आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट गिधाडांच्या संरक्षणाची...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की, आता भारतातून गिधाडे नामशेष होणार की काय, अशी भीती निसर्गअभ्यासकांना वाटू लागली आहे.

कित्येक जण विचारतात की, आपल्याला पक्ष्यांचा उपयोग काय? आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी पक्षी उपयुक्त ठरतात. आर्थिकदृष्ट्यादेखील त्यांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडीवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदरांवर व घुशींवर काही पक्षी उपजीविका करत असल्याने ते शेतीसाठी उपकारक ठरतात. घुबडाची एक जोडी कीटक आणि उंदरांपासून १ हेक्टर शेतजमिनीचे रक्षण करते. याशिवाय पक्षी फुलांचे परागीकरण आणि बियांचे स्थलांतर करतात.

गावातील मृत झालेले कीटक, सरपटणाऱ्या आणि कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे ही घाण नाहीशी करतात. घारी व गिधाडे मृत जनावरांवर तुटून पडतात. एक प्रकारे हे सर्व पक्षी घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात. परंतु शहरातून किंवा खेडेगावातून या सर्व पक्ष्यांची- मुख्यत्वेकरून घाण, मेलेली जनावरे नाहीशी करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करणाऱ्या गिधाडांची- संख्या हल्ली कमी होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे "डायक्लोफिनॅक' या मानवांमध्ये व जनावरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांचा अतिरेकी वापर. ही औषधे घेऊन अनेक गायी-गुरांसारखे प्राणी मरतात व त्यांचे सांगाडे, मांस गिधाडांच्या खाण्यात आल्यावर तीदेखील मृत्युमुखी पडतात, किंवा जे पक्षी जगतात ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.
आपल्या भारतात "पांढरपाठी गिधाड, राज गिधाड, युरेशियन गिधाड, हिमालयीन ग्रिफोन, पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती आढळून येतात.

गिधाडे हे मृतभक्षक वर्गातील पक्षी आहेत. हे अंटार्क्टिका व ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. पिसे नसलेले केस विरहित डोके हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रक्त वा इतर द्रव्यांनी अस्वच्छ होऊन पुन्हा स्वतःला स्वच्छ करणे अवघड असल्याने हा बदल त्यांच्यात निसर्गाने घडवला असावा. गिधाडे ही निसर्गातील सफाई कामगार आहेत, तशीच ती अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवाही आहेत. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण शिकारी पक्ष्यासारखी (लांब बाकदार चोच, टोकदार नखे, इत्यादी) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. डोक्यावर पिसे नसल्याने त्यांना मृतदेहाच्या आत डोकावून मांस खाणे सोपे जाते.
गिधाडांच्या अनेक प्रजाती आहेत. या सर्व प्रजातींचे कार्य एकच- मृतदेहांचा फडशा पाडणे, असले तरी ह्या सर्व जाती एकमेकांच्या साहाय्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे आकाशात उडतात व कळपात अंतर ठेवून उडतात. बरेचदा भिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र उडतात. प्रत्येक गिधाड दुसऱ्यावर लक्ष ठेवून असते. यांच्यातील इजिप्शियन गिधाडांवर सर्व जण लक्ष ठेवून असतात. या प्रजातीच्या गिधाडांचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटरवरील भक्ष्यसुद्धा हे सहज हेरू शकतात. त्यामुळे या प्रजातींची गिधाडे जिथे उतरतात तिथे इतरही गिधाडे जमिनीवर उतरतात व सर्व गिधाडांना खबर मिळते की, खाद्य मिळाले आहे. मग "राज गिधाडे' येऊन त्यांनी मृतदेहाची जाड कातडी भेदली की, बाकीच्या गिधाडांचे काम सुरू होते व मृतदेहाचा फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.

भारतात एके काळी गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की, आता भारतातून गिधाडे नामशेष होणार की काय, अशी भीती निसर्गअभ्यासकांना वाटू लागली आहे. गिधाडांची शिकार कोणी करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या चांगली असल्याने खाद्यही कमी नाही. परंतु त्यांच्या संख्येला फटका बसला आहे तो, मुख्यत्वे औषधे व विषारी द्रव्यांमुळे. पाळीव प्राण्यांना "डायक्लोफिनॅक' नावाचे औषध देतात. या मेलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने गिधाडे अनेक व्याधी होऊन मरतात. गिधाडे सुंदर दिसत नाहीत व ती मृतदेहांवर जगतात, त्यामुळे मानवांमध्ये त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्टन ऑफ द बर्ड्‌स या संस्थांनी भारतात हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम व महाराष्ट्र या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर, बुक्सा, रानी व फणसाड या ठिकाणी गिधाड संवर्धन केंद्र सुरू करून जगात केवळ १ टक्का उरलेल्या प्रजातींच्या संगोपनाचे काम सुरू केले आहे. हे संगोपन व्यवस्थित होते की नाही, ते पाहण्यासाठी घरट्यांमध्ये कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. तसेच त्यांना विषारी द्रव्ये व औषध विरहित मेलेले प्राणीही पुरवले जात आहेत व महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये "व्हल्चर रेस्टॉरंट'ही सुरू करण्यात आली आहेत. हा खरंच एक स्तुत्य उपक्रम म्हणता येईल.

आपल्या पुराणकाळात सीतेला रावणापासून वाचवणारा "जटायू' असो किंवा प्राचीन इजिप्तची "नेख्बेत' ही देवता असो किंवा पेरूमधील नाझ्का पठारावरील गिधाड स्वरूपातील आकृत्या असोत किंवा जैवविविधतेतील त्यांचे वरच्या क्रमांकाचे स्थान असो; सर्वच ठिकाणी गिधाडांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशा गिधाडांना केवळ निसर्ग अभ्यासकांनी किंवा सरकारने प्रयत्न करून वाचवण्याऐवजी समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करून त्यांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल व आपल्या अधिवासाचे रक्षण होऊ शकेल...

saurabh.nisarg09@gmail.com