आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड हिंदुस्थानचा विजय असो !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरांच्या मनात खोलवर असलेल्या चाचा नेहरू आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या छब्यांशेजारी जाऊन बसण्याचा स्तुत्य प्रयत्न शिक्षक दिनी आपल्या धडाकेबाज प्रधानसेवकांनी नुकताच पार पाडला. फाडफाड इंग्रजी आणि चकाचक हिंदी बोलणार्‍या केंद्रीय विद्यालयातल्या पोरांना-जे मोठमोठाल्या शहरांत राहतात- चांदण्या रात्री मज्जा अनुभवायचा सल्ला प्रधानसेवकांनी दिला. तसेच चांदण्या रात्री सुईत दोरा ओवून डोळ्यांची ताकद आजमावण्याची युगतदेखील सांगितली. मात्र प्रधान-अतिउच्च-नुसते उच्च-कनिष्ठ आदी प्रकारांतल्या सेवकांच्या सभेला ट्रकभर लोक घेऊन जाणार्‍या आमच्या गावच्या एका कार्यकर्त्याला प्रश्न पडला, आपणही लायटी बंद करून पोरांना अंधाराची मजा लुटायच्या कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाध्यक्षाला उद्घाटनाला बोलवावे का? तर ऑलरेडी अठरा तास भारनियमनाची गंमत लुटणारी पोरं आपल्याला इतके दिवस ही गंमत का कळली नाही, म्हणून स्वत:स व शिक्षक वर्गास दोष देत जिल्हाध्यक्षांच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहात आहेत. असो. आताचे हे पोट्टापोट्टी फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, हिस्ट्री आणि भूगोलाची जे दहशत घेतात, ती आता पुसली जाणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २०२५मध्ये शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने संघाशी जोडलेली ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’ ही संस्था कंबर कसून उभी ठाकली आहे. ‘पुराणांतर्गत इतिहास’ या नावाचा प्रकल्प हाती घ्यायचे त्यांनी ठरवले आहे आणि त्या हेतूनेच संस्थेचे पदाधिकारी आणि संघ टीम यांचे २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान प्रधानसेवकांच्या भूमीत म्हणजे गुजरातमधील पालमपूर येथे शिबिर साजरे झाले. “भारताचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर त्याला पुराणाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे.” या वाक्यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी सध्याच्या इतिहासाची उभी आडवी, आडवी तिडवी, उलथी पालथी मांडामांड करण्याच्या एकत्रित मनोदयाला प्रधानसेवकांकडून अनुमोदन मिळवले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण भारतीचे राष्ट्रीय कार्यवाह दीनानाथ बात्रांच्या दिव्य ज्ञानतपस्येतून उजळलेली नऊ पुस्तके, पुरवणी अभ्यास म्हणून बेचाळीस हजार सरकारी शाळांमधून मोफत वाटून विद्यार्थ्यांना ती अधिकचे ज्ञान देणार आहेत. गुजरातमध्ये हे अधिकचे ज्ञान वाटप चालूदेखील झाले आहे. आता प्रधानसेवक साहेब आणि संघ टीम यांच्या रडारवर उज्ज्वल भारताची भावी पिढी आहे.

विद्यार्थ्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण घ्यावे, परदेशी शिक्षण पद्धतीचे ढोंग बाजूला ठेवून अस्सल भारतीय शिक्षण आत्मसात करावे, असा बात्रा आणि संघ टीमचा मानस आहे. त्यांनी भारताचा (म्हणजेच हिंदुस्थानचा!) नकाशा म्हणून भारतात पूर्वी असलेले जुने प्रांत- जे आज स्वतंत्र देश आहेत- तेसुद्धा या अखंड भारताच्या नकाशात समाविष्ट केले आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, म्यानमार आणि अजून पसरलेला आडवा तिडवा हिंदुस्थान! हे सगळं आपलं (युनोच्याच काय कुणाच्याही बापाचे काही जावो; हे सर्व संघाचे! ठरले म्हणजे ठरले. नकाशा ही नांदी आहे!), या विश्वात्मक धारणेतून भारतीय विद्यार्थी आता नव्या इतिहासाला सामोरे जाणार आहेत. समृद्ध होणार आहेत. नव्या नकाशाबरहुकूम, पुढे काही दिवसांनी मोहन भागवत संघाच्या देखण्या वेषात कराचीतल्या महम्मद अली जिना विद्यापीठात ‘गोवंश हत्या बंदी’वर व्याख्यान देणार आहेत आणि टोप्या घातलेले दाढीधारी तरुण आणि बुरख्यातल्या तरुणी अनिमिष नेत्रांनी त्यांना कुतूहलाने पाहात, ऐकत असल्याचे विस्मयकारी चित्र िदसणार आहे. आम्हाला तर याही पुढची देखणी चित्रे दिसू लागली आहेत.

