आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अजात' पर्वाचा क्रांतिपट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपतीमहाराज हे विसाव्या शतकाच्या प्रारंभातलं अत्यंत दुर्लक्षित पर्व. या पर्वात जातव्यवस्थेविरोधातला क्रांतिकारी लढा आहे आणि रूढी-परंपरेविरोधातला एल्गारही. त्याचाच शोध अरविंद गजानन जोशी निर्मित ‘अजात’ माहितीपटात घेण्यात आला आहे. कॅलिफोर्निया येथील ओकलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या या कलाकृतीच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडणारा हा लेख...
 
येत्या एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या कॅलिफोर्निया येथील ओकलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमच्या ‘अजात’ या माहितीपटाची निवड झाली. आमचा दिग्दर्शक मित्र अरविंद गजानन जोशी (अभ्या) आणि विक्रांत बदरखे (विक्या) यांनी ही बातमी मला सांगितली, तेव्हा आपल्या कष्टाची आणि कामाची कुणीतरी दखल घेतेय, याचाच प्रचंड आनंद झाला आणि पाठोपाठ ‘अजात’च्या कामाचा पहिल्या दिवसापासूनचा पट डोळ्यासमोर तरळून गेला..

ही फिल्म करायची मूळ कल्पना विक्याची होती. नागपूरचे पत्रकार अतुल पांडे यांचा ‘अजातक कथा’ नावाचा लेख म.टा.च्या दिवाळी अंकात त्यानं वाचला होता. पुण्यात एका रात्री मी, विक्या आणि अभ्या गप्पा करत बसलो होतो. तेव्हा विक्या गणपतीमहाराजांविषयी सांगू लागला. गणपतीमहाराजांचे कार्य ऐकून मी तर अवाक् झालो. शंभर वर्षांपूर्वी एखादा माणूस इथल्या जातिव्यवस्थेला हादरे देणारे इतके धाडसी आणि क्रांतिकारी काम करू शकतो, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट होती...

मध्ये दोनेक वर्षे गेली. विक्या आणि मी आमच्या रोजीरोटीच्या कामात गुंतून गेलेलो होतो. अभ्या मुंबईतील नोकरी सोडून पुण्यात परत आला होता. काहीच काम करत नव्हता. तो खूप परात्म, भणंग आणि उदासीन होऊन बसला. विक्याला त्याची चिंता वाटायला लागली. मी यु.पी.एस.सी.च्या पूर्वपरीक्षेसाठी पुण्याला गेलो होतो. विक्या आणि मी अभ्याला एकट्यात गाठले. काहीच करत नाही, नुसते दिवस वाया घालवतोय, म्हणून मी अभ्याला झापायला लागलो. तसं जाऊन झापायचं, हे विक्याचं आणि माझं आधीच ठरलं होतं. पण तेथे जाऊन झालं उलटचं. अभ्याच आमच्यावर संतापला. म्हणाला की, येथे मदत करायला कुणीच तयार नाही, आणि झापायला सगळी दुनिया तयार आहे. मग मीच थोडा खजिल झालो. म्हणालो, सांग तुला काय मदत हवी? मग अभ्या बोलला, मी ‘अजात’वर फिल्म करतो, पण रिसर्चसाठी मदत कर. मी म्हणालो, "ठरलं.'

अभ्या आणि मी सरळ नागपूर गाठले. अतुल पांडे यांची भेट घेतली. त्यांना माहितीपट कसा असेल, हे थोडक्यात सांगितले. त्यांनी मंगरूळ दस्तगीर (ता. चांदूर जि. अमरावती) मधील पंढरीनाथ निमकर गुरुजी आणि हरिश्चंद्र निमकर यांचा संपर्क करून दिला. गावापर्यंत कसे पोचायचे, ते सांगितले. गणपती महाराज, त्यांचे कार्य, अजात संप्रदाय आणि अजात पंथीयांची सद्य:स्थिती या विषयावर त्यांच्या लेखातून बरीचशी माहिती आम्ही मिळवली होती. मग मंगरूळ दस्तगीरला गेलो. तेथे गणपती महाराजांचे वंशज असलेले भबूतकर कुटुंबीय व निमकर कुटुंबीय यांच्याशी बोललो, चर्चा केली. सगळी परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न केला. हरिश्चंद्र निमकर यांनी आम्हाला गणपती महाराजांचे प्रकाशित ग्रंथ मिळवून दिले.
 
