आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्‍पेशल: ‘मछली’ वन की रानी थी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती मोठ्या ऐटीत पोज देत असे... तिचा तो रुबाब टिपण्यासाठी देशी-विदेशी छायाचित्रकार-लघुपटकारांमध्ये चढाओढ लागत असे. कारण, ती रणथंभोरची अनभिषिक्त सम्राज्ञी होती. एक जिवंत दंतकथा होती. तिच्या केवळ दर्शनाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही एकेकाळी अपार सुखावले होते... २० वर्षांचं आयुष्य जगून गेल्या आठवड्यात ती गेली... हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तिला अग्नी दिला गेला... ती अनंतात विलीन झाली. नित्याचीच राजकीय साठमारी आणि नित्याचीच जनतेची दिशाभूल करणारी बाष्कळ वक्तव्यं या पलीकडे जाऊन वन्यजीव संशोधक-अभ्यासकांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेच्या निमित्ताने ‘मछली’ च्या आठवणी जागवणारा; मुख्य म्हणजे, माणूस आणि निसर्गाचं हरवत चाललेलं नातं जोडू पाहणारा हा हृद्य लेख..
१९९६ मध्ये मी बांधवगढ राष्ट्रीय उद्यानात आयुष्यातला पहिला वाघ पाहिला. त्याचं नाव, ‘चार्जर’. त्या आधी पिंजऱ्यातले किंवा सर्कशीतले अनेक वाघ पहिले होते. परंतु, पिंजऱ्यातले वाघ बघण्यात काय हशील? त्यामुळे गेल्या २०-२१ वर्षांच्या कारकिर्दीत मी भारतातल्या अनेक राष्ट्रीय उद्यानांमध्ये निव्वळ भटकंतीसाठी, अभ्यासासाठी भटकलो. त्यात अनेक व्याघ्र प्रकल्पही फिरलो. या माझ्या भटकंतीत ‘चार्जर, सीता, ब्रोकन टेल, कनकटी, बामेरा, मुन्ना, लंगडी, कल्लू मल्लू, बांबूराम, जय, उन्नीस, सतरा, स्टार मेल, B-2, मछली’ असे अनेक वाघ वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये अनुभवले, पाहिले, त्यांचे छायाचित्रण केले. परंतु एवढ्या वर्षांमध्ये मला सर्वात भावलेले आणि माझ्या हृदयात ज्यांनी स्थान मिळवले, असे दोनच वाघ... एक म्हणजे, बांधवगढचा राजा ‘B-2’ आणि दुसरी, रणथंभोरची राणी ‘मछली’...

हे दोघे आवडण्यालाही कारण म्हणजे, हे दोघेही प्राणी म्हणूनही उमदे होते आणि त्यांचा जंगलातला वावर अतिशय दिमाखदार होता. हे दोघेही पर्यटकप्रेमी होते. या दोघांवर डिस्कव्हरी, नॅट-जिओ अॅनिमल प्लॅनेट आदींनी अनेक फिल्म्स बनवल्या. तसेच या दोघांवर अनेक संशोधनपर प्रबंधही लिहिले गेले. २०००च्या सुमारास जेव्हा माझे विद्यापीठीय शिक्षण संपवून वन्यजीव अभ्यासक म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला अनेक जगप्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक शिकवायला येत. त्यात फतेहसिंग राठोड, वाल्मिक थापर, मार्क बर्कहेड, सर कोलिन, राजेंद्र सांखला, नल्ला मुथू असे अनेक नावाजलेले वन्यजीव संशोधक व लघुपटकार होते.

यातले फतेहजी हे त्या वेळी ‘रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात’ फिल्डडिरेक्टर म्हणून कार्यरत होते. ते मुंबईत आले की मला नेहमी म्हणत, ‘तू कभी रणथंभोर आ जाना, तुम्हारी पहचान अपने मछली से करवानी हैं...’ मी प्रत्येक वेळी त्यांना ‘हो’ म्हणायचो; परंतु योग काही जुळून येत नव्हता. तो योग २००१मध्ये आला. मी आणि माझे काही अभ्यासक मित्र रणथंभोरला फतेहजींकडे जाऊन धडकलो. अर्थातच, त्यांनी आमची व्याघ्र प्रकल्पात फिरण्याची व्यवस्था केली.

