आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saurabh Mahadik Article About Tortoise Conservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शर्यत कासवांच्या संवर्धनाची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कासव म्हटले की, कूर्मपुराणापासून ते कूर्मगती गोलंदाजीपर्यत अनेक संदर्भ आपल्या नजरेसमोर येतात. कासवाच्या नावावरील रंजककथाही कमी नाहीत. जगभरातील अथांग सागरात संचार करणार्‍या व फक्त विणीसाठी किनार्‍यावर येणार्‍या कासवांच्या अद्भुत जीवनाविषयी सामान्य लोकांइतकेच संशोधकांनाही कुतूहल आहे. समुद्री कासवांच्या अभ्यासकांपुढे अनेक प्रश्न उभे राहात आले आहेत. सध्या मात्र या प्रश्नांची जागा समस्यांनी घेतली आहे. या समस्या नैसर्गिक नसून पूर्णपणे मानवनिर्मित आहेत. अंड्यांची चोरी, विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात होणारी हत्या व समुद्रातील तसेच जमिनीवरील अधिवासांवर अतिक्रमण, अशा अनेक समस्यांमुळे कासवांच्या निव्वळ अभ्यासापेक्षा या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या या धोक्यांपुढे महासागर लीलया पार करणारी कासवेही हतबल झाली आहेत.

महाराष्ट्राखेरीज ओरिसा, तामिळनाडू इत्यादी किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सागरी कासवांच्या संरक्षण-संवर्धनविषयक काम चालू आहे. महाराष्ट्रात विविध संस्थांच्या सहकार्याने सागरी कासव संरक्षण–संवर्धनाचे काम सह्याद्री निसर्गमित्र या संघटनेमार्फत निसर्गमित्र भाऊ काटदरे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सुरू आहे. सागरी कासव या महत्त्वपूर्ण निसर्ग घटकाला असणार्‍या धोक्यासंबंधी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, ठिकठिकाणच्या संस्था, व्यक्ती यांचा या कामामध्ये सक्रिय सहभाग लाभावा, यासाठी गेली काही वर्षे रत्नागिरीजवळील मंडणगड तालुक्यातील वेळास येथे ‘कासव महोत्सव’ भरविण्यात येतो. दरवर्षी भरविण्यात येणार्‍या या कासव महोत्सवाला असंख्य निसर्गप्रेमी व पर्यावरणमित्रांची गर्दी असते. तसेच कासव महोत्सवाच्या निमिताने सागरी कासवांविषयी, त्यांच्या जीवनक्रमाविषयी, त्यांच्या प्रजोत्पादनाविषयी, त्यांच्या संवर्धनाविषयी आणि विविध प्रजातींविषयी माहिती जाणून घेता येते.

कासवे ही सरीसृप वर्गात मोडतात. त्यामध्ये कासवांचा गण ‘चिलोनिया’ असून त्यांची उत्पत्ती साधारण २० कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याचा अंदाज आहे. कासवांचे वर्गीकरण करताना प्रामुख्याने त्यांची डोके कवचात घेण्याची पद्धत विचारात घेतली जाते. भारतात जमिनीवरील गोड्या पाण्यातील व सागरी कासवांची एकंदर ५ कुळे व ३१ जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो व भारतामध्ये त्याची लेदरबॅक ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनार्‍यावर आढळणार्‍या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकबिल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो. सन २००२मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण किनार्‍यावर सागरी कासवे तुरळक संख्येत विणीसाठी येत असल्याची नोंद करण्यात आली. या पाहणीत प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले ही प्रजाती विणीसाठी येत असल्याचे आढळून आले.

सागरी कासवे जास्त करून उष्ण व समशितोष्ण कटिबंधातील समुद्र पसंत करतात. ती उत्तम पोहणारी असतात. अभ्यासासाठी खुणचिठ्ठी बांधलेल्या सागरी कासवांनी एका दिवसात ८२.६ कि.मी. अंतर कापल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या खाद्याच्या जागा व विणीसाठीची जागा यामध्ये हजारो किमीचे अंतर असते. सागरी कासवांना डोके व पाय आपल्या कवचामध्ये आता ओढून घेता येत नाहीत. त्यांचे पुढील पाय वल्ह्यासारखे असतात व त्यांच्यावर एक-दोन नख्या असतात. कासवांमधील नर हा मादीपेक्षा लहान असतो. कासवांना उत्तम दृष्टी असते, परंतु प्रतिमा मात्र कृष्णधवल प्रकारची असते. कासवांना उत्तम घ्राणेंद्रिय लाभलेले असते. त्यांची ध्वनिलहरी ग्रहण करण्याची क्रिया पाण्यात व जमिनीवर चांगल्या प्रकारे होऊ शकते. कासवांचे स्वादेंद्रिय मात्र प्रगत नसते. एकदा पिल्ले अंड्यामधून बाहेर पडून गेली की, त्यातील मादी कासवे फक्त अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात, व लगेच परत जातात. नर कासवे सहसा किनार्‍यावर येत नाहीत. नर व मादी कासवांचे मिलनही समुद्रातच होते. या कासवांची मादी अंडी घालण्यासाठी सर्वसाधारणपणे रात्रीच किनार्‍यावर येतात. अंड्यातून पिले बाहेर येण्यासाठी सुमारे ५० ते ५५ दिवसांचा कालावधी लागतो. या बाहेर आलेल्या अंदाजे १०० पिल्लांमधील एखादेच पिल्लू जगते.

कासवांचे महत्त्व पर्यावरण दृष्टीने असामान्य असले तरी त्यांना असलेल्या धोक्यांचा विचार करता, त्यांचे जीवन धोक्यात आल्याचे दिसून येते. सागरी कासवांचा समावेश आपल्या देशातल्या वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२च्या अन्वये अनुसूची-१ मध्ये करून कासवांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही महाराष्ट्रातील किनार्‍यावर आढळणार्‍या कासवांची अंडी पळविणे, मांसाचा वापर अन्नपदार्थ म्हणून करणे सुरू आहे. तसेच कुत्रे, कोल्हे, तरस, डुक्कर हे प्राणीसुद्धा कासवाची अंडी खातात. तेल काढण्यासाठी व कासवाच्या कवचापासून शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठीही कासवांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यात अडकणे किंवा वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायनांमुळे अशा अनेक कारणांमुळे समुद्री कासवांचे जीवन धोक्यात आले आहे.

आज महाराष्ट्रात भाऊ काटदरेसारख्या निसर्गमित्राच्या खंबीर नेतृत्वाखाली सह्याद्री निसर्ग मित्रसारखी संस्था महाराष्ट्रात वेळास, केळशी, आंजर्ला, कोळथरे, दाभोळ या ठिकाणी सागरी कासवांचे संवर्धन व्हावे, त्यांचे प्रजोत्पादन वाढून निसर्गाचेही संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे.

‘सागरी कासव संवर्धन’ या उपक्रमाला आपणही प्रतिसाद दिल्यास आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि.मी. किनारपट्टीचे रक्षण करता येऊ शकते. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात पर्यावरण व वसुंधरा रक्षणाची शर्यत आपण नक्कीच जिंकू, यात काहीच शंका नाही.

saurabh.nisarg09@gmail.com