आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी बोली माझी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषा आणि त्या भाषेतले शब्द हा भौगोलिक स्थितीनुसार बदलणाऱ्या दोन माणसांमधल्या संवाद-समन्वयाचा परिपाक. प्रत्येक स्थितीचं व्यक्त होणंही निराळं. त्या व्यक्त होण्याच्या ऊर्मीतूनच जगण्याशी घट्ट नाते असलेले शब्द जन्म घेतात. पुढच्या पिढ्यांमध्ये अभिसरित होत राहतात. प्रमाणभाषा तिथे मागील बाकावर बसलेली राहते. परंतु अभिजन वर्तुळात प्रमाणभाषेचा मान मोठा. त्यामुळे तिथे बोलीभाषा दबकत-बिचकत अंग चोरून असते. न्यूनगंडाने वावरते. मात्र समाजमाध्यमांच्या अवतरण्याने अस्सल मातीचा गंध नि स्पर्श असलेल्या बोलींचे पाट झुळूझुळू वाहते झाले. आज याच पाटांच्या प्रवाहांमुळे कधी नव्हे ते मराठी भाषेला डौलदारपणा आला आहे. त्या सुखद प्रक्रियेचा हा धांडोळा...

‘काळाचा महिमा अगाध असतो’, हे तसं एक घिसंपिटं वाक्य आहे. मुळात तो खरं तर काळाचा महिमा नसतोच, तर ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा महिमा असतो. जे मानवी बुद्धिमत्तेमुळे काळाच्या ओघात विकसित होत जातं; पण माणसांना ‘ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान’ यापेक्षा ‘देव, दैव, काळ’ वगैरे गोष्टी जवळच्या वाटतात आणि त्यामुळे त्यांना ‘देवाच्या दयेने’, ‘सुदैवाने’, ‘काळाचा महिमा’ असं श्रेय देणं अधिक सोयीचं वाटतं. परिणामी तंत्रज्ञानाचा महिमा अलगद काळाच्या नावे जमा होतो. जसं की गेल्या काही वर्षांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये हां हां म्हणता पसरलेल्या कॉम्प्युटर, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिकी तंत्रज्ञानाची किमया ही काळाच्या ओघात एकविसाच्या शतकाच्या नावे जमा होणार आहे. 

विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या इंटरनेटने आणि त्या मार्गे आलेल्या फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांनी जगभरातील मानवी जीवनाचा ढाचाच पुरता बदलून टाकला आहे.
‘मनुष्य हा एक सामजिक प्राणी आहे’ ही व्याख्या जरी आपण शाळेपासून घोकली होती, तरी आजच्या तुलनेमध्ये तेव्हाचा प्रत्येकाचा समाज हा कुटुंब, नातेवाईक, शेजारीपाजारी, कामाच्या ठिकाणचे लोक, मित्रमंडळी एवढ्यापुरता मर्यादित होता. पण या समाजमाध्यमांमुळे आज अखिल मानवजात एकाच प्रतलावर एकमेकांबरोबर तत्क्षणी संपर्क साधू शकते. या जगड्व्याळ तत्काळ संपर्कसुविधेमुळे जगातील जवळपास प्रत्येकच क्षेत्रामध्ये मोठ्याच उलथापालथी होत आहेत. ज्यातील सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे, ते अर्थातच भाषा.

