Home | Magazine | Pratima | school owner madhuri deshpande

बिनभिंतींची शाळा चालवणा-या माधुरी देशपांडे

मोहिनी घारपुरे | Update - Aug 10, 2012, 10:16 PM IST

एक बंद खोली आणि त्यामध्ये दाटीवाटीने बसलेली मुलं.. शिकवणारं कोणीतरी काहीतरी शिकवत असतं खरं पण सारं काही डोक्यात शिरतच असं मात्र नाही

  • school owner madhuri deshpande

    एक बंद खोली आणि त्यामध्ये दाटीवाटीने बसलेली मुलं.. शिकवणारं कोणीतरी काहीतरी शिकवत असतं खरं पण सारं काही डोक्यात शिरतच असं मात्र नाही .. त्यातून जी मुलं जेवढा ‘परफॉर्मन्स’ दाखवतील त्यावरच त्यांचं अस्तित्व आणि जगण्याची लायकी ठरवणार अशी आपली शिक्षण पद्धती. अनेक वर्षापासून हीच शिक्षण परंपरा आपण मान्य केलेली आहे त्यामुळेच मुख्य प्रवाहाच्या विरूद्ध पोहून ख-या अर्थाने बिनभिंतींची शाळा चालवण्यात यशस्वी ठरलेल्या पुण्याच्या माधुरी देशपांडे यांचे चोवीस वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेले ‘सर्वसमावेशक’शिक्षणाचे कार्य प्रत्येकाच्या मनात ठसते.
    एसएनडीटी महाविद्यालयामध्ये शिकवत असताना माधुरी यांना जाणवलं की, आपण सामान्य मुलं आणि काहीतरी कमी असलेली मुलं यांना शिकवताना फार फरक करतो. खरं तर तसं करण्याचं कारण नाही. पण आपण या मुलांना एकत्र शिकण्याची संधीच देत नाही. त्यामुळेच पुण्याला आल्यावर माधुरी यांनी ख-या अर्थाने सर्वसमावेशक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. थेट झोपडपट्टीतल्या मुलापासून ते अगदी श्रीमंताघरच्या मुलांपर्यत आणि सुदृढ मुलांपासून ते विशेष मुलांपर्यंत सा-यांना एकाच छताखाली, एकाच प्रकारच्या वातावरणात शिकण्याची संधी उपलब्ध करून देणारी शाळा अर्थात, अंकुर बालमंदिर 1988 मध्ये त्यांनी सुरू केली. अगदी दोन पाच मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेमध्ये सध्या पावणेतीनशे मुलं शिकत आहेत. यांपैकी तब्बल शंभर विशेष मुलं आहेत. ही सर्व मुले कोणत्या ना कोणत्या प्रकारची कमतरता असलेली आहेत. अशा तब्बल 29 प्रकारच्या कमतरतांना शाळेमध्ये असलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून हाताळले जाते. याकरिता एकूण 60 जणांचा स्टाफ कार्यरत आहे. असे असले तरीही माधुरीताई सांगतात, सुरुवातीला मी एकटीच काम करीत असे. तेव्हा दोघी मदतनीस होत्या. पहिली आठ वर्ष फक्त बालमंदिरच होतं. पहिली अडचण आली ती म्हणजे शिक्षकांची. नॉर्मल मुलं आणि स्पेशल मुलं यांना एकत्रितरीत्या शिकवता येऊ शकतं या मानसिकतेचे शिक्षकच नव्हते.. तसे शिक्षक आजही नाहीतच आणि पालकदेखील नाहीत त्यामुळेच मला सुरुवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं लागलं. पुढल्या वर्षी तुमच्या वर्गात कोणती मुलं शिकणार आहेत आणि त्यांना कशाप्रकारे शिक्षण द्यायचं हे या उन्हाळी प्रशिक्षणात आम्ही शिकवतो. शिक्षकांना मल्टिलेव्हल टिचिंग करता आलच पाहिजे, सर्व प्रकारच्या मुलांना एकत्रितरीत्या शिकवताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करता आला पाहिजे असे त्या सांगतात. वास्तविक सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्वसमावेशक शिक्षण पद्धती राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, परंतु या प्रयत्नाला मूर्त रूप देण्याचे कार्य मात्र अद्याप सरकारकडून झालेले नाही. त्यामुळेच माधुरी यांची ही बिनभिंतींची शाळा आदर्श ठरते. भविष्यात माधुरी यांना अशाच प्रकारे याच तत्त्वावरील महाविद्यालय सुरू करावयाचे आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा भरभक्कम पाठिंबा यामुळे माधुरी यांचे हे स्वप्नदेखील पूर्ण होईलच यात शंका नाही.
    mohini.gharpure@dainikbhaskargroup.com

Trending