आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता, काळ आणि मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले आयुष्य हीच कवितेची पार्श्वभूमी असते. कवितेच्याही आवाक्यात येणार नाही इतके अफाट, अथांग, व्यामिश्र, बहुआयामी, नैकरेषीय, अनाकलनीय आणि परस्पर अंतर्विरोधांचे अस्तित्व आयुष्यात आहे. मी कविता का लिहितो? या प्रश्नावर विचार केला तर माझ्या लक्षात येते की काहीतरी सांगण्याची मुलभूत ओढ माझ्यात आहे. स्वतःचे मन हलके व्हावे अशी एक सुप्त इच्छा कविता लिखाणाच्या मागे असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे. काहीतरी सांगण्याची प्रक्रिया तर इतर गद्य लिखाणातूनही होऊ शकते. मग कविताच का? मला असे वाटते की भाषेचा जन्म होतांनाच कवितेचा जन्म झाला. त्यामुळे कविता हा माणसाच्या मूळ भाषेचाच गाभा आहे. माणूस जसा जसा विचार करू लागला, तशी तशी त्याच्या भाषेची गद्यात्मकता वाढत गेली. त्यामुळे कविता आणि इतर गद्य लिखाणात खूप फरक पडतो. कवितेचा जन्मच मुळात सुप्त मनात होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे गद्य लिखाणात जसे लिहितांना तर्क आणि विचारांचे नियंत्रण ठेवता येते तसे कवितेच्या बाबतीत करता येत नाही. जे कवीच्या सुप्तमनात ठाण मांडून बसले आहे, ते जसेच्या तसे लाव्ह्यासारखे उफाळून येते आणि कवितेचा ज्वालामुखी कागदी भूपृष्ठावर प्रकट होतो. त्यामुळे कविता ही ठरवून, वेळ काढून विचारपूर्वक केलेली कृती नसते.
आपण जगत असतांना अनेक गोष्टींशी आपला संबंध येतो. समाज, संस्कृती, मूल्यव्यवस्था, कायदा, आपल्या इच्छा-आकांक्षा, वासना, अपुरी राहिलेली स्वप्ने, आर्थिक-राजकीय-सामाजिक अन्याय आणि शोषण, कुटुंब, निसर्ग, अस्मानी-सुलतानी संकटे अशा हजारो बाबी सांगता येतील. या सगळ्यांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. यातून एक अस्वस्थता आपल्या मनात निर्माण होत असते. दुःख आणि वेदना तर मानवी जगण्याच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. समस्या दूर करण्याचा आपण जीवापाड प्रयत्न करत असतो पण शेवटी माणूस म्हणून आपल्या शक्तीला मर्यादा आहेत. खरी कविता या अस्वस्थतेतूनच जन्माला येते. म्हणजे काहीच पर्याय नसतो म्हणून कवीला कविता लिहावी लागते. कुठल्याही कवीवर मागच्या पिढीतल्या कवींचा प्रभाव असणं ही काही वाईट गोष्ट नसते. प्रभावाचा परिणाम ही नकळत घडत जाणारी आणि साहजिक प्रक्रिया आहे.प्रभाव पचवून कवी किती पुढे गेला हेच तपासले पाहीजे. इतर लोक आपल्या कवितेबद्दल काय म्हणतात यावर कवीने फारसे लक्ष देऊ नये. कुणी काही आक्षेप कवितेवर घेतले तरी उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नये. कवीला स्वतःचा आवाज, स्वतःचा जीवनविषयक अर्थ आणि स्वतःची भाषा शोधता आली पाहिजे.
