आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Science mathamathicss' Curicity Increasing Institute Mutangan Exploartory Sciecne Centre

विज्ञान-गणिताची जिज्ञासा वाढवणारी संस्था ‘मुक्तांगण एक्स्प्लोरेटरी सायन्स सेंटर’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘सायन्स इज नॉट माय कप ऑफ टी’ असे बोलताना आपण खूप लोकांना ऐकत असतो. पण आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि गणिताचे महत्त्व खूपच असते. जाणते-अजाणतेपणे आपण विज्ञानाच्या संकल्पनांचा जगताना वापर करत असतो. पण विज्ञानाचा आपल्या जगण्यावरचा प्रभाव अधिक जाणून घ्यायचा असेल व विज्ञानातील गमतीजमती अनुभवयाच्या असतील तर पुण्यातील ‘मुक्तांगण एक्स्प्लोरेटरी सायन्स सेंटर’ला (एमईएससी) भेट द्यायलाच हवी. ही संस्था सेनापती बापट मार्गावर असून ती भारतीय विद्या भवनची संलग्न संस्था आहे. या संस्थेची स्थापना 20 वर्षांपूर्वी वैज्ञानिक डॉ. व्ही. जी. भिडे यांनी केली होती. विद्यार्थ्यांना शालेय पातळीपासून विज्ञान आणि गणिताची गोडी लागावी या उद्देशाने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. गेल्या 20 वर्षात ही संस्था देश आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरले असून विद्यार्थ्यांची जिज्ञासा अधिक जागृत करण्यासाठी, त्यांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी या संस्थेमध्ये आणि कोथरूड येथील एका केंद्रात विविध कोर्स शिकवले जातात.

या संस्थेमार्फत चालवले जाणारे कोर्स पुढीलप्रमाणे - प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान, हिवाळी आणि उन्हाळी कार्यशाळा, होमी भाभा परीक्षेत सहभागी होणा-यांना मार्गदर्शन, आंतरशालेय निबंध-प्रश्नमंजूषा स्पर्धा, सर्जनशीलता केंद्र, समाजविज्ञान केंद्र, शैक्षणिक सहल, पीआयसीसी प्रोग्राम फॉर कॉलेज स्टुडंट्स, विज्ञान व्याख्यानमाला, तारांगण, शिक्षक प्रशिक्षण शिबिर, अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स प्रोग्राम इन रिसर्च अँड एज्युकेशन (एएसपीआयआरई). या कोर्सेसव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकरिता दर रविवारी ‘अ डे विथ एक्सप्लोरेटरी’ असा एक उपक्रम राबवण्यात येतो, ज्यात मुलांना विविध प्रयोग करण्याकरिता लागणारी साधने दिली जातात.

शाळांना आधीपासून तारीख नक्की करावी लागते. त्यानुसार प्रत्येक शाळेला वेळ आणि दिवस दिले जातात. या कार्यशाळेची फीसुद्धा अत्यल्प आहे. विद्यार्थी या कार्यशाळेला आपल्या पालकांसोबतही भेट देऊ शकतात. येथे तासाला 20 रुपये एवढी अल्प फी भरून विद्यार्थी एक्स्प्लोरेटरीचा लाभ घेऊ शकतात.या संस्थेची पाचमजली इमारत आहे आणि प्रत्येक मजल्यावर 10,000 चौरस फूट जागा आहे. येथे 7 प्रयोगशाळा असून त्यात बायोलॉजी, अर्थ सायन्सेस, एन्व्हॉयर्नमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि कॉम्प्युटर या सातही प्रयोगशाळांत प्रत्येकी एक तज्ज्ञ शिक्षक आहे.

‘मुक्तांगण’चे कार्यकारी अध्यक्ष शंकर गोवारीकर यांच्या मते, या एक्स्प्लोरेटरीत 5वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता वार्षिक सभासदत्व देण्यात आले आहे. यासाठीचे शुल्क अत्यंत अल्प असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सभासदत्व मोफत आहे. संस्थेचे सभासदत्व मिळाल्यामुळे विद्यार्थी वर्षभर दर आठवड्यातून एक दिवस येथे येतो आणि सात आठवडे वेगवेगळ्या प्रयोगशाळेत प्रयोग करतो. सात आठवड्यांचे आवर्तन संपल्यावर परत पहिल्या प्रयोगशाळेत नवीन प्रयोगावर काम सुरू होते आणि अशा प्रकारे एक विद्यार्थी एका वर्षात 35 प्रयोग करतो. या प्रयोगांमध्ये अभ्यासक्रमातील आणि इतर विविध प्रयोगांचा समावेश होतो. अशा प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यांच्यातील सर्जनशीलता वाढू शकते. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोठेही ‘कोणत्याही वस्तूला हात लावू नये’ अशी सूचना वाचायला मिळत नाही. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून कोणतीही दुर्मिळ व किमती वस्तू हाताळायला देतात. या संस्थेत मूकबधिर विद्यार्थ्यांकरिताही कोर्सेस व क्लासेस चालवले जातात, पण ते कोर्सेस गरजेनुसारच आयोजित करण्यात येतात. महिलांकरिता किचन सायन्स कोर्सही चालवण्यात येतो. त्यात स्वयंपाकघरात विज्ञानाचा उपयोग कशा प्रकारे होतो आणि त्याचे किती लाभ होतात याची माहिती दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांकरिता कॉम्प्युटर कोर्सचे आयोजनही कोथरूड येथील केंद्रामध्ये आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : मुक्तांगण एक्स्प्लोरेटरी सायन्स सेंटर, भारती बक्षी, 409 ए 410 अ, शिवाजीनगर, भारतीय विद्या भवन चौक, अ‍ॅक्सिस बँकेजवळ, पुणे-411 016.
दूरध्वनी क्र : 020 -25677962, 020 -25677465.
वेळ : सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत (सोमवार ते शनिवार)
इमेल : bvb_exploratory@yahoo.com
वेबसाइट : www.bvbexploratory.org.in