आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीवाद... सबलीकरण आणि काही अनुत्तरित प्रश्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत एक प्रभावी माध्यम म्हणून जर आपण चित्रपट हे माध्यम निवडले, तर आजघडीला तरी या विषयावर बोलणं, चर्चा करणं आणि त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. एरवी समाजात काय घडतं, याचं प्रतिबिंब चित्रपटात दिसू शकतं. चित्रपट समाजाचा आरसा आहे, हेही मान्य असतं. मात्र चित्रपट हे माध्यम समाज बदलू शकत नाही, हे दाहक वास्तव आपल्याला समजून घ्यावंच लागतं... "पिंक’ आणि "पार्च्ड’च्या वाट्याला महिनाभरानंतर काय आलं, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे.

तु खुद की खोज में निकल, तु किस लिए हताश है
तु चल तेरे वजूद की, समय को भी तलाश है...

असं म्हणण्याची वेळ का आली आहे...? बरं, हे आपण कुणाला सांगायचा प्रयत्न करतोय...? ज्यांना सांगायचा प्रयत्न करतोय, त्यापेक्षा ज्यांच्या गळी उतरणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का...? ऐकणारे कोण आहेत...? ऐकून न ऐकल्यासारखं करणारे कोण आहेत...?
चुनर उडा के ध्वज बना, गगन भी कप कपायेगा
अगर तेरी चुनर गिरी, तो एक भूकंप आयेगा...

समजा असं झालं तरी, या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल असेल...? पण असे छोटे-मोठे धक्के इथल्या व्यवस्थेने खूप पचवले आहेत, तरीही त्या धक्क्यातून व्यवस्थेची काही पडझड झाली आहे का...? व्यवस्थेच्या निबर कातडीवर साधा ओरखडा तरी उमटतोय का...? की ज्याप्रमाणे एका मोठ्या स्फोटातून विश्वाची निर्मिती झाली, तशा एका मोठ्या स्फोटाची आता पुन्हा आवश्यकता आहे...

उत्खननाचा शोध घेतल्यानंतर असं दिसून येतं की, जगभरात सर्व संस्कृतींमध्ये आधी मातृसत्ताक पद्धतच होती. त्यामध्ये स्त्रियांकडेच आर्थिक आणि धार्मिक सत्ता होती. शेतीचे निर्णय तीच घेत होती, तिच्या आयुष्यात पुरुषांची ये-जा सुरू राहिली, तरी मुलं तिच्या नावानेच ओळखली जात होती. हळूहळू या पद्धती बदलल्या. पुरुषाने जनावरांना माणसाळवून त्यांच्याकडून शेतीची कामं करून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर स्त्रियांकडे असलेली सत्ता निसटू लागली. आज त्या सत्तेचा मागमूसही उरलेला नाही. मातृसत्ताक समाजव्यवस्थेला चितपट करताना मातृशक्ती पुन्हा प्रभावी होईल, या भीतीने पछाडलेल्या पुरुष वर्गाने असंख्य युक्त्या राबवल्या आहेत, त्यातूनच म्हणायला ‘देवी’ आणि वागवायला ‘दासी’ ही संकल्पना हजारो वर्षांपासून पद्धतशीरपणे खोलवर रुजवण्यात इथली व्यवस्था यशस्वी ठरली आहे.
महिला सक्षमीकरणाचे वारे सुसाट वाहू लागले आहेत. स्त्रीमुक्तीवादी आणि विरोधक या दोघांना अमान्य करता येणार नाही, अशी संकल्पना म्हणजे महिला सक्षमीकरण. मात्र महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न करणे, तसेच हे प्रयत्न शहरी जाणिवांपुरतेच सीमित न राहता ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होणे होय.