नव्वदोत्तर कवींच्या पिढीविषयी मी जर आता बोललो नाही तर तो व्यक्तिश माझा कृतघ्नपणा ठरेल. मी वयात आलो तेव्हापासून या कवितेच्या प्रेमात होतो. खरंतर ही कविता वाचत राहणे, त्यावर चिंतन करत राहणे ही माझीच तीव्र मानसिक गरज होती.मनाला भिडेल असे समकालीन लिखाण इतरत्र वाचायची सोय मला नव्हती. त्यामुळे या पिढीच्या कवितेशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहीजे की ‘साठोत्तरी’ किंवा ‘नव्वदोत्तरी’ ह्या काही केवळ कालिक संज्ञा नाहीत तर ते एका सेन्सिबिलीटीचे नाव आहे. नव्वदोत्तर काळातल्या कवींनी मर्ढेकरकालीन नवकवितेची आणि साठोत्तरी कवितेचीच परंपरा अधिक सशक्त आणि कालसुसंगत करीत पुढे नेलेली आहे. हे थोडं अधिक स्पष्टपणे बोलायचे तर असेही म्हणता येईल की वसंत दत्तात्रेय गुर्जर, तुलसी परब, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, सतीश काळसेकर, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे आणि वसंत अबाजी डहाके या सगळ्या साठोत्तरी कवींच्या कवितेवर मर्ढेकर, रेगे आणि मुक्तिबोध या नवकवींचा प्रभाव आहेच. त्याचप्रमाणे नव्वदोत्तर कवितेवरही साठोत्तरीच्या कवितेचा प्रभाव आहेच.कवितेच्या प्रत्येक टप्प्यावर मागच्या पिढीकडून आलेल्या काही गोष्टी गळून पडतात, काही सलग सुरु राहतात, काही नव्याने प्रवेश करतात आणि काहींचे पुनरुज्जीवन होते . कवितेचा आशय, आकृतिबंध, भाषा, प्रतिमा, प्रतिके इत्यादी बाबींना ही गोष्ट लागू होते. स्थितिशीलता आणि परिवर्तन यांचा एकत्रित विचार केला तरच इतिहास नीट समजून घेता येतो. ऐतिहासिक दृष्टीकोनातून याकडे पहायचे असेल तर विभागणी करतांना परिवर्तन किंवा नाविन्य किती आहे, त्यावर ते अवलंबून आहे. नव्वदोत्तर कालखंड हा जागतिकीकरणाचा कालखंड आहे. अर्थव्यवस्थेत झालेल्या मूलगामी बदलांमुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडून आलेले आहे. हे बदल केवळ जगण्याच्या भौतिक पातळीवरचे नाहीत, तर मानवी नातेसंबंध, भावविश्व, भाषा आणि मूल्यव्यवस्था इतक्या खोलवर त्यामुळे परिणाम घडून आलेत. माणसाचे ग्राहकात रुपांतर करणारा हा काळ आहे. याच काळात दहशतवादाचा भस्मासूर आपल्या समोर उभा ठाकला आणि मंदीर बांधण्याचे स्वप्न दाखवत नवे सरकार सत्तेवर आले. या सगळ्याच बाबींचे पडसाद नव्वदोत्तर कवितेत उमटलेले आहेत. अमेरिकन नवसाम्राज्यवादाला विरोध करणाऱ्या चळवळी जगभर सुरु झाल्या, तेव्हा आनंद विंगकरांनी ‘अमेरिका’ नावाची कविताच लिहिलेली आहे. वर्जेश सोलंकीच्या ‘ततपप’ मधील कवितांनी मानवी जगण्यातील जीविताच्या भयाची भावना अधोरेखित केली. बॉम्बस्फोट घडून येणाऱ्या शहरात ही भीती तर वाटणारच आहे. हिंदू-मुस्लिम नातेसंबंध पार बिघडवून टाकणारा हाच काळ आहे, तर याचेही प्रतिबिंब रवींद्र इंगळे चावरेकरांच्या ‘मोहम्मद हरवला आहे’ या कवितेत उमटले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. स्वतःच्या सांस्कृतिक मुळांचा शोध घेण्याची प्रवृत्तीही या पिढीच्या कवितेत बलवत्तर आहे. विशेषतः नवाक्षर दर्शन आणि ऐवजीतील कविता ही या देशी जाणिवेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. मला सांगायचे एवढेच की नव्वदोत्तर साहित्याची संकल्पना ही काही चार-दोन लोकांच्या टाळक्यातून निघालेली टूम नाही. तिला वास्तविक स्वरूपाचा वाङ्मयीन आधार