गणपतीमहाराजांविषयी मिळणाऱ्या अगदी छोट्या छोट्या नोंदीही आम्ही गोळा करत होतो. महाराजांची भजने आणि अभंग आम्ही वाचले. काही दिवसांनी अभ्या आणि रणजीत शेंडगे (दादा) माझ्या घरी वरणगावला आले.

या माहितीपटाचे स्वरूप कसे असावे? कुणाकुणाच्या मुलाखती घ्याव्यात? कोणकोणत्या मुद्द्यांची मांडणी करावी, यावर आम्ही सलग तीन दिवस चर्चा करत होतो. अभ्याने काही तांत्रिक बाबी आम्हाला समजावून सांगितल्या. संपूर्ण समता असलेला समाज अस्तित्वात येऊ शकतो का? जातीव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे? सामान्य लोक जातीव्यवस्थेकडे कसे पाहतात? कर्मकांडाची जुनी व्यवस्था आणि प्रतीकं नाकारून कर्मकांडाची नवी प्रतीके आणि नवी रूपे अस्तित्वात कशी येतात? म्हणजे क्रांतीचं रूपांतर प्रतिक्रांतीत कसं होतं? जातीव्यवस्था, पितृसत्ताक ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचा नायनाट करण्याची प्रत्यक्ष प्रेरणा गणपतीमहाराजांनी कुठून घेतली? मूर्तिपूजेकडून निर्गुणाकडे त्यांचा प्रवास कसा झाला? अजात संप्रदायाला असलेला जनाधार कमी कमी कसा काय होत गेला? गणपतीमहाराजांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची नऊ वर्षे एकांतात आणि मौनात का घालवली? त्यांच्या हयातीत व नंतर पंथीय भेद का व कसे निर्माण झाले? आजच्या अजात पंथाच्या अनुयायांपुढील नेमके पेच आणि आव्हाने कोणती? एखाद्या व्यक्तीच्या जीवनचरित्राचा शोध त्याने रचलेल्या कवितांमधून किती घेता येऊ शकतो? अशा अनेक बाबींचा विचार आम्ही करत गेलो. 

गणपतीमहाराजांचा जन्म इ.स. १८८५चा आणि मृत्यू इ.स. १९४४मध्ये झालेला. घोराडच्या केजाजी महाराजांचे ते शिष्य. पंढरपूरची वारी ते नित्यनेमाने करीत. त्यांनी विधवेशी आंतरजातीय विवाह केला आणि आपल्या शिष्यांना आंतरजातीय विवाह करण्याचे आदेश दिले. मंदिरप्रवेश, एकत्रित काला, स्त्री मुक्ती अशी अनेक कामे त्यांनी केली. स्त्रियांना पितृसत्ताक दास्याचे प्रतीक असलेले कुंकू पुसून टाकायला सांगितले. विवाहित शिष्यांना मंगळसूत्रे आणि बांगड्या काढून टाकायला सांगितल्या. पुढे तर त्यांनी स्वतःच मूर्तिपूजेला विरोध केला.

