आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: स्टेथॅस्कोप-श्रवणयंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळ स्टेथॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ छाती. छातीमधील ध्वनी ऐकण्याचे उपकरण म्हणजे स्टेथॅस्कोप. कधी डॉक्टरांच्या दवाखान्यात जायची वेळ आलीच तर त्यांच्या परवानगीने स्टेथॅस्कोप आपल्या कानास लावून आपल्या हृदयाचे ठोके ऐकून पाहा.


आधी स्टेथॅस्कोपचे कार्य कसे चालते त्याचा अभ्यास करूया. डॉक्टरकडे असलेल्या स्टेथॅस्कोपमध्ये छातीला लावण्याचा एक चकतीसारखा भाग एका प्लास्टिकच्या नळीस अडकवलेला असतो. चकतीमध्ये एक पातळ झडप असते. याला डायफ्रॅम म्हणतात. हृदयाच्या ठोक्यामधून निघणारा आवाज चकतीमुळे मोठा होतो. रबरी नळीवाटे तो कानामध्ये अडकवलेल्या दोन इयर प्लगपर्यंत वाहून नेला जातो. छातीमध्ये निर्माण झालेल्या ध्वनीचे कानापर्यंत वहन होताना तो कमी होऊ नये यासाठी रबरी नळ्यांचा उपयोग होतो.


आपण आज फक्त आपण बनवलेल्या उपकरणाने हृदयाचे ठोके सरळ ऐकता येतील यासाठी सोपे पण सोयीचे उपकरण बनवणार आहे. आजच्या प्रयोगासाठी साहित्य फार लागणार नाही. एक फुगा, सूत गुंडाळण्यासाठीचा कागदी किंवा पुठ्ठ्याचा कोन, जत्रेमध्ये अशा कोनपासून बनवलेली पिपाणी मिळते. ती थोड्याच दिवसात निकामी होते. असा रिकामा कोन मिळवा. त्याच्या रुंद बाजूच्या तोंडावर रबराचा फुगा ताणून बांधा. रबरी फुगा डायफ्रॅमसारखे काम करेल. तुमचा स्टेथॅस्कोप तयार झाला.


ज्याच्या हृदयाचे छातीचे ठोके ऐकायचे आहेत त्याच्या छातीवर डाव्या बाजूस तुमचा स्टेथॅस्कोप टेकवा. टेकवलेला पृष्ठभाग शक्यतो सपाट असावा. आता दुस-या अरुंद बाजूला तुमचा कान टेकवा. तुम्हाला स्पष्ट छातीचे ठोके ऐकू येतील. ‘लब डब’ असा आवाज एकदा-दोनदा ऐकला म्हणजे तुम्हाला आवाजाची सवय होईल. सध्या प्रत्येकाच्या मोबाइअलमध्ये स्टॉप वॉच आहे. मोबाइल मिळालाच नाही तर सेकंद काटा असलेल्या घड्याळाच्या साहाय्याने तीस सेकंदात किती हृदयाचे ठोके पडतात ते मोजा. त्यांची संख्या दुप्पट केली म्हणजे दर मिनिटास किती ठोके पडतात हे समजेल.


या उपकरणाने घरातील सर्व व्यक्तींच्या हृदयाचे ठोके मोजून पहा. आजोबा, आजी झोपून उठल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा कमी, व्यायाम करून नुकतेच घरी आलेल्या भावाचे ठोके अधिक किंवा तीन जिने चढून घरी आलेल्या पाहुण्यांच्या हृदयाचे ठोके मिनिटास शंभराहून अधिक पडत असल्याचे तुम्हाला कळेल. गरम पाण्याने स्नान केल्यानंतर ठोके किती पडतात हे पहा. एक उपयुक्त सूचना छातीवर स्वेटरसारखे जाड कपडे असतील तर हृदयाच्या ठोक्यांचा आवाज नीट येणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजणार ती स्त्री, मुलगी असेल तर पाठीवर तुमचा स्टेथॅस्कोप लावल्यास आवाज स्पष्ट येईल. तुमची वहिनी, ताई गर्भवती असेल तर अगदी पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोकेसुद्धा तुम्ही ऐकू शकता. आहे की नाही गम्मत. सर्वसामान्यपणे विश्रांती घेत असलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मिनिटास 70 ते 72 असतात. सतत पळणा-या, गडबड करणा-या मुलांचे ठोके अधिक तर वृद्ध व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बहात्तरपेक्षा कमी असतात.