गेल्या दोनएक वर्षांत अनेक स्त्रीकेंद्रित चित्रपट प्रदर्शित झाले. महिला सक्षमीकरण प्रक्रियेत समाजाचे एक प्रभावी माध्यम म्हणून जर आपण चित्रपट हे माध्यम निवडले, तर आजघडीला तरी या विषयावर बोलणं, चर्चा करणं आणि त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. समाजात काय घडतं, याचं प्रतिबिंब चित्रपटात दिसू शकतं. त्या अर्थाने, चित्रपट समाजाचा आरसा आहे. हे आपल्याला मान्य असतं, मात्र चित्रपट हे माध्यम समाज बदलू शकत नाही. दिग्दर्शक, कलाकार म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते नाहीत. मात्र तरीही अशा प्रकारच्या चित्रपटांचे स्वागत आणि त्याची चिकित्सा केलीच पाहिजे. कारण पुरुषी व्यवस्थेचा भाग असलेला चित्रपट कधी नव्हे ते आता म्हणू लागलाय...
जो तुझ से लिपटी बेड़ियाँ, समझ ना इन को वस्त्र तू
ये बेड़ियाँ पिघाल के, बना ले इनको शस्त्र तू...

रिलीज होण्यापूर्वीच लाखोंच्या संख्येने राधिका आपटेच्या ‘तथाकथित’ अश्लील व्हिडियोला ‘रिपिट ऑडियन्स’ मिळाल्यानंतर, आठवडाभरातच पाडण्यात आलेल्या ‘पार्च्ड’ या चित्रपटाची पहिलीच फ्रेम काय सांगू पाहात होती... राजस्थानच्या कोरड्याठाक वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर एका बस स्टॉपवर बसची वाट बघत लज्जो (राधिका आपटे) आणि तिची मैत्रीण रानी (तनिष्ठा चॅटर्जी) उभ्या आहेत. बस येते आणि त्यांचा प्रवास सुरू होतो. घुंगटने चेहरा झाकलेली लज्जो खिडकीतून डोकं बाहेर काढते. वाऱ्याच्या झुळकीने तिचा घुंगट मागे उडतो, मात्र तिला आता कसलीच पर्वा नाहीये. ती धुंद होते, मोकळा श्वास घेण्यात आणि तो क्षण जगण्यात. वाळवंटाप्रमाणेच शुष्क झालेल्या तिच्या आयुष्यात असं स्वत:ला मुक्त करून घेण्याचा, बहुधा तो पहिलाच प्रसंग असतो... बाजूला बसलेली रानी लज्जोला म्हणते, ‘ले, यही तो है, जिंदगी के मजे’...

मोकळा श्वासही घेऊ न देणाऱ्या इथल्या सडक्या पुरुषी व्यवस्थेविरुद्धची ‘पार्च्ड’मधली ही पहिलीच फ्रेम उत्तरोत्तर अस्वस्थ करत शेवटच्या फ्रेमपर्यंत येऊन थांबते. लज्जो, रानी आणि त्यांची आणखी एक सखी ‘बिजली’ या तिघी जणी पुरुषसत्ताक सिंहासनाला सुरुंग लावून पळ काढत गावच्या वेशीवर येऊन पोहोचतात. चारही दिशा आता त्यांच्यासाठी खुल्या असतात. आणि मग त्या निर्णय घेतात, ‘अब ना राईट लेंगे, ना लेफ्ट.. अब तो बस दिल की आवाज सुनेंगे...’

