आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकिरणांचा सोनेरी क्षण (सौरभ महाडिक)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिका खंड आणि तिथल्या वेगवेगळ्या देशांमधली राष्ट्रीय उद्याने तिथल्या ‘बिग फाइव्ह्स’मुळे नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिली आहेत... मीही वन्यजीव व्यवस्थापन आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात आलो, तेव्हापासून आणि विविध चॅनेल्सच्या माध्यमातून व विविध प्राण्यांवरच्या फिल्म्स पाहिल्यापासून आयुष्यात एकदा तरी आफ्रिका खंडातल्या विविध राष्ट्रीय उद्यानांना भेट देऊन तिथले वन्यजीवन अनुभवायचे, हे ठरवूनच टाकले होते. तो योग शेवटी २००९च्या मे महिन्यात आला. पहिल्यांदाच मी आफ्रिका खंडाला भेट देत होतो. त्यामुळे प्रचंड उत्सुक होतो ते तिथले वन्यजीवन अनुभवण्यासाठी, तिथल्या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांना भेटी देऊन तिथल्या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी, शिवाय छायाचित्रणाच्या माध्यमातून तिथले वन्यजीवन कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी...

याच भेटीत मी केनियामधल्या ‘मसाईमारा, साम्बरू, अल पजेता, लेक नकुरू’ या राष्ट्रीय उद्यानांना भेटी देऊन तिथल्या वन्यजीवनाचा अभ्यासही केला. शिवाय मसाईमारा व सेरेंगटी या दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये घडणाऱ्या विल्डबीस्ट या प्राण्याच्या स्थलांतराचाही अभ्यास केला.
एका शांत
संध्याकाळी मसाईमारा राष्ट्रीय उद्यानामध्ये फिरत असताना सूर्यास्ताच्या वेळी अचानक आभाळ दाटून आले. त्यातून सोनेरी किरणे खाली येत होती. त्याच पार्श्वभूमीवर एक जिराफ बरोबर त्या किरणांच्या खाली उभा होता... जणू काही आकाशातून सूर्यदेवता त्या जिराफावर सुवर्ण किरणांची बरसात करत होती...

तो क्षणच एवढा अविस्मरणीय, अप्रतिम व मन मोहून टाकणारा होता, की तो मला माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्याशिवाय राहवले नाही. तो मी वेगवेगळ्या फ्रेम्सच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केला. पुढे वेगवेगळ्या मासिकांमध्ये केनियामधल्या जगप्रसिद्ध किकोरोक आणि मारा सेरेना या हॉटेल्सच्या रिसेप्शन एरियामध्येही या माझ्या फोटोला स्थान दिले गेले... हे छायाचित्र गाजले, ते त्यातल्या वेगळ्या विषयामुळे, त्यातल्या वेगळेपणामुळे...
बातम्या आणखी आहेत...