आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरं बालपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मानवी जीवन गुंतागुंतीचं आहे, त्यात क्लिष्टता आहे याचंच हे द्योतक आहे. त्यातही साठी ओलांडली की ही जटिलता वाढतच जाते. गणिती पद्धतीनं हे दाखवता येणार नाही. ते कळायला त्या अवस्थेपर्यंत पोचायला हवं. बोरिस पास्तरनाक यांच्या ‘डॉ. झिवॅगो’च्या तोंडी एक वाक्य आहे. जीवनाच्या अंतापर्यंत जगत राहणं हा काही पोरासोरांचा खेळ नव्हे.
असं असलं तरी जीवन जगावं हे लागतंच. किती जगायचं हे ठरवायचा अधिकार आपल्याला नाही, पण कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार देवानं दिला आहे. केवळ जगण्याचाच नव्हे तर जगात जे काही आहे त्या सगळ्याचा स्वीकार करून त्याचा उचित विनियोग करण्याचं शहाणपण म्हणजे वार्धक्य. वार्धक्य शब्दाचा वृद्धीशी संबंध आहे. वाढत्या वयाबरोबर शहाणपण, सहनशीलता, तडजोड करण्याची क्षमता हे सगळं वाढलं नसेल तर केवळ वयच वाढलं असं होईल.

माणूस दीर्घायुषी होत जातो तेव्हा त्याचे समवयस्क आणि काही वेळा त्याचे कनिष्ठ परिवारजनही त्याच्या आधी निघून जातात. अशा वेळी जीवेत् शरद: शतम् असा कुणीतरी दिलेला आशीर्वाद खरा ठरताना एकटेपण येतं. हा एकटेपणा घालवतील असे आपल्या आवडीचे काही छंद माणसाने जीवनात जोपासायला हवेत. माणूस पन्नाशीत म्हणजे प्रौढावस्थेत येतो तोवर त्याने येणारी वृद्धावस्था व्यवस्थित जगण्यासाठी व्यावहारिक आणि वैचारिक अशा दोन्ही भूमिकांतून तयारी करायला हवी. यासाठी आपल्या आवडीचे विषय शोधून काढायला हवेत. तरुण वयात किंवा प्रौढत्वात जे आवडतं ते वार्धक्यातही तसंच आणि तितकंच आवडत नाही, हेही लक्षात घ्यायला हवं.

अमेरिकेतील एक धनाढ्य युवक मधुचंद्रासाठी पॅरिसला गेला. रंगीन पॅरिसविषयी त्यानं खूप ऐकलं होतं. पॅरिसमध्ये हे जोडपं महिनाभर राहिलं. दोघेही अमेरिकेस परतले आणि वडिलांच्या औद्योगिक साम्राज्यात सर्वोच्च ठिकाणी त्यानं कामाला सुरुवात केली. पुढची पन्नास वर्षं आपल्या उद्योगात तो इतका बुडाला की तीव्र इच्छा असूनही तो पुन्हा पॅरिसला जाऊ शकला नाही. त्याने जीवनाच्या आठव्या दशकात प्रवेश केल्यावर त्याच्या मुलांनी त्याच्या औद्योगिक साम्राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आता त्याला थोडी मोकळीक सापडली. त्यानं आपली पॅरिसला पुन्हा भेट द्यायची दीर्घकाळची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. आता पॅरिस खूपच सुधारलं होतं. प्रशस्त हॉटेल्स, हिंडणं -फिरणं, मौजमजा करणं या सगळ्यात खूपच भर पडली होती. या वृद्ध गृहस्थाने आपल्या पहिल्या भेटीतले रोमांचक प्रसंग आठवून ते सगळं पूर्ववत अनुभवण्याचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक, पहिल्या भेटीसारखा अपूर्व आनंद तो मिळवू शकला नाही. त्यानं आपल्या पत्नीपाशी तक्रार केली, ‘डार्लिंग, हे पॅरिस आता पहिल्यासारखं राहिलं नाही; आपण पहिल्यांदा आलो त्या वेळी जी गंमत, जी मजा आली तशी आता वाटत नाही, सगळं पार बदललंय.’ पत्नी शहाणी होती. किंचित हसून म्हणाली, ‘इथलं काहीच बदललं नाही डिअर, सगळं तेच आहे, आपण मात्र बदललो आहोत.’