लज्जो(वांझ), रानी(विधवा), बिजली(वेश्या) आणि जानकी(बालवधू) यांच्या या संघर्षमय प्रवासात इथल्या समाज व्यवस्थेचा एक भयावह चेहरा दिसतो. आपला पुरुषसत्ताक समाज स्त्रीकडे पाहतो तो निव्वळ ‘बाई’ या एकाच अर्थानं. दोन स्तन, एक योनी लाभलेली एक बाई. बस्स! हा पुरुषसत्ताक समाज तिची ओळख शोधत आला आहे, केवळ तिच्या लैंगिकतेतच. त्याच्यासाठी ते आहे, आपल्या लैंगिक वासनेचं शमन, नाही तर दमन करू शकणारं एक हक्काचं शरीर... म्हणूनच ‘पार्च्ड’मधल्या अल्पवयीन जानकीला शिकण्याची प्रचंड इच्छा असताना ‘पढाई कर किताबें सिर चढ जाती है, और हमारे चढने की जगह नहीं बचती’ असं म्हणत, प्रगतीची शिडीच हिसकावून घेत लग्नाच्या बाजारात विकलं जातं. स्वत:च्या वांझपणावर ‘अच्छा है मुझे बच्चा नही होता, वरना यहां बच्चों का अलग प्रदेश बन जाता’ असा मार्मिक विनोद करताना लज्जोला पुरुषही वांझ असू शकतो, हे जेव्हां उमगतं, तेव्हा रोज रात्री याच कारणावरून अमानुष मारहाण करणाऱ्या दारूड्या नवऱ्याबद्दल जितकी घृणा तिला वाटू लागते, तितकीच शिसारी याच समाजाचा भाग आहोत, म्हणून आपल्यालाही वाटू लागते. या सिनेमात चार स्त्रियांच्या आयुष्याची घुसमट चारित्र्य, शील आणि लज्जा अशा वेगवेगळ्या घटकांमधून अनुभवता येते. या घुसमटीतून बाहेर पडण्याची अतिशय अनोखी पद्धत हे ‘पार्च्ड’चे वैशिष्ट्य आहे. विधवा रानी अनोळखी व्यक्तीकडून सतत येणाऱ्या मोबाइल कॉलच्या वापरातून आपलं सुख शोधण्याचा प्रयत्न करते. लज्जो स्वत:चे वांझपण खोटं ठरवण्यासाठी दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवत गरोदर होते, तर वासनेपलीकडच्या खऱ्या प्रेमाची भूक असणारी वेश्या व्यवसाय करणारी बिजली स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी व्यवस्थेलाच आव्हान देते. एकूणच, ग्रामीण महिलांना भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांना दिग्दर्शक लीना यादव वाचा फोडते.
‘पार्च्ड’ जिथे संपतो तिथून ‘पिंक’ हा चित्रपट सुरू होतो. गावच्या वेशीवरून शहराकडे जाणाऱ्या मार्गावरून सक्षमपणे पावलं टाकत मीनल अरोरा, फलक अली आणि आंद्रिया या आजच्या जमान्याच्या मुली बुरसटलेल्या पुरुषी अहंकाराला, त्याने लादलेल्या मर्यादांना फाट्यावर मारत स्वच्छंदी जगण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांचा हा प्रवास ‘भारता’कडून ‘इंडिया’कडे जरी झालेला असला, तरी व्यवस्थेने आखून दिलेल्या काटेरी कुंपणाला शेवटचं टोकंच नाहीये, हे त्यांना कुठे ठाऊक असतं? कारण, भारत काय किंवा इंडिया काय, निव्वळ एक पेशींचा समूह म्हणून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच तर राहिलेला आहे. स्वछंद जगणाऱ्या, जीन्स-स्कर्ट घालणाऱ्या, लेट नाइट पार्ट्या करणाऱ्या वर्किंग वूमन्स ‘या त्यातल्याच असणार’ अशी मतं आणि त्यातून निघणारा निष्कर्ष हे सारं परंपरेच्या चौकटीतलंच तर आहे. म्हणूनच पुरुषी व्यवस्थेने हा निष्कर्ष कसा एकतर्फी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करताना मीनल अरोरा जेव्हा शरीरसंबंधाला नकार देते, तेव्हा त्याचा अर्थ हा केवळ ‘नाही’ हाच असतो. पण, हे पुरुषी व्यवस्थेच्या सहजी पचनी पडत नाही. दुसऱ्या बाजूला, ‘नो’ केवल एक शब्द नही, यह अपने आप मे पुरा वाक्य है... ‘नो’ मतलब नही... नही के आगे कुछ नही, पीछे भी कुछ नही... ‘पिंक’चा हा महिला सक्षमीकरणाचा प्रखर मुद्दा वकिलाची भूमिका साकारणारा अमिताभ बच्चन न्यायालयात मांडतो, त्यावर अनेकांनी विशेषत: फेमिनिस्ट शक्तींनी नाराजी दर्शवली आहे. म्हणजे, ही नाराजी अमिताभवर नसून ‘पिंक’मध्ये महिला सक्षमीकरणासाठी शेवटी एका पुरुषाचीच का गरज भासते, यावरची ती नाराजी आहे. त्यासाठी ‘पार्च्ड’चे उदाहरण पुढे केले जात आहे. ‘पार्च्ड’च्या नायिकांनी सबलीकरणाची लढाई ही स्वत: लढली आहे, आणि त्यासाठी त्यांना कुण्या एका पुरुषावर अवलंबून राहण्याची गरज निर्माण झाली नाही वगैरे वगैरे.. या उलट ‘पिंक’च्या शेवटी पुरुषी व्यवस्थेविरुद्ध न्याय मिळवून दिल्याबद्दल नायिका पुन्हा एका पुरुष वकिलालाच धन्यवाद देतात, वगैरे वगैरे...

