आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभचा देशीवाद आणि बरंच काही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही प्रतिस्पर्धी देशाविरुद्ध भारतच जिंकला पाहिजे, ही इथल्या प्रत्येक भारतीयाची इच्छा असतेच. मात्र या इच्छेत कट्टर ‘राष्ट्रवाद’ शिरला की त्या खेळाचे रूपांतर युद्धामध्ये होत जातं. अमिताभलादेखील नेमका याच कट्टर ‘राष्ट्रवादा’चा ज्वर चढला आहे. सध्या देशभरात राष्ट्रवादाचे जे विघातक वारे वाहत आहेत किंवा ठरावीक कंपूने राष्ट्रवादाची जी व्याख्या तयार केली आहे, त्या व्याख्येशी मिळतीजुळती अशी ही अमिताभची प्रतिक्रिया आहे.
सही बात को सही वक्त पर किया जाए, तो उसका मजा ही कुछ और है, और मैं सही वक्त का इंतजार करता हूं...आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेला कदाचित ‘त्रिशूल’मधला अमिताभ बच्चनचा हा फेमस डायलॉग ठाऊक नसावा, अन्यथा तो, या महानायकाच्या नादीच लागला नसता. पूर्वी अमिताभच्या अशा पडद्यावरच्या डायलॉगवर त्याचे लाखो चाहते टाळ्या-शिट्या मारून त्याला डोक्यावर घ्यायचे. काळ बदलला.आता अमिताभ सोशल मीडियाच्या छोट्या स्क्रीनवर अशा प्रकारची डायलॉगबाजी करतो आणि त्याचे लाखो चाहते, त्याचे हे डायलॉग रिट्विट करून त्याला ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर आणून बसवतात...
हर्षा भोगले हा तसा साधासरळ माणूस. इंजिनिअर असूनही त्या वाटेला न जाता सुनील गावसकर, रवी शास्त्री, कपिल देव या दिग्गज क्रिकेटपटूंच्या खांद्याला खांदा भिडवत हर्षाने त्यांच्याप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक सरस असे क्रिकेट समालोचनाचे तंत्र शिकून घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी समालोचक म्हणून ख्याती मिळवली. गेल्या दोन दशकांपासून हर्षाचं हे असं सुरळीत चालू होतं. कुणाशी वाद नाही की कुणाशी भांडण नाही... अजातशत्रू...
पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक? आयपीएलचा नववा मोसम सुरू होण्यास काही दिवस उरले होते, इतर क्रिकेट समालोचकांप्रमाणे हर्षानेही आयपीएलसाठी तयारी सुरू केली, प्रायोजकांनी त्याचे विमानाचे तिकीट काढून ठेवले आणि आयपीएलला अवघे दोन दिवस शिल्लक असताना हर्षाला भारतीय क्रिकेट बोर्डाकडून निरोप आला की, ‘अरे बाबा हर्षा, तुझी सेवा आता पुरे झाली. तू आता घरीच थांब.’ हे म्हणजे ‘जंजीर’ चित्रपटामध्ये कर्तव्यदक्ष विजयला त्याचे मोठे साहेब, विजय, अब तुम्हे सस्पेंड किया जाता है, असं सांगतात तसंच काहीसं हर्षाच्या बाबतीत घडलं... का, कशासाठी हे असले प्रश्न हर्षा विचारू पाहत होता. परंतु क्रिकेट बोर्डाने त्यावर मौनच बाळगलं होतं. तेव्हा कुठे हर्षाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असावी की, अरे, च्यायला, आपण त्या ‘बिग बी’च्या नादी लागून चूक तर केली नाही ना? त्याचं झालं असं की, दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या ट्वेंटी-२०च्या विश्वचषकात कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियममध्ये आपल्या धीरगंभीर आवाजात अमिताभने अगोदर राष्ट्रगीत गायलं. आता हे राष्ट्रगीत अमिताभने चुकीच्या पद्धतीने, चुकीचे शब्द वापरून आणि वेळही चुकवून गायलं, असा त्या वेळी बराच वाद झाला. असो, मुद्दा तो नाही. राष्ट्रगीतानंतर सुरू झाला थरार तो भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये. भारताने पाकिस्तानला धूळ चारली, संपूर्ण स्टेडियम ‘भारतमाता की जय’ने भारावून गेलं. अमिताभही मागे हटला नाही. हातातला तिरंगा जोरजोरात फडकावून अमिताभने भारताचा हा विजय साजरा केला. आता पुढचा उपांत्य फेरीचा सामना होता, बांगलादेशविरुद्ध... ३९.