आपण बदललो असल्याच्या आंतरिक अनुभूतीचा हा मुद्दा नीट समजून घ्यायला हवा. वयाच्या पाचव्या वर्षी सागरगोटे आवडीनं खेळणा-या मुलीला सत्तरीतही तो खेळ तितकाच आवडत असेल तर त्याला मनोरुग्णता म्हणायला हवं - मानसिक विकास थांबला आहे हाच त्याचा अर्थ. लहानपणी आपण विटीदांडू ज्या हिरिरीने आणि आरडाओरडा करत खेळलो तो आनंद सत्तरी गाठल्यावर त्याच खेळात शोधण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्याला मानसिक जडत्व म्हणायला हवे. सागरगोटे किंवा गोट्यांच्या खेळाचं जीवनात एका विशिष्ट काळी स्थान असतं. वयाच्या पंचविशीत प्रियकर किंवा प्रेयसीवर जितकं प्रेम असतं तितकंच प्रेम पाच वर्षांच्या मुलीचं सागरगोट्यावर आणि सात वर्षांच्या मुलाचं गोट्यांवर असू शकतं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण या म्हणीचा अर्थ इतकाच की बाल्यावस्थेतलं निरागसपण आणि चिंतामुक्त अवस्था वार्धक्यात पुन्हा यायला हवी. बाल्यावस्थेतल्या निरागसपण आणि चिंतामुक्तीचं कारण नासमज हे असतं. आता वृद्धावस्थेत या दोन्ही गोष्टींचा जाणतेपणाने विकास करायला हवा. कुठे काही उणीव असेल, काळजीचं कारण असेल, तरीही अनुभव, वैचारिक समृद्धी आणि व्यवहारकुशलतेच्या बळावर तशा परिस्थितीतही निरागस आणि चिंतामुक्त राहण्याचा प्रयास करायला हवा. हे एका रात्रीत जमणार नाही. यासाठी माणसानं स्वत:चं शिक्षण करायला हवं.

देशाच्या विभाजनाच्या पूर्वसंध्येला बंगालमध्ये घडत असलेल्या जातीय दंगलींच्या वेळी महात्मा गांधी दंगलग्रस्त भागात फिरत होते. त्या वेळी वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. माणसानं नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचा यत्न अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवायला हवा, असा सोनेरी सल्ला सुज्ञ आणि विद्वान माणसं देत असतात. वय वाढलं की जटिल तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वस्तूचा वापर शिकणं अवघड बनतं. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीनं अशा गोष्टी आत्मसात केल्या तरी ते अपवादात्मकच. आता या वयात माहिती वा ज्ञानाचा ढीग गोळा करण्याची गरज नाही, पण जे काही प्राप्त केलेलं आहे त्यात खोल उतरायचं की नाही हे कळण्याचा विवेक जरूर असायला हवा. इथे प्राप्तीचा अर्थ बँकेची खाती, शेअर बाजारातली गुंतवणूक किंवा देण्याघेण्याचे व्यवहार असा नाही. या सगळ्या गोष्टींवर सजग नजर असूनही त्यापासून होता होईल तितकं दूर राहणं यातच ज्येष्ठता आहे. या दूर राहण्याचा अर्थ ‘मी पैशाला स्पर्शही करत नाही,’ असं म्हणणा-या साधू वा बाबांच्या जमातीत जाणं असाही नाही. चेकबुक व पासबुकबद्दल असलेली जवळीक, त्याबद्दलची आत्मीयता कमी करत जाण्याचं भान राखलं म्हणजे झालं. कॉम्प्युटर ऑपरेट करता आला नाही तरी चालेल, कॉम्प्युटरवर काम करता आलं नाही तरी चालेल, हायफाय मोबाइलच्या सर्व सोयींचा उपयोग करता आला नाही तरी काही बिघडत नाही. आता शिकायचं एकच. उरलेली वर्षं जडभारी न होता हलकी, फुलासारखी आणि उज्ज्वल कशी बनतील एवढंच!
क्रमश:
अनुवाद-डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर
dinkarmjoshi@rediffmail.com