आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाशी लढतोय आपण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंदाज बांधून हेतू लादणे आणि कुटाणे करणे हे आपल्याकडे अजिबातच नवे नाही. शिवाजी महाराजांचे चित्र आणि आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणे हा त्यातलाच एक गलिच्छ प्रकार. परंतु दुर्दैवाने अशाच मोक्याच्या शोधात असलेले, गर्दीत गुंडा होऊ पाहणारे भाबडे समाजमन या गलिच्छ प्रकाराला नेमके बळी पडते आणि विकृतांच्या हेतूला बळकटी मिळते. मग उदयनराजे भोसले यांचे नाव वापरून परदेशात भूकंपात पडलेली मशीद आणि आवाहनाचा मेसेज फिरवला जातो. निहाल खान हे नाव जखमी हिंदू युवकावर लादून त्याचे रक्तरंजित फोटो दाखवून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर गोंधळ घातला जातो. इथे राजकीय नेत्यांचे फोटो दिसणार नाहीत, कारण मराठी मानसिकता ओळखून काम करणारी विकृत यंत्रणा या भाबड्या समाजसमूहाला चांगली ओळखून आहे.
शिवाजी महाराजांचे या प्रकारचे चित्र पाहिल्यानंतर पाच-पंचवीस लोकांनी ते तत्काळ रिपोर्ट केले असते तर गदारोळ झालाच नसता. पटकन ते चित्र फेसबुकवरून हटले असते. पण तसे न होता, खरे असाल तर हजार लाइक द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, कायदा काही करणार नाही, आपल्यालाच कायदा हातात घ्यावा लागेल, हे आवाहन माजवीत हा फोटो शेअर होत राहिला आणि तरुणांची माथी भडकवीत गेला. अजूनही अशा आवाहनात्मक अफवा शेअर होत आहेत. विशिष्ट नावाने आयडी/पेज बनवली जातात. श्रद्धास्थळे /महापुरुष/ धर्म यांना टार्गेट केलं जातं.... प्रतिमा मलिन करण्यासाठी फोटोशॉपी करून विकृतीचं दर्शन घडवलं जातं आणि मग सुरू होतं कॉपी-पेस्ट-फॉरवर्डच एक भावनिक(?) सत्र....जे नेमकेपणानं अगदी तसंच हवं असतं, इथल्या काही मूठभर समाजकंटकांना. ते असाच एखादा फोटो व मजकूर टाकून फक्त एकदा विटंबना करतात आणि त्या महापुरुषांचे भगत लोक मात्र ‘शेअर’ ‘लाइक’च्या नादात क्षणाक्षणाला कुणी जाणीवपूर्वक, कुणी नकळत विटंबना करत जातात. मग होते फोनाफोनी, हासडल्या जातात शिव्या आणि फोडल्या जातात सिटी बसेस, महामंडळाच्या एसटी गाड्या. दुकानदारांच्या दारावर बसतात दणादण लाथा. भेदरलेल्या लहान पोरांना विचारत नाही कुणी. खेचले जाते शटर. दवाखान्यात जायला सज्ज झालेल्या दुखणाईत म्हातारीला वाट बघावी लागते चांगल्या पुढच्या मुहूर्ताची आणि स्वीकारावं लागतं घरामध्येच बिना औषधोपचाराचं मरण. भगत लोक चार -दोन दिवसांच्या तोडफोडीने संतोष पावतात. एव्हाना लाव्ह्याप्रमाणे उसळलेले त्यांचे रक्त थोडेसे थंडावलेले असते.

पुढे काय ? पुन्हा कधीतरी अशीच एखादी घटना. पुन्हा अवकाश भेदणार्‍या भयंकर आरोळ्या. दगड, सोडा वॉटरच्या बाटल्या, सहज उपलब्ध तलवार- लाठ्या- काठ्या आणि चार-दोन दिवस जहरी तणाव. इथे दर काही वर्षांनी हे छचोर उद्योग होतच राहणार. कारण इथे पुतळे आहेत, पण पक्षी कमोड म्हणून वापरणार. समाजकंटक निवडणूक म्हणून वापरणार आणि आपण अस्तित्वाची लढाई म्हणून! विचार म्हणून वापरण्याची इथे कुणावर कसलीही सक्ती नाही. आमचं सगळं जाज्वल्य कडवं आणि कट्टर आहे हे सिद्धण्याचा दुसरा कुठलाही मार्ग अद्याप आम्हाला सापडलेला नाही, हा आमचा नाही तर इथल्याच महापुरुषांचा पराभव म्हणावा काय?

