आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्युओमार्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या मोबाइलमधील कॅल्क्युलेटर पाहा किंवा घड्याळ. ब-याचदा ते आपण नेहमी वापरत असलेल्या कॅल्क्युलेटर किंवा घड्याळासारखे असते. म्हणजे गोल घड्याळ आणि फिरणारे काटे तसेच चौकोनी कॅल्क्युलेटर, त्यावर चौकोनी बटणे आणि एक रुंद आयताकृती खिडकी. खरे तर घड्याळ आकड्यांच्या स्वरूपातही उपलब्ध असते आणि त्यात ते सेकंदाचा दहावा भागही दाखवू शकते, पण बरीच माणसे पडद्यावरही गोल घड्याळ पसंत करतात. जे मेल आपल्याला काढून टाकायचे असते ते आपण ट्रॅश कॅनमध्ये टाकतो. त्याचा आकार ख-या कचरापेटीसारखा असतो. असे का, हा विचारही आपल्या मनात येत नाही. खरं तर या सा-यांना कोणताही आकार असू शकतो. त्यामुळेच अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या हे पारंपरिक आकार झुगारून द्यायच्या प्रयत्नात आहेत. त्यांना स्क्यूओमॉर्फ म्हणतात. या शब्दाचा अर्थ काय आणि स्क्यूओमॉर्फ इतके लोकप्रिय का आहे?


1890 मध्ये हेन्री कॉलिमार्च या पुरातत्त्ववेत्त्याने हा शब्द वापरला. आदिमानव काळात माणूस काठीला दगड मानून हातोडीसारखा वापरत असे. हे बांधण्यासाठी वापरल्या जाणा-या कातडी पट्ट्याला थौंग असे म्हणत असत. आता हातोडी आली आणि थौंगची गरज नाहीशी झाली. पण सवयीने लोक विसाव्या शतकातही थौंग वापरत असत. अशा गरज नसलेल्या पण सवयीने वापरल्या जाणा-या उत्पादनाला किंवा त्याच्या भागाला स्क्यूओमॉर्फ म्हणतात. मोबाइल फोन, संगणक आणि टॅब कंपन्या अनेक पारंपरिक आकार वापरतात, कारण ते आपल्या जाणीव- नेणिवेचा भाग आहेत.


माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. त्यांना लाखो लोकांप्रमाणे रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला ऐकायला आवडत असे. त्यांनी रेडिओ सिलोनचे अनेक कार्यक्रम कॅसेटवर रेकॉर्ड करून ठेवले आहेत आणि आजही ते रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला ऐकतात. खरं तर जुन्या पिढीतील बहुतेक मंडळी या स्क्यूओमॉर्फ संस्कृतीचे बळी आहेत. पूर्वी दिवाळी अंकासाठी लेख मागवताना एक वाक्य असायचे, ‘पाठपोट लिहिलेले स्वीकारले जाणार नाही.’ मी एका संपादकांना म्हटले, ‘अहो पाठपोट लेखन पूर्वी का चालत नसे माहीत आहे?’ ते म्हणाले, ‘का?’ ‘पूर्वी ट्रेडल प्रेसवर लिहिलेली कॉपी जुळवण्यासाठी अनेकदा शाई लागलेल्या कागदावर किंवा ब्लॉकवर ठेवली जाई. ते वाचत कम्पोझिटर जुळणी करायचा आणि लिहिलेल्या कागदाची मागची बाजू काळी व्हायची. त्यामुळे तेव्हा तो आग्रह ठीक होता. पण आता आपण डीटीपीवर टाइप करून ऑफसेटवर छपाई करतो. तेव्हा पाठपोट लिहिलेले स्वीकारले तर 50% स्टेशनरी वाचेल.’ त्यांनी याला मान्यता दिली. ही 1990च्या दशकातील गोष्ट आहे. तेव्हा बहुतेक पत्रकार हाताने लिहीत.


तंत्रज्ञान जसजसे प्रगत होते तसतशा अनेक गोष्टी अंगवळणी पडतात, पण जुन्या तंत्रज्ञानाचे काही फायदेही असतात. उदाहरणार्थ, डायल करायचे फोन होते त्या काळात अनेक फोन नंबर पाठ असत. मोबाइल आला आणि फोन नंबर लक्षात ठेवायचे कामही तोच करू लागला. हे झाले सामान्य माणसांचे; पण कलावंतांचे काय? एकेकाळी दिवसभराचे शूटिंग संपल्यावर नंतरच निगेटिव्ह धुऊन झालेल्या शूटचे रशेस पाहायला मिळत. आता एक शॉट घेतल्यावर तो लगेच कॅमे-याला जोडलेल्या टीव्हीवर पाहता येतो. हे तंत्रज्ञान 1996-97नंतर विकसित झाले. मला आठवतंय, इंदरकुमारच्या एका सिनेमाच्या वेळी करिश्मा कपूर आपला प्रत्येक शॉट कसा झालाय, हे तपासून पाहत असे. यामुळेच सिनेमा बोलू लागल्यावरही चार्ली चॅप्लिन मूकपट बनवत होता किंवा रंगीत छायाचित्रण आले तरी रिचर्ड अ‍ॅवडनसारख्या किंवा सेबास्तियो सल्गाडोसारख्या छायाचित्रकारांनी आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्या दिग्दर्शकाने ‘शिंडलर्स लिस्ट’ चित्रपटासाठी रंग नाकारून कृष्णधवल माध्यमच पसंत केले. डिजिटल तंत्रज्ञानातील अनेक शक्यता पारंपरिक आकारामुळे मर्यादित होतात, त्यामुळे टॅब कंपन्या ते नाकारत आहेत. उलट तंत्रज्ञानाच्या सोयीने जेव्हा जेव्हा कलावंताला सर्जनशीलतेवर बाधा येतेय असे वाटले, तेव्हा तेव्हा त्याने ते नाकारले आहे. सर्जनशीलतेच्या प्रवासातील हाही अनिवार्य टप्पा असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

shashibooks@gmail.com