आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूम नावाची शाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारा आहे फक्त सहा महिन्यांची. सध्या मी तिचा अभ्यास करतोय. तिच्या निरनिराळ्या रडण्यातून, ओरडण्यातून, चित्कारातून आणि हुंकारातून तिला नेमकं काय सांगायचं असेल याचा मी सतत शोध घेत असतो.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सारा अचानक वेगळ्याच सुरात रडू लागली, वाटलं हिला काही तरी हवंय. नेहमीची खेळणी दाखवली तर तिने ती भिरकावून दिली. मग मी तिच्या आवाजाचा वेध घेणं सोडून तिच्या देहबोलीकडे लक्ष केंद्रित करू लागलो. आता यातून तरी काही समजेल? पण छे!


इतक्यात बाथरूममधून फ्लशचा आवाज आला आणि बटण बंद केल्याप्रमाणे ती रडायची तर थांबलीच, पण त्या आवाजाचा वेध घेऊ लागली. मी तिला कडेवर घेऊन बाथरूममधेच गेलो. आणि त्या क्षणी ती आनंदाने चित्कारू लागली. मी प्रथम गोंधळलोच! साराला इतका आनंद होण्याचं कारण काय, मला समजेच ना. तिच्या भिरभरणा-या नजरेमागून मी शोध घेऊ लागलो तर मला नवीनच गोष्ट समजली की, बाथरूममधे खेळण्यासाठी खूपच खेळणी होती.
मग आम्ही बाथरूममधे शाळा-शाळा खेळायला सुरुवात केली.


दाढीचा ब्रश, दात घासायचा ब्रश आणि कपडे घासायचा ब्रश यांचा पोत वेगवेगळा आहे. या ब्रशांवर हळुवारपणे हात फिरवून तो अनुभवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं मुलायम, कुरकुरीत आणि खरबरीतपण मुलाने स्वत:हून समजून घेण्यासाठी त्याला उत्सुक करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. या क्रियेमुळे मुलांमधील डोळे व हात यांचा समन्वय साधण्याचे कौशल्य विकसित होऊ लागते. यातूनच हाताची व बोटांची हालाचल नियंत्रित करण्यावर मुले लक्ष केंद्रित करतात. स्पर्शातून शिकण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.


मूल थोडं मोठं झालं की, एका भांड्यात रंगीत पाणी घेऊन याच ब्रशांनी मुलांना जर जमिनीवर फरांटे मारायला दिले तर त्याचाही खूप फायदा होतो. मुले लिहिण्यासाठी आपल्या फक्त पंजाचा वापर करतात आणि तेही आपली मर्यादित शक्ती वापरून. पण मुले जेव्हा जमिनीवर मुक्तपणे फरांटे मारू लागतात त्या वेळी ती आपल्या पूर्ण हाताचा तर उपयोग करतातच, पण आपल्या पूर्ण ताकदीचाही वापर करतात.


लक्षात ठेवा, मुलांना पाटीवर किंवा वहीवर अक्षरे गिरवायला देण्याअगोदर मुलांच्या हातात ब्रश द्या. त्यांना मुक्तपणे जमिनीवर फरांटे मारू द्या. त्यांना हवं तितका वेळ आणि कितीही वेळा. आणि मग त्यांना गिरवायला द्या. पाहा काय चमत्कार होतो. मुलांना आपला पूर्ण हात मुक्तपणे वापरत असताना आपली ताकदही अजमावून पाहण्याची संधी मिळाली पाहिजे. याचे दोन फायदे होतात. एक, पंजा वापरण्याचे कौशल्य विकसित होते आणि दुसरे म्हणजे, बोटांच्या हालचालींवरचे नियंत्रण सुलभ होते. साहजिकच मुलांचे हस्ताक्षर सुधारते. हाताकडून पंजाकडे व पंजाकडून बोटाकडे जायचे आहे. आपण जर पंजाकडूनच सुरुवात केली तर मात्र मुलांची घुसमट होते. आरशातल्या प्रतिमेशी खेळताना तर मुले वेडावून जातात. उजव्या हातात लाल रंगाचं व डाव्या हातात वेगळ्या रंगाचं खेळणं दिलं की आणखी मजा येते. कारण आरशातल्या हातांची अदलाबदल झालेली असते. उजवा-डावा शिकवण्यासाठी तर हा खेळ एकदम बेस्ट. पण मला सांगा, तुमची मुलं फक्त घराबाहेरच्या शाळेत शिकतात की घरातल्या शाळेतसुद्धा? मला कळवाल?