आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवाजी महाराज शोध आणि बोध’ लवकरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथील फुले-आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते दिलीप सुरवाडे हे सातत्याने सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक लेखन करीत आहेत. राष्‍ट्रीय महापुरुष आणि त्यांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांची खरी माहिती वाचकांना उपलब्ध झाली पाहिजे, याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. त्यांचे ‘शिवाजी महाराज : शोध आणि बोध’ हे इतिहासावर आधारित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.


सामाजिक अन् आत्मभान जपून संवेदना बोथट झालेल्या समाजाच्या डोळ्यात शब्दरूपी झणझणीत अंजन घालणे हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांची आजपर्यंत दीड डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील बहुतांश महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचे विचार आणि कार्य, अशा सामाजिक विषयांवर आहेत. मात्र, सुसंस्कृत भारताचे आशास्थान असलेल्या नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा अचूक इतिहास, संदर्भ माहीत व्हावे म्हणून त्यांनी ‘शिवाजी महाराज : शोध आणि बोध’ हे इतिहासावर आधारित पुस्तक लिहिण्याचा पहिला प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षभरापासून ते पायाला भिंगरी लावून या पुस्तकासाठी अचूक पण दुर्मिळ संदर्भ शोधण्याच्या कामात गुंतले आहेत. वाचकांची उत्कंठा वाढवणा-या या पुस्तकाची मांडणी जवळपास पूर्ण झाली असून ते लवकरच प्रकाशित होणार आहे. इतिहासावर आधारित मराठी साहित्याचा अनुबंध वाढण्याच्या दृष्टीने त्यांचा हा लिखाणाचा व्यासंग मोलाचा ठरणार आहे. ‘साहित्य हे समाजाचा आरसा असते.


समाजाचे निखळ प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे. आपण किती पुस्तके लिहिली त्यापेक्षा समाजासाठी ती कितपत उपयोगी पडली? याचा विचार साहित्यनिर्मिती करताना नवोदित लेखकांनी आवर्जून केला पाहिजे,’ असा संदेशही ते आपल्या लिखाणाच्या माध्यमातून वेळोवेळी देत आहेत. एवढेच नव्हे तर वाचन चळवळ समृद्धशाली होण्यासाठीही त्यांचे एक पाऊल पुढेच असते, हे विसरता येणे शक्य नाही. इतिहासाच्या झरोक्यातून लिहिलेल्या नव्या पुस्तकात अचूक आणि वेधक असे शिवाजी महाराजांचे संक्षिप्त जीवनकार्य, शिवराज्याभिषेक आणि तत्कालीन सामाजिक चित्र, असे वैशिष्ट्यपूर्ण लेखन करण्यात आले आहे.


चळवळीला आपला जीव की प्राण समजणारे सुरवाडे हे इतिहासावर आधारित नव्या पुस्तकातून नेमका काय सामाजिक संदेश देतात? याची सुजाण वाचकांना निश्चितच उत्सुकता आहे. दिलीप सुरवाडे म्हणतात की, ‘साहित्य सेवेमुळेच मला सत्कीर्ती मिळाली. विद्येची देवता सरस्वतीने माझ्यावर वरदहस्त ठेवला पण; लक्ष्मीने दुर्लक्ष केले. या दोघींचा संगम होईल की नाही? ते भविष्यकाळच ठरवेल’. त्यांच्या ‘चर्मकार समाज आणि आंबेडकरवाद’ या पुस्तकाला अखिल भारतीय सत्यशोधक साहित्य संमेलनाचा ‘आदर्श साहित्य’ पुरस्कार लाभला आहे. एवढेच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी ‘महात्मा फुले : शैक्षणिक विचार व कार्य’ या संपादित पुस्तकाला महाराष्‍ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार मिळाला आहे.


महापुरुषांची समाजसेवा असा विषय घेऊन पीएच.डी. करणा-या संशोधक विद्यार्थ्यांसाठी सुरवाडे यांनी चिकित्सकपणे संपादन व लेखन केलेल्या ‘थोर समाजसुधारक गाडगेबाबा’ या पुस्तकाची भरीव मदत होत आहे. गाडगेबाबांच्या ठळक कार्याची माहिती, बाबांच्या कार्याचा समाजमनावर कसा प्रभाव पडायचा? यातून लोकांच्या मानसिकतेत कसा बदल व्हायचा? यावर त्यांनी या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे. अमृताची फुले, जीवनबोध, नामदार शरद पवार, शेतक-यांसाठी लढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, शाहू महाराजांचा वेदोक्त लढा, धर्मांतरच का?, लोकशाही : एक चिंतन, कबीर - तुकाराम, भारताच्या प्रथम महिला राष्‍ट्रपती - प्रतिभाताई पाटील यासह त्यांची 19 पुस्तके आजमितीपर्यंत प्रकाशित झाली आहेत. लवकरच वाचकांच्या भेटीला येत असलेले ‘शिवाजी महाराज : शोध आणि बोध’ हे त्यांचे 20 वे पुस्तक असेल.


मुलाखत - आनंदा पाटील, भुसावळ.