विदर्भातील गावांमध्ये गणपतीमहाराजांची लोकप्रियता वाढत होती. हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी होते. पण इतिहासाच्या दृष्टीने या घटनेचे दस्ताऐवजीकरण झाले नाही. गणपतीमहाराजांबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर मला सर्वप्रथम याचेच आश्चर्य वाटत राहिले की, महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तनाच्या इतिहासाने गणपती महाराजांची नोंद का घेतली नसावी? त्यांनी ब्राह्मणी, पुनरुज्जीवनवादी संघाला जसा विरोध केला, तसेच काँग्रेसच्या राष्ट्रवादी चळवळीपासूनही आपल्या अनुयायांना दूर राहायला सांगितले. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेतृत्वाच्या राजकीय आणि वर्गीय मर्यांदाचेही गणपतीमहाराजांना भान होते. मंगळूर-दस्तगीर या गावात बहिष्कृत समाज परिषद महाराजांनी १९२९मध्ये भरवली होती. त्या परिषदेच्या उद‌्घाटनाला स्वतः बाबासाहेब आंबेडकर येणार होते, पण अचानक काहीतरी कामात गुंतल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांचे बंगाली मित्र विराटचंद्र मंडल यांना परिषदेला पाठविले. बाबासाहेब जर त्या परिषदेला आले असते, तर गणपतीमहाराजांच्याही कामाची नोंद नक्कीच इतिहासात घेतली गेली असती.

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर विदर्भाचा प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. पण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, वैचारिक आणि सांस्कृतिक वारशावर पश्चिम महाराष्ट्राचीच पकड राहिली. त्यामुळे पुण्यातल्या पेठांमधल्या सुधारकांमध्ये झालेले लहानसहान वैचारिक वादही इतिहासात दाखवले जातात. पण विदर्भातील एवढ्या मोठ्या घटनेची महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात नोंद होत नाही.

महाराष्ट्राला वारकरी संत परंपरेचा वारसा आहे. वारीत, पंढरपूरच्या वाळवंटात, चंद्रभागेत स्नान करताना उच्च-नीचतेचा भाव या वारकऱ्यांच्या मनात नसतो. पण वारी गावात परत आल्यावर पुन्हा सगळे जातीय आणि वर्गीय रचनेत भेदाभेद आणि शोषणाच्या व्यवस्थेचे पालन करतात. गणपतीमहाराज मात्र येथे वेगळे ठरतात. गावातूनही भेदाभेद आणि शोषणाची व्यवस्था झुगारून द्यायचा मोठा लढा त्यांनी उभारला. आपण सारे ईश्वराची लेकरे आहोत, त्यामुळे भेदाभेद पाळणे हा भ्रम होय, असा सिद्धांत आपली परंपरा सांगत होती. पण या सिद्धांताची प्रत्यक्षात व्यावहारिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न गणपतीमहाराजांनी केला. ब्राह्मणी वर्चस्ववादी धर्मव्यवस्थेला पुरजोर विरोध करून ‘अजात’ पंथाच्या रूपात नवा पर्याय गणपतीमहाराजांनी दिला. म्हणूनच प्रत्यक्ष चळवळ राबवून समाज परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करणारा हा वारकरी परंपरेतील संत क्रांतिकारी ठरला... 

सनातनी लोकांना गणपतीमहाराजांचे हे काम आवडले नाही. त्यांनी हरप्रकारे महाराजांना आणि त्यांच्या अनुयायांना त्रास दिला. महाराजांच्या चारित्र्यावर शितोंडे उडवले. त्यांच्यावर सामूहिक बहिष्कार लादला. एकदा तर गणपतीमहाराजांच्या खुनाचाही कट विरोधकांनी रचला होता. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबीयांचे प्राण वाचविले. इंग्रजांनी देशाला पारतंत्र्यात ढकलले असले तरीही इंग्रज सरकारच्या न्यायबुद्धीवर व उदारमतवादावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच ‘अजात’ पंथीयांची पालखी निघायची, तेव्हा ‘राजा पंचम जॉर्ज’चा फोटो पालखीच्या सगळ्यात पुढे ठेवला जाई. विदर्भातील सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. नायगावचे सत्यशोधक समाजाचे नेते गुलाबराव शिसोदे हे हातात बंदूक घेऊन गणपतीमहाराजांच्या पाठीशी उभे राहात आणि मग मोठ्या जनसमुदायासमोर गणपतीमहाराज कीर्तन करीत. समतावादी समाजाचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कार्य करणाऱ्या कर्त्या सुधारकांना कायमच मरणाची भीती दाखवली जाते. विषमतामूलक शोषणाच्या व्यवस्थेशी पंगा घेणाऱ्यांचे खून पाडले जातात. आपला इतिहास अशा शहिदांच्या रक्ताने माखला आहे.  

