आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Waghmare's Artical On Samyak Sahitya Sammelan, Pune .

बांधिलकीचा 'सम्यक' मेळा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संमेलनाचा सीझन चालू झालेला आहे. लेखक, कवी, आयोजक, यजमान, मेहमान यांचा सेन्सेक्स जातीनिहाय उंचावण्याचा आणि खालावण्याचा हा गोल्डन कालखंड! 13, 14, 15 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज सेंटर, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरपीआय कार्यकर्ता परशुराम वाडेकरांच्या आयोजनाने पुण्यनगरीतल्या बालगंधर्व थिएटरमध्ये चौथे सम्यक साहित्य संमेलन पार पडले. दिनांक 3, 4, 5 जानेवारीला अखिल भारतीय वैश्विक (खि खि खि) साहित्य विश्वाला, हरवक्त निराळे तडे वा हादरे देण्याचे इस्टमन कलर ख्वाब बघणारे, लोकांना दाखवणारे अखिल भारतीय (?) मराठी साहित्य संमेलन सासवडात होत आहेच, आनंद आहे!
साहित्य संस्कृती व्यवहार अधिकाधिक सुलभ व देखणे होण्याच्या कामी गल्लीबोळ संमेलने ही एकूणच अत्यावश्यक सांस्कृतिक बाब जातीय, धार्मिक आणि विविध प्रतिस्पर्धात्मक गट पातळीवर गरजेची झालेली आहे. तर ते एक असो. आपण हे चूपचाप मान्य करायलाच हवे. (बीकॉज वी ऑल मराठी पीपल लव्ह मराठी मायबोली!) या सर्व संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिका आणि येणारे पाव्हणेरावळे, उद्घाटक मंडळी पाहिली तरी महाराष्‍ट्राचा साहित्यिक सांस्कृतिक वारा कुणीकडे वाहतोय, याची सुपरझलक दिसून येते. वानगीदाखल 25, 26, 27 डिसेंबरला झालेल्या दिलीपभौंच्या संमेलनात अध्यक्षा अश्विनी धोंगडे होत्या; उद्घाटक रा. रा. शशिकांत शिंदे (जलसंपदामंत्री, महाराष्‍ट्र राज्य) होते; तर प्रमुख पाहुण्या सुप्रियाताई सुळे (यांचे पद थोरलेसाहेब सावकाश डिक्लेअर करतील), चंचला कोद्रे (महापौर) आणि वंदना चव्हाण (माजी महापौर) हे मान्यवरही उपस्थित होते! टोटल राष्टÑवादी साहित्यिक मामला! इथे नामचीन कवी-कवयित्रीही उपस्थित होत्या! अखिल भारतीय (?) मराठी साहित्य संमेलनासाठी तर शंकाच घ्यायला नको! जन्माला यावं आणि त्या संमेलनात मिरवून जावं, हा ध्यास न बाळगलेले माय मराठीतले लेखक, लेखिका, कवी आणि कवयित्री विरळाच! तर सम्यक विद्रोही वा तत्सम चळवळीशी बांधील साहित्य संमेलनात बरेचसे नामचीन, मराठीवर प्यार असल्याचे लिखित आणि मौखिक दावे करणारे जन, जे की पत्रिकेवर नाव छापेपर्यंत ‘आ जायेंगे यार छापदेव नाम’ करत चूप राहतात आणि ऐन वेळेस कल्टी मारतात आणि इतर प्रस्थापित ठिकाणी लग्गा लावालावी करतात, हा तसा प्राचीन अनुभव ‘सम्यक’मध्येही परत नव्याने आलाच. परंतु, बांधिलकीच्या जाणिवेतून उपस्थित राहून संमेलन यशस्वी करणारी मंडळी एकूण रसिक वाचक श्रोत्यांना सुखावून गेली. डॉ. वासुदेव गाडे , संजय पवार, रावसाहेब कसबे ही मंडळी आवर्जून उपस्थित राहिली.
सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका रमणीका गुप्ता यांच्या हस्ते उत्साहात झाले. संमेलनाध्यक्षा नीरजा यांचे जात, धर्म, लिंग, वर्ण, स्त्रीवाद यांना स्पर्शत मनुस्मृती, तिचा आजही न जळालेला विचार वगैरे विचारी खंत व्यक्त करत संमेलनाला सुरुवात झाली. ‘मी आणि माझे लेखन’ हा परिसंवाद विद्रोही लेखकांच्या लेखन प्रेरणा उलगडून दाखवणारा, नव्या लिहित्या लेखकांना एक दृष्टी देणारा, वाट दाखवणारा उत्तम कार्यक्रम, खैरलांजीचे सार्वत्रीकरण ठसविणारा प्रज्ञा दया पवार लिखित धादांत खैरलांजीचा प्रयोग, ही सम्यक साहित्य संमेलनाचे सर्वसमावेशीकरण अधोरेखित करणारी आकर्षणे ठरली. बाकी झ्याक म्हणावे, असे तुरळक तुरळक कार्यक्रम घडत गेले.
