आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनमधील तरुण ब्रँड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑप्रा यांनी जयपूरला जाण्यापूर्वी या मुंबईतील स्टोरला धावती भेट दिली होती. या स्टोरमधून त्यांनी आपल्यासाठी खास साडी खरेदी केली. मुलांसाठी अनेक वस्तूही घेतल्या. तसे हे स्टोर नवीन. परंतु डिझायनिंग क्षेत्रातील अनेक नवनवीन गोष्टी येथे पाहून त्या आकर्षित झाल्या. म्हणूनच कालाघोडा भागातील हे स्टोर या भेटीमुळे एकदम प्रकाशझोतात आले नसते तरच नवल. त्याचे सर्व श्रेय अर्थातच सव्यसाची मुखर्जी यांच्या कल्पकतेला द्यावे लागेल.
सव्यसाची यांचा जन्म 1974 मध्ये कोलकात्यामध्ये झाला. तेथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी सव्यसाची या नावाने डिझायनिंगच्या व्यावसायिक कामाला सुरुवात केली. 2001 मध्ये सव्यसाची आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदम प्रकाशात आले.फेमिना ब्रिटिशसाठी त्यांनी केलेल्या डिझाइनला पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे त्यांना लंडनला इन्टर्नशिपच्या निमित्ताने राहण्याची संधी मिळाली. 2003 मध्ये सव्यसाची यांनी सिंगापूर येथील न्यू एशिया फॅशन विकमध्ये आपली जादू दाखवून दिली.
त्यानंतरही सव्यसाची यांनी 2004 मध्ये क्वालालम्पूर येथील लॅक्मे फॅशन वीकमध्ये पुरस्कार मिळवत त्यांनी फॅशन जगतात कल्पकतेचा वरचष्मा दाखवला. 2005 साल हे त्यांच्या कामाला ग्लॅमर मिळवून देण्यास कारणीभूत ठरले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ हा चित्रपट त्यांना मिळाला. त्यांनी कॉश्च्यूमच्या जबाबदारीचे सोने केले. म्हणूनच त्यांची दखल सरकारच्या
चित्रपट विभागानेही घेतली. त्या सालचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ब्लॅक
चित्रपटाचा विषय त्यातील सिनेमॅटोग्राफी जेवढी वेगळी ठरली होती. तेवढाच त्यातील कॉश्च्यूम आपले वेगळेपण अधोरेखित करणारा होता.
ब्लॅक नंतर सव्यसाची यांची डिझाइनची गाडी सुसाट निघाली. बाबूल, लागा चुनरी दाग (2007), पा (2010), रा-वन (2011), गुजारिश(2010) या चित्रपटातील त्यांचे कॉश्च्यूम भाव खाऊन गेले. कोलकाता नगरी हीच सव्यसाची यांच्या डिझाइनच्या क्षेत्रातील कामाची प्रेरणा राहिली आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत नवीन स्टोर सुरू केले. कपडे हे व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे एक्स्टेंशन असते, असे मानणारा हा डिझायनर भारतीय संस्कृतीवर नितांत प्रेम करतो. त्यांच्या कामातूनही पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा मेळ पाहायला मिळतो तो त्यामुळेच. 2004 मध्ये मिलान फॅशन शोमध्ये हजेरी लावणारे ते भारतातील एकमेव डिझायनर होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन सिंगापूरच्या एशिया इंक या बिझनेस नियतकालिकाने भारतातील प्रभावशाली दहा व्यक्तींमध्ये त्यांची निवड केली होती. या यादीत ऐश्वर्या रॉय, प्रियंका गांधी या सारखी मोठी नावे होती.