आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडीचं आव्हान नि आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातल्या बायकांचं कपड्यांचं प्रेम जगजाहीर आहे. कुठल्याही देशातली बाई असो तिला वेगवेगळ्या कपड्यांचं आकर्षण, वेड, प्रेम नाही असं क्वचितच होत असेल. भारतीय बायकाही यात मागे कशा असतील! त्यातही हातमागावरच्या साड्या आणि हातमागावरचं कापड याबद्दल प्रेम असलेल्या बायकांची आणि पुरुषांचीही संख्या मोठी आहे. भारतात तर साडी हा फॉर्मल पोशाख मानला जातो. भारतीय उद्योगक्षेत्रात, बँकिंग क्षेत्रातल्या वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या किती तरी बायका नियमितपणे साड्या नेसतात. आणि या सगळ्यांची पहिली पसंती असते ती हातमागावर तयार झालेल्या साड्यांना.या वर्षी इंटरनेटवर एक आगळीवेगळी चळवळ सुरू आहे, 100saripact म्हणजे १०० साड्या नेसायचा करार. अंजू मौद्गल कदम आणि एली मॅथ्थन या दोन मैत्रिणींनी ही चळवळ सुरू केली आहे. या वर्षभरात तुम्ही तुमच्याकडच्या साड्यांमधल्या १०० साड्या नेसायच्या. साडी नेसण्यासाठी कुठल्याही खास प्रसंगाची, समारंभाची आवश्यकता नाही. तुम्हाला साडीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही साडी नेसायची, आपल्या मोबाइलवर फोटो काढायचा आणि या दोघींना टॅग करून आपल्या फेसबुक टाइमलाइनवर तो पोस्ट करायचा. या गंमतीत परत परत त्याच साड्या नेसल्या तरी चालणार आहे. हा फोटो पोस्ट करताना आपल्या त्या साडीमागची गोष्ट सांगायची. म्हणजे ती कधी घेतली, कुठे घेतली आणि तिच्याविषयीच्या काही खास आठवणीही. सांगायचा मुद्दा असा की जर तुम्ही १०० साडी पॅक्टच्या पेजवर जाऊन बघितलंत तर तुम्हाला तिथे बहुतांश साड्या या हातमागावर तयार झालेल्या आहेत असं दिसेल.
हातमागावर तयार होणारे कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले, नैसर्गिक रंग वापरलेले आणि म्हणूनच सुखदायक असतात. हातमागावर मुख्यतः कॉटन आणि सिल्क अशी दोन प्रकारची कापडं तयार होतात जी दिसतातही फार सुंदर. शिवाय लोकरी कपडेही. मला स्वतःला तर सुती व रेशमी कपड्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे कपडे वापरायला आवडत नाहीत. अर्थातच हे कपडे बनवायला वेळही बराच लागतो कारण ते हातानं बनवले जातात. शिवाय त्यामागे कष्टही खूप आहेत, आणि म्हणूनच हातमाग कपड्यांची किंमतही तशीच असते. एक साधी पैठणी तयार व्हायला दीड ते दोन महिने लागतात. यंत्रमागावर याच्या किती तरी पटीनं अधिक कापड, किती तरी कमी वेळात तयार होतं शिवाय तिथे कामगारही कमी लागतात. कारण तिथे कौशल्याची फारशी गरज नसते. म्हणून यंत्रमागावर तयार झालेल्या कपड्यांची किंमत हातमागावर तयार झालेल्या कपड्यांच्या तुलनेनं कमी असते.
तज्ज्ञांच्या मते हातमाग क्षेत्र असंघटित असल्यानं त्यासंबंधीची निश्चित आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही किंवा सरकार खऱ्या आकडेवारीकडे कानाडोळा तरी करतं आहे. गेल्या काही वर्षांत हातमाग कपड्यांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दस्तकार, पारंपरिक कारागीर, दिल्ली हाट, क्राफ्ट्स काैन्सिल आदी संस्था देशभरात जी प्रदर्शनं भरवतात त्यांच्या विक्रीच्या आकड्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मी स्वतः मुंबईतल्या ज्या-ज्या प्रदर्शनांना जाते तिथे तिथे हातमाग कपड्यांना किती प्रचंड मागणी आहे ते बघितलेलं आहे. शिवाय आता हस्तमाग कारागीरांच्या संस्था डिझायनर्सकडून डिझाइन घेऊन विविध रंगसंगतींचे, लाकूड, दगड, बांबू, लोकर, आदींचा वापर करून अतिशय मनोहारी कपडे तयार करतात. या प्रदर्शनांमध्ये वाजवी दरांमध्ये हे कपडे उपलब्ध असतात. हातमागाचा अजून एक फायदा म्हणजे हे कपडे पर्यावरणस्नेही असतात कारण त्यामध्ये नैसर्गिक कच्चा मालच वापरलेला असतो.
हातमाग क्षेत्राला संरक्षण देणारा कायदा केंद्र सरकारनं १९८५मध्ये केला. या कायद्याअंतर्गत हातमागावर कापड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि कपड्यांना संरक्षण देण्याची तरतूद आहे. म्हणजे या सूचीमधला कच्चा माल, कपडा, डिझाइन हे वापरायला यंत्रमाग उद्योगाला मनाई करण्यात आलेली आहे. शिवाय पारंपरिक कारागीर आणि विणकर यांना काही खास सवलती देण्यात आलेल्या आहेत. तर या कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी पॉवरलूम क्षेत्रानं सध्या लावून धरलेली होती. विशेषतः साडीला या कायद्यातून वगळावं, असं त्यांचं म्हणणं होतं. हातमाग क्षेत्र मरणपंथाला लागलेलं आहे त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करून यंत्रमाग क्षेत्राला तशा प्रकारचे कपडे तयार करायला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. पण असं असलं तरी १९८५च्या हातमाग संरक्षण कायद्यात कुठलीही दुरुस्ती केली जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. (इकडे किरण खेरचा उल्लेख करावा का, म्हणजे तिचं साड्यांचं कलेक्शन आणि तिन या विषयावर लोकसभेत उठवलेला आवाज याचा?)
सब्यसाची मुखर्जी, रितू कुमार, अबु जानी आणि संदीप खोसला आदी आघाडीचे फॅशन डिझायनर हातमाग कपड्यांचाच वापर करतात आणि त्यांच्या कपड्यांना जगभरातून प्रचंड मागणी आहे. इजाजत चित्रपटातली रेखा डोळ्यासमोर आणा. वेगवेगळ्या रंगांच्या सुरेख नारायण पेठी साड्या आणि त्याला साजेसे असे सुरेख मराठमोळे दागिने. इजाजतमधल्या या सुधाकडे नुसतं बघत राहावंसं वाटतं. किंवा रुदाली चित्रपटातली डिंपल आठवा. तिचे ते राजस्थानी, टिपिकल मातकट रंगांचे हँडब्लॉक प्रिंटचे कपडे आणि चांदीचे दागिने. काय सुंदर दिसली आहे डिंपल त्यात! रेखा काय किंवा डिंपल काय दोघीही मुळात सुंदर आहेतच पण या चित्रपटांमधलं त्यांचं रूप खुलवलं आहे ते हातमागावर तयार झालेल्या कपड्यांनी. यावर्षी शंभर साड्या नेसायच्याच आणि त्याही हातमागावर तयार झालेल्या असा निश्चय मी तरी केला आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या बऱ्याच मैत्रिणींनीही. तुम्हीही या मजेत सहभागी होऊन तर बघा.
sayali.rajadhyaksha@gmail.com