आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकतेच नाशकात ऊर्जा युवा प्रतिष्ठान व सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने तीन दिवस रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य संमेलन घेण्यात आले. सावरकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या साहित्याचा ऊहापोह या संमेलनात विविध शहरांमधील साहित्यिक-समीक्षकांनी केला, त्याचा हा धांडोळा.
साहित्य संमेलनांचा सुकाळ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. साहित्य संमेलन आणि वाद, संमेलनांना येणारे राजकीय स्वरूप आता अपरिहार्य झाले आहे, अशा समजुतीत अलीकडे या संमेलनांना उपस्थित असणारे प्रेक्षक, साहित्यप्रेमी यायला लागले आहेत. राजकारण, वाद यांना बाजूला ठेवून साहित्य संमेलने अलीकडे होत नसली तरी पुस्तके, साहित्यिकांची मनोगते, त्यांचे साहित्यविचार यांना ऐकायला प्रेक्षक गर्दी करतात. सावरकर साहित्य संमेलनातही भगव्या राजकारणाचा प्रभाव तीनही दिवस जाणवत असला तरी सावरकरांच्या साहित्यावर प्रेम करणा-या प्रेक्षकांनी ही बाब बाजूला ठेवून त्यांच्या साहित्याचे जाणकारांकडून विश्लेषण ऐकणेच प्राधान्याने पसंत केले,हे या संमेलनाचे यश म्हणावे लागेल.
आयोजन उत्तम मात्र वक्त्यांनी भान ठेवले नाही- भविष्यातील राजकारणासाठी मशागत म्हणून ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी हे संमेलन आयोजित केले होते, असे तर्कवितर्क राजकीय व साहित्यिक वर्तुळात लढवले जात असले तरी संमेलनांचे अजीर्ण लोकांना होत असताना संमेलने खरोखरीच घ्यायचीत का, असा प्रश्न निर्माण होत असताना नाशिकमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात, त्याचा संपूर्ण खर्च उचलण्यात त्यांनी प्राधान्याने पुढाकार घेतला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भगूर जन्मभूमी असलेल्या सावरकरांचे येथे स्मारक व्हावे म्हणून झटणा-या सावरकरांच्या साहित्याचे व इतिहासाचे अभ्यासक नंदन रहाणे यांचे या संमेलनामागचे परिश्रम व संकल्पनेच्या पूर्तीसाठी घेतलेली मेहनत वाखाणण्यासारखी होती. मात्र, आयोजकांनी कितीही काटेकोर नियोजन केले तरी वक्त्यांनी विषयांचे भान ठेवले नाही, ही बाब या संमेलनाच्या बाबतीत खटकणारी ठरली. तरीही धाडसाने ज्येष्ठ साहित्यिकांना चिठ्ठीद्वारे वेळेची व विषयाची जाणीव आयोजकांनी दरवेळी करून दिली,पण फार कमी वक्त्यांनी ती वेळ पाळण्याचे सोडल्यास विषयाची जाणीव ठेवणे लक्षात घेतले नाही.
