आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्बुकी चेहरे...मुखवटेसुद्धा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियाला सीमा नाहीत, वेळ नाही, काळ नाही. त्यामुळे एकाच वेळी, एकाच क्षणी येथे विचारांचे द्वंद्वही चाललेले असते आणि प्रेम आणि कौतुकाची रिपरिपही. एकाच वेळी येथे एखादा मुद्दा जन्म-मरणाचा होऊन बसतो, तर एखादी भन्नाट कॉमेंट वा एखादा भन्नाट फोटो-व्हिडिओ जगभर व्हायरल होत राहतो. रस्त्यावरच्या फेरीवाल्यापासून ते बड्या कंपनीच्या सीईओपर्यंत, राडेबाज कार्यकर्त्यापासून बुद्धिवादी विचारवंतांपर्यंत आणि फ्रॉकातल्या मुलीपासून ते डोक्यातल्या केसात चश्मा अडकवणाऱ्या पोक्त बाईपर्यंत समस्त लोक कधी चेहऱ्याने तरी कधी मुखवटे घालून इथे दिवसाचे २४ तास व्यक्त होत असतात. प्रत्येकाची व्यक्त होण्याची तऱ्हा निराळी असते, गरज वेगळी असते. त्यात आत्मस्तुतीपर कवनं असतात, शब्दांचे अणकुचीदार बाण असतात, शिव्याशापांची लाखोली असते. त्या अर्थाने सोशल मीडियारूपी हे शहर कधीही झोपत नाही. याच निद्रानाशी जगातल्या गम्य व्यवहारांचा हा वेध...

भारतात क्वचितच, म्हणजे अभावानेच आढळणाऱ्या, वावरणाऱ्या आपल्या आदरणीय कार्यक्षम पंतप्रधानांनी मार्क झुकेरबर्गची सिलिकॉन व्हॅलीत नुकतीच घेतलेली भेट म्हणजे, भारतीय समाजमनावरच्या फेस्बुकी गारुडाचा विलक्षण पगडा स्पष्ट करणारी घटना म्हणावी लागेल . एका राष्ट्राचा पंतप्रधान या माध्यमाच्या निर्मात्याशी भेटून काही गुफ्तगू करू इच्छितो, ही गोष्ट या माध्यमाची भारतीय समाजमनात खोलवर रुतत चालेली मुळे पुरेसे स्पष्ट करणारे आहे.

मध्यंतरी, एका माणसाने हसरा चेहरा असलेल्या तरुण मुलाच्या फोटोसह फेसबुकवर एक स्टेट्स अपडेट केले. त्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू दोन तासापूर्वीच झालेला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तो मरण पावल्याचे त्यात म्हटले. हे स्टेट्स अपडेट करणारा होता खुद्द, त्या मुलाचा जन्मदाता पिता. आता स्टेट्स टाकल्यानंतर त्यावरच्या ‘लाईक’ कॉमेंटकडे लक्ष देणे ओघाने आलेच. अंत्यविधीच्या प्रसंगातदेखील तो पिता सोशल मीडियावरील आपली हळवी दुखरी इमेज क्याश करून आभासी लोकांच्या आभासी RIP कॉमेंटवर वास्तव आयुष्याला चिरून टाकणारे दुःख सहज पचवीत होता.