खरं म्हणजे, अशा प्रकारच्या चिकित्सेला काहीएक अर्थ नाही. स्त्रियांना समान हक्क देण्याच्या नावावर फेमिनिस्ट चळवळ फक्त स्त्री केंद्रित आणि पुरुषद्वेषी संस्कृती निर्माण करण्याचा खटाटोप करत असेल तर एका अतिरेकाचे उत्तर दुसऱ्या अतिरेकाने देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘पार्च्ड’ काय किंवा ‘पिंक’ काय, असे स्त्री केंद्रित चित्रपट अधिकाधिक पुरुषांनी पाहायला हवेत, असा आग्रह धरताना महिलांच्या शोषणाविरुद्ध पुरुषवर्ग सकारात्मक भूमिका घेत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत करणे गरजेचे आहे. महिला वकिलाने जर ही भूमिका साकारली असती तर तितका परिणाम साधला गेला नसता, कारण शेवटी पुरुषांच्याच तोंडून स्त्री-पुरुष समानतेची भाषा येणं हे कधीही परिणामकारक ठरत नाही का?

अर्थात, ‘पार्च्ड’च्या शेवटाबाबत मतभेद असू शकतात. ‘पार्च्ड’चा शेवट हा पलायनवादाकडे जाणारा आहे. स्त्रीची शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवरची होणारी घुसमट शहरांपेक्षा खेड्यापाड्यांमध्ये अधिक भयंकर आहे, हे ‘पार्च्ड’ पाहताना पदोपदी जाणवतं. परिस्थितीशी झगडल्यानंतर, संघर्षांना संयमाने पेलल्यानंतर, अपार वेदना, दु:ख यांना सामोरं जाण्याची ताकद दाखवून दिल्यानंतर स्त्रीकडे शेवटी काहीच पर्याय उरत नाही. तेव्हा या घुसमटीतून बाहेर पडताना लज्जो, बिजली आणि रानी एल्गार पुकारतात. हा एल्गार पुकारताना त्यांनी पुरुषी व्यवस्थेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या असल्या, तरी त्यांचा हा विद्रोह वैयक्तिक पातळीवरच रेंगाळतो. वस्तुत: विद्रोहाची ठिणगी मनामध्ये पेटली असताना त्यांनी तिथेच थांबून समाजातील आपल्या इतर भगिंनीसाठी ‘रोल मॉडेल’ची भूमिका साकारणे गरजेचे असते, कारण त्याच गावातल्या नामधारी महिला सरपंचाला टीव्हीसारख्या किरकोळ गोष्टीसाठीही गावातल्या पुरुषी व्यवस्थेची गयावया करावी लागत असते. मात्र तसे न करता इतका मोठा विद्रोह करूनही त्या पळ काढताना दिसतात. शेवटी, हा पळ कुणापासून काढला जातोय...? तुम्हाला घेरण्यासाठी व्यवस्थेने चारही बाजूला जाळं विणलंय... शहरात स्वत:च्या हिमतीवर आपलं कतृर्त्व सिद्ध करू पाहणाऱ्या ‘पिंक’च्या नायिकाही या जाळ्यात अडकलेल्या आहेत...
अर्थातच ‘पार्च्ड’च्या तुलनेत ‘पिंक’ची अधिक चर्चा झाली, आणि तशी ती होणारच होती. शहरी लोकांना गावची घाण आवडत नाही. गावातल्या घाणीचा विटाळ होऊ नये, म्हणून ‘पार्च्ड’च्या नायिकांप्रमाणे शहरात स्थलांतरित झाल्यानंतर इथला वर्ग जितका ‘पिंक’च्या प्रश्नांशी एकरूप होऊ शकतो, तितका तो ‘पार्च्ड’च्या प्रश्नांशी नाही होऊ शकत. ‘पार्च्ड’ची दिग्दर्शक लिना यादवलाही हे चांगलचं ठाऊक असावं. कारण चित्रपटाच्या इंग्रजी नावापासूनच त्याची सुरुवात होते. चित्रपटाचे कथानक जरी खेड्यापाड्यातील शोषित महिलाकेंद्रित असले तरी चित्रपटाची मांडणी मात्र एका खास वर्गासाठी आहे. या व्यवस्थेत ‘बोल्ड’ पद्धतीने दाखविण्यात येणारी प्रत्येक गोष्ट यशस्वी होते, मात्र त्या खाली असणाऱ्या ‘स्मॉल’ लेटर्सकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही.

