आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना गतवैभव प्राप्त करून देणारी चळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यानंतर गाव-खेड्यावर प्राथमिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तर झाला. पण गुणवत्तेचा प्रश्न मात्र सुटू शकला नाही. अशा परिस्थितीतही संधी मिळताच आदिवासी आणि ग्रामीण मुलं शिकू लागली तरी पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवणे बहुसंख्य पालकांना अशक्य होई आणि सवित्रीबार्इंच्या या लेकरांचे ‘तुझी यत्ता कंची ?’ या प्रश्नाचे उत्तर चौथीपर्यंत येऊन थांबू लागले. ही समस्या ओळखून तत्कालीन शिक्षणमंत्री आणि द्रष्टे विचारवंत मधुकरराव चौधरी यांनी विद्या निकेतन नावाची गुरुकुले राज्यभर स्थापण्याचा विचार केला.

नुसता विचारच केला नाही तर स्वत: या संकल्पनेचा पाठपुरावा करून पण शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात धुळे, औरंगाबाद, पुसेगाव, केळापूर, आणि अमरावती या पांच ठिकाणी शासकीय विद्या निकेतन या नावाने सरकार पुरस्कृत शाळा 1967 मध्ये सुरू केल्या. स्थापनेपासून सुरुवातीची पंचवीस वर्षे या शाळांकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन जोपर्यंत उदार होता तोपर्यंत या पाचही शाळांनी सामाजिक, राजकीय, प्रशासन, कला, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्त्व निर्माण केले. शासकीय विद्या निकेतन या शाळांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक विश्वात उत्तम मानांकन प्राप्त केले. विद्या निकेतनात आपल्या मुलांना पाठवणे ही पालकांना सर्वोच्च समाधानाची बाब ठरू लागली. महत्त्वाचे म्हणजे या शाळांनी खेड्या-पाड्यावरच्या शिक्षणाचा हक्क नाकारल्या गेलेल्या आदिवासी, बहुजन आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे एक ज्ञानपीठ उपलब्ध करून दिले.

तथापि कालांतराने महाराष्ट्र शासनाच्या बॅलन्सशीटमध्ये इन्व्हेस्टमेंट या सदरातील ‘शिक्षण’ हे जसजसे लायबिलिटी या सदरात मोडले जाऊ लागले तसतसे सरकारचा विद्या निकेतनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या बदललेल्या नजरेने अर्थातच गुणवत्तापूर्ण शिक्षण या निकेतनाचे वैशिष्ट्य असलेल्या संस्काराला ओहोटी लागली. गेल्या दीड वर्षात पूर्ण वेळ प्राचार्य-रेक्टर-वॉर्डन नसणे, महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नसणे, विद्या निकेतनच्या आवारात शाळाबाह्य सरकारी कार्यालये सुरू करणे, 20-25 वर्षांपूर्वीच्या अनुदानातच वसतिगृह-मेसचे खर्च भागवणे यासारख्या समस्यांच्या विळख्यात एकेकाळच्या उत्तम शिक्षणाची ही ज्ञानपीठ इतकी गुरफटली की 100% निकाल ही या शाळेसाठी विशेष बाब ठरू लागली. हा दर्जा पुढे इतका खालावला की पालकही आपल्या मुलांना विद्या निकेतनात पाठवण्यास टाळू लागले. अशातच विद्यानिकेतनातून बाहेर पडून पुढे आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या अणि यशामागील शाळेचं ऋण अभिमानाने मिरवणार्‍या काही माजी विद्यार्थ्यांचे चारएक वर्षांपूर्वी शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष गेले.

आपल्या गावच्या वेशीपर्यंत मर्यादित विश्व असलेल्या आमच्या सारख्या मुलांना बाहेरच्या मोकळ्या आकाशात भरारी घेण्याची संधी ज्या शाळेमुळे मिळाली तिची दुरवस्था बघून आम्हा सर्वांनाच वाईट वाटले. पण वाईट वाटणे हा कोणत्याच समस्येवरचा उपाय नसल्याचे ज्यांना माहीत होते, अशा काही माजी विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र आणण्याचे काम केले. त्यासाठी आधुनिक जगाच्या संवादाचे माध्यम बनलेल्या फेसबुकचा कल्पक वापर करत देश-विदेशात स्थायिक झालेल्या 1800 माजी विद्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना शाळेच्या परिस्थितीची कल्पना देण्यास प्रारंभ केला गेला. त्यानंतर विचारविनिमयांतर्गत शासकीय यंत्रणेला जागे करून अधिकारी-शिक्षकांची रिक्तपदे भरणे, विद्यार्थी अनुदान वाढवणे यासाठी शासनाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि शासकीय निर्णय हे धिम्या गतीने होत असल्याने या प्रयत्नांना यश येईपर्यंत माजी विद्यार्थ्यांनी स्वत:च ‘विद्यानिकेतन ऋण निर्देश चळवळ’ सुरू करून शाळा सुधार कार्यक्रम हाती घेतला. या अनोख्या चळवळीअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील काही माजी विद्यार्थ्यांनी विद्या निकेतनामध्ये जाऊन शिक्षक नसलेले विषय शिकवणे, व्यक्तिमत्त्व शिबिर घेणे, नाट्य प्रशिक्षण, हस्तकला सुधार, चित्रकला शिबिरांसारखे अनेक उपक्रम गेल्या चार वर्षांत राबवले.

सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप यावे यासाठी ‘विद्या निकेतन गिव्ह बॅक फाउंडेशन’ या सार्वजनिक संस्थेची स्थापना केली आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला. दरम्यानच्या काळात विद्यार्थांना लागणार्‍या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रामुख्याने गरीब घरातील विद्यार्थी शाळेत असल्याने त्यांना वह्या, पेन, पेन्सिल, शूज, सॉक्स, स्वेटर्स, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साधने फाउंडेशनने उपलब्ध करून दिले. विद्या निकेतनला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ‘गिव्ह बॅक फाउंडेशन’च्या या प्रयत्नांना आर्थिक आणि मानसिक पाठिंबा देण्यात अक्षरश: शेकडो माजी विद्यार्थी सामील झाले. काही बांधवांनी डोनेशनच्या माध्यमातून, काहींनी शासकीय पातळीवर पाठपुरावा करून तर काहींनी समन्वयाच्या भूमिकेतून ‘गिव्ह बॅक’ चळवळीला पाठबळ दिल्याने फाउंडेशनचे उपक्रम सतत वाढत गेले. प्रसारमाध्यमांनी फाउंडेशनच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रसिद्धी दिल्याने समाजात चांगला संदेश जाण्यासही मदत झाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन दिवसागणिक शाळेच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती दिसू लागली.

मागील वर्षात कबड्डी खो-खो या खेळात राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरदेखील शाळेचे विद्यार्थी चमकले. संगीत -कला स्पर्धांमधे विद्यार्थी सहभागी होऊ लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी जवळपास सर्व विद्या निकेतनांचे निकाल 100 % लागून अनेक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. आपल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश बघून ऋणनिर्देश चळवळीत सहभागी झालेल्या सर्व माजी विद्यार्थी बांधवांमधे एक चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. ‘शाळा सुधार हे माजी विद्यार्थ्यांचे काम नसून शासनाचे आहे’, या मताच्या चळवळीपासून लांब असलेल्या पण या यशाने आनंदी झालेल्या माजी विद्यार्थ्यांची आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तेव्हा आम्हा सर्वांचा आनंद कोण वर्णावा ?

प्रमोद गायकवाड
अध्यक्ष, विद्या निकेतन गिव्ह बॅक फाउंडेशन

(फोटो - संग्रहित छायाचित्र)