वास्तविक पाहता भाषकांची संख्या विचारात घेता, आपली मराठी ही जगातील १७व्या नंबरची भाषा आहे. तरीही इंटरनेट आणि समाजमाध्यमे अवतरायच्या काही काळ आधीपर्यंत, म्हणजे विसाव्या शतकाच्या शेवटच्या २०-२५ वर्षांत, ‘मराठी भाषा शेवटच्या घटका मोजते आहे की काय?’ असे एक कृतक भीतिदायक चित्र डोळ्यासमोर उभं केलं जात होतं. याचं कारण मराठी भाषेतील साहित्य, कला, माध्यमं वगैरेंवर ज्यांचा वरचश्मा होता, अशा शहरी उच्चभ्रू मंडळींची मुलं तेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊ लागली होती आणि त्यांचं अनुकरण करण्यात धन्यता मानणारे ग्रामीण लोकदेखील आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालू लागले होते. परिणामी, ही भीती अगदीच निराधार नव्हती. इंग्रजीचा प्रभाव वाढत होता, ही वस्तुस्थिती होती. पण याचा अर्थ मराठीचे उच्चाटन होईल, असा लावणे गैर होतं. कारण नव्याने साक्षर होऊ लागलेल्या आपल्या समाजात व्यवहाराची/संवादाची भाषा मराठी किंवा तिची एखादी बोलीभाषाच होती. पण ‘मराठीची इतिश्री’ होण्याची भीती बाळगणाऱ्या मुंबईसारख्या महानगरी, पुण्यासारख्या नागर मंडळींना तेव्हा हे चित्र ठाऊक नव्हतं. एकविसाव्या शतकात कॉम्प्युटरच्या वाढत्या प्रसाराबरोबर इंटरनेट आणि त्याच्या जोडीने समाजमाध्यमे झपाट्याने वाढू लागल्यावर हे चित्र आर-पार बदललं आणि तिथे भाषेचा असा काही लोंढा घुसला, की मराठीला घरघर लागल्याची अवास्तव भीती कुठच्या कुठे वाहून गेली.

समाजमाध्यमे उदयाला आली, तेव्हा भारतीय भाषांमध्ये लिहिण्याची सोय आजच्याएवढी सरसकट नव्हती. मात्र यथावकाश भारतीय भाषांमध्ये टायपिंग करता येणाऱ्या अनेक सुविधा विकसित झाल्या आणि मग थेट अनिवासी भारतीय ते ग्रामीण भागातील मंडळी देवनागरीतून व्यक्त होऊ लागली. तिथेच मराठीसाठी अक्षरशः एक नवीन पर्व सुरू झाले. 
त्या आधी साठोत्तरी वातावरणात मराठी साहित्याचा प्रचार जरी सर्वदूर झाला होता, तरीही लेखक मंडळींद्वारा पुस्तकातून येणारी भाषा ही तुलनेमध्ये सीमितच होती. पण समुद्राला जसे अनेक नदी-नाले येऊन मिळतात, तशी समाजाच्या सर्व स्तरांमधील भाषा या समाजमाध्यमांमध्ये येऊन ओतली जाऊ लागली. न केवळ बोलीभाषा, तर ‘बारा कोसांवर भाषा बदलते’ असं जे आपल्या कानी आजवर होतं, त्याची अक्षरश: प्रचिती यावी, एवढे शब्द समाजमाध्यमांमध्ये अवतरू लागले. यातील काही शब्द हे संदर्भामुळे कळतात, तर काही शब्द कळतही नाहीत. मात्र समाजमाध्यमांमधील ऊठबस/वावर हा सर्वसमावेशक स्वरूपाचा असल्यामुळे अडलेल्या शब्दांवर इथे अधनंमधनं चर्चादेखील होत असते.
फार काय, प्रमाणभाषेमध्ये असल्याने वापरात असलेले काही शब्द हे ग्रामीण भागातील मंडळींना अगम्य वाटत होते, तेदेखील चर्चेला घेतले जातात आणि अक्षरशः जगभरातील सर्व वयोगटातील मराठी भाषक मंडळींच्या उपस्थितीमुळे या चर्चेमध्ये वेगवेगळे अन्वय, स्रोत, आडाखे, पूर्वपीठिका यांमध्ये वैविध्य जाणवते. एकूणात काय तर एवढी भाषिक चर्चा ही मराठीमध्ये आजवर कधीही झालेली नव्हती, ती या नवीन माध्यमांमध्ये सहजपणे सुरू असते. महत्त्वाची गोष्ट ही की, त्यामध्ये सामान्य माणसे आणि उत्तम जाणकार दोघांचाही सहभाग असल्याने ही चर्चा एखाद्या विद्वतसभेसारखी बोजड-अवजड होत नाही, तर सुलभ भाषेमध्ये होते.

