आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Waghmare Article About Suicide Of Rohith Vemula

टॉर्चर कॅम्पस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिटलरच्या नाझी फौजेने वंशश्रेष्ठत्वाच्या अहंगंडातून सुरू केलेल्या छळछावण्या हा इतिहास होता, तर जातश्रेष्ठत्वाच्या अहंगंडातून उच्च शिक्षण देणाऱ्या आयआयटी, एम्स, एफटीआयआय आदी संस्थांमध्ये अव्याहत सुरू राहिलेल्या छळछावण्या हे भारतीय प्रजासत्ताकाचे लांछनास्पद वर्तमान आहे. पीएचडी पश्चात उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवणारा हैदराबाद विद्यापीठातला रोहित वेमुला हा प्रस्थापित व्यवस्थेला खुपणारा, स्वतंत्र प्रज्ञेचा, स्वतंत्र विचारांचा, उद्याच्या भारताचे प्रतीक होता. त्याने केलेली आत्महत्या ही कुणा एका रोहितची नव्हे, उद्याच्या भारताची आत्महत्या ठरली आहे...

जन्माने दलित असणे हे परंपरेने लादलेले एक लांछन आणि ज्या मुलावर उद्याच्या आशा होत्या, त्याने व्यवस्थेच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणे हे समाजाने लादलेले दुसरे लांछन, त्यांच्या उद्ध्वस्त घराचा कोपरा न् कोपरा व्यापून आहे... एमबीबीएसच्या शिक्षणादरम्यान उच्चवर्णीय शिक्षकांच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या बालमुकुंदच्या घरातल्या प्रत्येक माणसाचा आकांत काळीज चिरत जाणारा आहे... बेटा हमारी आत्मा थी, वो तो चली गई। अब तो सिर्फ शरीर बचा है, अगर न्याय नही मिला तो शरीर भी चला जाएगा उसके पास... बालमुकुंदच्या वडिलांचे भावनेचा बांध फुटून रडणे अंगावर येणारे आहे... अनन्वित अत्याचार होऊनही दाद न मागण्याइतपत बालमुकुंदला वाटणारी प्रस्थापित व्यवस्थेची भीती आई-बहीण-वडील-काका अशा सगळ्यांच्या बोलण्यातून अधोरेखित होते आहे... प्रगती आणि समृद्धीच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या समाजाचे हे जळजळीत वास्तव ‘डेथ ऑफ मेरिट’ नावाची डॉक्युमेंट्री पाहणाऱ्याच्या मनात एकाच वेळी संताप, उद्वेग आणि असहाय्यतेची भावना जागवते आहे...
‘डेथ ऑफ मेरिट’ ही सत्यघटनांवर आधारित युट्यूबवरची एक व्हिडिओ मालिका आहे, ज्यात भारतातल्या दलित जाती-जमातीतील स्कॉलर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची कारणमीमांसा करतानाच इथले समाजशास्त्रीय जातवास्तव अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुणाही संवेदनशील माणसाचे काळीज फाटून जाईल, अशा अनेक दलित विद्यार्थ्यांच्या हत्येचा पंचनामा आणि एम्स, आयआयटी, शासकीय मेडिकल कॉलेजेस व अशा प्रकारच्या जातीयवादात अग्रेसर असलेल्या बऱ्याच संस्थांचा काळाकुट्ट भूतकाळ, वर्तमानकाळ त्या व्हिडिओ मालिकेत दिसून येतो आहे.
चंदीगढ गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिकणारा मेडिकलचा विद्यार्थी जसप्रीत सिंग. हा केवळ दलित असल्याने त्याला वारंवार नापास करून गळफास घ्यायला ही सनातनी यंत्रणा भाग पाडते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पेपर दुसऱ्या प्रोफेसरांकडून तपासून घेतल्यानंतर सत्यता बाहेर येते. मग त्याला डॉक्टर घोषित केले जाते. ही घटना काय, वा बालमुकुंद भारती या ‘एम्स’च्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने ३ मार्च २०१० रोजी केलेली आत्महत्या काय, दोन्हीतले व्यवस्थेने दाखवलेले क्रौर्य सारखेच. मध्यप्रदेशातल्या कुंडेश्वर या छोट्याशा गावातून आलेल्या या पोराला प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल लोकांनी अक्षरशः मरेस्तोवर जातीच्या नावाने छळले. ‘तू कितीही अभ्यास कर, तरी तू डॉक्टर होणार नाहीस. किंबहुना, तुला डॉक्टर बनूच देणार नाही. काय करायचे ते कर. तुम्ही दलित, साले कुठून कुठून येता...’ अशा धमक्या दिल्या. शेवटी शिक्षण पूर्ण होण्यास सहा महिने बाकी असताना, बालमुकुंदने आत्महत्या केली. बालमुकुंद जर डॉक्टर झाला असता, तर कुंडेश्वर परिसरातला गेल्या पन्नास वर्षांतला तो पहिला डॉक्टर ठरला असता! त्याच्या छळाचे स्वरूप इतके भयानक होते की, बालमुकुंदने आपली जात लपवण्यासाठी चक्क नाव बदलायचा प्रयत्न केला होता. शेवटी शेवटी तो बापाला वारंवार विचारायचा, जात बदलता येईल का, म्हणून!