अरुण शौरी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करतात, तेव्हा आम्ही चटकन त्यांच्या तोंडाला काळे फासतो. ते य. दि. फडके, जयदेव गायकवाड यांचे नंतरचे मुद्देसूद प्रतिवाद सोडा, त्याला तसा फार अर्थ मराठी मानसिकतेत नाही. शिवाय आमच्या जातीचे ही अस्मिताविषयक टोटल निराळे मुद्दे आहेत. कारण आम्ही रमाबाई घाटकोपर घटनेत रस्त्यावर येणे तर सोडा, साधा निषेधदेखील नोंदवीत नाही आणि का नोंदवावा? जात -अस्मिता शेवटी आहे की नाही? आपल्याकडे सर्वात जास्त दुर्दैवी महापुरुष म्हणजे गांधी. चप्पल घातली काय आणि शेण टाकले काय? निव्वळ पाचकळ निषेध नोंदवला जातो. त्यामुळे नाइलाजास्तव गांधींना आता या लोकांनी वगळले आहे. इथली चलनी नाणी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय. परंतु दुर्दैवाने हे महापुरुष त्यांनी जन्म घेतलेल्या जातीत बांधले गेलेत. आणि महाराष्ट्रात या महापुरुषांच्या जातसमूहाचे लोक विकृत लोकांच्या कारस्थानांना बळी पडत आहेत. रिपोर्ट करून चित्र हटवणे जसे शक्य होते तसेच गळ्यातला चपलेचा हार काढून, निषेध नोंदवून, बुद्धवंदना घेऊन 13 दलितांची हत्या रोखणेही शक्य होते. पण तसे झाले नाही. भविष्यात काय हे सांगता येत नाही. जेम्स लेन म्हटले की भांडारकर हल्ला आणि आणि बाबासाहेब म्हटले की रोडवर गोंधळ हे आपले आखीवरेखीव अस्तित्व जपण्याचे सोपे मार्ग.

आज सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव समाजावर आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर इथला तरुण वर्ग करतो आहे. या वर्गाला नीट समजून घेत त्यांचे प्रबोधन करणारे जाणते इथे कमी आहेत. फेसबुकवर वावरणारे स्वत:च्या ‘लायका कॉमेंटा’च्या प्रेमात मश्गुल असणारे कितीतरी लेखक आणि लेखिका, थोर थोर समाजसेवक अशा घटना घडल्यानंतर सरसावून पुढे येऊन काही भूमिका घेऊन तरुणांना मार्गदर्शन करताना दिसत नाहीत, त्याचे आश्चर्य वाटते. स्वत:चा वाचक जपणे म्हणजे दांभिकपणे वावरणे असे सोशल मीडियावरचे आजचे चित्र आहे. तुमचे एखाद्या महापुरुषावर, एखाद्या देवावर कितीही प्रेम असो. त्याचा फोटो स्वत:चा प्रोफाइल आयडी म्हणून वापरणारे लोक वेगळे करून रिपोर्ट केले पाहिजेत किंवा सरळ दुर्लक्षिले पाहिजेत. फोटो टाकून ‘लायका कॉमेंटा’ची भीक मागणारे दणादण ब्लॉक केले पाहिजेत. शेअर करताना काय शेअर करतोय याचे भान ठेवून फोटो वा मजकूर शेअर केले पाहिजेत. इथे उत्साहाने, हौसेने वावरणार्‍या मंडळींनी स्वत:चा सेलिब्रिटी झगा बाजूला ठेवून वेळ मिळेल, तसे जास्तीत जास्त तरुण लोकांचे प्रबोधन करायला पाहिजे. कान टोचणारे कुशल सोनार इथे भरपूर असून, कान मात्र टोचले जात नाहीत. हे इथले चित्र बदलले तर नक्कीच भविष्यात फेसबुकवरचे तरुण गंभीरपणे वागतील.

एक प्रश्न पडला आहे. पेपरमध्ये एक छोटी बातमी वाचली. या घटनेमागील सूत्रधार इथले कुणी नसून ते देशाबाहेरचे म्हणजे अमेरिकेतले कुणीतरी आहेत. इथल्या पेटलेल्या बांधवांना एक प्रश्न विचारावा वाटतो. तुम्ही उचललेले दगड अमेरिकेपर्यंत पोचलेत का? पोचतील का? त्या दगडांनी टाळकी फुटलीत कुणाची? तुमच्याइतकेच शिवराय आणि बाबासाहेब यांना मानणार्‍या सामान्य गोरगरीब जनतेची. अरे कुणाशी लढतोय आपण?