अर्थात, यामध्ये चुका, अशुद्धता या गोष्टी समोर येणं, हे ओघानेच येतं. जे भाषेविषयी सजग, सुजाण आणि संवेदनशील असणाऱ्या मंडळींना साहजिकच खटकतं, ते याबाबतची आपली मते, नाराजी अध्येमध्ये नोंदवत असतात. मात्र भाषिक शुद्धतेचा आग्रह आता हळूहळू सोडावा लागणार आहे आणि प्रमाणभाषेचा फार बाऊ करण्यात हशील नाही, ही जाणीव आता मूळ धरू लागली आहे. मुंबईची भाषा तशी मुळातच एकजिनसी नाही, पण पुण्याच्या भाषेचं मराठीमध्ये जे ठळक स्थान होतं, ते या समाजमाध्यमांमुळे खूपच पुसट झालं आहे. याचं कारण शब्दांचा हा महापुरासारखा लोंढा वेगळ्या प्रकारचे अनुभव आणि शैलीदेखील घेऊन येतो. या माध्यमांमध्ये अवतरणाऱ्यांची वर्गवारीदेखील एवढी प्रचंड आहे की, यापुढे भाषा ही कुणा एका समाजसमूहाची मिरासदारी राहणं शक्यच नाही, ही जाणीव वाढीला लागली आहे. त्यामुळे पूर्वी जसं ‘ण’ आणि ‘न’ यांची गल्लत करणाऱ्यांना ‘आनिपानी’ करणारे लोक असं हिणवलं जायचं, तो प्रकार आता हळूहळू इतिहासजमा होत चालला आहे. त्याबरोबरच ज्यांना भाषेमध्ये रुची आहे आणि खोलात शिरायची इच्छा आहे, अशी मंडळी इथे वेळोवेळी भाषिक शंका मांडून चर्चा घडवत आहेत. मराठीच्या जडणघडणीवर ज्यांचा परिणाम झाला आहे, त्या संस्कृत, प्राकृत, फारसी, उर्दू, इंग्रजी शिवाय बोलीभाषांची तज्ज्ञ मंडळीदेखील इथे असल्याने भाषिक शंकाकुशंकांचे येथे यथास्थित निवारणही होत असते. शिवाय येथील विषयांना कोणतेही बंधन नसल्याने भाषेचा लोंढा हा एवढा प्रचंड आहे, की मराठीच्या आजवरच्या वाटचालीमध्ये असं कदापि घडलं नसावं. त्या दृष्टीने पाहता हा मराठीच्या वाटचालीसाठी अक्षरशः सुवर्णकाळ अवतरल्यागत आहे. थेट यादवकाळापासून विसाव्या शतकापर्यंत, मराठीतील अवघं शब्दभांडार असं एकाच ठिकाणी कधीच नांदत नव्हतं.  

आता भाषा आणि साहित्य यांचा परस्परसंबंध लक्षात घेता, या साऱ्याचा परिणाम साहित्यावर होणंदेखील ओघानेच येतं. इथे कविता तर मोठ्या संख्येने समोर येत असतातच, पण ‘अनुभवाचे बोल’देखील भरभरून लिहिले जातात. त्यातील लक्षवेधक शैलीला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, तो बहुतेकांना समाधानकारक वाटतो. त्यातील काही मोजकेच लोक हे वृत्तपत्र ते पुस्तकं इथपर्यंत पोहोचतात. अजूनही पूर्वापार साहित्यप्रकारांचं महत्त्व जरी शाबूत असलं, तरी संवाद साधणे हा निकष लक्षात घेता, समाजमाध्यमांमधून जे किस्सेवजा अनुभवांचे, वैचारिक मांडणीचे तुकडे समोर येतात, ते भावी काळात साहित्यामध्ये सामावले जाऊन, साहित्याच्या कक्षा विस्तारण्याची दांडगी शक्यता समाजमाध्यमांमधील अभिव्यक्तीतून जाणवू लागली आहे. एकूणात काय, तर समाजमाध्यमांमुळे भाषा ही अधिकच संपन्न होत गेली. समाजाच्या झाडून सर्व स्तरांतील लोक इथे व्यक्त होऊ लागले. त्यामुळे ‘मराठी लवकरच संपणार’ ही आवई आता जवळपास विरून गेली आहे, हे समाजमाध्यमांमुळे लाभलेले मोलाचे योगदान आहे. समाजमाध्यमे आणि भाषा या विषयांमध्ये इतके बारकावे आहेत, की त्यावर काही ग्रंथ सिद्ध होऊ शकतील. इथे प्रश्न विचारायचा अवकाश, त्यासंबंधी मतांचा, माहितीचा अक्षरशः वर्षाव सुरू होतो. तेव्हा खात्री पटते की, समाजमाध्यमांनी भाषांना एक नवसंजीवनी दिली आहे. 
तेव्हा “मराठी भाषेचा सुवर्णकाळ कोणता?” असा प्रश्न जर समाजमाध्यमांमध्ये मांडण्यात आला, तर त्यासाठी थेट यादवकाळापासून एकविसाव्या शतकापर्यंत अनेक उत्तरं दिली जातील, परंतु शब्दसंख्येचा विचार करता समाजमाध्यमांचा एवढा सुकाळ आजवर कधीही नव्हता, हे निर्विवादपणे मान्य करावंच लागेल.
 