केवळ जैविक आणि भौतिक गरजा पूर्ण झाल्या म्हणजे सारे काही संपत नाही. माणूस हा चिंतन आणि विचार करणारा प्राणी आहे. मी कोण आहे? माझ्या अस्तित्वाचे कारण, विश्वाचा आणि माझा संबंध, आयुष्याचे श्रेसय, अंतिम सत्य इत्यादी प्रश्नांचे चिंतन माणूस करतच असतो. हे मानवी जीवनाचे अाध्यात्मिक अंग आहे. अध्यात्माची परंपरा जीवनातील भौतिक बाबींकडे दुर्लक्ष करते. अाध्यात्मिक शोध घेणारा माणूस जीवनाला क्षणिक आणि नश्वर मानून अन्याय, शोषण आणि विषमतेकडे कानाडोळा करतो. पण गणपतीमहाराजांनी असे केले नाही. इतिहासात अाध्यात्मिक आणि त्याच वेळी सामाजिक कार्य करणारे महाराजांसारखे दुर्मीळ उदाहरण दुसरे कुठलेच नाही. जुन्या अाध्यात्मिक आणि दार्शनिक परिभाषेसोबतच आधुनिक राजकीय आणि न्यायव्यवस्थाविषयक परिभाषा ही गणपतीमहाराजांनी रचलेल्या काव्यात आढळून येते. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांची अप्रकाशित ग्रंथसंपदा हस्तलिखित स्वरूपात जीर्ण अवस्थेत पडलेली आहे. त्यांचे हे ग्रंथ संपादित करून प्रकाशित करण्याची व त्यांचे जतन करण्याची नितांत गरज आहे. त्यांच्या विचार आणि कार्यावर समाजशास्त्रीय, राजकीय, आर्थिक, दार्शनिक आणि तात्त्विक पातळीवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

आजच्या घडीला ‘अजात’पंथीय हे आर्थिकदृष्ट्या गरीब असूनही त्यांच्या जातीच्या रकान्यात ‘अजात’ असा उल्लेख असल्याने त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. म्हणून यातले काही ‘अजात’पंथीय पुन्हा मूळ जातींचे दाखले मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे म्हणजे, अजातपंथीयांचे जातीव्यवस्थेला शरण जाणे आहे की काय? या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही या माहितीपटातून केलाय. प्रा. सदानंद मोरे, प्रा. प्रवीण चव्हाण, डॉ. प्राजक्त पांडे, डॉ. अशोक चोपडे, डॉ. सुभाष खंडारे, डॉ. प्रमोद गारोडे, गणपतीमहाराजांच्या साहित्यावर पीएचडी करणाऱ्या डॉ. विहीरे अशा अभ्यासकांच्या मुलाखती तर आम्ही घेतल्याच, सोबतच सामान्य लोकांची मते आणि त्यांचे विचारही समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. या संदर्भात सामान्यांच्या भावविश्वाचेही या माहितीपटाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘अजात’च्या चित्रीकरणासाठी पुणे, पंढरपूर, नागपूर, अमरावती, वर्धा, धामणगाव, नायगाव, वर्धमनेरी, अंजनवती, मंगरूळ दस्तगीर, हिम्मतपूर-वातोंडा, पवनार अशी महानगरांपासून ते खेड्यांपर्यंतची अनेक ठिकाणे आम्ही पालथी घातली. माहितीपटाच्या आशयात्मक आणि तांत्रिक बाजूमध्ये कुठलीच कमतरता राहू नये, म्हणून सारेच झटत होते. आमच्यापुढची सगळ्यात महत्त्वाची समस्या आर्थिक स्वरूपाची होती. या माहितीपटासाठी खूप प्रयत्न करूनही आम्हाला चित्रपट क्षेत्रातील निर्माता मिळाला नाही. मित्रमंडळींच्या साहाय्याने पैसे उभे करत एक एक टप्पा आम्ही पार करत होतो. आमची ही मित्रमंडळीच आमचे निर्माते झाले. आमच्या निर्मात्यांना नफा तर सोडाच, पण झालेल्या खर्चाचा किमान परतावाही करता येईल की नाही, याची आम्हाला आजही शाश्वती नाही. 
 