सोशल मीडिया आणि वास्तव जग यात वावरताना माणसाच्या मनावरचे खरे खोटे ताण आणि त्यांची अभिव्यक्ती यातला खरेखोटेपणा ठळक जाणवू लागला आहे. “पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले झुठाही सही” या देव आनंदच्या गाण्यातले बोल तंतोतंत आचरणात आणणारी एक मोठी लॉबी सोशल मीडियावर वावरू लागली आहे. या गर्दीत, नव्या काळाचे आयुध म्हणून सोशल मीडियाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या काही मूठभर लोकांना इथले बेगडी वातावरण लक्षात येऊ लागले आहे. मग सोशल मीडिया हा इथे वावरणाऱ्या खऱ्याखुऱ्या चेहऱ्यांचा की बेगडी मुखवट्यांचा? हा प्रश्नही समोर येऊ लागला आहे. म्हणजे, एखाद्या घटनेचा निषेध असो वा समर्थन आपण ते केल्याने मिळणारे लाइक, वाढणारा वा घटणारा टीआरपी याचा मनाशी विचार करत, अंदाज बांधत मग या टीआरपीसाठी मनाविरुद्ध अधिकाधिक लोकानुनयी भूमिका घेऊन वावणाऱ्यांची भरमसाठ जत्रा म्हणजे, सोशल मीडिया असे आजचे त्याचे वर्णन करता येईल.
महाविद्यालयीन जीवनात पाऊल ठेवल्याबरोबरच हातात महागडा मोबाइल व बाइक असलेली तरुण पिढी ज्या उत्साहाने ऊर्जेने या माध्यमाचा वापर करताना आज दिसतेय तितक्याच उत्साहाने वकील, प्राध्यापक, डॉक्टर इंजिनीअर, पत्रकार-सहसंपादक-उपसंपादक, वयस्क, निमवयस्क, नोकरीत असलेले, नोकरीत नसलेले, रिटायर्ड झालेले, छोटे मोठे व्यावसायिक, नोकरदार महिला, निव्वळ गृहिणी या माध्यमाची ताकद कळलेले चित्रपट कलावंत, गायक, संगीतकार, चित्रकार, कवी या सर्वांची व्यक्त व्हायची घाई गर्दी इथे दिसून येतेय.

सामजिक, धार्मिक आणि राजकीय हे इथले टीआरपीसाठीचे प्रमुख विषय. या विषयाला धरून लिहिणारी एक मोठी गर्दी. पुन्हा या विषयावर फार न लिहिणारी, किंबहुना या विषयावर व्यक्त होणे कटाक्षाने टाळणारी ललित लिखाण, कविता, आपापले अनुभव यांनाच साहित्य मानून समजून व्यक्त होणारी दुसरी मोठी गर्दी. हे ‘ललित’वाले स्वतःच्या ललित टीआरपीसाठी दोन्हीकडे लाइकचिन्हरुपी अस्तित्व राखून वावरताना दिसतात.

सोयीसाठी या गर्दीचे गट पाडले, तर ते साधारण असे पडतील, एक कडवा सनातनी हिंदुत्ववादी जो सहज ओघाने मोदींचा मोठा भक्त आहे. ज्यात खूप सारे ब्राह्मण आहेत महाराष्ट्रीयन-नॉनमहाराष्ट्रीयन दोन्ही. दुसरा कमी ताकदीचा हिंदुत्ववादी, पण मोदी विरोधी. ज्यामध्ये बऱ्यापैकी सुशिक्षित मराठा, थोडेसे अर्धवट छावा ब्रिगेडी. तिसरा तरुण सुशिक्षित मुस्लिम यांचा (अर्थातच मोदी व कडवे सनातनी हिंदुत्व यांच्याविरोधी असलेला) आणि अजून एक अत्यंत महत्वाचा गट पडतो, तो दलित वर्गाचा. तो या सगळ्यांबरोबर कनेक्ट आहे. व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर. सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व बाबीत त्याला मत आहे. ते मांडण्याची त्याची ऊर्जा नजरेत भरण्याइतकी ठळक आहे. प्रखर आहे. पण सर्वात आक्रमकपणे कार्यरत सोशल मीडीयावर कुणी असेल, तर सनातनी भगवा आणि निळा हे दोनच गट.
खालोखाल मुस्लिम. हे महाराष्ट्रातले चित्र. पहिल्या गटात असणारे मोदी समर्थक सनातनी ब्राह्मण, हे बऱ्यापैकी मोदीसमर्थक वगळता, सगळ्यांशी शत्रूत्व पत्करून अजेंडे राबविताना दिसतात . पुन्हा, ‘येस वुई आर पुरोगामी’ म्हणून सगळीकडे वावरणारा कधी स्वच्छ भूमिका घेणारा, तर कधी सोयीस्कर कानाडोळा करणारा, वा डोळेझाक करणारा सर्व जातीय समाजवादी वर्गही इथे भयंकर कार्यरत आहे. यात प्रामुख्याने ब्राह्मण संख्या अधिक. खालोखाल ओबीसी. लोणच्यापुरते मराठीत व्यक्त होणारे जैनदेखील.

