आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्तित्वाचा भार नको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उरलेलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे शांतपणे जगावं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. असं आयुष्य मुला-सुनांबरोबर, नातवंडांबरोबर जगता येणं हे सुदैव आहे. काही ठिकाणी असं दिसतं की मुलासुनांशी बर्‍यापैकी पटत असूनही आईवडील जवळपासच अलग राहतात. त्यांच्या सोयीसाठी मुलांच्या कुटुंबापैकी कुणी न कुणी रोज येत-जातही असतं. अशा एका ज्येष्ठांना मी एकदा विचारलं की तुम्ही दोघं वेगळे का राहता? ते म्हणाले, ‘आमच्या कोणत्याही मुलाकडे राहण्यात कोणतीच अडचण नाही, पण तिथे प्रत्येकाचा वेगवेगळा अग्रक्रम असतो आणि ते आम्हा दोघांच्या अग्रक्रमापेक्षा अगदी भिन्न असतात. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षी एक प्रकारची अस्वस्थता वाटत राहते. तसे कुणालाच वाटू नये यासाठी आम्ही हा पर्याय निवडला आहे.’
प्रत्येक वृद्ध मातापित्यांना मनातून असं वाटत असतं की मुलानं किंवा सुनेनं घराबाहेर पडताना आपली परवानगी घेतली नाही तरी चालेल; पण आपण कुठे जातोय, कधी परत येणार आहोत, याबद्दल सांगून जावं. नोकरी-उद्योगासाठी घराबाहेर पडणार्‍या मुलांनी आणि सुनांनी आपल्यासाठी रोज थोडा तरी वेळ काढावा. अशा उद्योगासाठी बाहेर पडणार्‍यांजवळ स्वत:चा म्हणावा असा वेळच फारसा नसतो, हे विसरता कामा नये.
एका ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलं, घरात सगळ्यांना आपापली कामं असतात. आम्ही अधिकची-बिनकामाची म्हणून उपेक्षितासारखं जगायचं असेल तर वेगळं राहणं अधिक आवडेल. वरिष्ठ नागरिकांनी आपल्या लहानमोठ्या गरजा कुटुंबातील कुणाकडूनही पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा न करता जगायला शिकायला हवं. उलट खाण्यापिण्यापासून उठणंबसणं, झोपणं या नित्यकर्मात आपली अडचण होत नाही याचं भान राखायला हवं.
आपल्याकडेच सर्वांचे लक्ष कायम असेल, ही अपेक्षाही चुकीची आहे. मी बाहेरून घरात येतो तेव्हा ‘इडियट बॉक्स’ ऑन असतो, एवढंच नव्हे तर घरातील लहानथोर त्याच्याकडे अशा तन्मयतेनं पाहत असतात की माझ्या आगमनाची नोंदसुद्धा घेतली जात नाही. अशी वेळ तुमच्यावर आली तर तुम्हीही टीव्हीवर चाललेला कार्यक्रम पाहण्यात सामील व्हावं किंवा सुदैवानं तुमची अलग बैठक असेल तर तिथे जावं, यात सगळ्यांचाच मान राखला जाईल. मात्र अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध नसेल तर? तुमची वेगळी खोली नसेल आणि तुम्हाला टीव्हीवरचे कार्यक्रम रुचत नसतील तर त्यात रुची घ्यायच्या प्रयत्नाला लागा आणि हे जमलं नाही तर तुमच्या इच्छेप्रमाणे घरातल्या सगळ्यांचं वर्तन असावं अशा अपेक्षेपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. शक्यता अशी आहे की तुम्ही त्यांच्या कार्यक्रमात भाग घ्यायला लागलात तर तुम्हालाही त्यात रस वाटायला लागेल.
केवळ कुटुंबातच नव्हे तर जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही आपलं असणं - आपलं अस्तित्व इथून पुढे कुणाला भाररूप होता कामा नये. आपल्या असण्याची प्रत्येक ठिकाणी नोंद घेतली जावी ही अपेक्षाही आता कमी व्हावी. अपेक्षा पूर्ववत राहिल्या तर अपमानाची भावनाही वाढण्याची शक्यता वाढते. इथे वरिष्ठ नागरिकांनी मान-अपमान सोडून द्यावा असं सांगण्याचा मुळीच हेतू नाही, आपली ही भावना जागी ठेवूनही तिची हॅलोजन लाइटसारखी प्रखरता कमी करून पणतीसारख्या मंद प्रकाशात परिवर्तित करावी. स्वमान आणि अपमान यातील लक्ष्मणरेषा अगदी पुसट असते.
विनोदाच्या स्वरूपातील एक कथा इथे सांगण्यासारखी आहे. एक राजा रोज सकाळी आपला दरबार भरवून बसत असे. राजाच्या सिंहासनाचे तोंड पूर्वेकडे असल्याने सकाळचे ऊन त्याच्या तोंडावर येई. राजा यामुळे हैराण होई. त्याने आपल्या सेनापतीला सूर्याकडे जाऊन अशी अडचण न आणायला भाग पाडा असं सांगितलं. सेनापती समजूतदार आणि हुशार होता. म्हणाला, ‘महाराज, सूर्य खूप अंतरावर आहे. त्याच्याकडे जाऊन परत यायला मला किमान सहा महिने लागतील आणि खर्चही अमाप येईल.’ राजानं त्याला संपत्ती आणि समय दोन्ही दिलं. तो हुशार सेनापती आपल्या परिवारासह सहा महिने तीर्थाटन करून आला. परत आल्यावर राजाला म्हणाला, ‘महाराज, आपल्या प्रभावाने सूर्य भयभीत झाला. तुमचं वर्चस्व मान्य करून त्यानं क्षमायाचना केली आणि आपली आज्ञा मान्य केली आहे. मोबदल्यात त्यानं एक लहानशी मागणी केली आहे. आपण आपली बैठक फिरवून टाकावी. आपण सिंहासनाचं तोंड फिरवलंत की सूर्य सकाळी आपल्या मार्गात येणार नाही.’ ‘बस, इतकंच? उद्यापासूनच माझी बैठक विरुद्ध दिशेला ठेवा.’ गोष्ट इथेच संपली. सूर्याशी चार हात करता येत नाहीत. परिस्थितीविरुद्धही फार लढता येत नाही. आपणच थोडं तोंड वळवलं किंवा दिशाच बदलून टाकली तर कित्येक प्रश्न निर्माणच होत नाहीत किंवा सोपे होऊन जातात.
क्रमश:
अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर
dinkarmjoshi@rediffmail.com