रोज सकाळ-संध्याकाळ आम्ही व्याघ्र प्रकल्पात फिरायचो. फिरून आलो की, संध्याकाळी फतेहजी आम्हाला जंगलाविषयी, प्राण्यांविषयी आणि त्यांच्या आवडत्या ‘मछली’विषयी अनेक गोष्टी सांगत. काकाजींचे म्हणजेच फतेहजींचे जंगलाविषयीचे, वाघांविषयीचे ज्ञान खरेच अगाध होते, ते फक्त ‘पग मार्क्स’वरून वाघांना ओळखत. त्यांच्याच काळात पहिल्यांदा वाघांना नाव देण्याची, क्रमांक देण्याची प्रथा सुरू झाली. त्यांचे रोज एकच म्हणणे असायचे, ‘अपनी मछली एक दिन रणथंभोर की शान बनेगी. ये टायग्रेस कुछ अलग हैं...’ आणि त्याच प्रभावातून दर वर्षी रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊ लागलो. एक-दोन महिने तिथे अभ्यासासाठी, छायाचित्रणासाठी राहायला लागलो, तेव्हा ‘मछलीने’ माझ्यावरही जादू केली. मीही तिच्या प्रेमात पडलो.

१९९७च्या पावसाळ्यादरम्यान या मछली नावाच्या वाघिणीचा जन्म झाला होता. ती २०००च्या दरम्यान आपल्या आईला म्हणजेच मूळ मछलीला हरवून रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाची राणी बनली होती. त्या वेळी रणथंभोरचे आणि मछलीचेही नाव जगभर दुमदुमू लागले होते. २००० ते २००५मध्ये मछलीवर चार फिल्म्स मार्क बर्कहेड व सर कोलिन, वाल्मिक थापर, नल्ला मुथू व बी बी सी यांनी बनवल्या होत्या. त्यामुळे असेल, किंवा ‘मछली’विषयीच्या वेगवेगळ्या दंतकथा पसरल्या असतील; मछलीचे नाव होऊ लागले होते. मछली हळूहळू जगप्रसिद्ध होऊ लागली होती. त्याच दरम्यान कधी चर्चा असायची, ती मछलीने तिच्या बछड्यांना वाचवण्यासाठी केलेल्या १४ फुटी मगरीबरोबरच्या संघर्षाची; तर कधी तिच्या आणि ‘निक मेल’ बरोबर झालेल्या झटापटीची. तर कधी तिने कसे आपल्या आईला दूर लोटून जंगल आणि जंगलातील पदम, राजबाघ, मलिक तलावांचा परिसर आपलासा केला, याची. अशा बऱ्याच दंतकथा घेऊन जगणारी ही मछली नंतर नंतर रणथंभोरची सर्वार्थाने राणी आणि जीवनदायिनी बनली. तिला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येऊ लागले. दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक मछलीला पाहण्यासाठी येत की, राजस्थान पर्यटन भवनाला मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास ७० ते ८० कोटी रुपये हे केवळ मछलीला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून मिळत. डिस्कव्हरीवरच्या ‘व्हेअर टायगर रूल्स’ या कार्यक्रमात प्रत्येक मार्च महिन्यात मछलीवरच्या सर्व फिल्म्स दाखवल्या जात. माझे अनेक विदेशी मित्र मला विनवण्या करत, ‘वुई वॉन्ट टु सी मछली’, तेव्हा ऊर भरून येत असे.