बालमुकुंद अतिशय हुशार विद्यार्थी होता. आयआयटीमध्ये ऑल इंडिया पातळीवर आठव्या क्रमांकाने तो निवडला गेला होता, तेही प्रेसिडेंट मेडलसह. पण नैराश्यग्रस्त अवस्थेत मृत्यूला कवटाळणारा तो एकटाच नव्हता. एम श्रीकांत (बी टेक आयआयटी मुंबई, मृत्यू दिनांक १ जानेवारी २००७), जसप्रीत सिंग (गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, चंदीगढ, २७ जानेवारी २००८), प्रशांत कुरील (आयआयटी कानपूर, १९ एप्रिल २००८), सेन्थिल कुमार (पीएच. डी. विद्यार्थी हैदराबाद, २३ फेब्रुवारी २००८), अंकिता वेगढा (बीएस्सी नर्सिंग, अहमदाबाद, २० एप्रिल २००९), माधुरी साळे (आयआयटी कानपूर, १७ नोव्हेंबर २०१०), मनीषकुमार (बी.टेक. आयआयटी रुरकी, १३ फेब्रुवारी २०११), लीनेश मोहन (पीएच. डी. नवी दिल्ली, १६ एप्रिल २०११)... जातीधिष्ठित व्यवस्थेने मरणास भाग पाडलेल्या मुलांची ही यादी इथे न संपणारी आहे. या यादीत आता नाव जोडले गेले आहे, हैदराबादच्या रोहित वेमुलाचे.

आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या रोहितची पद्धतशीर आत्महत्या कशी घडवून आणली गेली, हेसुद्धा फार नवे नाही. या प्रकरणाची सुरुवात त्याच्या हैदराबाद विद्यापीठातील प्रवेशापासूनच झाली. किंबहुना, दलित जातीत जन्माला असल्यापासूनच झाली. पण तत्कालिक कारण घडले, ते ३० जुलै २०१५ रोजी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेननला फाशी देण्याची घटना घडली तेव्हा. देशात फाशीची शिक्षा असावी की नसावी, या विषयावर एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्रात आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये फाशीच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे म्हणणे होते की, याकुबला सश्रम कारावासाची शिक्षा दिली जावी. त्याच्याकडून आणखी काही माहिती, धागे-दोरे मिळतात का, हे पाहिले जावे. तर दुसरीकडे अभाविपचे म्हणणे होते, याकुबला फाशीच व्हायला हवी. गुन्हेगारांना फाशी द्यावी की न द्यावी, याविषयी देशात मत-मतांतरे आहेत. पण आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या पोरांनी फाशी नको, सश्रम कारावास हवा, म्हटल्याने ही पोरं व्यवस्थेच्या रडारवर आली. याचमुळे दोन संघटनांमध्ये ठिणगी पडली. त्यात शेवटी रोहितचा बळी गेला. पण जर रोहित कुठल्याही विचारधारेशी, राजकीय-सामाजिक घटनांशी संबंधित राहिला नसता तर? तर त्यांच्या अॅकॅडेमिक करिअरचा असा आकस्मिक अंत झाला असता का? नसताच! हे उत्तर काही काळ मनात येतं. पण ते तेवढ्यापुरतेच; कारण इथल्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेतल्या उच्चवर्णीय प्रोफेसर चालक-मालकांची मानसिकता ही फार आधीपासूनच विकृत राहिली आहे. शिक्षण घेणारा दलित मग तो चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता असो, की निव्वळ चारचौघांसारखं मुकाट्याने करिअर एके करिअर करणारा असो; त्याचे मरण टळत नाही. त्याचे दलित असणे हेच इथल्या सनातनी मानसिकतेला त्याला संपवायला सबळ कारण असते. रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत असणारी जी नीच मानसिकता आहे, ती नेमकी हीच आहे.

रोहित आणि इतर जातिभेदाचे बळी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता होती, परंतु उच्चवर्णीय सनातनी प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल यांना हवी असणारी, त्यांची आवडती ‘जात’ नव्हती. हाच त्या सर्वांचा मुख्य दोष होता. अगदी रोहितचाही. खालच्या जातीतले विद्यार्थी इतक्या वर येऊन व्यवस्थेला वरचढ वाटू लागतात, ज्ञानाच्या तिजोरीच्या किल्ल्या आमच्याच कमरेला आहेत, या घमेंडीत वावरणाऱ्या सनातनी विद्वान लोकांना, संविधानाच्या चौकटीत हे दलित विद्यार्थी खपवून घ्यावे लागतात, तेव्हाच त्यांच्या हत्येची बीजे या लोकांच्या कुजक्या सनातनी मेंदूत कटांच्या सुपरफास्ट प्रणालीने रोवली जातात.