मोदीविरोध म्हणजेच पुरोगामी असणे (?) अशा अडाणी समजुतीतून प्रकाशाच्या वेगाला लाजवेल इतक्या सुपरफास्ट वेगाने रोज पायलीला पन्नास स्टेट्से टाकणाऱ्या, मुंबई विद्यापीठ आपल्याला फेसबुकवर चोवीसतास पडीक राहून अविरत स्टेट्स टाकण्याचाच पगार देते, या अविचल धारणेतून अर्धवट प्राध्यापक महिला देखील इथे आहेत. दमबाजी करीत आरडाओरडा केल्याने आपल्याकडे लोकांचे पटकन लक्ष वेधले जाऊन आपण, शे-सव्वाशे लाइकास पात्र ठरून मगच आपला दिवस सार्थकी लागतो अशा ठोस समजुतीतून, या विद्वान महिला एकाच वेळी कवितेवर भाष्य (?) करतात. मोदींना कडाडून विरोध करत असताना डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूक त्यांच्या दारावरून जाते, तेव्हा हे दलित लोक त्यांच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण करतात, अशी बोचरी खंत त्या फेसबुकवर व्यक्त करतात. दिल्लीतील निर्भया प्रकरणाने व्यथित होऊन प्रोफाईलचित्र काळे करून, मेणबत्त्या पेटवून, दुःखद आवंढे गिळत कविता टाकणाऱ्या कादंबरीकार, कवयित्री थोर स्त्रीवादी लेखिका खर्डा वा सागर शेजवळ प्रकरणात जराही व्यक्त न होता कलिंगडात व्होडका भरून ठेवल्याने ती कशी चवदार होते, व किक कशी मस्त लागते, हे अनुभवकथन विथ रेसिपी सांगण्यात मश्गुल होतात. मुद्दा यांच्या लेखी महत्वाचा आहे, तो लाइक कॉमेंटचा भरपूर शिधा व व्यावसायिक हितसंबंध हा. त्याकरिता त्या चेहरा व मुखवटा अशा दोन्ही आयुधाचा वेळवखत प्रसंगी उचित वापर करतात.

दलित हत्येबाबत काही हळवे भाष्य चुकून कुठे केले गेले, तर दाणकन टीआरपी घसरेल, हे भय त्यांना त्यांचा मुखवटा व चेहरा यात अलगपण जपायला भाग पाडते. समाजवादी मुशीतून तावून सुलाखून निघालेले पण नंतर सेनेला सर्वस्व वाहिलेले, काही सुपारीबाज पत्रकार निव्वळ दांभिकपणे कडव्या हिंदुत्वाचा अजेंडा रेटताना दिसतात. केवळ मुस्लिम द्वेष व उद्धव भलामण हा त्यांचा मुख्य हेतू. प्रत्यक्ष टीव्हीवर झळकताना त्यांच्यात जाणवणारे थोडेसे समजूतदारपण, ब्लॉग लिहिताना वा फेसबुकवर दलितविरोधी पोस्ट टाकताना, मात्र निव्वळ घनघोर झोपी जाते . त्यावर कुठल्याही विवेकाचा जागता पहारा राहात नाही!

स्वातंत्र्याची तिसरी लढाई, लोकांवर लादू पाहणारे, स्वयंघोषित दुसरे गांधी ऊर्फ महात्मा किसन बाबूराव हजारे यांचे काही पेड कार्यकर्ते उदाहरणादाखल थोर पर्यावरणप्रेमी विश्वंभर चौधरी हे मोदीला विरोध करतात, परंतु गोहत्या बंदीचे समर्थन करतात. टीव्ही चॅनलवर न दमता अविरत तोंड चालविणारे, हे महानुभाव दलित हत्येवर मात्र निषेधाचे चकार अक्षर त्यांच्या कीबोर्डातून उमटवत नाही. उलट तात्विक प्रश्न उपस्थित करून महात्मा अण्णा व त्यांच्या टीमला अडचणीत आणणाऱ्या दलित वर्गाला हे ‘ब्लॉक’ ठोकून लोकशाही हुकुमशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दीर्घ विचारमंथन करतात.

