आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनी काळ सोकावतोय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कबूल? हो कबूल! आता श्रद्धा ही अंधश्रद्धेची पहिली पायरी आहे. आहे का कबूल? अजिबात नाही. श्रद्धेवर प्रश्न निर्माण करणार्‍यांनो, तुमचा तीव्र धिक्कार असो. आता असो तर असो (आम्ही आत्मा आणि भुते मुळीच मानत नाही. म्हणूनच देव मानण्याचेदेखील काही कारण नाही.) पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंतर्गत विचारविसंगतीची उदाहरणे कैक आहेत. आताचे ताजे पोळांचे प्लँचेट प्रकरणच पाहू. समजा, पोळ शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गेले असते आणि लवकर तपास लागू दे, म्हटले असते तर मीडिया आणि विचारवंत इतके केकाटले असते काय? दरवर्षी मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन विठोबाकडे ‘पाऊसपाणी पडू दे, महाराष्ट्र देशी सुखसमृद्धी नांदू दे’ अशी मागणी करतात. मीडियासमोर हेच मागणे मागितले, असे जाहीरही करतात. यंदाच्या मुख्यमंत्र्यांनी तर टिळा-टोपी व गळ्यात टाळ घालून भक्तीचे देखणे दर्शन दिले. नामदार दिलीपराव सोपल आणि नामदार हर्षवर्धन पाटील यांनी फुगड्यांचा फेर धरून राजकीय आध्यत्मिक रिंगण पुरे केले. त्यांच्या श्रद्धेला कुणाची ना नाही. पण त्यांची जर श्रद्धा ही श्रद्धा आहे, तर पोळ वा कुठल्या बाबाची श्रद्धा अंधश्रद्धा कशी? एखाद्यासाठी देव असणं, ही जर श्रद्धा ठरत असेल तर दुसर्‍यासाठी आत्म्याचं असणं, भुताचं असणं ही अंधश्रद्धा कशी काय ठरू शकते?
महाराष्ट्रातील कैक विद्वान, टीव्हीवरचे बडे बडे प्रबोधनकार या गोष्टीला इतके महत्त्व कसे काय आणि का देत आहेत? हा खरा सतावणारा प्रश्न! देवाच्या दारात नवस करून वा न करून काही मागणे मागणारे व भूतखेत किंवा अतींद्रिय शक्तींच्या आधारे विसंबून काही ईप्सित साध्य करू पाहणारे लौकिकार्थाने एकाच मापात मोजायला हवेत. कारण वैज्ञानिक कसोटीवर दोघांना अर्थ शून्य!

दुर्दैवाने आपल्याकडे अंतर्विरोध इतका ठासून भरला आहे की कुठल्याही चॅनलवर जयंत नारळीकरांचा वा इतर कुणाचा कुठलाही विज्ञानवादी कार्यक्रम झाल्यानंतर नजरबट्टू कवच, शिवलिंग पारदयंत्र किंवा सोनेरी मुलामा असलेले हनुमान कवच किंवा अजून अनोखे यंत्र यांची जाहिरात दाखवली जाते. आपण ती किती गंभीरपणे घेतो? प्लँचेटद्वारे तपास करण्याच्या कृतीचा निषेध वगैरे ठीकच आहे; परंतु ते प्रकरण इतका काळ ताणते ठेवून सनातनी विचारधारेसमोर आपण आपले हसे करून घेतोय, हे अंनिस आणि तमाम विद्वानांना समजायला हवे. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा तपास न लागणे, हा फक्त पोलिसांच्या इज्जतीचे वाभाडे काढण्यापुरता मर्यादित मुद्दा नसून परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा बनला आहे. परिवर्तनवादी चळवळीला हादरा देणारी भयंकर घटना म्हणजे 20 ऑगस्टला दाभोलकरांची झालेली हत्या. या 20 तारखेला या हत्येला एक वर्ष पूर्ण होतेय. मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. हत्येची रूढ कारणे अपवाद ठरत घडलेल्या, निव्वळ विचारसरणीच्या विरोधातून घडलेल्या हत्या आपल्याला नव्या नाहीत. मोहनदास गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, प्रतापसिंग कैरो, जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या आणि अजून काही उदाहरणे आहेत. डॉक्टरांची हत्या ही याच प्रकारच्या