आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ बिती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केजरीवाल बाबू मुख्यमंत्री झाल्याबरोबर अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटातले काही तुकडे एका बाजूला आणि टोपी व मफलरधारी केजरीवालांची छबी दुस-या बाजूला दाखवत इलेक्ट्रॉनिक मीडियाने जो हैदोसहुल्ला उडवला होता, तो पाहून आमच्या काही जाणत्या आयाबाया, ‘ह्यो बाबा पिच्चरमदी गेलाय काय’, असंही विचारू लागल्या. लोकशाहीत घडलेला हा चिमित्कार पिच्चरमदीच आजवर दिसलेला; पण दिल्लीत खराखुरा पाहिल्याने आमी हरखून गेलो. केजरीवाल बाबू काय करतील, त्याची गडद, पुसट खूण पिच्चरमदी शोधू लागलो. मीडिया ती नंतर दाखवेना आणि मग आमची चीडचीड होऊन आमची च्यानल बदलाबदली वाढली. सत्ता हाती घेतल्यापासून रोज नव्या घोषणा करणे आणि मीडियाला ब्रेकिंग न्यूज देणे; हीच आपली ड्युटी आहे, असे ‘आप’ ग्यांगला आणि त्यांच्या प्रमुख बाबूला वाटू लागले आहे. पण, त्यांनी भरवलेला जनता दरबार पहिला, आणि राजा परांजपे व राजा गोसावी यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या पिच्चरची आठवण झाली. लाख रुपये खर्चण्याची क्षमता नसलेले नायक आणि सत्ता मिळून राज्यशकट हाकण्याची कुवत नसलेले केजरीवाल; हे चित्र ब-यापैकी सारखे आहे, हे पक्के गडद झाले...
‘आप’चा उदय आणि वाटचाल ही किसन हजारे (राळेगणकर) यांच्या रामलीलावरील 2011च्या तमाशापासून सुरू झाली. प्रसिद्धीला चटावलेल्या किसन हजारेंना मीडियाने देवाचा दूत भासवत, पब्लिकचा (मेणबत्तीवाले) तारणहार केवळ तोचि एक अण्णा! हे चित्र तयार केले. त्यावर ‘जाम’ आणि ‘आम’ दोन्ही प्रकारचे पब्लिक डोलू लागले. किसन हजारे फुगू लागले आणि अशात सरकारी बिलाला ‘जोकपाल’ म्हणत केजरीवाल बाबूने कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये, ‘अब हमे व्यवस्था में उतरना होगा, असं म्हटल्याबरोबर किसन हजारे नाराज झाले, त्यांनी बाबूबरोबरचे सर्व रिश्ते तोडले.
आपल्याकडे विरेचन म्हणून एक प्रकार मान्यता पावलेला आहे. निचरा होणे. आम्ही जातीय आहोत; पण जातीयवादी नाही. सब का भला हो लेकिन पहले सिर्फ मेरा हो! याचा स्वीकार होऊन सर्व शकट नीट असावे, अशा इच्छे-अपेक्षेत वावरणारा, सांपत्तिक स्थिती उत्तम असणारा एक मोठ्ठा वर्ग, या आंदोलनात सक्रीय सामील होता. हा वर्ग 1991 नंतर जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या लाटेने इथे तयार झाला. आमची सोच ग्लोबल सोच! म्हणून सिद्ध झालेला हा युवा व मध्यम सेटल वर्ग याला जातीय दंगली, राजकारण, त्यांच्या भाषेत करप्शन आणि मुख्य अजेंड्यावर आरक्षण या विषयाने ग्रासले. हा मनाने भाजप व संघाशी ज्यादा जोडलेला; परंतु वरकड सेक्युलर जप जपणारा. त्यांना उघड भाजप वा ब्राह्मणी झाकेची पारंपरिक काँग्रेस याचं कुठलंच नेतृत्व नकोसं होतं आहे. त्याला सबळ कारण म्हणजे, सोनिया गांधींचे विदेशी असणे आणि त्यांच्या हाती नेतृत्वाची दोर असणे. हे इथल्या ब्राह्मणवादी मनोवृत्तीला रुचणारे नसल्याने, या नव्या वर्गाची गरज म्हणून एक अशी नवी पार्टी की ज्यात कट्टर हिंदुत्व हवे; पण त्याचे