आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Waghmare Artical On Activist And Theire Leadership

कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्हीही झिंदाबाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला कुणी जयभीम म्हटलं की, मीही त्याच्या प्रतिसादानुसारच कधी खणखणीत, कधी हळुवार, कधी पुटपुटता जयभीम म्हणतो. जयभीमला प्रतिसाद देत नाही, ते फक्त विद्यापीठात एकत्र शिकलेल्या एका मित्राला. 2000 ते 2002मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आम्ही शिकत होतो. हा मित्र जयभीम बंधूच. मूळचा मराठवाड्यातला.
तो आता कोकणात एका सहकारी बँकेत नोकरी करतोय.एका चळवळीतही काम करतोय. हा एका स्थळासंदर्भात कॉलेजमध्ये मला भेटायला आला. जवळजवळ सातेक वर्षांनी भेट होत होती.
त्याने जयभीम घातला आणि मी माझं पेटंट ‘ख्या ख्या ख्या’ चालू केलं. त्याला प्रतिसाद न देता मुद्द्यावर येऊन चर्चा चालू केली. काय, कसं काय, पुणे प्रवास, बायका, पोरे या विषयावर बोलू लागलो. त्याच्या सोबतचा पाव्हणा गांगरला, विचित्र बघू लागला. मला बोलता बोलता आणि त्याचं ऐकता ऐकता मराठी विभाग आठवू लागला.
आमचा मराठी विभाग म्हणजे, महाराष्‍ट्राच्या सगळ्या भागातून आलेल्या मुलांचा भरणा. त्यानंतर त्यांच्यामधे जिल्हावार, जातवार पडत गेलेले गट. या गटांमध्ये आपापले एक अंतर राखून, खेळीमेळीच्या लबाड वातावरणात असलेली खुनशी स्पर्धा! ती लपत नसायचीच कधी. अगदी सहज एक गट ‘ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था’ म्हणू लागला की दुसरा गट, ‘हय पावलाय देव माझा मल्हारी’ म्हणायचा. तिसरा लगेच, ‘वर ढगाला लागली कळ...’ चौथा गट लगेच, ‘चला निळ्या निशानाखाली सर्वांनी एक व्हा रे’ चालू करायचा. प्रचंड दणक्यात एकमेकांचे आवाज दाबनं चालू व्हायचं. उत्तम नरड्याची पोरं, गोड गळ्याच्या ओंकार स्वरुपाला मागं टाकायची. वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा कलर पसरून मराठी विभागात रंगीबेरंगी धुरळा दणक्यात उडायचा.
सदर मित्र उत्तम गाणारा. मला एक वर्षाने सिनियर याचं ‘निसर्गराजा’ विभागात भलतंच फेमस झालेलं. या गाण्यात त्याला साथ करायची ‘ओंकारस्वरुपा’वाल्या गटातली मंजुळ आवाजाची भयानक देखणी मुलगी. हा दोस्त सुरुवातीला जयभीमची आरोळी जंगी ठोकायचा. नव्या आलेल्या पोरांना कोपच्यात घ्यायचा. बाबसाहेब, मार्क्स, सांगायचा. पाठीवर थाप टाकून कडक जयभीम घालून निरोप घ्यायचा. दिवसातल्या याच्या पहिल्या भेटीतील पहिल्या आरोळीला पहिला प्रतिसाद दिल्यानंतरसुद्धा हा दिवसभरातल्या दुस-या तिस-या भेटीत परत जयभीम घालायचा. अरे बापरे! मी म्हटलं, गडी दांडगा आंबेडकरवादी आहे. दोस्ताना वाढवूच. चळवळ समजून घेऊच. प्रोसिजर चालू केली. याच्याबरोबर जास्त वेळ राहू लागलो. संघटनेच्या बैठकीला जाऊ लागलो. हॉटेलमध्ये, होस्टेलमध्ये, मुतारीमधे एकत्रच जाऊ लागलो. याराना वाढला! चळवळ सांगताना हा तल्लीन होऊ लागला. ऐकताना मी गुंग होऊ लागलो. हॉटेलमधली वेटरं आमच्या बातुनी चळवळीला वैतागू लागली. गल्ल्यावरची मालकं आम्हाला बघितल्याबरोबर चरफडू लागली. एका ऑम्लेटवर दोन दोन तास बसणारी गाबडी म्हणून चिडू लागली. चळवळ सांगता सांगता मागवलेलं ऑम्लेट टेबलवर आलं की हा समजून सांगण्यात जराही खंड पडू न देता, मला गप्पांत गुंगवून माझ्या बाजूला आलेली ऑम्लेटची जाड बाजू, खुबीने त्याच्या बाजूला वळवून घ्यायचा. जर जाड बाजू त्याच्याच बाजूला आली तर खुश होऊन तिप्पट उत्साहात चर्चेत रंग भरायचा.