नफेखोरीच्या मुक्तबाजाराच्या युगातही या विषयाचे महत्त्व, आमची धडपड आणि सामाजिक-प्रयोगशील उपक्रमांच्या आवडीखातर आमच्याशी कुठलीही ओळखपाळख नसताना फक्त फोनवरच्या बोलण्यावरून डॉ. स्वाती कामशेट्टे यांनी भरघोस मदत केली. सहा महिन्यांच्या मर्चंट नेव्हीच्या जॉबमधून साठवलेले पैसे श्री. मयुर मिरा किशोर यांनी दिले. सोलापूरचे श्री. विनायक फुलारी यांनी शिकवणीच्या पैशातून आम्हाला मदत दिली. महाराष्ट्रातील प्रख्यात कवी श्री. दिनकर मनवर हे केवळ श्री. रविंद्र इंगळे चावरेकर यांच्या सूचनेवरून तत्काळ आम्हाला फक्त पैसे देण्यासाठीच प्रत्यक्ष भेटले. श्री. शशांक दत्तात्रय प्रतापवार यांनी सर्वप्रथम आम्हाला आर्थिक साहाय्य केले. श्री. सुनिल चांदूरकर यांनी पैशांसोबतच रिसर्चसाठी कामी येईल म्हणून स्वतःचा हॅण्डीकॅमही आम्हाला दिला. आमच्या प्रत्येक प्रकल्पात आमचा मित्र निलेश प्रभुलिंग नरके हा केवळ आर्थिक बाबतीतच नव्हे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्यक्ष आमच्या सोबत असतो. फोनवर न बोलता किंवा प्रत्यक्ष न भेटताही केवळ आमच्या मेसेजवरून श्री. भारत मयेकर यांनी आम्हाला पैसे ट्रान्सफर केले. हर्षल अलुरकर हा तर आमचा घरचाच माणूस आहे. या सगळ्यांनी आमच्या पाठीशी आर्थिक बळ उभे केले. ही आमच्यासाठी अत्यंत आशावादी गोष्ट आहे. हर्षल अलुरकर व मयुरेश चव्हाण पुण्यातून सारी तांत्रिक रसद आम्हाला पुरवत होते. अभ्या, दादा, यशोवर्धन कुळकर्णी, हरिश्चंद्र निमकर, कॅमेरामन शैलेश देसाई आणि मी जणू काही झपाटून गेलो होतो. अनेक अडचणी, गैरसोय आणि काटकसर सोसत आम्ही हे काम पूर्ण केले.

गणपतीमहाराजांच्या अनुयांयानी गायलेली भजने, पंढरपुरात मिळालेली भजने यांचे रेकॉर्डिंग करून तेच संगीत म्हणून आम्ही माहितीपटात वापरलेले आहे. एकूण शूटिंगचे फुटेज ११८ तासांचे झाले होते. ते विवेक चक्रे, अभ्या, रोहित गाडगे यांनी एडिट करून दोन तासांचा माहितीपट सिद्ध केला. नुकताच ‘Impact Docs’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्रपट महोत्सवात ‘अजात’साठी अभ्याला ‘अवाॅर्ड ऑफ मेरिट’ मिळालाय. या महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणारा ‘अजात’ हा एकमेव भारतीय माहितीपट ठरला आहे. भारतात माहितीपटांना चित्रपटांच्या तुलनेत फार महत्त्व दिले जात नाही. मार्केट तर महत्त्व देतच नाही, पण चित्रपट क्षेत्रातील लोकांनाही माहितीपट हा प्रकार फारसा महत्त्वाचाच वाटत नाही, असा आमचा अनुभव आहे. 

