आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: जलतरंग तयार करा आणि संगीतकार बना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी जलतरंग पाहिलाय आणि ऐकलाय का? आज तुम्ही स्वत: जलतरंग बनवायचाय आणि वाजवायचासुद्धा. प्रयोगाचे साहित्य अगदी सोपे आहे. प्रयोग झाल्यानंतर साहित्य जिथल्या तिथे ठेवले तरी चालेल. एकाच आकाराचे सहा-सात काचेचे किंवा धातूचे बाऊल्स किंवा ग्लास, एकाच आकाराच्या अन् एकाच उंचीच्या बाटल्या. यापैकी काहीही. सर्व बाऊल्स ओळीने मांडा. एक लाकडी पट्टी, दांडू, काचेची दांडी, अगदी लहान रवी, पेन्सिल यापैकी काहीही चालेल. हे सर्व आणले तर फारच उत्तम.


ग्लासमध्ये पाणी ओता. पहिल्या ग्लासमध्ये जेवढे पाणी ओताल त्याहून कमी दुस-यामध्ये, त्याहून कमी तिस-यामध्ये, अशा क्रमाने सर्व ग्लासमध्ये पाणी ओता. आता लाकडी पट्टीने ग्लासच्या बाजूने आघात करा. प्रत्येक ग्लासमधून येणारा आवाज वेगळा असेल. ज्या ग्लासमध्ये पाणी अधिक आहे त्यामधून कमी कंपनसंख्येचा आवाज, तर कमी पाणी असलेल्या ग्लासमधून उच्च कंपनसंख्येचा आवाज निघतो. ज्या वस्तूने तुम्ही आघात करता त्याप्रमाणे निघणारा ध्वनी बदलतो हे तुमच्या चटकन ध्यानात येईल.


ध्वनी हा माध्यमामधून वाहणा-या तरंगांच्या कंपनसंख्येवर अवलंबून असतो. ‘सारेगमपधनीसा’ याप्रमाणे ग्लासमधून निघणा-या आवाजाबरोबर जुळवून घेण्यासाठी थोडी अधिक खटपट करावी लागेल. पहिला स्वर ‘सा’ लावून त्या अनुरूप आवाज निघेपर्यंत ग्लासमधील पाण्याची पातळी वाढवत जा. एकदा ‘सा’सारखा आवाज यायला लागला की दुसरा ग्लास ‘रे’बरोबर जुळवा. सातही स्वरासारखी ग्लासमधील पाण्याची पातळी जुळवली म्हणजे तुमचा जलतरंग तयार. तुम्हाला गाण्याचे थोडे अंग असेल तर तुम्ही जलतरंगाची साथसुद्धा करू शकाल. या प्रयोगामध्ये आणखी सुधारणा करणे सहज शक्य आहे. काच, धातू आणि चिनीमातीचे बाऊल्स यापैकी कोणत्या पदार्थामधून निघणारा आवाज अधिक मधुर आहे हे पाहणे अधिक मजेचे आहे. जसे-काच, धातू आणि चिनीमातीच्या पोकळ बाऊल्समधून आवाज निघतो तसे तो भरीव लाकडामधूनही निघतो. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे जलतरंग हे पूर्ण भारतीय वाद्य आहे. त्याचा उल्लेख भारतीय 64 कलेमध्ये केलेला आहे. एकाच व्यासाच्या पण निरनिराळ्या लांबीच्या दंडगोलाकार लाकडी तुकड्यामधूनसुद्धा वाद्य बनवता येते. याला काष्ठतरंग म्हणतात. अर्थात हे सारेगामाप्रमाणे जुळवणे अधिक कौशल्याचे आहे.