आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादुई जग फुलपाखरांचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकांना विलोभनीय रंगांचे फुलपाखरू दिसणे, ते मनसोक्त न्याहाळता येणे, ही दुर्मीळ बाब वाटते; मात्र प्रत्यक्षात फुलपाखरांना आमंत्रितही करता येते, त्यांना आपल्याला निवाराही देता येतो, त्यांचं आयुष्यही मनसोक्त टिपता येतं...

हल्ली त्यामुळेच बटरफ्लाय गार्डनची संकल्पना आपल्याकडे रुजायला लागलीय.
आपण बाह्य जगात फिरत असताना आपल्या आजूबाजूला, घराजवळच्या बागेत, घरातल्या कुंड्यांमधल्या झाडांवर, रस्त्यांवर जमिनीवर बसलेली अशी अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे पाहात असतो. शिवाय, आपण जेव्हा जंगलांमध्ये, तसेच राष्ट्रीय उद्यानांमध्ये, माळरानावर फिरायला जातो, तेव्हा अनेक प्रकारची, विविधरंगी, लहानमोठी फुलपाखरे आपले मन मोहून टाकतात. मग मनात विचार येतो, या फुलपाखरांशी मैत्री करता येईल? त्यांना आपल्या घराच्या अंगणात बोलावता येईल? त्यांना आपल्या हाताच्या बोटांवर घेऊन गुजगोष्टी करता येतील? याचा विचार केला तर हे आपल्या कोणालाही सहज शक्य आहे, असे दिसून येईल.
परंतु, त्यासाठी आपल्या भोवतालचे पर्यावरण, अधिवास, वातावरण, तसेच आपण ज्या फुलपाखरांशी मैत्री करायची म्हणतोय, त्यांच्याबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल. यामध्ये आपल्या देशात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती, त्यांचे नैसर्गिक अधिवास, त्यांचे जीवनचक्र, त्यांना जगण्यासाठी लागणारे अन्न, त्यांच्या उडण्याच्या पद्धती, त्यांच्या विविध अवस्था या सर्वांचा आपल्याला थोडा सखोल अभ्यास करावा लागेल.
सर्वात आधी फुलपाखरे आणि पतंग यातला फरक आपल्याला थोडक्यात जाणून घ्यावा लागेल. मुळात, फुलपाखरे आणि पतंग हे एकाच कीटक वर्गातले; पण काही बाबतीत त्यांच्यात फरक असतो. फुलपाखरे ही दिनचर आहेत, तर पतंग निशाचर! अर्थात, काही दिवसा उडणारेही पतंग आपल्याला बघायला मिळतात. तसेच रात्री उडणारी ‘इव्हिनिंग ब्राऊन’सारखी फुलपाखरेही आहेत. पण ते अपवादच! फुलपाखरे फुलांवर, पानांवर बसलेली असताना पंख मिटून किंवा पंखांची उघडझाप करत बसतात, त्याला फुलपाखरांचे ‘बास्किंग’ असे म्हणतात. तर पतंग विश्रांती घेताना पंख पसरून बसतात. फुलपाखरांचे अँटेना लूपसारखे किंवा शेवटी गाठ असलेले असतात, तर पतंगांचे अँटेना केसाळ झालर असलेले असतात. अळीच्या अवस्थेत असतानाही त्यांच्यातला फरक लक्षात येतो. पतंग अळ्यांच्या अंगावर काट्यांसारखे केस असतात. फुलपाखरांच्या अळ्यांना मात्र असे केस नसतात.
फुलपाखरांविषयी आपण आणखी माहिती गोळा केल्यास आपल्याला कळते की, विल्यम ब्लिथ नावाच्या संशोधकाने त्याच्या पुस्तकात भारतातल्या १२०० जातींची नोंद केलीय, त्यातल्या ३३० जाती तर आपल्या पश्चिम घाटातच एकवटल्यात. त्यात ‘ग्रास ज्वेल’ या सर्वात छोट्या फुलपाखरापासून, ते ‘सदर्न बर्ड विंग’ या जगातल्या सर्वात मोठ्या फुलपाखराचा समावेश होतो. आपल्या भारतात अरुणाचल प्रदेशमधील ‘जयरामपूर’ येथे जगातील सर्वात जास्त म्हणजे ९६७ प्रजाती दिसतात, तर सिक्कीममध्ये ७०० फुलपाखरे आढळतात.
