत आहेत. या कवितांमध्ये स्थितीच्या वर्मावर नेमके बोट ठेवले गेले आहे. या कविता वाचताना ‘बाइक’ या समान घटकामुळे अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’ या कवितासंग्रहातील ‘मौत का कुवा’ या कवितेची आठवण येते.
कोलटकरांची थेट आठवण येणारी अशीच आणखी एक कविता आहे, ती म्हणजे ‘खोली’. ही कविता वाचताना असे आवर्जून जाणवते की, आपण सर्वच जण खोलीतच तर राहत असतो; पण या ‘खोली’चे अस्तित्व हे कविताविषय आहे, याचे भान आपल्यापैकी किती जणांना असू शकते? आणि खोली तशी लांबचीच गोष्ट राहिली, पण आपला देह हाच निरीक्षणाचा; पर्यायाने कवितेत मांडण्यासारखा विषय आहे, हे ‘स्व’च्या रिंगणात राहणार्‍या कवींपेक्षा जास्त या निरीक्षक कवीला कळले आहे, हे त्याच्या ‘चरणकमल’ या शीर्षकाच्या कवितेत जाणवते. या कवितेची शेवटची ओळ, ही पुन्हा कोलटकरी मिश्कीलतेची आठवण करून देते.
प्रणवच्या कवितेच्या वेगळेपणाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर हे आवर्जून नोंदवावेसे वाटते की, या कवितेला प्रयोग करायचा सोस नाही. म्हणजे असं की, हेतूपूर्वक काही वेगळे करावे, असे अवधान ही कविता बाळगत नाही. कवितेच्या संदर्भात मांडणी, रूप, आकृतिबंध या दर्शनी गोष्टींना महत्त्व असतं. पण त्याची दखल प्रणवची कविता आवर्जून घेताना दिसत नाही, आणि त्यांची जाणीवपूर्वक मोडतोडदेखील करताना दिसत नाही.
प्रणवच्या एकूणच कवितेत हे सतत जाणवत राहते की, तीत जीवनावर केलेली कॉमेंट्री आहे. याचे कारण मूलत: हे आहे की, ‘स्व’च्या रिंगणातून बाहेर पडल्यामुळे बहुतांश कवितांमध्ये आढळणारी तरलता, भावुकता, कल्पनारम्यता वगैरे गोष्टींचा मागमूस या कवितेत नाही. परिणामी ही कविता अधिक सूक्ष्मदर्शी झाली आहे, ती वरकरणी देखल्या वास्तवात अडकून पडत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन स्थिती टिपते. वास्तव आणि स्थिती यांतील फरक प्रणवच्या कवितेत नेमका पकडला जातो. प्रणवच्या कवितेत स्थितीचा जो वेध घेतला गेला आहे, तो प्रत्येकाला तंतोतंत पटणे अर्थातच शक्य नाही, किंबहुना पटताही कामा नये. परंतु ‘स्व’ आणि वास्तव यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याप्रमाणेच स्थितीचे निरीक्षण करूनदेखील कविता प्रसवण्याएवढी तरलता गवसू शकते, ही जाणीव जरी जोपासली गेली, तरी ही कविता सार्थकी लागू शकेल.
प्रणव सखदेव विरचित पायर्‍यांचा गेम आणि इतर कविता
प्रकाशक - अमलताश बुक्स
पृष्ठे - 81 मूल्य - 125
satishstambe@gmail.com