आयोजकांचे प्रेक्षकांच्या गर्दीचे यश मात्र इथे नाकारता येणार नाही. संमेलनास पारंपरिक श्रोत्यांपेक्षा तरुणांची व महिलावर्गाची उपस्थिती अधिक होती. तरुणांमध्ये सावरकरांची विचारसरणी रुजावी हा बोरस्ते यांचा हेतू प्राथमिक स्तरावर त्यामुळे बहुतांशी साध्य झाला. संमेलनाची गर्दी दखल घेण्याजोगी होती.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन,
हिंदुत्वाचा जागर, पक्षाचा प्रभाव- संमेलनाचे उद्घाटन झाले तेच मुळात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, अभिनेता शरद पोंक्षे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यामुळे सावरकरांच्या साहित्यावर उद्घाटनाच्या दिवशी कितपत ऐकायला मिळेल,अशी शंका लोकांना होती. संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व साहित्यिक यशवंत पाठक यांनी सावरकरांच्या साहित्याला आकाशीचा दीपोत्सव अशी उपमा देत त्यांच्या साहित्याचा मागोवा घेतला खरा (शिवाय पाठक यांचे भाषण इतके शब्दबंबाळ, अलंकारिक व रटाळ झाले की, उद्धव ठाकरेंना उठून बाहेर जाऊन पुन्हा येऊन बसण्याची वेळ आली.), पण त्यांच्याव्यतिरिक्त साहित्य केवळ नावाला चाखत त्यांच्या हिंदुत्ववादाचाच जागर संमेलनाच्या उद्घाटनातून होत राहिला. अर्थात सावरकरांचा विषय निघाला की हिंदुत्ववाद ओघाने आलाच, पण या द्रष्ट्या नेत्याच्या विचारसरणीच्या रांगेत अनेक सद्य:स्थितीतील मान्यवरांना यादिवशी आयोजकांनी व पाहुण्यांनी नेऊन बसवले आणि संमेलन हे सावरकरांचे आहे की एखाद्या पक्षाचे आहे, असा संभ्रम लोकांना पडला. शरद पोंक्षेंनी जणू काही आपण शिवसेनेच्या संरक्षणाखाली आहोत, असा अविर्भाव आणत आज मी बिनधास्त बोलणार म्हणून विद्यमान सरकारवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नारा देत टीका करण्यास एकही संधी सोडली नाही. सावरकरांच्या साहित्याला वाहिलेल्या या व्यासपीठाचा वापर करीत त्यांनी ठाकरेंना भावी मुख्यमंत्रिपद बहाल करून टाकले आणि आपले कलाकार म्हणून शब्द व नाट्यप्रवीण असणे सिद्ध केले. त्यात प्रायोजकत्वाबाबत सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे शंकरराव गोखले यांनीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली, पण भगव्या निनादामध्ये त्यांचा आवाज कुठल्या कुठे विरून गेला. केवळ शब्दसंपत्ती सांडत एकांगी भूमिका घेत काही भाषणे झालीत, पण यात कुठेही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा पूर्णांशाने वेध घेतला गेला नाही.
सगळे परिसंवाद व मुलाखती अत्यंत काटेकोरपणे वेळेत दुस-या दिवशी व तिस-या दिवशी सुदैवाने एक गोष्ट कटाक्षाने पाळली गेली ती म्हणजे सगळे परिसंवाद व मुलाखती अत्यंत काटेकोरपणे वेळेत सुरू होत होत्या व वेळेत संपत होत्या. हातात माईक आला की बोलण्याचा मोह न सोडणा-यांना आयोजकांनी आवर घातला, पण हाच आवर जर त्यांच्या भाषणांतील विषयांवर घातला असता तर कदाचित संमेलनाचा फोकस चुकला नसता (वक्त्यांनीच हे भान ठेवणे आवश्यक होते.) बहुतांश वक्ते हे केवळ आक्रमक भाषेमध्ये बोलत होते ज्यात साहित्याचा केवळ नामोल्लेख होता वा साहित्यातले पुस्तकी संदर्भ होते.
