आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रगतीचे शत्रू आत आहेत की बाहेर हे ओळखावे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागात बुद्धिगम्य चाली-ढालीचं सदाशिवपेठी बोलणं अद्याप रुजलेलं नाही, ही महाराष्ट्रातल्या विविध भागांत बोलल्या जाणार्‍या अस्सल बोली टिकण्याच्या दृष्टीने एक अत्यंत दिलासादायक बाब आहे. सदर बोलीच्या वापरातून जी अनौपचारिक जवळीक साधली जाते, ती भाषिक ‘म्यानर्स’ जपणार्‍या नागर बोलीत तितक्या सहजपणे साधली जाईलच किंवा जातेच, असे नाही.

16 मार्च ‘रसिक’मधल्या ‘कशाला हवे आरक्षण?’ या शीर्षकाच्या लेखातील मुद्दे विशद करताना तिरस्काराच्या नसून, जवळिकीच्या, अनौपचारिकतेच्या हेतूने ग्रामीण भाषा मी वापरली. पण त्यामुळे माझे काही मराठा बांधव नाराज झाले. त्याचे मला विशेष वाईट वाटते. एक तर संपूर्ण विवेचनात, टीकेचा रोख हा धनदांडग्या व खूप आधीपासून सत्ता ताब्यात असूनही गरीब मराठा समाजाविषयी काहीच भरीव करू न शकलेल्या नेत्यांवर व त्यांना पूर्ण समर्थन असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर होता. लेखातील मराठा आरक्षणाला विरोध हा घटनेच्या मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांना समर्थन या अंगाचा आहे. मराठा आरक्षणाला समर्थन म्हणजे घटनेच्या आरक्षणविषयक मूलभूत तत्त्वालाच हरताळ फासण्याच्या कृतीला समर्थन म्हणावे लागेल.

गरिबी हाच निकष ठेवला तर फक्त मराठा समाजच कशाला, ब्राह्मणांतही भरपूर गरीब आहेत. प्रत्येक सवर्ण जातींत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांनाही आरक्षण लागू होईल. आणि खरे गरीब सोडले तर खोटे गरीब पायलीला पन्नास आपल्याकडे आहेत. आजही निवडणुकीत जाहीर केलेली संपत्ती आणि खरी असलेली संपत्ती हा मोठा संशोधनाचा विषय आहे. खर्‍या गरीब मराठा बांधवांविषयी मला मनापासून आस्था आहे. त्यांना शैक्षणिक खर्चात सवलत नक्कीच द्यायला हवी; पण ती भारत सरकारच्या शिष्यवृत्तीतूनच द्या, हा हट्ट करणे टोटली राँग! जरा विचार केला, तर आज कितीतरी शैक्षणिक संस्था व आर्थिक विकासाच्या प्रवाही मुख्य नाड्या या महाराष्ट्रातील मराठा समाजातील माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या हातात आहेत. मंत्रिमंडळात संख्याबळ अधिक याच समूहाचे आहे. या लोकांनी मराठा समाजातील किती तरुणांना संधी दिली आहे, हे मराठा तरुणांनी तपासायला पाहिजे. प्रगतीचे शत्रू आत आहेत की बाहेर, हे ओळखून हल्ला केला पाहिजे. जाणीवपूर्वक एक घटक दुर्बल ठेवून, त्यांच्या दुर्बलतेच्या मुद्द्यावर राजकारण करणार्‍यांचे हेतू तरुणांनी ओळखले पाहिजेत.

माझ्या उपरोक्त लेखाचा रोख हा विरोध व आरक्षणाच्या राजकारणाला प्रत्येक निवडणुकीपूर्वी(च) फुटणारी पालवी यावर मुख्यत्वे होता. सदर लेखातील भाषा ही कुणालाही दुखविण्यासाठीची खासच नव्हती. केवळ भाषेमुळे किंवा एखाद-दुसर्‍या शब्दामुळे जर माझा कुणी मराठा बांधव दुखावला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो व पुनश्च माझ्या मराठा आरक्षणाला विरोध या भूमिकेवर मी ठाम असल्याचे जाहीर करतो.