परमवीरचक्र तयार केलेल्या / परमवीरचक्र तयार केलेल्या वीरपत्नीची कहाणी

विक्रम खानोलकर

Aug 10,2012 10:19:49 PM IST

सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या इव्हा युओन लिंडा मॅदे -दे मोरॉस! जन्म स्वित्झर्लंडमध्ये 20 जुलै 1913 रोजी झाला. वडील हंगेरियन, तर आई रशियन. इव्हाने आईला कधी पाहिलं नाही. वडिलांनीच तिचे संगोपन केले. वडील जिनेव्हाच्या ‘लीग ऑफ नेशन्स’ मध्ये ग्रंथपाल होते. इव्हाचे बालपण शाळा आणि वसतिगृह यात गेले. रिव्हिएराच्या समुद्र किना-यावर हिंडताना इव्हाचे लक्ष ब्रिटिश सोल्जर्सच्या एका घोळक्याकडे गेले. सँडहर्स्ट (लंडन) हून सुटीवर आलेला तो ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये विक्रम खानोलकर नावाचा तरुण अधिकारी होता. ही गोष्ट 1929 मधील आहे. इव्हा अवघी 16 वर्षांची आणि कॅप्टन खानोलकर 27 वर्षांचा; पण त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले.
भारताबद्दल अधिकच कुतूहल असलेल्या इव्हाला भारत देश खूपच आवडला. दोन वर्षांत वडिलांचा विरोध झुगारून तिने तडक मुंबई गाठली. वास्तविक तिशी गाठल्याशिवाय विवाहबंधनात अडकायचे नाही, असा ब्रिटिश सैन्याचा संके त होता; पण विक्रमने इव्हासाठी तो संकेत मोडला. लखनऊमध्ये इव्हाची समारंभपूर्वक सालंकृत सावित्री झाली. सावित्री आणि विक्रम यांचे वास्तव्य काही काळ औरंगाबादेत होते. पुढे त्यांच्या विविध ठिकाणाहून बदल्या झाल्या. सावित्रीने पाटणा विद्यापीठातून हिंदी व संस्कृतचे पाठ गिरवले. साधी सुती साडी, ठसठशीत कुंकू , पायात मराठी चपला, चेह-यावर शांत भाव असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. चित्रकला त्यांचा आवडता विषय होता. प्रयत्नपूर्वक मराठी, हिंदी आणि गुजराती भाषांवर प्रभुत्व मिळवले.
ब्रिटनमध्ये शौर्यपदक म्हणून ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ दिला जातो. त्या धर्तीवर भारताच्या लष्करातही सर्वोच्च सन्मान दिला जावा, अशी कल्पना लष्करप्रमुख मेजर जनरल हिरालाल अटल यांच्या मनात घोळत होती. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पाठबळ या कल्पनेला होते. सावित्रीबार्इंची प्रगल्भता पाहून हिरालाल यांनी या सन्मानाच्या डिझाइनचे काम त्यांच्याकडे सोपवले आहे. भारतीय पुराणं, इतिहास आणि संस्कृतीची सांगड घालत सावित्रीबार्इंनी हे पदक तयार केले. दैवयोग असा की, ज्या बहुमानाच्या परमवीरचक्राच्या डिझाइनशी त्यांचा संबंध जोडला गेला, ते पहिले वहिले पदक मेजर सोमनाथ शर्मा यांना जाहीर झाले. मेजर सोमनाथ सावित्रीबार्इंचे जावई होते. आतापर्यंत एकवीस शूर सैनिकांना हा मान मिळाला. त्यातले एकोणीस जण रणांगणावर मृत्युमुखी पडले.
या पदकाचे डिझाइनही सावित्रीबार्इंनी केले आहे. किंचित उभवलेल्या पृष्ठभागाच्या मधोमध राष्ट्रचिन्ह, भोवती चार वज्रप्रतिमा, कारण इंद्राचे अमोघ शस्त्र निर्मिण्यासाठी दधिची ऋषींनी आपल्या मांडीचे हाड दिले होते. याखेरीज पदकावर शिवरायांची तलवार आहे.
(या लेखाचे लेखक विक्रम खानोलकर हे सावित्रीबार्इंचे नातू आहेत)

X
COMMENT