आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरातलं रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिहिर शाळेतून घरी आला. त्याने पाठीवरचं ओझं खुर्चीत फेकलं आणि नाक फुगवून जोरात श्वास घेतला. पुन्हा एकदा जोरदार श्वास घेतला. तोंड कसंनुसं करत म्हणाला, ‘आजी हा कुठला गं वास? घरी आल्यावर नेहमी येणारा हा वास नाही!’


‘अरे, आजोबांना जरा बरं नाहीये. त्यांच्या डोक्याला बाम चोळलाय. तोच वास भरलाय घरभर!’ आजीचं बोलणं पुरं होण्याआधीच मिहिर किंचाळला, ‘काऽऽय? डोक्याचा वास?’
मिहिरला एक टप्पल मारत आजी म्हणाली, ‘अरे डोक्याला त्रास म्हणून घरभर वास!’
आजोबा पांघरूण घेऊन कॉटवर पडले होते. मिहिर आजोबांकडे गेला. आजोबांचा हात हातात घेत म्हणाला, ‘आजोबा, तुम्हाला बरं वाटत नाही का? मी तुमच्या डोक्याला बाम चोळू का? बरं वाटेल तुम्हाला.’
मिहिरचा हात धरून आजोबा उठले. आजोबा उठताच मिहिर धावतच किचनमध्ये गेला. एक मोठा चमचा घेऊन आला. त्याच्या हातातल्या चमच्याकडे पाहत आजीने भुवया उंचावल्या. आजोबा पाहतच बसले!
हातातला चमचा नाचवत मिहिर म्हणाला, ‘अहो, तुमच्या डोक्याला बाम लावायचा आहे ना.. म्हणून आणला हा चमचा.’


‘मिहिरू, बाम कधी चमच्याने लावतात का रे?’
‘अहो आजोबा, कपाळाला बाम बोटाने लावतात. पण बाटलीतून बाम काढण्यासाठी मी हा चमचा आणलाय ना! आपण बाटलीतलं लोणचं चमच्याने काढतो आणि हाताने खातो, तसंच!’
‘अरे लोणचं म्हणजे बाम आहे का?’ आजोबांना थांबवत मिहिर झटक्यात म्हणाला, ‘लोणचं म्हणजे काही बाम नाही हे खरंच. पण दोन्ही बाटलीतूनच काढावं लागतं ना? काय?’
पदराला हात पुसत आजी बाहेर आली. मिहिरकडे पाहत भुवया उंचावत म्हणाली, ‘अगदी बरोबर! पण दोन्ही सारख्याच आहेत का रे?’ आता हे ऐकल्यावर मिहिर चांगलाच वैतागला. एका हातात बामची व दुस-या हातात लोणच्याची बाटली घेत तो म्हणाला, ‘दोन्ही बाटल्या सारख्या? अगं दोघींचा आकार आणि त्याचं डिझाइनही वेगळं आहे ना?’
मिहिरला लाडाने जवळ ओढत आजी म्हणाली, ‘हेच तर मी तुला सांगणार होते. बाटलीतल्या वस्तूचा उपयोग कशासाठी करायचा याचा विचार करूनच त्या-त्या बाटलीचं डिझाइन केलेलं असतं. त्यांचा आकार ठरवलेला असतो. आपण बाम बोटानेच लावतो. त्यामुळे बामच्या बाटलीचं तोंड हे एका वेळी एक किंवा दोन बोटं आत जातील एवढंच असतं!’ ‘म्हणजे आता, लोणच्याच्या बाटलीच्या तोंडातून...’ ‘रिकामा चमचा आत जाणार आणि काठोकाठ लोणचं भरलेला चमचा बाहेर येणार! त्यामुळे तिचं तोंड सताड उघडंच पाहिजे.’
‘म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे तुला समजतंय?’
मिहिर किंचाळत म्हणाला, ‘मला आणखीन एक गोष्ट समजली. दंतमंजन म्हणजे टूथपावडर कधीच ट्यूबमध्ये मिळत नाही. कारण दंतमंजन हातावर घेऊन बोटावर घ्यायचं आणि बोटाने चोळायचं. जर का दंतमंजन ट्यूबमध्ये भरलं तर ट्यूब दाबल्यावर त्याचा फवाराच उडेल ना? काय?’
‘आणि आजी, टूथपेस्ट कधीच बाटलीत मिळत नाही. कारण टूथपेस्ट डायरेक्ट ब्रशवरच लावायची असते ना? त्यामुळे ती ट्यूबमध्येच हवी.’
‘अरे, इतकंच नव्हे तर टूथब्रशची रुंदी आणि टूथपेस्टचं तोंड यांचं एकमेकांशी असणारं प्रमाण ही ठरलेलं आहे. म्हणजे...’
आजोबांना थांबवत उतावीळपणे मिहिर म्हणाला, ‘म्हणजे, आजोबा, तुमच्या डोळ्यात मलम घालायच्या ट्यूबचं तोंड का लहान आहे आणि या टूथपेस्टचं का मोठं आहे? हे आता मला एकदम सही समजलं!’
आता मिहिरचं डोकं वेगात काम करू लागलं.
शाम्पूची बाटली आणि कंडिशनरची बाटली.निरनिराळ्या औषधांच्या गोळ्यांच्या बाटल्या व कफ सिरपच्या बाटल्या. खायच्या तेलाची बाटली आणि डोक्याला लावायच्या सुवासिक तेलाची बाटली. फिनेलची व टॉयलेट क्लीनरची बाटली. टॅल्कम पावडरचे डबे. लिपस्टिकची रचना. जॅमची बाटली व चहाची बरणी. या सगळ्यांकडेच तो आता वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्यांच्या डिझाइनमागे लपलेलं रहस्य त्याला उलगडू लागलं! वापरणा-या माणसाला कमीत कमी त्रास व्हावा, अधिकाधिक आराम मिळावा असं काहीतरी खास, त्या प्रत्येक डिझाइनमध्ये होतंच. मिशीवरून हात फिरवत आजोबा म्हणाले, ‘खरं म्हणजे, सगळीच घरं रहस्यमय असतात. घराचं रहस्य कळलं तर घराचा चांगला उपयोग करता येतो.’ आजोबा काय बोलताहेत ते मिहिरला कळलंच नाही. तो दोन्ही हात खिशात घालून आजोबांकडे पाहतच राहिला.
आजोबा हसत म्हणाले, ‘हे पाहा, तुझे दोन्ही हात घरात गेलेत. म्हणजे तुझ्या खिशाचा आकार केवढा पाहिजे. माझा नव्हे तर, तुझा हात जाईल एवढा! कारण ते तुझ्या हाताचं घर आहे ना! कळलं? आपल्या घरातच खूप घरं आहेत. सीडीचं घर, पुस्तकांचं घर, चष्म्याचं घर, कपड्यांचं घर...’
हात उंचावत मिहिर म्हणाला, ‘थांबा! या घरांची रहस्यं मी शोधून काढीन. पण आजोबा, तुमचं अजून डोकं दुखतंय?’ हळूच हसत आणि आजीकडे पाहत ते म्हणाले, ‘अंऽऽ ते पण एक रहस्यच आहे बुवा!’ तुम्हाला काय वाटतं, मिहिरने शोधली असतील घरातल्या घरांची रहस्यं? आणि तुम्ही कधी शोधणार अशी रहस्यं? मी तुमच्या ‘रहस्यपत्रांची’ वाट पाहातोय.