“मी तुझ्या विचारांशी सहमत नाही. परंतु तुला तुझे विचार निर्भयपणे मांडता यावेत म्हणून मी तुझ्याबाजूने मरेपर्यंत लढेल.” फ्रेंच विचारवंत वाल्तेअरच्या या वाक्याचा दाखला देत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विकृत लाभ घेत, विशिष्ट समाजाच्या भावना दुखाविण्यात धन्यता मानणारे तथाकथित वयस्कर पुरोगामी लोक देखील इथे आढळतात. अब्दुल कलाम असोत वा नामदेव ढसाळ वा अजून कुणी सुप्रसिद्ध सुस्मृत व्यक्ती, तिच्या मृत्यूनंतर लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ढसाळ यांच्या कविता किती बोगस आहेत, वा वैवाहिक आयुष्य किती फालतू होते किंवा अब्दुल कलाम तसे फालतूच सायंटिस्ट भाजपच्या गळाला लागलेला आयता मासा वगैरे अशा विषयावर चर्वितचर्वण करताना दिसतात.

या सर्वाना व्यक्त होण्याची भयंकर खुमखुमी ..दुश्मन का दुश्मन अपना दोस्त वा कधी कधी दोस्त का दुश्मन वो भी अपना दोस्त! असे विचित्र चित्रही सोशल मीडियावर दिसते. या न्यायाने इथे स्कोअर सेटल होताना दिसतात. आंतरजालावर सलग दोनतीन वर्ष वावरल्याने इथे काही लोकांचे वास्तव जगातले काही कट्टा ग्रुप तयार झालेत. ही माणसे प्रत्यक्ष जीवनात भेटी गाठी करत असल्याने, आभासी जीवनात वावरताना आता एकमेकांची काळजी घेत वावरू लागलीत. म्हणजे टोकाचा कट्टरवाद, वा ब्राह्मणद्वेष, वा मुस्लिम लांगुलचालन या त्यांच्यातल्या स्फोटक विषयाला हाताळताना एक मवाळपणा आपोआप जपताना दिसू लागलीत. पण या सर्व चर्चेत स्वतःच्या टीमबाहेरचा कुणी घुसून चर्चा करू लागला, की यांचे मूळ स्वभाव उफाळून येतात.

भगवा, निळा आणि हिरवा या गटातल्या मारामाऱ्यांत विचारवंत म्हणवणाऱ्या थोर माणसांच्या प्रामाणिकपणे व्यक्त होण्याचा कस लागतो. मग पुढे यातल्या टीआरपीग्रस्त सेलीब्रेटी मान्यवरांचे सैरभैर विचारमंथन मनोरंजक ठरते. निळा आणि भगवा आपसात भांडत असताना, म्हणजे थेट कडवे मोदीभक्त आणि कट्टर आंबेडकरवादी. ब्राह्मण, बौद्ध यांच्या भांडणात मोदीला विरोध असणारे, व पुरुषोत्तम खेडेकर वाचलेले मराठे आंबेडकरवाद्यांच्या बाजूला खांद्याला खांदा लाऊन ‘हर हर महादेव’ म्हणत यल्गार पुकारतात. इथे महार मराठा युती होते. कुणीतरी खानमिया वा शेख चिच्या पटकन तुमान सावरीत, दाढी कुरवाळीत ‘ना रहे तकरीर अल्लाह हु अकबर’चा घोष करत तलवार उगारत महार मराठा युतीत सामील होतो . ब्राह्मण समाजाची पार दैना उडते. पुन्हा पुढे मागे दलित हत्येचा विषय आल्याबरोबर मराठा समाज टार्गेट होतो आणि ‘ब्राह्मण दलित’ युती होते . इथे मुस्लिम समाजातले विचारवंत चूप राहतात . गांधीविषयी विशेष आस्था नसल्याकारणाने गांधीवादी व आंबेडकरवादी यांच्यात जुपली, तर सनातनी ब्राह्मण व दलित अशी युती होते . समाजवाद्यांची मात्र मोठी अडचण होते. आंबेडकरवाद्यांना ठोकण्यासाठी म्हणून मग मराठा ओबीसी गांधी या मुद्यावर एकत्र येतात आणि डेनिमचे शर्ट डेनिमची जीन्स घातलेला प्रोफाईल पिक असलेले मराठा ओबीसी लोक खादीचे महत्व पटवून देतात. एक दिवस एसी बंद असल्यावर कासावीस होणारा यांचा जीव गांधीजयंती मयंतीला मात्र खेड्यातील जीवनाचे व खादीच्या कौतुकाचे गुणगान गाताना दमत नाही. सर्वाना ‘गांधी जयंती-पुण्यतिथीला खेड्याकडे जायला हवे’चे वेध लागतात. परंतु कुणाचाही पाय शहरातून निघत नाही. मग केवळ ई-दुःख ई-खंत व्यक्त करत हे विद्वान लोक मूळ चेहरा व त्यावरचा मुखवटा यायोगे फेस्बुकी दुनियेत लाईक कॉमेंटचा शिधा गोळा करीत राहतात.