अशा रीतीने गेल्या १५ वर्षांत मी मात्र तिला अनेकदा पहिले, तिच्याबरोबर रणथंभोरच्या जंगलात अनेक सकाळ आणि संध्याकाळ घालवल्या. तिला शिकार करताना पाहिलं. तिला जशी दुसऱ्या वाघांची कधीही भीती वाटली नाही, तशीच तिला पर्यटकांचीही कधी भीती वाटली नाही. उलट ती त्यांना छान पोझ देत असे. मछली ही एकमेव वाघीण होती, जिचे आजवर अनेक फोटो काढले गेले आहेत. तिच्यावर सर्वाधिक फिल्म्स बनवल्या गेल्या आहेत. ती एकमेवाद्वितीय यासाठीही होती की, मगरीबरोबर झालेल्या शिकारीत तिचे १२ दात तुटले होते, त्यानंतरही तिने बछड्यांना जन्म दिला होता. वाघिणींच्या बाबतीत सहसा हे घडत नाही. परंतु हे मछलीच्याच बाबतीत घडले होते. शिवाय मछली साडे एकोणीस वर्षे जगली, हेही आजवरच्या वाघांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले होते. मछलीची क्रेझच एवढी होती की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन २०००मध्ये भारतात आले तेव्हा त्यांनीही मछलीला पाहण्याची इच्छा प्रकट केली. मछलीने त्यांना दर्शन दिले, तेव्हा तेही खूश झाले होते...
मछलीने उभ्या आयुष्यात नऊ बछड्यांना जन्म दिला. तिच्या या पुढच्या पिढ्याच आज रणथंभोर आणि सरिस्काच्या व्याघ्र प्रकल्पात वाढताहेत. खरे तर गेली काही वर्षे मछली वय झाल्यामुळे अज्ञातवासात असल्यासारखीच वावरत होती. रणथंभोरच्या जंगलालाच लागून असलेल्या ‘टायगर मून’ या रिसॉर्टच्या मागच्या बाजूच्या जंगलात ती ठाण मांडून होती. अनेकदा ती आपले आधीचे साम्राज्य असलेल्या तलावांच्या व जोगी महालाच्या परिसरात चालून यायची, तेव्हा पर्यटकांना कधीकधी तिचे दर्शन व्हायचे.
गेल्या जानेवारी महिन्यामध्येच मी व माझे मित्र सुदर्शन शर्मा, आदित्य सिंह, धर्मेंद्र खंडाल आम्ही तिला जोगी महालात पाहिले होते. ती आमची आमच्या लाडक्या मछलीबरोबरची शेवटची गाठभेट होती. त्या वेळीही तिला अतिशय शांत, रुबाबदार, डौलदार, आपला आब राखून राजबाघ तळ्याच्या काठावर वावरताना आम्ही पहिले होते. जणू केसरबाईंसारखी दिग्गज गायिका आपल्या भात्यातले सूर वय झाल्यावरही राखून असते आणि जेव्हा एखादी खास मैफल असते तेव्हाच ते बाहेर काढून सर्वांना चकित करते, तसेच त्या वेळीही आम्हाला वाटले होते. परंतु मछलीच्या चेहऱ्यावर तिचे वय स्पष्टपणे दिसत होते. ती कदाचित काही दिवसांचीच सोबती असणार आहे, या जाणिवेने आम्ही हळहळलो होतो...

तीच आम्हा सर्वांची लाडकी मछली; ‘लेडी ऑफ दी लेक’, ‘दि क्रोकोडाईल हंटर’, ‘क्वीन ऑफ रणथंभोर’, ‘दी क्वीन मदर’ रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी जवळपास आपल्या आयुष्याची २० वर्षे जगून हे जग सोडून गेली, जंगलजमा झाली. तिच्या आवडत्या रणथंभोरच्या जंगलातच तिने अखेरचा श्वास घेतला...