३ षटकांपर्यंत बांगलादेशचा संघ उत्तम खेळला आणि शेवटच्या तीन चेंडूंमध्ये भारताने बांगलादेशच्या तोंडातला घास अक्षरश: हिसकावून घेतला, आणि अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला. भारत जिंकला जरी असला तरी, पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवणाऱ्या बांगलादेशच्या जिगरबाज खेळाडूंच्या कामगिरीची अनेकांनी तारीफ केली. समालोचक, या नात्याने हर्षा भोगलेही त्यापैकी एक होता. भारताने हा सामना कसाबसा जिंकल्यानंतर देशप्रेमी अमिताभने ट्विट केले की भारतीय समालोचक हे आपल्या खेळाडूंपेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंची अधिक प्रशंसा करतात आणि हे काही ठीक नव्हे! बरं, त्याने ‘हे मी सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर यांच्याबाबतीत बोलत नाहीये’, अशीही रिटिप्पणी केली, मग राहतो कोण, तर हर्षा भोगले... झालं. भारत तर जिंकला होताच, त्याच विजयाच्या उन्मादात अमिताभच्या या ट्वीटवर लाखो भारतीयांनी आपला पाठिंबा व्यक्त केला, अगदी ‘मिस्टर कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेदेखील...! धोनीलाही समालोचकांवर राग होताच, त्यानेही अमिताभच्या खांद्यावर बंदूक ठेवून अचूक गोळी मारली. हर्षाने यावर अमिताभला प्रत्युत्तरदेखील दिलं की, ‘क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या जवळपास सात देशांत सामन्यांचं समालोचन केलं जातं आणि त्यामुळेच जो चांगला खेळतो, त्याचे गुणगान तर होणारच... परंतु हर्षाला कोणी सीरियसली घेतलं नाही. हर्षाची विकेट काढण्यामागे जी काही कारणं असतील, त्यातील एक कारण हे अमिताभचे ट्वीट आहे, एवढे मात्र नक्की...
हा विषय इथेच संपलेला नाही, तर या निमित्ताने क्रिकेट आणि राष्ट्रवाद हा एक नवा मुद्दा पहिल्यांदाच ऐरणीवर आला आहे.
विराट कोहलीचा निस्सीम चाहता असलेल्या पाकिस्तानच्या उमर दराजने त्याच्या घराच्या छतावर भारतीय तिरंगा फडकावला. विराट कोहली हा माझा अतिशय आवडता खेळाडू असल्याने त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठीच मी भारताचा झेंडा फडकवला अशी प्रांजळ प्रतिक्रिया देणाऱ्या पाकिस्तानच्या या उमरला त्याच्या या कृत्यामुळे जवळपास महिनाभर तुरुंगात डांबून ठेवले होते. भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं, असे जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला, तेव्हाही मोठा आगडोंब उसळला आणि अखेर शाहिदला माफी मागावी लागली.
खिलाडूवृत्ती ज्याला ‘स्पोर्ट््समन स्पिरिट’ म्हणतात ते आणि कट्टर राष्ट्रवाद यात सध्या गफलत होत चालली आहे. १९६५ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर युद्ध सुरू होतं, तेव्हा पाकिस्तानी कर्णधार हनिफ महंमद आणि भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडी हे यॉर्कशायर काउंटी स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एकाच संघातून म्हणजे शेष विश्व संघातून खेळत होते. त्या वेळी या दोन्ही महान खेळाडूंनी आपापल्या सरकारला एक तार पाठवली होती, ज्याचा मथळा होता... ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे युद्ध सुरू झालंय, त्याचे आम्हाला अतिशय वाईट वाटतंय, परंतु क्रिकेटच्या मैदानावर एकत्रित यश मिळविण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, आणि आम्हाला मनापासून असं वाटतंय की, तुम्हीही एकत्र येण्यासाठी नक्कीच चांगला मार्ग काढू शकाल...’ खिलाडूवृत्ती आणि राष्ट्रवाद यात नेमका हा फरक आहे.
कोणत्याही प्रतिस्पर्धी देशाविरुद्ध भारतच जिंकला पाहिजे, ही इथल्या प्रत्येक भारतीयाची इच्छा असतेच, मात्र या इच्छेत कट्टर ‘राष्ट्रवाद’ शिरला की त्या खेळाचे रूपांतर युद्धामध्ये होत जातं. अमिताभलादेखील नेमका याच कट्टर ‘राष्ट्रवादा’चा ज्वर चढला आहे. सध्या देशभरात राष्ट्रवादाचे जे विघातक वारे वाहत आहेत किंवा ठरावीक कंपूने राष्ट्रवादाची जी व्याख्या तयार केली आहे, त्या व्याख्येशी मिळतीजुळती अशी ही अमिताभची प्रतिक्रिया आहे. समालोचकांनी फक्त आपल्याच देशाच्या खेळाडूंचे कौतुक करावे, ही अमिताभची भूमिका नेमक्या याच कट्टर राष्ट्रवादातून आलेली आहे. निर्णायक क्षणी आर. अश्विन नो बॉल टाकतो, भारताला त्याची जबरी किंमत चुकवावी लागते आणि तरीही समालोचकांनी भारतीय खेळाडूंचीच तारीफ करावी, असे अमिताभला वाटते काय? जेफ्री बायकॉटसारखा सगळ्यात खवचट समालोचकदेखील भारतीय क्रिकेटपटूंबद्दल भरभरून बोलायचा, त्यामुळे अमिताभने अशी मागणी करणे, हे खूपच हास्यास्पद आहे.