आजोबाच्या मांडीवर जाणे या मराठीतल्या म्हणीप्रमाणे काही दलित कवी विचारवंत इथे दांभिकपणे वागता वावरताना दिसतात. आंबेडकरी समूह एखाद्या विषयाला धरून मुद्देसूद चर्चा करीत असताना ब्राह्मणी शाबासकीस भुकेलेले, हे कवी-विचारवंत मधेच येऊन जग कुठे चाललेय आणि आपण काय चर्चा करतोय? काय भांडतोय, असे विव्हळणारे उद्गार काढत पंत व काकूंच्या मांडीवर बसण्यात यशस्वी होतात. त्यांच्या शाबासकी आणि कौतुकाच्या गालगुच्याने मोहरतात. दलित चळवळ तिची वर्तमानकालीन स्थितीगती याच्याशी यांना काहीही देणे घेणे नसते. फक्त लाईक कॉमेंट्स टीआरपी हा त्यांचा हेतू, मूळ चेहरा आणि मुखवटा याची बेमालूम सरमिसळ करत हे या झुंडीत वावरू लागतात. यांची अपेक्षा फक्त ‘पलभर के लिये प्यार’ची असते आणि पलभरासाठी ती पूर्णही केली जाते.

सोशल मीिडयावर व्यक्त होत असलेला मुस्लिम समाज जगाच्या कुठल्याही नकाशात मुस्लिम समाजावर अन्याय झाला असेल, तर त्यावर निषेध व्यक्त करतो. परंतु स्वतःच्या राज्यात होत असलेल्या दलित हत्याकांडावर एक ओळीचा निषेध व्यक्त करत नाही. उदाहरणार्थ दंगली, बॉम्बस्फोट यातील खऱ्या-खोट्या कहाण्यांच्या आधारावर भडक आणि उथळ कथासंग्रह लिहिलेले एका नामांकित वर्तमानपत्राचे सहसंपादक असलेले, मोठा राजकीय आणि साहित्यिक वारसा असलेले मुस्लिम समाजातील एक लेखक आश्चर्यकारकरित्या मूग गिळून वावरताना दिसतात. मुस्लिम समाज २४ बाय ७ केवळ राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यात मश्गुल असलेला दिसतो. या राष्ट्राने त्याला इतकी जबर दहशत बसविली आहे की कुठे काही खुट्ट झाले तरी त्याला हडबडून स्वतःची राष्ट्रभक्ती सिद्ध करावी लागते. हे दुर्दैवी सत्य आहे. पण हेच वाईट वातावरण सोशल मीडियावर तीव्र स्वरुपात नाही. या माध्यमात चेहरे आणि मुखवटे टोकदारपणे व्यक्त होतात. कारण इथे थेट हल्ल्याची भीती नाही. शिवाय वास्तव जीवनात टाळता न येणाऱ्या बऱ्याच अप्रिय गोष्टी इथे सहज टाळता येतात. म्हणून माणसे इथे सोयीनुसार चेहरा, तर कधी मुखवटा लाऊन वावरताना दिसतात .