ऑम्लेटने त्याचं आणि त्याने दिलेल्या उदाहरणाने माझं पोट भरल्याचं, मी पोटाला, फ्राईडच्या आवेशात बजावून चूप करायचो. वाटलं, याला ऑम्लेट आवडत असेल. जाऊ द्या! पण लवकरच प्रत्येक पदार्थातील याची भयकारी आवड यानं सक्रिय दाखवून दिली. ती निव्वळ कौतुकास्पद! मलई बर्फी घेतली की मोठे तुकडे उचलण्यावर याचाच भर. श्रीखंडाचा पाव किलो डबा हा चार दोन काजू खावेत या सहजतेने संपवायचा. गुलाबजामून खाण्यात माझा एक तर त्याचे तीन ही रफ्तार! नाताळात एका मित्राकडे याला घेऊन गेलो तर तिथेही चिकण बिर्यानी खाण्यात हाच आघाडीवीर. कुशल नेतृत्वाचे विपुल गुण याच्या ठायी ठायी दिसून आम्हा कार्यकर्त्या दोस्तांना आनंद होऊ लागला.
गॅदरिंग नामक प्रकार जवळ आला. सहभागी गटधा-यांच्या जंगी तालमी चालू झाल्या. हा मित्रही सहभागी झालेला. याचं ‘निसर्गराजा’ ऐकायला आमची गर्दी वाढू लागली. गाण्यात सोबत करणारी देखणी मुलगी याच्या सोबत चार गाणी पेश करणार होती. त्यांच्या तालमी बघताना वाटायला लागलं, यांचं गाणं फक्त ऐकावं; बघू नये. रवींद्र महाजनी आणि रंजना यांनी स्वत:च्या अभिनयाला लाजून जावं, इतके खंग्री भाव हे दोघं चेह-यावर आणून गाणं पेश करू लागले. न लाजता आम्हाला लाजवू लागले. तालमीच्या कारणाने जवळीक वाढली. आता ही जोडी निवांत झाली. हा स्त्रीवाद मांडू लागला, ती दलित साहित्यावर बोलू लागली. याने खानोलकर बेस्ट म्हटलं, की ती दया पवारांचा ‘कोंडवाडा’ ऐकवू लागली! बिलकूलच न दमता दोघेही एकमेकांची तळी उचलू लागली. हळूहळू आसंमत विसरली, अडचणी विसरली. हा चळवळ विसरला. निसर्गात गुंगला. घेऊन गेलेला कुठलाही प्रश्न हा नंतर सोडवू रे. जस्ट वेट अ‍ॅन्ड वॉच रे. थोडं थांब. बघुयात. माझ्या लक्षात आहे. असं म्हणू लागला. चळवळ पोरकी झाली. ती मला आणि मी तिला निव्वळ हसू लागलो. ती म्हटली, जाते मी. म्हटलं, आजच्या दिवस थांब. आज निकाल लावतोच. जयभीम बंधू मला आणि चळवळीला वेळ देईनासा झाला. देखण्या मुलींबरोबरच्या चहा कॉफीने पागल पागल झाला. टेबल मॅनर्स शिकण्यात गुंग होऊ लागला. चपातीला पोळी म्हणू लागला. आबा म्हणून भेटायला येणा-या धाकट्या भावावर चिडू लागला. ओरडू लागला. तंबाखू चोरून खाऊ लागला. माउथ फ्रेशनर वापरू लागला. देशी कटाक्षाने टाळू लागला. आम्हाला टाळू लागला.