विचारसरणीच्या विरोधातून झाली असावी, हे सूत्र लक्षात घेऊन तपास अद्याप चालू आहे. या विचारसरणीमागे नेमक्या कोणत्या संघटनेतील, कोण लोक आहेत? कोणत्या प्रवृत्ती या कार्यकर्त्यांवर डूख धरून आहेत? त्या प्रवृत्ती, संघटना आणि त्यांचे म्होरके या सगळ्याची कार्यपद्धती समाजासमोर यायला हवी. भले ते गुन्हेगार नसतील. परंतु डॉक्टरांच्या विचारधारेला विरोध करणारे संघटन काय आणि कसे कसे काम करते? हे मीडियाने समोर आणायला हवे. पण मीडिया ते न करता पोळांचे प्लँचेट गाजवत आहे. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची खाण समजले जाते. त्यातही पुण्याची ओळख वेगळी. त्या पुण्यामध्ये डॉक्टरांसारख्या श्रेष्ठ विचारवंताची हत्या होणे, हे जितके दुर्दैवी आहे; तितकेच त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध न लागणे, हे अधिक करंटेपणाचे आहे. डॉक्टर गेले म्हणून चळवळ संपणार नाही, हे सकारात्मक जाज्वल सत्य कबूल आहेच; पण परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करू पाहणार्‍या सनातनी वृत्तीचा डाव उधळला जाणे, अधिक गरजेचे आहे. पण दुर्दैवाने त्यावर झोत न ठेवता उपेक्षेने मारावे, असे प्लँचेट प्रकरण माध्यमांकडून चवीने चघळले जात आहे.
मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांच्याकडे आता वारस या अर्थाने (ते तसे स्वत:ला मानत नसले तरी) कार्यकर्ते पाहतात. त्यांच्या भूमिका आता महत्त्वाच्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना राष्ट्रीय पातळीवरचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजन दांडेकर व कुणाल शिरसाट या नगरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तरुणांनी व्यक्त केलेली भावना अत्यंत महत्त्वाची आहे. सत्य साईबाबांना भजणारे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मिळणारा महाराष्ट्र शासनाचा क्रंतिसिंह नाना पाटील उत्कृष्ट प्रबोधन ग्रंथ हा पुरस्कार डॉक्टरांनी नाकारला; मात्र, त्या विचारांची बांधिलकी विस्मरून मुक्ता आणि हमीद यांनी त्यांच्या पश्चात ‘अंनिस’च्या नऊ कार्यकर्त्यांसह पद्मश्री स्वीकारला याबाबत निर्माण झालेला संदेह कुणाल आणि राजन यांनी व्यक्त केला. मुक्ता आणि हमीदने शासनाचे दीड लाख स्वीकारणे, हीदेखील अशीच खटकणारी बाब. डॉक्टरांच्या मृत्यूला इतके सहज घेणारे शासन; यांचा पुरस्कार आणि रोख रक्कम स्वीकारून त्या यंत्रणेशी भांडण्याचे नैतिक बळ आणि अधिकार आपण स्वत:हून हरवत चाललोय, ही भावना कार्यकर्त्यांत रुजत असेल तर ते वाईट आहे. महानगरपालिकेत किंवा अन्यत्र शासकीय सेवेत असताना मेलेल्या माणसाच्या मृत्यूचे दु:ख हलके करण्यासाठी त्यांचा क्षोभ पटकन विझविण्यासाठी तत्सम शासकीय यंत्रणा तत्काळ अनुकंपा तत्त्वाचा अवलंब करते. काँग्रेस व राष्ट्रवादीने दिलेले रोख दीड लाख आणि पद्मश्री त्यासदृश ठरू नये, असा विचार एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात आला तर तो गैर ठरू नये.
आज डॉक्टरांच्या हत्येच्या तपासासाठी सीबीआय यंत्रणा बोलावली आहे, जी पुण्यातल्या नितीन राणे आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाचा तपास करण्यात टोटल अपयशी ठरली आहे. शेवटी केंद्रात सत्ता गाजवत असलेला विचार परिवर्तनवादी चळवळीसाठी खत ठरणारा नसून आम्ल ठरणारा आहे, याचे भान बाळगले तरी एक टप्पा सर केला, असे आम्ही मानू.

sbwaghmare03@gmail.com