मध्यंतरी ब. मो. पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेला गोंधळ व त्यावर ब्राह्मण समाजावर तुटून पडलेले मराठा मुस्लीम ब्राह्मण यांच्यातील वाद संवाद सोशल मीिडयावर फार गाजले . नामांकित वर्तमानपत्री मुस्लिम संपादक बमोंना चिक्कार शिव्या देते झाले , परंतु नेमाडे यांनी बमोंच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, यावर काय मत आहे, असे विचारता मूग गिळून गप्प बसले . नेमाडे ब्राह्मण समाजाला शिव्या घालतात, म्हणून प्रिय असणाऱ्या या वर्तमानपत्री संपादक विचारवंताना नेमाडेंच्या जातीयता समर्थक भूमिकेवर छेडले असता, छेडणाऱ्या सर्वांवर ते धावून गेले, व मग मौनात बसले. ब्राह्मणांना शिव्या देणे, हे चालणारे सह संपादक देशीवाद वा अस्पृश्यता यावर काही बोलत नाहीत. पुन्हा आम्ही अल्पसंख्याक हा टाहो. सनातनी ब्राह्मण, कडवे मराठा वा कट्टरपंथी आंबेडकरी, यांच्याइतकेच कडवे आणि सोयीस्कर वर्तन व्यवहार असणारे मुस्लिम हे देखील सोशल मीिडयावरील चेहरे व मुखवटे यातले म्हत्वाचे सक्रीय घटक आहेत.

सोशल मीिडयावरची कवी कलावंत ही तशी दुबळी आणि हळवी जमात. यांना भूमिका आहेत पण त्या स्पष्टपणे मांडून त्यांचा चाहता वाचकवर्ग असलेल्या लोकांना ते नाराज करू इच्छित नसल्याचे, चित्र इथे दिसते. मग ते ‘चिअर गर्ल’सारखे समर्थक भूमिकेला केवळ ‘लाईक’चा अंगठा दाखवतात. यातूनच तर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या तीन वर्षाच्या मृत आयलान बालकावर कविता करणाऱ्या नामवंत कवयित्रीला हरियाना सोनपेडमधील दलित कुटुंबातील जाळून मारल्या गेलेल्या दोन चिमुरड्यांवर कविता सोडा, साधे RIP हे शब्द स्वतःच्या वालवर टाकणे गैरसोयीचे वाटते. रात्री बारा वाजता मित्र यादीत असलेल्या एखाद्या देखण्या बाईला तिच्या वालवर जाऊन ‘बड्डे विश’ करणारे, पुरोगामी म्हणवणारे काही विचित्र लोक पुरुष मित्राला विश करणे मात्र जाणीवपूर्वक टाळतात.

“रात्र रुपेरी चंद्र पहारा निळ्या नदीवर सूर्य दिवाना” सारख्या बोगस कवितेला शेअर करणारे सत्तरीतले तरुण म्हातारे हा इथला मोठा मनोरंजक विषय आहे. एखाद्या पोराने अपघात होऊन हात पाय मोडल्याचे पंचवीस फोटो टाकले, तरी तीस लाइक आणि चार कॉमेंट असतात. याउलट सर्दी पडश्याने जराशी नरम तब्येत असलेल्या एखाद्या देखण्या बाई पोरीने, “हे गाईज, फिलिंग आजारी” ही चार अक्षरे टाकली तरी, तासात सहाशे लाइक दोनशे कॉमेंट तिला ‘गेट वेल सून’च्या इतक्या शुभेच्छा येतात, की ती प्रत्यक्ष औषध गोळ्यांपेक्षा लाइक, कॉमेंटच्या माऱ्यानेच सुखावते...
एकूणात, कडवे वास्तव म्हणजे, भारतीय समाजमन हेच प्रचंड दांभिक स्वरूपाचे आहे. समाजकारण-राजकारण यात खोलवर मुरलेल्या या दांभिकपणाची वास्तव जगातली अस्सल झलकच आभासी जगात म्हणजे, सोशल मीडियात पाहायला मिळते. इथे माणसे जास्त मुक्तपणे वावरतात, ते त्यांच्या मानसिक निचऱ्याशी म्हणजे विरेचन होण्याशी आणि रिलीफ मिळवण्याशी जास्त निगडीत असल्याने. या माध्यमांवर अत्यंत सयंतपणे जबाबदारीने भूमिकेत बदल न करता चेहरा आणि मुखवटा एकच ठेऊन वावरणारे काही सन्मानीय अपवाद देखील आहेत, हीच काय, ती एक समाधानाची बाजू.

प्रा. सतीश वाघमारे
sbwaghmare03@gmail.com
(लेखक गेनबा सोपानराव मोझे, येरवडा-पुणे महाविद्यालयात मराठीचे साहाय्यक प्राध्यापक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...