‘पार्च्ड’च्या वाट्याला नेमकं हेच आलं आहे. प्रसारमाध्यमांनी, सोशल मीडियावर, समीक्षकांनी ‘पार्च्ड’च्या बोल्ड दृश्यांवर किंवा स्तन-योनीच्या स्वातंत्र्यावर अधिक चर्चा केली. कदाचित महिलांचे स्वातंत्र्य आणि महिलांचा स्वैराचार या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू अलीकडच्या स्त्रीवादी चित्रपटांमधून अधिक पाहायला मिळत असल्याने नेमक्या कोणत्या बाजूवर अधिक चर्चा व्हायला हवी, याचा संभ्रम पडला असावा. ‘पार्च्ड’मधील जानकी ही स्मॉल लेटर्समध्ये दिसणारी व्यक्तिरेखा असली, तरी खऱ्या अर्थाने ती बोल्ड व्यक्तिरेखा आहे. बोल्ड म्हणजे केवळ दारू पिणे, शिव्या देणे आणि लैंगिक स्वातंत्र्याचा जोर धरणे नसून महिला सबलीकरण आणि पुनर्वसनाच्या दिशेने पडलले जानकीचे पाऊल हे सर्वार्थाने बोल्ड आहे, असेच म्हणावे लागेल.
जानकीची कथा -
पुस्तकांशी मैत्री करणाऱ्या जानकीला बालविवाहाच्या रूढी-परंपरेत जेव्हा अडकवलं जातं, तेव्हा त्याचा निषेध म्हणून जानकी स्वत:चे लांबसडक केस कापून विद्रूप दिसण्याचा प्रयत्न करते. चोरी करणारा आणि अय्याशी असणारा नवरा कोवळ्या जानकीचे लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करतो, ‘देखता हूँ मर्द के बिना यह घर कैसे चलता है’, असं म्हणत आपली विधवा आई आणि जानकीला वाऱ्यावर सोडून घरातून पळ काढतो. व्यवस्थेशी विद्रोह करत शेवटी सासू जानकीचा हात तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या हातात देण्यास तयार होते. त्याचे एकमेव कारण म्हणजे, जानकीला असणारी शिक्षणाची भूक. व्यवस्थेपासून पळ न काढता व्यवस्थेतच राहून जानकीला शिकायचंय, सक्षम व्हायचंय. यासाठी आता तिच्यासोबत आहेत तिची पुस्तकं आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा तिचा प्रियकर...
बातम्या आणखी आहेत...