हा जयभीम बंधू ‘चला निळ्या निशाणाखाली’च्या गटातून अलगद ‘ओंकार स्वरुपा’च्या गटात डेरेदाखल झाला. हा त्या गटातील मेंबरांबरोबर असला की जयभीम आरोळी ठोकेनासा झाला. बाहेर आम्ही दिसलो, की अजिबात पाहिलेच नसल्याचा, कसलेल्या अभिनेत्यांना लाजवेल, असा सुरेख अभिनय करू लागला. आमच्या जयभीमने हा कानकोंडा होऊ लागला.
याचा खणखणीत जयभीम आता पुटपुटण्यावर आला. हा भलताच दैनंदिन पेचात अडकला. पण हा मूळचा हुशार. लवकरच नामी शक्कल यानं शोधली. त्याला कुणी जयभीम घालायच्या आत नजरानजर झाल्याबरोबर, हा त्वरेने जयभीम गाळून, कुणाच्या लक्षात येणार नाही असे संभाषण करू लागला. चिक्कार प्रश्न विचारून जयभीम सॉलीड कट करू लागला. मी दिसलो की अरे ‘इंधन’ वाचलीस का? (जयभीम कट) तू लायब्रीत गेला होतास का रे? (जयभीम कट) ऐ, ती मुक्ता तुला शोधतेय इकडं काय करतोस? (जयभीम कट) हा चतुर बिरबलाच्या कैक पुढचा तयार झाला. हजरजबाबीच्या धर्तीवर हा हजरसवाली झाला. कुणी बरोबर नसलं की मात्र परत खणखणीत जयभीम! वर प्रतिसादाची अपेक्षा! एकदा टाळकं सटकलं. यानं सवाल केला, जयभीम गाळून. म्हटलं, बाजूला ये. त्याला विचारलं, आम्हाला काय बिनडोक समजतोस का बे? गाढवीच्या! चल परत, आपण तुला जयभीम घालत नसतो आणि तुझा घेतही नसतो. उलीसे वाईट वाटून तो पुन्हा आदिम निसर्ग चक्रात बुडाला. जयभीमसह जयभीमवाले विसरला!
आज त्याला पाहिल्याबरोबर हे सर्व आठवलं. का आठवलं, हे त्याच्या पावण्याला सांगण्यात पॉइंट नव्हता. कॉलेजची कामं आटोपून गप्पा मारत, दुपारी जेवायला एका हॉटेलात गेलो. सदर मित्र आजही एका चळवळीत काम करतोय. चळवळ चालवताना येणा-या अडचणी तो सांगू लागला. प्रकरण घेऊन येणा-या प्रकरणार्थीकडून पैसे घेणं म्हणजे लढानिधी घेण्याची आवश्यकता कशी आहे, ते पटवून देऊ लागला. टेबलावर मटण-भाकरी आली. जेवायला सुरुवात झाली आणि आजही त्याचा मटण खाण्याचा उरक पाहून पुन्हा दंग झालो. त्याचे कार्यकर्ते डोळ्यासमोर तरळून गेले. मनात म्हटलं, चळवळीच्या नेतृत्वाची भूक अद्याप दांडगी आहे. जबराट आहे. जाड बाजू स्वत:कडे वळवून घेण्यात नेतृत्व अधिक कुशल झालंय. आणि कार्यकर्ते मात्र पातळ झालेत. पातळ झालेल्या कार्यकर्त्यांचा पोकळ बळाने नेतृत्वाच्या नावाचा जयघोष मात्र अजून सुरूच आहे. कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्हीही झिंदाबाद!