आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीवर चढवा दप्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन-चार महिन्यांपूर्वी एका चित्रपटाच्या रिसर्च संदर्भात चंदिगड आणि शिमल्याला जाणं झालं. प्रवासाच्या दरम्यान एका ट्रकच्या मागे लिहिलेलं वाक्य लक्षात राहिलंय.

बुरी नजर वाले तेरा भी हो भला...
ते वाचलं आणि वाटलं की आपण कसा विचार करतो, कसे वागतो, कशा प्रकारची व्यक्ती बनतो, हे सगळे आपण माणसे आणि विचार कोणते निवडतो यावर किती जास्त अवलंबून असते नाही? ‘आम्ही सारे खवय्ये’च्या एका शूटिंगच्या दरम्यान एकदा असं झालं की एका भागाचं शूटिंग आटोपलं आणि मग लक्षात आलं की काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे गेले दोन तास जे शूट करून झालं होतं ते सगळं परत करायला लागणार! सगळेच वैतागले. त्या वेळी प्रशांत दामले फक्त एकच वाक्य म्हणाले, ‘अरे वा, आपल्याला वन्स मोर मिळालाय, चला होऊन जाऊ दे!’ एका क्षणात सेटवरचा मूड बदलला!
प्रत्येक दिवसाकडे दोन त-हांनी बघता येऊ शकतं की! रोजचा दिवस तसाच, तसेच चोवीस तास, तीच सकाळ, तेच ऊन, तशीच रात्र! किती एकसुरी आहे सगळं जगणं असा एक दृष्टिकोन आणि प्रत्येक दिवस म्हणजे काहीतरी नवीन बघायला, ऐकायला, शिकायला मिळण्याची ब्रँड न्यू संधी, असा दुसरा! यातला कुठला निवडतो यावर आपलं जगणं किती इंटरेस्टिंग करतो ते अवलंबून आहे. कधीतरी थोडासा ब्रेक घेऊन विचार केला तर लक्षात येतं की अरेच्चा, आपण रूटीनच्या, सवयींच्या कधी आहारी गेलो आणि एकच दिवस तसाच्या तसा रोज जगायला कसे लागलो कळलंच नाही. हे तेव्हा होतं जेव्हा आपण नवीन काही शिकणं, अभ्यास करणं सोडून देतो. एका ठरावीक काळापर्यंत केलेल्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे मग पुढचे सगळे पेपर सोडवायचा प्रयत्न करतो.

हे जाणवतं त्या क्षणी पुन्हा एक काल्पनिक दप्तर पाठीवर चढवायला हवं. शिकणं ही कधीही न संपणारी प्रोसेस असते. गुरूही डोळे उघडे ठेवून पाहिले तर अनेक सापडतात. काही दिवसांपूर्वी माझ्या घरच्या कामवाल्या तार्इंनी माझ्या आईकडे महिन्याचा पगार वाढवून मागितला. महागाई आहेच हे लक्षात घेऊन माझ्या आईने तिला नेहमीपेक्षा 300 रुपये पगारात वाढवून दिले. त्यांनी काही ते मोजले नाहीत. अर्ध्या तासाने त्या परत आल्या आणि त्यांनी 100 रुपये परत दिले. म्हणाल्या की 100 रुपये जास्त दिलेत. मी करते त्या कामाचा मोबदला म्हणून असायला हवेत त्यापेक्षा हे जास्त आहेत. तेव्हा ते काही मी घेऊ शकत नाही! कदाचित 100 रुपयेही माझ्यासाठी काहीच नसतील, पण त्या तार्इंसाठी 100 रुपयांची किंमत नक्की कमी नव्हती. असे असताना ते परत देण्याची ताकद त्या बाळगून होत्या, ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट नाहीये का?
माझं कॉलेज नुकतंच संपलं होतं. काही मित्रमैत्रिणींसह माझ्या एका मित्राच्या घरी बंगालमधल्या आसनसोल नावाच्या एका गावी गेले होते. माझ्याच वयाचा अतिशय हट्टी आणि स्वत:ला हव्या तशाच गोष्टी करणारा हा मुलगा, घरी गेल्यानंतर आईला पोळ्या करण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळी मदत करत होता. का, तर तो घरापासून लांब असतो, त्याची आईला कधीच मदत होत नाही म्हणून. आता आला आहे तर त्याने जास्तीत जास्त वेळ तिला द्यायला हवा म्हणून! हे शिकण्यासारखं नाहीये का?

मी काही कारणासाठी मुंबईमधल्या काही बायकांना डिझाइन्स समजावून त्यांच्याकडून साड्या बनवून घेते. एकदा त्यातली एक साडी मला जशी हवी तशी झाली नव्हती. ती बनवणा-या रमिलातार्इंनाही त्यांनी केलेले काम मनापासून पसंतीला उतरले नव्हते. त्या बेचैन झाल्या. म्हणाल्या, ही साडी मी आत्ता देत नाही. आपल्या दोघींना आवडेल अशी करेन साडी. आपण केलेल्या कामातल्या चुका मान्य करून परत पहिल्यापासून तितक्यात उत्साहाने सुरुवात करायची, हे कौतुकास्पद नाहीये का?

गर्दीत सिगारेट ओढत शिव्या देणारी माणसं जास्त असतील कदाचित. जगात नकारात्मक विचारांचे वारेही वाहत असतील जोरात. पण ही अशी माणसंही असतात त्याच गर्दीत. आपण कोणाला शोधतो आहोत? आपण काय शिकतो आहोत, यावर ती माणसं आपल्याला दिसणं व न दिसणं अवलंबून असेल कदाचित. आपल्या घरचा कचरा घेऊन जाणा-या माणसापासून जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यापर्यंत गुरू कोणाच्याही रूपात आपल्याला एखादी गोष्ट शिकवून जाऊ शकतो. सिल्विया प्लाथ नावाच्या एका अमेरिकन कवयित्रीने अतिशय खेदाने म्हटले होते, ‘मला जितकी वाचायची आहेत तितकी पुस्तके एका आयुष्यात वाचून होणार नाहीयेत, मला जे जे व्हावंसं वाटतं आणि जितकी आयुष्यं या एका जन्मात जगावीशी वाटतात तितकी काही मला जगता येणार नाहीयेत.

मला जी जी कौशल्यं शिकायची इच्छा आहे त्या सगळ्यात मी पारंगत होऊ शकणार नाहीये. मला जगण्याच्या सगळ्या शेड्स, सगळी विविधता, सगळे बारकावे अनुभवायचे आहेत, आणि या सगळ्यासाठी मी अतिशय अपुरी आहे!’ पेला अर्धा सरला आहे हा ऑ प्शनच नसेल तर आपोआप पेला भरलेला दिसायला लागतो, मनासारख्या न झालेल्या गोष्टी, सुटलेली बस, बिघडलेली रेसिपी, झालेला वाद याने पॉज न होता प्रवास सुरू ठेवायचा असतो. कारण त्या स्पीडब्रेकरनंतर सगळ्या चांगल्या गोष्टी आपली वाट बघत उभ्या असलेल्या दिसतात. त्या दिसल्या की मग सिल्विया प्लाथला जो खेद होतो नं, त्याचा अर्थ आपल्याला कळू शकेल. ज्या क्षणी आपण त्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो, त्या क्षणी त्या गोष्टीसुद्धा आपला वास घेत आपल्याला हुडकत येतात .


aditimoghehere@gmail.com