आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड इनिंग- केसांनी पत्करले वैर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चष्मा, कवळी, श्रवणयंत्र इ. वापर करूनही पाहणं, खाणं व ऐकणं या क्रिया पूर्ववत होत नाहीत, शरीरयंत्र सुरळीत चालायला मदत होत असली तरी उपभोगाचं पूर्ण समाधान मिळत नाही या गोष्टीचाही सहज स्वीकार व्हावा. वयाच्या चाळिशीनंतर डोळ्यांवर चाळिशी आली तर ते परमात्म्याचं पहिलं पत्र समजावं! याचा अर्थ असा की, आता चर्मचक्षूंनी बाहेरच्या जगाकडे पाहणं कमी करून अंतर्दर्शन करायला शिकू.

ज्याप्रमाणे जमिनीतून वर आलेल्या कोंबाचे रोप होते आणि कालांतराने वृक्षाचा आकार धारण करते, त्याचप्रमाणे मनुष्य जीवनात शैशव, किशोरावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि शेवटी वृद्धत्व या अवस्था येतात. या प्रत्येक अवस्थेची निश्चित अशी नैसर्गिक लक्षणे असतात. खरं सांगायचं तर मानवी देहाच्या प्रत्येक नैसर्गिक अवस्थेचं स्वत:चं असं सौंदर्य असतं, त्याचप्रमाणे शरीराच्या विविध इंद्रियांचं सामर्थ्य वा शैथिल्य शरीराच्या त्या वेळच्या नैसर्गिक अवस्थेशी निगडित असेल तर त्यात निसर्गाचा निश्चित असा संदेश असतो. या वस्तुस्थितीचा थोडा अधिक विचार करूया.
निसर्गनियमानुसार आपले केस ऐन पंचविशीत काळेभोर असतात, पन्नाशीत पांढरे व्हायला लागतात आणि साठी उलटल्यावर बहुतेक सगळे पांढरे होतात. केशवदास नावाच्या कवीनं विनोदाने म्हटले आहे,
केशव! केशने असि करी, अरि न करीयो कोई
कांचनवरणी कामिनी, बाबा काही बुलाय!
कवी केशव श्वेतकेशी आहे आणि वृद्धत्वाचं हे लक्षण मानून कुणी यौवना त्याला ‘अहो बाबा!’ असे संबोधते. यामुळे हताश झालेला कवी म्हणतो की, या केसांनी तर एखाद्या शत्रुपेक्षाही अधिक वैर पत्करलं!
पण काळ्याचे पांढरे होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी किमान साठ वर्षे जगायला हवं. हा सहा-सात दशकांचा जीवनसंघर्ष सोपा नसतो. एखादी व्यक्ती जन्मत:च काका, मामा, मावशी वा आत्या बनू शकते, पण आजोबा किंवा आजी बनायला किमान साठ वर्षे जीवनसंघर्ष करायला हवा आणि त्यानंतरही जगायला हवं. याउपरही आजी-आजोबा बनायला नशिबाची साथ हवी. पांढरे केस सहज उगवत नाहीत तसंच आजी-आजोबापण सहज मिळत नाही.
आपण आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत निरोगी, आरोग्यपूर्ण राहण्याचा प्रयत्न करतो यात वावगं काहीच नाही. उलट आरोग्याबद्दलचं हे भान स्वागतार्ह आहे. शरीराच्या सर्व इंद्रियांनी आयुष्याच्या अवस्थेनुसार आपापल्या क्रिया सुरळीतपणे करत राहावं आणि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी जीवन जगता येणं ही ईश्वराची कृपा आहे. मात्र वयाच्या सत्तरीत साठीचा किंवा साठीत पन्नाशीचा आभास निर्माण करण्याची वृत्ती ही मानसिक विकृती नसली तरी या वृत्तीला एक प्रकारचा न्यूनगंड म्हणायला हवं. कृत्रिम रंगरंगोटीनं तरुण दिसण्याचा प्रयत्न करणं हास्यास्पद आहे. तुमच्या या फसवेगिरीनं पाहणारा फसत तर नाहीच, उलट तुमचा न्यूनगंड लक्षात येऊन मनातल्या मनात हसतो. केसाचा कलप असो वा चेह-या वरील सुरकुत्या कमी करण्यासाठीची रंगरंगोटी, त्यानं वय वाढायचं थांबत नाही. एखादा ज्येष्ठ नागरिक जेव्हा असं काही करतो तेव्हा तो एखाद्या मुठीत हवा पकडण्याचा खेळ खेळणा-या नादान बालकासारखा दिसतो.