आता थोडेसे फुलपाखरांशी मैत्रीविषयी... फुलपाखरांचे संशोधन, निरीक्षण, प्रकाशचित्रण हा खूप आनंद देणारा प्रवास आहे. हल्ली त्यामुळेच बटरफ्लाय गार्डनची संकल्पना आपल्याकडे रुजायला लागलीय. मुख्य म्हणजे, ‘फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी ‘फूड प्लांट’ आपल्या बागेत लावली, तर फुलपाखरांचे पूर्ण जीवनचक्र जवळून अनुभवता येते. अशा फूड प्लांटमध्ये ‘कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक’ अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही, ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात. या झाडापानांमध्येच लपलेल्या अळ्या पाळायच्या, त्यांना विशिष्ट प्रकारचे खाद्य द्यायचे आणि मग कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखराला निसर्गात सोडायचे... हेही एक सृजन तंत्र आहे. एवढेच कशाला, गुलबक्षी, सदाफुली, एक्झोरा अशी गुच्छांनी फुलणारी झाडे तुम्ही लावलीत, तर क्रीम्झन रोझ, पेंटेड लेडी, लाझबेल सारखी सुंदर फुलपाखरे तुम्हाला दर्शन द्यायला येतील.
फुलपाखरांशी मैत्री करण्याच्या आणखी काही मजेशीर गमतीजमतीही आपण करू शकतो. यातलीच एक गंमत ‘बेटिंगची’! फुलपाखरांच्या मागे धावण्यापेक्षा त्यांनाच आपल्याकडे बोलवायचे असेल, तर संशोधक ही शक्कल लढवतात. फुलपाखरांना फुलांचा मधुरसच नव्हे तर सडकी-कुजकी फळे आवडतात. याचा फायदा घेऊन आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये अशी सडकीकुजकी फळे, बिअर एखाद्या बाउलमध्ये ठेवू शकतो किंवा पपई-पेरू अशी आंबट-गोड चवीची पिकलेली फळे घेऊन त्यांचा गर घेऊन त्यात आंबट ताडी किंवा बिअर मिसळून, ते मिश्रण ३ ते ४ दिवस आंबवून आपल्या घराच्या अंगणात ठेवू शकतो. त्या मिश्रणाचा वास जसा पसरायला लागतो, तशी ग्रेट एग फ्लाय, कमांडर, ब्लू ओकलीफ अशी सुंदर फुलपाखरे त्या ठिकाणी झेपावतात व त्या मिश्रणावर तुटून पडलेली दिसतात.
अशा वेळी आपण त्यांच्या जवळ जाऊन प्रकाशचित्रण केले, तरी जसे एखादे रॅम्प वॉक करणारे मॉडेल आपल्याला फोटो घेण्यासाठी साहाय्य करते, तसेच ही फुलपाखरेही आपल्याला एखाद्या सराईत मॉडेलप्रमाणे प्रकाशचित्रणासाठी छान पोझ देऊन मदत करतात.
अशा अनेक गमतीजमती व घटना फुलपाखरांच्या आयुष्यात घडत असतात. या सर्व घटनांमध्ये नैसर्गिक अवस्थेत फुलपाखरांचे कोशातून बाहेर येताना पाहणे खूप कठीण असते. कारण बऱ्याच वेळा ती पहाटेच बाहेर येतात. कोशातून बाहेर येण्याचा काळ म्हणजे, कसोटी असते. अशा वेळी पंख ओलावल्या अवस्थेत पक्ष्यांनी गाठू नये म्हणून निसर्गाने ही पहाटे बाहेर येण्याची योजना केली असावी. कोशातून फुलपाखरू बाहेर येण्याचा क्षण खूपच जादुई असतो.
फुलपाखरांच्या नावांमध्येही बरीच विविधता जाणवते. फुलपाखरांना त्यांची ही पदव्यांसारखी नावे ब्रिटिशांनी दिली. त्यांच्या रूपावरून किंवा त्यांच्या काही विशिष्ट सवयींमुळे. ब्रिटिशांनी जेव्हा आपल्याकडची फुलपाखरे बघितली, तेव्हा ते अक्षरशः वेडे झाले. एवढे कौतुक वाटण्याचे कारण म्हणजे, पूर्ण इंग्लंडमध्ये केवळ ५७ प्रजातींची फुलपाखरे आढळतात, तर जगभरात १८००० जाती आढळतात आणि आपल्याकडे भारतात त्यांच्या सुमारे १५०३ जाती आढळतात. निसर्गाचा हा चमत्कार आपल्या वाट्याला आला म्हटल्यावर कुणाला जादुई रंगात न्हाऊन निघणाऱ्या मित्रांशी मैत्री करायला आवडणार नाही?
(saurabh.nisarg09@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...