नुसते कविसंमेलन काय, वा साहित्य संमेलनातील (कोणत्याही!) कविसंमेलन काय, हा आता जरा गंभीर विचार करण्याजोगा विषय झाल्याचे इथेही ठळक आढळून आले. स्टेजवरचे कविता ‘वाचे कवी’ आणि कविता ‘आयके श्रोते’ यांच्यात मोप डिस्टन्स असल्याचे दिसून आले! एकतर कविलोक स्वत:ची सोडून दुस-याची कविता ऐकण्याचे औदार्य मुळीच अंगी बाणवित नाहीत. ते उत्तम ऐकतात! हे दर्शवणा-या त्यांच्या अभिनयाला माय मराठीवर प्यार करणारे तमाम श्रोते साष्टांग घालतील, हा भाग वायला! गपागप स्वत:ची टाळीबाज वसुली कविता म्हणणे (सगळं क्रेडिट चढ्या आवाजाला!), दाद निरखणे आणि कधी एकदाचा कार्यक्रम संपतो याची वाट बघत ‘चलो घूम जाव हॉटेल मे’ हा प्रकार ठळक दिसून आला.
जाणीवपूर्वक बाकीच्या इतर वैचारिक परिसंवादाला हजर राहून चिंतन-मनन करण्याचा अजिबातच प्रयत्न अविनाश गायकवाड, अशोक थोरात, अशोक बनसोडे, गणेश विसपुते हे सन्माननीय गंभीर प्रकृतीचे कवी वगळता इतर कुणामध्ये दिसला नाही. ही अत्यंत खेदजनक बाब या संमेलनात दिसली.
2000 नंतरच्या सांस्कृतिक चळवळी व मराठी वाङ्मयीन संस्कृती आणि जात, वर्ग, लिंगभावाचे राजकारण या परिसंवादातील राजन खान, महेंद्र भवरे, नीलकंठ शेरे, मंगेश काळे या मान्यवर लेखकांची जातीचे आर्थिक हितसंबंध, लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यामध्ये असलेल्या कळप संस्कृतीमुळे एकूणच वाङ्मय व्यवहारावर होणारे परिणाम ही चर्चा खास! जागतिकीकरणाच्या दुस-या पर्वातील सामाजिक, सांस्कृतिक बदलाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न समकालीन मराठी साहित्याची निकोप परखड चिकित्सा करत केलेली चर्चा ही केवळ इथेच होऊ शकते, यात शंका नाही.
सिद्धहस्त लेखक सदानंद देशमुख व मकरंद साठे यांच्या प्रकट मुलाखती बहारदार! मुलाखत घेणारे पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी लेखकाच्या प्रेरणा आणि साहित्यावरील संस्कार यावर विचारताना देशमुखांची थोडी अडचण केल्याचे वा झाल्याचे चित्र काही काळ निर्माण झाले.
ज्ञानोबा तुकोबाच्या वाङ्मयीन प्रभावातून साकारलेले शेतकरी जीवन त्याला ग्रामीण लेबल हटवून माझ्या साहित्याकडे पाहा, असं हट्टाने सांगणारे देशमुख जागतिकीकरणाच्या रेट्यात पिचलेला नाडलेला गरीब शेतकरी हा फक्त ग्रामीण परिप्रेक्ष्यात बसू शकत नाही, हे सांगताना समकालीन मराठी ग्रामीण लेखकांच्या साहित्यातून दिसणारा जातव्यवस्थेचे समर्थन करणारा बागायतदार, धनदांडगा शेतकरी मात्र विसरले. आजचा अस्मितेचा प्रश्न या परिसंवादात अवघड लिहिणारे डॉ. हरिश्चंद्र थोरात सर खूपच आकलनीय, सोपे बोलले.
समग्र परिवर्तनाचा विचार घेऊन पुढे चाललेल्या सर्व समावेशक होऊ पाहणा-या या साहित्य चळवळीचे एकूणच इतर संमेलनीय बुजबुजाटात महत्त्वाचे स्थान आहे, हे नाकारता येत नाही!
sbwaghmare03@gmail.com