अमिताभकडून आलेली प्रतिक्रिया म्हणजे, पानाच्या टपरीवर व्यक्त केलेली पोरासोरांची प्रतिक्रिया नव्हे. कारण त्याला समाजात एक वेगळे स्थान आहे. अमिताभ जे बोलतो, त्याची आज ‘ब्रेकिंग न्यूज’ बनते हे या महानायकाला ठाऊक नाही का? स्वत: अमिताभ आज फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. हॉलीवूडच्या काही चित्रपटांत त्याने भूमिका साकारल्या आहेत. जगभरातल्या रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममधील त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबत जगभरातील चाहते स्वत:चा फोटो काढत असतात. क्रिकेटचाच राष्ट्रवादाचा न्याय, मग अमिताभच्या अभिनयक्षेत्राला लावायचा झाल्यास सगळंच कठीण होऊन जाईल. लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमचे काय कौतुक करताय, त्याऐवजी आपल्या लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये माझा जो पुतळा आहे ना त्याचे कौतुक करा असे अमिताभ म्हणेल काय, किंवा फ्रान्सच्या कान फेस्टिव्हलमध्ये आपल्या सुनेचे रेड कार्पेटवर कसे स्वागत झाले, याचे फोटो ट्वीट करताना अमिताभचा देशीवाद जागा होईल का?
खेळ, कला, साहित्य ही क्षेत्रे कट्टर राष्ट्रवादापासून दूर राहावीत, यासाठी अनेक लेखक, कलावंत, अभिनेते प्रयत्न करीत असताना अमिताभसारख्या एका दिग्गज कलाकाराने अशा प्रकारची भूमिका घ्यावी, यात फारसं आश्चर्यकारक असं नाहीये. ‘पुरस्कार वापसी’वरून सबंध देशभरात वाद पेटला असताना अमिताभला यावर त्याचे मत विचारले होते, तेव्हा या महानायकाने देशात असं काही सुरू आहे का, मला याबद्दल काहीच कसे माहीत नाही, अशी मानभावी प्रतिक्रिया दिली होती. मग त्यापेक्षा अनुपम खेर, ऋषी कपूर, आमिर खान, शाहरुख खान हे अधिक प्रतिक्रियावादी म्हणावे लागतील. कारण उजवी-डावी काही तरी भूमिका या मंडळींनी घेतली होती.
वास्तविक अमिताभ ज्या काही मोहिमांमध्ये सहभागी झालाय, त्याचा निश्चितच व्यापक परिणाम समाजावर झालाय. पोलिअोचे उच्चाटन असेल किंवा गुजरातचे टुरिझम अधिक समृद्ध होणे असेल, अमिताभच्या हाकेला अनेकांनी सकारात्मक साद दिली आहे. मात्र या घडीला अमिताभकडून अशा प्रकारच्या भूमिकेची अपेक्षा न ठेवता कोणत्याही मंदिरात महिलांना मुक्त प्रवेश दिलाच पाहिजे, अशा प्रकारच्या ट्वीटची अपेक्षा आहे, परंतु अमिताभने अशा प्रश्नांपासून स्वत:ला नेहमीच जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे. ऐश्वर्या रायला मंगळ असल्याने, या ग्रहाची वक्रदृष्टी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पूजा करून मग तिला ऐश्वर्या बच्चन करून, घेणाऱ्या अमिताभकडून अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे म्हणा. बोफोर्स, फेरा, शेतकरी असण्याचा सात-बाराचा उतारा आणि आता पनामा लीक्स... अमिताभवर वेळोवेळी बोट ठेवण्यात आले आहे, दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी व्यवस्थित राजकीय खेळी करण्यातही अमिताभ यशस्वी झाला आहे. आता तर राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत त्याचे नाव घेतले जात आहे. अशा वेळी राष्ट्रभावनेला हात घालणारे अमिताभचे हे ट्वीट निव्वळ देशप्रेमाच्या लाटेतून केलं गेलं आहे, यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच आहे, कारण अमिताभच म्हणतो की, ‘मैं हमेशा सही वक्त का इंतजार करता हूँ...’
सविता प्रशांत
savitaprashant23@gmail.com
बातम्या आणखी आहेत...