आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांचं स्वप्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तसा गाढ झोपतो, स्वप्नं फार कधी पडत नाहीत. पण त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक, एक स्वप्न पडले... वर्गात भूगोलाचा तास चालू आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना समोर नकाशा ठेवून भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांची ओळख करून देत आहेत. ओळख करून देता देता ते महाराष्ट्र राज्यावर येतात आणि सांगतात, मुलांनो ही जी कोपर्‍यात दिसतेय, ती बारामती आणि एक ते सव्वीस क्रमांकासह ‘लवासा’ नावाने दिसून येणारी ही पर्यटन बेटं म्हणजे महाराष्ट्र! मध्ये कुठे तरी पुणे, मुंबईसारखी छोटी शहरं अस्तित्वात होती, असे म्हणतात; पण त्याला काही अर्थ नाही. तसे कुठलेच पुरावे इथे आढळत नाहीत... मी गडबडून उठलो. काय असावा ब्वा या स्वप्नाचा अर्थ, म्हणून विचारात पडलो. पण साहेबांचे भाषण लख्ख आठवले आणि जीव थंडावला.

साहेब मोठे धोरणी! आपल्याकडे नेहरूंनी स्वप्न पाहिले. मग यशवंतरावांनी पाहिले, पुन्हा मुरारजी, पुन्हा बाळासाहेब... आणि लेटेस्ट स्वप्नवीर राज ठाकरे...! सगळ्यांच्या स्वप्नात देखणा महाराष्ट्र आहे, हे कॉमन. स्वप्न बघणार्‍यांची यादी तशी बडी आहे. पण हेतू यादीचा नाही. सगळ्यांनी स्वप्न पाहिली, ती रात्रीची. पवारसाहेब एकटेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहतात. त्यातली सगळीच खरी होतात की सगळीच खोटी, हे नंतर ठरवू. पण त्यांचे जे स्वप्न खरे होते ते टरकावणारे असते, हे मात्र नक्की! ते स्वप्न पाहतात आणि त्यासाठी ते झगडतातदेखील. नंतर साठल्या जाणार्‍या गाडीभर पुराव्यांची तमा न बाळगता. लगेच ते शिलेदारांना गोळा करून वा ऑलरेडी जिथे शिलेदार जमलेले असतील, तिथे जाऊन स्वप्नाची कैफियत मांडतात. मग ते हडबडून गडबडून अधेमध्ये जशा पक्षाच्या चिंतन बैठकी; हो, बैठकीच घेतात!

त्या दिवशी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’ला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साहेब बोलत होते. साहेबांनी एक स्वप्न सत्यात उतरवले आणि मग त्यांना तशीच कैक विकृत स्वप्ने सत्यात उतरवायचा ध्यास लागल्याचे त्या दिवशीच्या भाषणातून लक्षात आले. साहेब म्हणाले, महाराष्ट्र देशी 26 ठिकाणी लवासासारखी पर्यटन केंद्रे विकसित करता येऊ शकतात, पण त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कोणताही नवीन प्रकल्प आला की, त्याच्या विरोधी समिती तयार होते. आणि विकासप्रक्रियेकडे दुर्लक्ष होऊन, विकासविरोधी घटकांना प्रसिद्धी मिळते. पश्चिम महाराष्ट्राच्या विशेषत: सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. या भागातून लोकसंख्येचे दुसरीकडे स्थलांतर झालेले आहे, पण तिथे पाणी आणि भरपूर टेकड्या आहेत, तर इंग्लंडच्या धर्तीवर पर्यटन केंद्रे का उभारू नयेत?

अवश्य उभारा साहेब, स्वप्न तुम्हाला पडलेय. एव्हाना, तिथल्या जमिनी ‘प्री प्लान’ काही लोकांनी घेतल्या असतील आणि तिथून परागंदा झालेल्या लोकांना योग्य भाव देऊन परागंदा व्हायला भागही पडले असेल. (योग्य भाव कोणता आणि तो कुणी ठरवला? ज्याला जमीन विकायची नसते त्याच्याकडून ती कशी विकत घेतली जाते, हे सांगा-विचारायची गरज नाही.) महाराष्ट्रातला आदिवासी, शेतकरी, गरीब मराठा समाज आणि दलित समाज नागवण्यासाठी राजकारण्यांना आंदणच दिला आहे. मूळ भूमिपुत्र हटवून त्याच्या घरादारावरून नांगर फिरवून आधीच एक सुंदर नंदनवन उभारले गेले आहे. ही प्रसारमाध्यमे ते नंदनवन न पाहता, मूठभर आदिवासींच्या, गरीब शेतकर्‍यांच्या दु:खाची गा-हाणी गात आपल्यासारख्या विकासाची सतत स्वप्ने पाहणार्‍या माणसाला समजून घेत नाहीत...

साहेब, तुम्ही खरेच त्यांची कार्यशाळा किंवा चिंतन बैठक घ्यायला हवी. तुम्ही लोकांची काळजी वाहताना गरीब-श्रीमंत भेद करत नाही. मूठभर श्रीमंतांना खूप पैसे कमावून झाले की चैनचंगळीसाठी महाराष्ट्रात एकही ठिकाण नसावे? ही गोष्ट तुमच्या नाजूक मनाला खूपच लागलेली दिसतेय, साहेब. म्हणूनच कदाचित तुम्ही या लोकांसाठी लवासा लेकसिटी प्रकल्पाला पाठिंबा दिला. एक ठिकाण विकसित करण्याकरता ‘लवासा’ने केलेली निसर्गाची कत्तल, पर्यावरणाचा -हास, लोकांच्या फसवणुकी, कायद्याची वासलात, हे सारे पाहून तुम्ही जराही थक्क आणि व्यथित झाला नाहीत. कारण मूठभर श्रीमंतांसाठी घेतलेला ध्यास आणि तुम्हाला पडलेले स्वप्न जास्त महत्त्वाचे वाटत होते. बरे ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे तुमचे धोरण! (‘एकमेकां’ची तुमची व्याख्या जरा जास्त संकुचित आहे; पण ते असो.) हा तुमचा बाणा असल्याने तुम्ही एका दगडात अनेक फळे तोडून तुमच्या सर्वांचे पोट भागवता, ते जास्त कौतुकास्पद आहे. ‘लवासा’ लेकसिटीवर शासनाची एवढी मेहेरनजर का? आणि तुमच्या ध्यासाच्या अंत:प्रेरणा नेमक्या कोणत्या, हे काही लोकांनी शोधले आणि तुमच्याविषयीचा आमचा आदर प्रचंड दुणावला, साहेब.

चला. आम्ही एक ‘लवासा’ पाहिलेय. आता तुम्हाला सव्वीस ‘लवासा’चे स्वप्न पडलेय. साहेब, तुम्हाला तुमच्या मनासारखी स्वप्ने पडू द्या. पण, कधी कधी आम्हाला पडणारी स्वप्ने काय आहेत, तेही पाहा. आम्हाला स्वप्नात दिसलेलं कर्जबाजारी शेतकर्‍याचं झाडाला टांगलेलं मढं तुम्हाला कधी तरी दिसू द्या. पांढर्‍याफटक कपाळाच्या विधवा आणि काडीसारख्या हाता-पायांची गरीब लेकरेही तुम्हाला दिसू द्या. नोकरीच्या ध्यासाने पळून जीव गमावणारे बेरोजगार तरुण दिसू द्या. नितीन आगेचे अगतिक आईबाप तुम्हाला दिसू द्या. तुम्ही मोप जाणते आहात साहेब, तुम्हाला आम्ही काय स्वप्ने सुचवावी?