तिची लोकप्रियता आणि महत्त्व एवढे होते की, तिचे अंत्यसंस्कार माझा जवळचा मित्र व रणथंभोरचा मुख्य वनाधिकारी सुदर्शन शर्मा याने केले. ते झाल्यावर त्याने मला फोन केला, तेव्हाही त्याच्या बोलण्यातून हेच कळले की, ‘मछली’ गेल्यावरही तिला राणीसारखाच सन्मान देण्यात आला. तिचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे अंत्यसंस्कार ती ज्या क्षेत्रात जन्म झाला, जिथे मोठी झाली, त्या अमी घाटी परिसरात झाले. तिला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गायत्री मंत्रांच्या उद‌्घोषात मंत्राग्नी देण्यात आला. हे सारे ऐकून डोळे डबडबून आले. मछलीच्या अनेक भावमुद्रा, त्यात तिचे बच्चे, तिचे त्यांच्याबरोबर खेळणे, तिने केलेल्या शिकारी, तिच्यावरच्या फिल्म्स सारे काही डोळ्यासमोर आले. डोळ्यापुढे तिच्या आठवणींचा एक दाट पडदा दाटून आला... मछली या जगातून गेली आहे. पण तिच्या आठवणी काही डोळ्यासमोरून हटत नाहीत. वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात आलो, तेव्हा माझ्या सर्व गुरुंनी मला एकच मंत्र शिकवला ‘जीवो जीवस्य जीवनम्’... त्यामुळे मी शिकार अनुभवतानाही कधी विचलित झालो नाही. होत नाही. पण गेल्या १८ वर्षांत दोन वेळा अक्षरशः ढसढसून रडलो, ते बांधवगडचा राजा ‘B-2’ गेला तेव्हा; आणि आता ‘मछली’ गेली तेव्हा. कारण हे दोघेही माझे जिवश्च मित्र होते... त्यांना पाहातच मी माझ्या या क्षेत्रात मोठा झालो होतो. त्यांच्याबरोबर मी अनेक अविस्मरणीय क्षण घालवले होते. त्यातल्या ‘मछली’ला निसर्गदेवतेने प्रेमभराने आपल्यात सामावून घ्यावे, हीच मनोमन इच्छा!
बिल क्लिंटन यांनाही दिले दर्शन
मछलीची क्रेझच एवढी होती की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन २०००मध्ये भारतात आले तेव्हा त्यांनीही मछलीला पाहण्याची इच्छा प्रकट केली. मछलीने त्यांना दर्शन दिले, तेव्हा तेही खूश झाले होते...
saurabh.nisarg09@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------
‘टायगर सफारी’ची जिंदादिल सदिच्छादूत...
मी गेली ४० वर्षे वाघ आणि व्याघ्र प्रकल्पांवर संशोधन करत आहे. २००० ते २००४ या दरम्यान भारतीय वाघ अनेक कारणांनी नाहीसे, नष्ट होण्याचा काळही मी अनुभवला. पण त्याच खडतर काळात ‘मछली’ एक आशेचा किरण होऊन आली. ती नुसती आशेचा किरण होऊन आली नाही, तर भारतीय व्याघ्र संवर्धनाचा आणि व्याघ्र पर्यटनाचा मानबिंदू आणि राजदूत बनली... खरे सांगायचे तर मछलीसारखी वाघीण मी आजवर बघितली नाही. तिने आपले साम्राज्य निर्माण करताना अनेक सामर्थ्यशाली वाघांशी लढा दिला, त्यांना हरवले. आपल्या पिल्लांचे रक्षण करताना १४ फुटी मगरीला मारून तिचा तिने नायनाट केला. त्याच काळात वाघांची तस्करी जोरात असतानाही ती तिच्या कौशल्याच्या जोरावर टिकून राहिली. तिचे वैशिष्ट्य म्हणजे, ती अतिशय प्रेमळ आई होती. प्रतिस्पर्ध्यांशी लढण्याव्यतिरिक्तच्या काळात ती कधीही आक्रमक झाली नाही. १९ वर्षांच्या आयुष्यात मछलीने ९ बछड्यांना जन्म दिला. एक प्रकारे रणथंभोर आणि सारिस्का व्याघ्र प्रकल्पांची शान तिने राखली. जागतिक स्तरावरही भारतीय व्याघ्र पर्यटनाची ती राजदूत बनली. ‘बीबीसी’ने तर तिच्यावर सर्वाधिक फिल्म्स बनवल्या होत्या. ती मानव व वाघ यांच्यातील नातेसंबंधांचेही प्रतीक होती. वाघांच्या जीवनातल्या अनेक रहस्यांचा अभ्यास तिच्यावर फिल्म्स बनवताना मला करता आला. आज तिच्याविषयी हे बोलताना माझे डोळे भरून आले आहेत. आजवरच्या कारकिर्दीत माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडले आहे. रणथंभोरच्या या राणीला,
जिंदादिल मछलीला
माझा सलाम...
वाल्मिक थापर
जगप्रसिद्ध व्याघ्र : वन्यजीव अभ्यासक व फिल्ममेकर
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...