विचार करणारे, प्रश्न विचारणारे, व्यवस्था मोडू-तोडू पाहणारे, संघर्ष करू पाहणारे कुठच्याही जातीचे लोक, हे प्रस्थापित सनातनी व्यवस्थाचालकांना नकोच असतात. त्यातही बंडखोरी करणारा दलित असेल, तर त्यांच्या द्वेषाला धरबंद राहात नाही. रोहित व्यवस्था बदलू पाहणारा, आंबेडकरी विचारधारा जाणणारा, जगणारा एक तरुण होता. म्हणूनच तो प्रस्थापितांसाठी अधिक घातक होता. खरे तर स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची क्षेत्रे खुली झाली, परंतु दलितांमधून उच्चशिक्षण घेऊन पुढे येऊ पाहणारी पिढी थंड डोक्याने संपवायचे काम अद्याप चालूच आहे. कुठल्याही क्षेत्रातले वर्चस्व टिकविण्याचे तंत्र आजही मनूवादी मंडळी राखून आहेत.

उच्चशिक्षण घेणारी दलित पोरांची ही पिढी मनूवादी मंडळींच्या चिंतेचा आणि द्वेषाचा विषय न ठरली तर नवलच. जागृत विद्यार्थी हा यांच्या मुळावर बसलेला घाव आहे, याची कल्पना पेरियार स्टडी सर्कल, नॉन नेट फेलोशिप व एफटीआयआय आंदोलन, यातल्या सरकारने घेतलेल्या भूमिकांतून दिसून आलेच आहे. या सर्व आंदोलनात विद्यार्थ्यांच्या रक्ताने सरकारचे हात माखले आहेत. सरकारी मुस्कटदाबीनेच आज रोहितला संपवले आहे. इथल्या दहशत पसरविणाऱ्या मान्यताप्राप्त व्यवस्थेनं, चालू काळात शिकणाऱ्या, पुढील काळात उच्चशिक्षण घेऊ पाहणाऱ्या, ते घेण्याची मनात आस बाळगणाऱ्या तमाम नवदलित पोरांना दिलेला हा सज्जड इशारा आहे.

दलित मुलगा दहावी-बारावी पास झाला की, त्याच्या कुटुंबाला चांगल्या दिवसांच्या आशेचे किरण स्वप्नात दिसू लागतात. पदवी, पदव्युत्तर शिक्षणातले त्याचे पुढची वाटचाल करणारे सकारात्मक टप्पे त्याच्या कुटुंबातील लोकांचे आयुष्य वाढविणारे असतात. त्याच्या त्या यशात जेव्हा असे जातीय मोडते घातले जातात, तेव्हा तो विद्यार्थी फक्त एकटा मरत नाही. सनातनी व्यवस्थेकडून फक्त त्याची एकट्याची हत्या होत नाही, तर त्याच्या कुटुंबातल्या, त्याच्यावर भविष्य निर्भर असलेल्या, सर्व कुटुंब सदस्यांची हत्या झालेली असते. एक संपूर्ण कुटुंब, एक संपूर्ण पिढी जातश्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगणारी विखारी वृत्ती मारून टाकत असते.

आता, सायन्स आणि टेक्नॉलॉजी शाखेत शिकणाऱ्या पोरांचे करिअर बरबाद करून त्यांच्या आत्महत्या घडवून आणायच्या, हा इथल्या उच्च शिक्षण देणाऱ्या नामांकित शैक्षणिक संस्थांचा अलिखित अजेंडा बनला आहे! तो योग्य पद्धतीने राबविणेही चालू आहे. असे असेल तर कसे येतील हुशार दलित तरुण उद्योजक आणि वैज्ञानिक म्हणून पुढे, हा खरा प्रश्न आहे. पण हा विरोधाभास आहे, आपल्या इथल्या सरकारी व्यवस्थेचा. सय्या भये कोतवाल, अब डर काहे का? असाच सध्याचा भयावह माहोल आहे.

खालच्या जातीतले विद्यार्थी इतक्या वर येऊन व्यवस्थेला वरचढ वाटू लागतात, ज्ञानाच्या तिजोरीच्या किल्ल्या आमच्याच कमरेला आहेत, या घमेंडीत वावरणाऱ्या सनातनी विद्वान लोकांना, संविधानाच्या चौकटीत हे विद्यार्थी खपवून घ्यावे लागतात, तेव्हाच त्यांच्या हत्येची बीजे या लोकांच्या कुजक्या सनातनी मेंदूत कटांच्या सुपरफास्ट प्रणालीने रोवली जातात...
sbwaghmare03@gmail.com
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....