व्यक्त होणे भाजपच्या थाटात नको. मंडल आयोगाला विरोध करणारे केजरीवाल बाबूंचे नेतृत्व या गरजेतून किसन हजारेंच्या या वेळच्या तमाशाचा फायदा घेत पुढे आणले गेले. जोपर्यंत हे नेतृत्व बाल्यावस्थेत होतं, तोवर संघीय मीडियाने त्याला कडे-खांद्यावर घेऊन वाढवले. घडवले. आणि बेमतलब हिंदी बडबड करणारे किसन हजारे बाजूला पडले. हे घडवलेले नेतृत्व, आता अप्रत्यक्ष संघप्रणीत भाजपची मदत करते आहे. ढोंग मात्र मोहनदास गांधींच्या तोडीचे वठवत आहे. सरकारी बंगलाच काय नको, सुरक्षा व्यवस्थाच काय नको, आणि स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन, या प्रकाराने तर कहरच! सरकारी बंगला घेतला असता तर जनता दरबार तिथल्या गवतावर कदाचित सहज मावला असता. आता झेड सुरक्षा नाही, म्हणजे ती केजरीवाल बाबूला आहे, असा त्यांनी ग्रह केलाय. ती मुख्यमंत्री या पदाला असते, हे मान्य करायला ते तयारच नाहीत. जिथे 40 लोकांवर काम भागते तिथे, यांच्या साधेपणा व सादगीच्या दबावाने 100 लोक सिविल ड्रेसवर तैनात करावे लागतात. त्याचे काय? साधेपणा आणि सादगीच्या नशेने बेभान होऊन मुख्यमंत्र्याने रस्त्यावर उतरून फिल्मी स्टायलने केंद्रीय गृहमंत्र्याची रेवडी उडवणे, हा भलताच डेंजर प्रोग्राम! केजरीवाल बाबूने तत्काळ देशभक्तीपर वा देशभक्तीवरच काढलेले सिनेमे पाहणं बंद करायला हवे नाहीतर, आधीचा कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणजे
आधी होती दासी। पट्टराणी केले तिसी।
तिचे हिंडणे राहिना। मूळ स्वभाव जाईना।
दुर्दैवाने सध्या दिल्लीत दिसणारी केजरीवालबाबू आणि ‘आप’ ग्यांगची थेरे म्हणजे असलाच प्रकार चालू आहे. इंग्रज गेल्याचं खरं दु:ख ‘आप’वाले व किसन हजारे ग्यांग यांच्या इतके दुस-या कुणाला होत नसावे. आंदोलनाची नशा या काळात त्यांना पुरेपूर अनुभवून तसेच कायम बडे होता येत नाही, हे दु:ख त्यामागे नक्कीच असणार. संसदेला, घटनेला नाकारत वारंवार उपोषण, तमाशे व फिल्मी आंदोलनांनी थेट सरकारी यंत्रणेला वेठीस धरून ब्ल्याकमेल करत राहणे म्हणजे लोकशाहीप्रधान मुख्य मूलभूत अधिकारांची टवाळीच म्हणावी लागेल. कायम प्रेषितांच्या शोधात असणारे समाजवादी आणि बिगर राजकीय तोंडावळा घेऊन आलेल्या एनजीओ, बदललेल्या आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्यात जे राजकीय व्यासपीठ शोधत होत्या, ते व्यासपीठ म्हणजे आप! जागतिक पातळीवरील मीडियाचे सर्वंकष पाठबळ, भारतीय सरंजामी राजकीय मानसिकतेला कंटाळलेला व आर्थिक प्रगतीला खीळ बसलेला भांडवलदार वर्ग आपल्या थैल्या सुट्या करून आपच्या मागे उभा राहिलेला दिसतो, त्याची कारणे काँग्रेसप्रणीत सरकारने तपासण्याची गरज आहे. शहरी मध्यमवर्गाला भुलवणारे रूप ‘आप’ने पांघरल्याने मतदार म्हणून हाच वर्ग टार्गेट ठेवणारा प्रत्येक प्रादेशिक पक्ष आज आपचा धसका बाळगून आहे, महाराष्‍ट्राची माय होऊन, सत्तेची साय खायचे ख्वाब बघण्याच्या ऐवजी राज ठाकरे ‘आप सोडा, इथे आम्हीच बाप आहोत’, अशी वल्गना करताना दिसतात; त्यातून हा धसका इथेही घेतल्याचे स्पष्ट होते. म्हणून टोलच्या तापलेल्या तव्यावर सध्या ते भाकरी भाजून घेण्यात गुंग आहेत.
sbwaghmare03@gmail.com