भावनिक आवाहन करण्यापेक्षा पारदर्शीपणे सावरकरांच्या साहित्याचे साहित्यिक मूल्यांच्या दृष्टीने मूल्यमापन व चर्चा होणे आवश्यक होते. मात्र, तसे अभावानेच घडले. इतिहास, हिंदुत्ववाद यावरच मोठ्या प्रमाणात ऊहापोह झाला. दुसरे म्हणजे बोलणारा प्रत्येक वक्ता हा दिलेल्या विषयावर केवळ प्रस्तावनेपुरता बोलत होता नंतर त्याचा सगळा कल हा भलतीकडेच जात होता. उदाहरणार्थ नागपूरच्या शुभा साठे यांनी साहित्यिक सावरकर या विषयावर बोलणे अपेक्षित असताना सुरुवातीचे काही परिच्छेद सोडल्यास संपूर्ण भाषणाचा कल हा कधी हिंदुत्ववाद तर कधी सावरकरांचे जीवनातील प्रसंग यांचेच वर्णन करण्याकडे होता. ब-याच व्यक्तींनी भाषणातदेखील भगव्यावर शिक्कामोर्तब करून राजकीय रस दाखवला जे संमेलनाच्या हेतूस बाधा आणल्यासारखे झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य, गद्यलेखनाची कालसापेक्ष चर्चा झालीच नाही. कमला, मोपल्यांचे बंड, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, माझी जन्मठेप आदी सावरकरांच्या काव्य व गद्य लेखनाची कालसापेक्ष चर्चा होणे गरजेचे होते.मात्र, तसे फार कमी प्रमाणात घडले. सावरकरांच्या संरक्षणसिद्धतेवर बोलत असताना सावरकर बाजूलाच राहिले व भारताची या क्षेत्रातील सद्य:स्थिती यावरच प्रकाश टाकला गेला. समोर तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसले होते जे अक्षरश: नोट्स उतरवून घेत होते व मिळेल ती माहिती पदरात पाडून घेत होते ! अमुक एका साहित्यिकाला एका विशिष्ट चौकटीत बसविण्याची परंपरा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनादेखील याबाबतीत या संमेलनाने सोडले नाही. त्यांच्या साहित्याला त्यांनी कुणा एका विशिष्ट समाजाचे करून टाकले.
विशेष म्हणजे त्यांनी सांगितलेला धर्माचा, राष्ट्रनिष्ठेचा त्यांच्या साहित्यातील अर्थदेखील काही वक्त्यांंनी एकमेकांच्या विरुद्ध सांगत विरोधाभास निर्माण केला. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे विधान दोन प्रथितयश वक्त्यांनी केले.मात्र, या विधानाचे दोघांनी दोन स्वतंत्र अर्थ सांगितले. असा संभ्रम निर्माण करणे म्हणजे सावरकरांच्या प्रतिमेबाबत द्विधा मन:स्थिती जाणकारांमध्येच आहे मग प्रेक्षकांकडून, तरुणांकडून कसली अपेक्षा करायची असा प्रश्न निर्माण होतो.
सावरकरांच्या प्रतिमा मांडल्या, शेषराव मोरेंची उपस्थिती, पुस्तकविक्री बाकी विषयांमध्ये वैविध्य होते, येणारे वक्ते विविध भागांतले होते, नियोजन चांगले होते, सावरकरांच्या विविधांगी प्रतिमा या संमेलनात मांडल्या गेल्या. शेषराव मोरेंसारखे मान्यवर लेखक या संमेलनास लाभले. पुस्तकविक्री चांगली झाली. या सगळ्या चांगल्या बाबींबरोबर जर संयतपणे सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा व त्यांचे साहित्य सजगतेने मांडले गेले असते तर खरोखरीच राजकारणाचा स्पर्श होऊनही संमेलन सावरकरांच्या साहित्याचा उत्सव ठरला असता.
...तर साहित्याचा उत्सव- विषयांमध्ये वैविध्य होते, येणारे वक्ते विविध भागांतले होते, नियोजन चांगले होते, सावरकरांच्या विविधांगी प्रतिमा या संमेलनात मांडल्या गेल्या. शेषराव मोरेंसारखे मान्यवर लेखक या संमेलनास लाभले. पुस्तकविक्री चांगली झाली. या सगळ्या चांगल्या बाबींबरोबर जर संयतपणे सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा व त्यांचे साहित्य सजगतेने मांडले गेले असते तर खरोखरीच राजकारणाचा स्पर्श होऊनही संमेलन सावरकरांच्या साहित्याचा उत्सव ठरला असता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.