याचा अर्थ असा मात्र नव्हे की डोळे अधू झाले तर चष्मा वापरायचा नाही, दात पडले तरी कवळी करवून घ्यायची नाही किंवा ऐकायला कमी येऊ लागलं तरी श्रवणयंत्र घ्यायचं नाही. ही सगळी साधनं कृत्रिम असली तरी जीवनयात्रा चालू ठेवण्यात त्यांचं निश्चित योगदान असतं. शक्ती कमी झाल्यावर काठीचा आधार घेण्यात गैर काही नाही. मात्र काठी घेऊन धावण्याच्या शर्यतीत भाग घेणं हास्यास्पद ठरतं.
रसिक झवेरी या गुर्जर लेखकानं आपल्या स्मरणयात्रेत एक प्रसंग नोंदला आहे. वयाच्या साठीत ते लंडनला गेले होते. त्या काळात ते एकदा हेअर कटिंग सलूनमध्ये गेले. तिथल्या केस कापणा-या मुलीनं त्यांना सुचवलं की केवळ पाच शिलिंग ज्यादा घेऊन ती त्यांचे केस काळेभोर करून देऊ शकते. त्यावर हसून रसिकभाई उत्तरले, ‘पोरी, हे केस पांढरे करायला मला साठ वर्षांचं मोल द्यावं लागलं, साठ वर्षांची ही कमाई केवळ दोन-पाच शिलिंग देऊन उधळून टाकू?’ प्रत्येक महिन्याला केसावरून कलप लावण्याचा ब्रश फिरवणा-या ज्येष्ठ नागरिकानं रसिकभार्इंचं हे उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आहे.
बाहेरचं कमी दिसतं, बाहेरचा आवाज कमी ऐकू येतो याचा आध्यात्मिक संकेत असा की, आता पाहण्यासारखं बाहेर नसून आत आहे. बाहेरचा आवाज, कोलाहल खूप ऐकला, आता त्याच्याशी नातं तोडून किंवा कमी करून आत खोल उतरण्याचा काळ आला आहे. दात अधू झाले किंवा पडले तर ईश्वर जणू सुचवत असतो की, सुपारीचे खांड, उसाचे करवे यासारखे कठीण पदार्थ खाण्याचे तुझे दिवस आता समाप्त झाले आहेत. याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की आता पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होऊ लागली आहे, पचायला जड असलेले पदार्थ पोटात ढकलता कामा नये. जो ज्येष्ठ नागरिक या सूचना ऐकेल आणि त्यांचा स्वीकार करेल त्याचा गात्रे शिथिल झाल्याबद्दलचा रोष, असंतोष कमी होईल.
पन्नालाल पटेल हे गुजरातीतले एक आघाडीचे लेखक. आमची पहिली भेट झाली त्या वेळी त्यांचे कान अधू झाले होते. वय 50-55 एवढं असेल. पुढच्या 5-6 वर्षांत भेटीचा योग आला नाही. पुढे जुनागढच्या साहित्य परिषदेत आमची दुस-या ंदा भेट झाली. आता पन्नाभाई स्वत:पाशी एक साधंसं उपकरण बाळगत. एका प्लास्टिकच्या लांब नळीच्या टोकाला जोडलेला लहानसा भोंगा असं त्याचं स्वरूप होतं. माझ्याशी बोलताना त्यांनी त्या यंत्राचं एक टोक आपल्या कानाशी धरून भोंगा माझ्या हातात दिला. अगदी सहज! एकमेकांची खबरबात विचारून झाल्यावर मी म्हटलं, ‘पन्नाभाई, कान कामातून गेले?’
‘अहो, ज्यानं दिले त्यानं परत घेऊन टाकले! मूळ ठेव ज्याची त्याला परत करायला हवी ना!’ अतिशय निरागसपणे पन्नाभाई उतरले.
‘हा भोंगा बरोबर वागवणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल ना?’ मी त्या क्षणी योग्य अशी सहवेदना व्यक्त केली.
‘अहो, त्रास मला नाही, तुम्हाला होतो.’ एखाद्या तिºहाइताबद्दल बोलावं अशा बेफिकीर स्वरात पन्नाभाई म्हणाले, ‘माझं काय, ऐकावंसं वाटेल तेवढं ऐकतो आणि नकोसं वाटलं की नळी कानापासून लांब धरतो. तुम्हाला मात्र मला काही ऐकवायचं असलं तर त्रास घ्यावा लागतो,’ एवढं बोलून पन्नालाल खळखळून हसले होते. क्रमश:
अनुवाद-डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर