Home »Magazine »Divya Education» Science From Mothertung

मातृभाषेतून विज्ञान

अनिल गोरे | Jan 09, 2013, 12:42 PM IST

  • मातृभाषेतून विज्ञान

महाराष्ट्र एस.एस.सी./एच.एस.सी. बोर्डाने परिपत्रक क्र. रा. मं. परीक्षा - 2 /7504 दि. 15/ 10/ 2012 याद्वारे बोर्डाच्या सर्व विभागीय कार्यालयांना पाठवून तेच परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठवण्याची सूचना त्यात दिली. 12 वी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर सर्वत्र पोचलेले हे परिपत्रक वाचल्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिकवणी चालक यांनी मला त्यांच्या शंका विचारल्या. माझ्या आकलनानुसार माझ्या अभ्यासपूर्ण मतांनुसार त्यांची उत्तरे पुढे देत आहे. अधिक अचूक माहितीसाठी बोर्डाच्या विभागीय कार्यालयांशी किंवा राज्य मुख्यालयात 020 -25705000/ 020-25705272 या क्रमांकावर संपर्क साधून सर्वांनी परीक्षा मराठीतून देण्याचा निर्णय घ्यावा, असे मी सुचवतो !

प्रश्न :12 वी सायन्स भौतिक, रसायन, जीवशास्त्र, गणित परीक्षा वर्षानुवर्षे इंग्रजीतून होते, ती मराठीतून का द्यावी?
उत्तर :या विषयांचे आकलन इंग्रजीपेक्षा मराठी भाषेतून अधिक चांगले होते. हे विषय इंग्रजीतून शिकलेल्याना इंग्रजी शब्द पाठ झाले पण त्यांचे अर्थ कळले नाहीत, असा सार्वत्रिक अनुभव आहे. हे विषय पदवीपर्यंत हिंदी, तामिळ, कन्नड, गुजराती, बंगाली, पंजाबीत शिकलेल्यांना मात्र शब्दही पाठ झाले आणि त्यांचे अर्थही कळले. हे विषय मराठीतून शिकल्यास मराठी भाषकांना असाच लाभ होईल.

प्रश्न : इ. 12 वीची भौतिक, रसायन, जीवशास्त्र, गणित विषयांची परीक्षा मराठीतून दिल्यास विशेष लाभ होतो का ?
उत्तर :होय ! 12 वीच्या आणि सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळतात. गुण वाढले की नामवंत महाविद्यालयात देणगीशिवाय प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते, लाखो रुपये वाचतात. विषयातील संकल्पना नीट समजतात आणि पुढील आयुष्यात त्याचा खूप उपयोग होतो.

प्रश्न : 12 वीच्या पुढील शिक्षण मराठीतून उपलब्ध आहे का ?
उत्तर : - 11 वी, 12वीत वरील विषयांचे शिक्षण आपण गेली अनेक वर्षे मराठीतून न घेतल्याने पुढील शिक्षण मराठीतून देण्याच्या सोयी आजवर नव्हत्या. अलीकडे 12 वी शास्त्र (सायन्स) परीक्षा शेकडो विद्यार्थी मराठीतून देऊ लागल्याने पुढील शिक्षण मराठीतून देण्याची मागणी होऊ लागली. येत्या दोन वर्षात अभियांत्रिकी पदविका (इंजि. डिप्लोमा) मराठी माध्यमातून सुरू होईल. मराठीतून 12 वी शास्त्र परीक्षा देणारे विद्यार्थी वाढले की बी. ई./ एमबीबीएस/ एमबीए/ आणि इतर सर्व अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण मराठी या दर्जेदार आणि समृद्ध भाषेतून मिळेल. हे अभ्यासक्रम तामिळनाडूत तामिळ माध्यमात सुरू झाले आहेत. या वर्षी भोपाळ येथे हिंदीतून एमबीबीएस सुरू झाले आहे. हे अभ्यासक्रम तेलुगू , गुजराती, बंगाली, पंजाबी, मल्याळी, कन्नड, संस्कृत माध्यमातून सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांचे विषय अधिक चांगले समजतात. सर्वांनी मराठीतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणिताचा अभ्यास मराठीतून करावा, परीक्षा मराठीतून द्यावी.

प्रश्न : 12 वी शास्त्र भौतिक, रसायन, जीव, गणित परीक्षा मराठीतून दिल्यास पुढील काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाला बंदी असते का ?
उत्तर : नाही ! वरील विषयांत 12 वी उत्तीर्ण असणे ही प्रवेशासाठी पात्रता असलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास 12 वीची परीक्षा मराठीत दिल्याने अडथळा येत नाही.

प्रश्न : 12 वी शास्त्र ( सायन्स) भौतिक, रसायन, जीव, गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठीतून मिळतात का ?
उत्तर : होय ! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मंडळ विनियम 1977 मधील नियम क्र. 86 नुसार ऑक्टोबर 1977 पासून भौतिक, रसायन, जीव, गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठीतून काढल्या जातात. ज्यांनी आपल्या अर्जात या विषयांसाठी उत्तराची भाषा म्हणून मराठीची निवड केली असेल, त्यांना त्या विषयांच्या मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका दिल्या जातात.

प्रश्न : प्रश्नपत्रिका मराठीतून तरी उत्तरे मराठीतून लिहिता येतात का ?
उत्तर : - होय! ज्यांनी भौतिक, रसायन, जीव, गणितसाठी परीक्षा अर्जात मराठी ही उत्तराची भाषा निवडली ते या विषयांच्या उत्तरपत्रिका मराठीतून लिहू शकतात.

प्रश्न : भौतिक, रसायन, जीव, गणित विषयांसाठी परीक्षा अर्जात उत्तराची भाषा म्हणून मराठी निवडता येते ही माहिती अगोदर नसल्याने 12 वी परीक्षा अर्जात इंग्रजी ही उत्तराची भाषा निवडली असेल तर परीक्षेपूर्वी उत्तराची भाषा बदलून मराठी निवडता येते का ?
उत्तर : हो ! हो !! आणि होय !!! परीक्षा अर्ज भरून झाल्यावरदेखील अगोदर निवडलेली उत्तराची भाषा इंग्रजी असेल तर बदलून त्याऐवजी मराठीची निवड करता येते. यासाठी साध्या कागदावर एक अर्ज आपल्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याकडे द्यावा. अर्जात विद्यार्थ्याचे नाव, शाळा/ महाविद्यालयाचे नाव आणि संकेतांक, 12 वीच्या मूळ परीक्षा अर्जातील निवडलेल्या विषयाचे नाव, त्या विषयासाठी अगोदर निवडलेली उत्तराची भाषा व तिचा संकेतांक आता बदलून उत्तराची जी भाषा निवडायची असेल, त्या भाषेचे नाव व संकेतांक इ. माहिती विषयवार द्यावी.

प्रश्न : भौतिक, रसायन, जीव, गणित यापैकी काही विषयांसाठी उत्तराची भाषा मराठी आणि काहींसाठी इंग्रजी निवडता येते ?

उत्तर : होय ! वरील विषयांपैकी काही विषयांसाठी उत्तराची भाषा म्हणून मराठी आणि काहींसाठी इंग्रजीची निवड करता येते.

प्रश्न : शाळेत /महाविद्यालयात हे विषय इंग्रजीतून शिकवत असले तरी त्या विषयांसाठी उत्तराची भाषा म्हणून मराठीची निवड करता येते ?
उत्तर : होय! वरील विषय वर्गात इंग्रजीतून शिकवत असले तरी परीक्षा लिहिताना विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास उत्तराची भाषा म्हणून मराठीची निवड करता येते. वर्गात इंग्रजीत शिकवले जाते म्हणून उत्तराची भाषा मराठी निवडलेला अर्ज स्वीकारण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिल्यास त्यांना बोर्डाकडून नियमांची माहिती घेण्याची नम्र विनंती करावी.

प्रश्न : 11 वी आणि 12 वी शास्त्र शाखेतील चालू अभ्यासक्रमासाठी कोणत्या विषयांची पुस्तके मराठीतून उपलब्ध आहेत ?
उत्तर : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांची पुस्तके 11 वी आणि 12 वीच्या अभ्यासाठी मराठीतून उपलब्ध आहेत.

Next Article

Recommended