बोलींचे रंग-ढंग

वसईच्या ख्रिसी कुपारी समाजाची कादोडी बोली
जेलाडीशा रसेलने महाराष्ट्र श्री वर आपल्या कुपा-याव झेंडाॅ फडकविल्यामुळॅ माला अतोनात अभिमान वाटलाॅ. माई छाती गर्वाए फुगाॅन आली. थोडॅफार हातपाय सालविलॅ तॅ आपून पाण अहीस बाॅडी बिल्डींग करू शकात्याव अहाॅ माला त्या धीहा साक्षात्कार जालाॅ . मग हांच्यापारा जाऑन दुकानातनॅ पाव किलो काजू आणि अर्दा किलो बदाम पिस्ता घेवाॅन आलाॅ. एक लीटर दुधाई बाटली पाण ईकत घेतली. त्या का हाय ना जर बाॅडी बिल्डींग क-याशी हायदे ते दबाके खाना-प्याना जाला पाय आहा वटारसो राजेश बोळींजशा अर्नेस्टला बोलताना पहरावशा बाॅबीनॅ ऐकिताना मॅ एकदा बगीलताॅ .
(सिमसन व्हिन्सेंट राॅड्रिग्ज )
 
झाडीबोली
अब्यास सुरु होता तोवरी च्यामारी दिमागात सतरा गोष्टी येऊन रायच्या. डोळे बन केले का मेंदू मन्जे मेंदू नसून झारी असल्यावानी वाटे.च्याभैन हे सांगू का थे सांगू मन्तानी सर्व्या गोष्टीचा कारंजा होऊन जाचा....येकडाव सर्व्या मेंदूचा कवेलू बदलून टाकला ज्जा लेकाले. नं निस्ता अब्यास केलो. कोनीबी अति शाना अब्यासू जसा टायमावर सारी लायबरी घ्यून बसते तसा केलो. मरमर करू करू लिवलो. च्याभैन मान , हात गीत पार मोडले. डाक्टर झाला...पन आपल्या डोक्ष्यावर अब्यास होता. केलो...! लीव्लो.
( माधवी भट ) 
 
बागवानी
न्हन्नेने किरीम बिस्कीट मंग्या. दुकान्दार दिया. बडेने बोल्या ही नको, चाक्लेटी द्या. दुकान्दार्ने वाकडा मूं कर्के बदल्के दिया. पैशे देताना मां ने सौ की नोट काडी. दुकान्दार हौर वैताग्या. बोल्या, पाच रुपे सुट्टे द्या वं.    
मां उस्शे डबल वैताग च्हैरेपे लाके बूली, 'तेवढीच हाया नोट. आत्ता टीवी विकून आणलंय. द्या सुट्टं तुमीच. ही ब्येनी आय्कतील तर नां.''
( इरशाद बागवान ) 
 
हैदराबादी
"हामचं तर लई कडक र्हाते ऊपास!!’
"हामचंबी लई कडक र्हाते ओ मनलं तर !’
"काय तर खायच्या व्हत्या की ओ मंग आक्का!!’
"हामच्या पाटलैला जमचं ना की ओ खाल्लेलं...’
"दुध तर घ्यायच्या व्हत्या नक्कर...’
"घेटलाव ओ, हिंगं... दोन गिलास दुद... पेंडखजूरं... पपया... झालच तर आपले पाच सहा केळं... तुमी काय खाल्ल्या आक्का? "
"हे समदं... अजुक दशम्या... धपाटे... ...ताक...’
"चुकून सोप खाशाल बरं...’
"शिवशिवशिव... बर्या हाव ओ माय ...खाईना ये माय ...सोपाला बाटना हो...’
( मकरंद जामकर )
 
संपर्क : ९८२१२६२५५५
बातम्या आणखी आहेत...