आहे. नेमक्या याच काळात मराठीत नव्वदोत्तर कवींनी कविता लिहिली. त्यामुळे नव्वदोत्तर काळाची सगळी स्पंदने या कवितेत उमटलेली आहेत. जागतिकीकरणाला प्रतिक्रिया देणे हे या कवितेचे महत्वपूर्ण सहजसिद्ध लक्षण आहेच, पण केवळ तेवढेच ते एकमेव असे नाही. शब्दवेध आणि अभिधानंतर या अंकांच्या सुरुवातीपासून आपण कविता वाचायचा प्रयत्न केला तर हे सहजच लक्षात येते की या कवितेचा विकास होत आला आहे. सुरुवातीच्या काळातील केवळ अनाठायी प्रयोगशीलता, उगीच भांबावून सोडणारी भाषिक दुर्बोधता असली दुय्यमपणाची लक्षणे दूर सारून ही कविता सध्या चांगली समर्थ आणि परिपक्व झालेली आहे.आता माझ्या समकालीन पिढीतील माझ्या किती मित्रांनी शब्दवेधचे किमान ७-८अंक , अभिधानंतरचे किमान १०अंक , खेळचे किमान १० अंक , ऐवजी आणि नवाक्षर दर्शनचे किमान ५-७ अंक तरी वाचले असतील, मला शंका वाटते. इग्नेशियस डायस, फेलिक्स डिसूझा, अजित अभंग किंवा स्वप्नील शेळके यांनी वाचलेले असतील. नव्वदोत्तर पिढीची कविता आणि मराठी साहित्यातील त्यांचे योगदान समजून घ्यायचे असेल तर ते अंक नीट समजून घ्यावेच लागतात. नाहीतर कविता लिहून झाली की मग मीच काय ती जगावेगळी आणि प्रयोगशील कविता लिहिली या भ्रमात सगळे मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मी जे प्रयोग कवितेत करतोय, तसले प्रकार विवेक मोहन राजापुरे, मन्या जोशी, सचिन केतकर, अरुण काळे वगैरे इत्यादी मंडळींनी केव्हाच करून सोडलेय हे आम्हाला मग कळतच नाही. आणि मग त्यातून (स्वप्नील शेळकेच्या भाषेत सांगायचे तर) एकमेकांची लाल करण्याचा प्रकार घडतो. नव्वदोत्तर पिढीतील लोकांच्या स्वतःच्या काही मर्यादा नाहीत असे मुळीच नाही. त्यांच्या मर्यादांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल. माझ्या मते त्यांचे काम नीट न तपासता विधाने करणे काही बरोबर नाही. प्रणव सखदेव, सुदाम राठोड, अविनाश उषा वसंत काहीही म्हणोत पण यांना धरून महेश लोंढे, अजित अभंग, महेश लीलापंडित, फेलिक्स डिसोझा, इग्नेशियस डायस , वैभव छाया, अजिंक्य दर्शने, ओंकार कुलकर्णी, स्वप्नील शेळके, कुणाल गायकवाड, उत्पल वनिता बाबुराव, शर्मिष्ठा भोसले, शर्मिला रानडे, मोनालिसा विश्वास, चैताली अहेर, हर्षदा विनया, बालाजी सुतार, विनायक येवले, योजना यादव, प्रेषित सिद्धभट्टी, सचिन कापसे, अमोल कदम, गोपाल तिवारी, विनोद कुलकर्णी, ऐश्वर्य पाटेकर, हर्षवर्धन पवार, नामदेव कोळी, उदय येशे, मोरेश्वर सोनार, अनिल साबळे, कविता ननावरे, संदीप जगदाळे इत्यादी कविमंडळीना उद्याचे समीक्षक नव्वदोत्तर कवितेच्या दुसऱ्या पिढीत टाकण्याची शक्यता मला अधिक वाटते. म्हणजे अरुण काळे, भुजंग मेश्राम, मंगेश नारायणराव काळे, हेमंत दिवटे, सचिन केतकर, रमेश इंगळे उत्रादकर, रवींद्र इंगळे चावरेकर, गणेश विसपुते, दिनकर मनवर, अविनाश गायकवाड, प्रवीण दशरथ बांदेकर, वर्जेश सोलंकी, वीरधवल परब, गणेश वसईकर, अजीम नवाज राही, दासू वैद्य, संतोष पद्माकर पवार, आनंद विंगकर, अशोक कोतवाल इत्यादी लोकांची नव्वदोत्तरीची पहिली पिढी आणि माझ्या समवयस्क मित्रांची दुसरी पिढी. आता हेही लक्षात घेतले पाहिजे की नव्वदोत्तरीच्या या दोन्ही पिढ्यांमध्ये वेगळेपणही आहेच. अगदीच साम्य नाही. पण कालिक विभाजनाची रेषा आखावी इतका मोठा फरक नाही.
बातम्या आणखी आहेत...