आम्ही रिसर्चसाठी मंगरूळ दस्तगीरला मारलेल्या पहिल्या फेरीनंतर अभ्या मला म्हणाला, की डॉक्युमेंटरीत तू नॅरेटर म्हणून काम कर. मी "हो' म्हणालो. मला सुरुवातीला वाटलं, कुठेतरी स्टुडिओत बसून हा माझ्या आवाजात काहीतरी रेकॉर्ड करून घेईल. पण अभ्याने तर या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने काळ आणि अवकाशाच्या मोठ्या पटावर मला फिरवून आणले. गणपतीमहाराज नावाच्या एका दुर्लक्षित क्रांतीनायकाचा शोध घेताना धर्म, इतिहास, संस्कृती, समाज, अध्यात्म, जातीव्यवस्था, शोषण, तत्त्वज्ञान यांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास मला करावा लागला. माझा चित्रपट क्षेत्राशी काहीच संबंध नाही. या आधी अभ्यानेच दिग्दर्शित केलेल्या ‘मास्तर’ या त्याच्या पहिल्याच लघुपटात मी शिक्षकाची भूमिका केल्यामुळे कॅमेराविषयीची भीती माझ्या मनातून तेव्हाच निघून गेलेली होती. अभ्याने सांगितल्यानुसार खूप नव्या गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी हा माझ्यासाठी आयुष्य समृद्ध करणारा अनुभव ठरलाय. 
 
अगतिक पाऊल
* बारावीची जी स्कॉलरशिप होती, ती उचलण्यासाठी मग जात पाहिजे होती नं... कास्ट सर्टिफिकेट... तर कास्ट सर्टिफिकेट काही भेटत नव्हतं... मग आमचे अप्पाजी जे व्हते, त्याहीले विचारलं तं त्यांच्याही इच्यावर "अजात' होतं... पण समजा यांचं पूर्ण सगळं "अजात'च होतं.. मग डुप्लिकेट म्हणजे थोडं डुप्लिकेट करून मग आमचं आम्ही स्वतः "तेली' करून घेतलं... कारण का, समोर शिक्षण होऊ शकत नव्हतं... 
- दत्तदेव नरेश निमकर ( एक अजातपंथीय विद्यार्थी) 

*  मी जातीप्रमाणपत्र पडताळणी विभागात गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की, बॉ अजात असल्यामुळे तुमचं प्रकरण त्रुटीमध्ये आहे. तर तुम्हाला व्हॅलिडिटी देता येणार नाही. तुम्ही एक प्रतिज्ञापत्र बनवून आणून द्या. तं तिथे त्या तहसीलमध्ये गेलो. तहसीलदारांना प्रमाणपत्र मागितलं, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे मी त्यांना आफिडेव्हिट करून दिलं. "मी मंगेश पवनकुमार भबूतकार, वय २६ वर्षे, धंदा मजुरी, राहणार पेठ रघुनाथपूर, ता-धामणगाव, जि-अमरावती...  मी वरील कोर्टास प्रतिज्ञापूर्वक कळवितो की, मी वरील ठिकाणाचा रहिवासी असून माझ्या आणि माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर माझीही जात "अजात' अशी नमूद आहे. परंतु "अजात' ही कुठेही अस्तित्वात नसून आमची खरी व सत्य जात ही माळी आहे... " 
- मंगेश पवनकुमार भबूतकार (गणपती महाराजांचे पणतू) 

* आम्ही जे बोललो, हे आजही माफ नाही करू शकणार गणपती महाराज. आम्ही चुकीनं "अजात' झालो. आमची ओरीजिनल जात "माळी' आहे... असं आफिडेव्हिट करून दिलं. पाहा... आम्हाला त्या वेळेस इतकं दुःख झालं का, आमच्या पूर्वजानं जे काही केलं; त्याला आम्ही तिलांजली दिली. आम्ही आजच गणपती साधूले गाडून दिल्यासारखं झालं त्या दिवशी... 
- श्री श्याम महाराज भबूतकार (गणपती महाराजांचे नातू) 
 

rajputsatyapalsingh08@gmail.com 
संपर्क - ९२२६७१५८३८ 
(लेखक आयुध निर्माणी, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव येथे कुशल कामगार म्हणून कार्यरत आहेत.)
बातम्या आणखी आहेत...