या नकाशाबरहुकूम भारताच्या अखंड कल्पनेमुळे काबूल-कंदाहारच्या एखाद्या शाळा-कॉलेजात कार्यानुभवाचा तास म्हणून विद्यार्थ्यांना गाईला चारा घालणे, धारा काढणे इत्यादी कामे करावी लागत आहेत. प्रचंड सात्त्विक बळाने मोहरून हिंदुस्थानचाच एक भाग असलेल्या आणि आता केवळ नाममात्र वेगळे नाव असलेल्या त्या प्रांतातले विद्यार्थी हे काम करताना दिसत आहेत. गोवंश हत्या बंदी व्याख्यानाच्या ‘इफेक्ट’ने पाकिस्तानात भरपूर प्रमाणात गाई वाढवल्या जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात मानवी लोकसंख्येबरोबर गायबैलांची संख्या वाढली आहे. तिथे दुधाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. आकस्मिक शिक्षण मोडीत काढल्याने लंडन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया इथली विद्यापीठे ओस पडली आहेत आणि त्या देशांचे दूत हिंदुस्थानच्या दारात विद्यार्थ्यांसाठी भीक मागत आहेत.
प्रत्यक्ष हिंदुस्थानात तर याहून मोठे देखणे चित्र दृष्टीस पडते आहे. आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नव्हे; तर आधुनिकीकरण म्हणजे भारतीयीकरण, हे केव्हाच कळलेले असल्याने आपण इतके प्रगत झालो आहोत की, अमेरिकेने युनोमध्ये ठराव आणून हिंदुस्थान ही महासत्ता आहे, पूर्ण जागतिक पातळीवर गोहत्या बंदी व्हायलाच हवी, यावर सर्व राष्ट्रांचे अनुमोदन घेतले आहे. हिंदुस्थानातल्या सर्व विद्यापीठांतून गरुडपुराण, शिवपुराण, वराहपुराण, नारदपुराण, लिंगपुराण हे सक्तीचे पेपर म्हणून नेमले गेलेले आहेत. गरुडपुराण वाचून पापी माणसाला मृत्यूनंतर काय काय शिक्षा होते, याच्या भीतीने हिंदुस्थानातील विद्यार्थी इतके नैतिक आणि पुण्यवान होऊ पाहात आहेत, झालेत, की त्यांचा प्रवास न केलेल्या पापापासून एकमेकांच्या पापीकडे(म्हणजे प्रेमळ मुक्याकडे) चालू झालेला आहे.

हिंदुस्थानातल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर महिला-पुरुष उपचारासाठी आलेल्या स्त्री-पुरुषांची प्राथमिक तपासणी करण्याच्या आधी घरातल्या गाईगुरांची चौकशी करूनच औषधाच्या पुड्या बांधून देत आहेत. हिंदुस्थानातील आईबाप संघ आणि टीमला लक्ष लक्ष दुवे देत आहेत. पूर्ण जगाने हिंदुस्थान हा अतिप्राचीन काळापासून प्रगत असल्याचे मान्य केले आहे. एकूणात विमानापासून अणुबॉम्बपर्यंत आणि गुरुत्वाकर्षणापासून टेस्टट्यूब बेबीपर्यंत सर्व शोधांचे पेटंट हिंदुस्थानला जगाने देऊन टाकलेले आहे. संपूर्ण पृथ्वीवर केवळ भारतवर्ष हिंदूभूमीचा बोलबाला होत आहे. प्रधानसेवकांनी शिकलेल्या मुलांच्या बाबतीत बाळगलेली आस्था आणि त्यांच्यासोबत पाहिलेले स्वप्न उद्याचा उज्ज्वल भारत घडवणार आहे. शिक्षकदिनी प्रधानसेवकांनी चाचा नेहरूंसारखा गुलाब जरी लटकवला नसला तरीही कलामांसारखी शपथ द्यायला ते विसरले नाहीत, ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. लग्नात जाताना स्टेपलर घेऊन जाणार नाही, सनईवाल्याला चिंचा दाखवणार नाही, या तिथल्या तिथे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रॉिमसने आपल्या प्रधानसेवकांचे द्रष्टेपण सिद्ध होत नाही काय?
sbwaghmare03@gmail.com